बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 710

जळगाव जिल्हा परिषदेची कामात आघाडी; अनेक विभागात कौतुकास्पद काम – पालकमंत्री गुलाबराव पाटील

रकुल योजनेतही जिल्याने उमटवला ठसा

जळगाव दि. ६ (जिमाका):  जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या खर्चामध्ये जळगाव जिल्हा परिषदेने मोठी आघाडी घेतली असून निधी खर्चात राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याने शासन दरबारी देखील जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे गौरवोद्गार पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी  बाबुलाल पाटील, महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत आदी उपस्थित होते.

गाव पातळीवर जे शेतकरी मेहनत करून काम करतात व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतीच्या शाश्वत विकासाची कास धरतात अशा शेतकऱ्यांचा आज सत्कार होत आहे ही खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे. शाश्वत शेतीसाठी जलस्रोत आवश्यक असून या कार्यक्रमात पुरस्कार मिळत असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध जलस्रोतांचा योग्य प्रकारे वापर करून उत्कृष्ट शेती केली असे कौतुक पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित होती. मात्र खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांची ही मागणी या माध्यमातून पूर्ण झाली असल्याने आता अंगणवाडी सेविकांना देखील उत्कृष्टपणे काम करता येणार आहे. अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन असून लवकरात लवकर याबाबतची घोषणा होणार असल्याचे देखील पालकमंत्र्यानी यावेळी सांगितले.

घरकुल योजनेतही जिल्ह्याने उमटवला ठसा

घरकुल महाअवास योजनेत जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व या संबंधित इतर अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, अधिकारी आणि शासकीय यंत्रणा या विकासाच्या रथाची दोन चाके असून या दोन्ही चाकांनी व्यवस्थितरित्या काम केल्यास जिल्ह्याचा विकासाचा रथ नेहमीच पुढे जात राहील. जिल्ह्यात नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विविध विकास कामे सुरू आहेत. जेथे ज्या बाबीची आवश्यकता आहे अशा मूलभूत सुविधायुक्त बाबी त्या-त्या ठिकाणी पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण वाहिकेशिवाय राहणार नाही असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

ई – सायकलच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मिळाला वेगवान पाय

या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलचे वितरण करण्यात आले आहे. ई -सायकलच्या माध्यमातून हाताने सायकल चालवण्याच्या मोठ्या विक्रीच्या समस्येतून दिव्यांग बांधव मुक्त होणार आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेल्या ही सायकलच्या माध्यमातून या दिव्यांग बांधवांना जणूकाही एक प्रकारे पायाच मिळाले आहेत. आता त्यांचा वेग वाढल्याचे सांगून धरणगाव तालुक्यात 500 दिव्यांग बांधवांना अशा सायकली वाटल्यामुळे त्यांच्यात मोठा आत्मविश्वास आल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप, अंगणवाडी सेविकांसाठी प्राप्त झालेल्या स्मार्टफोनचे वाटप, आदर्श शेतकरी पुरस्कारांचे वितरण, तसेच महाआवास योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित म्हणाले की, अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झालेल्या स्मार्टफोनमुळे अंगणवाड्यांमधील बालके तसेच कुपोषित बालकांबाबतची मूलभूत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामांवर निधी खर्च करण्यात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यास वाव मिळाला आहे.

महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प संचालक देवेंद्र राऊत म्हणाले की, केंद्र सरकारच्या पोषण आहार योजनेअंतर्गत 4 हजार 96 स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या स्मार्टफोनच्या माध्यमातून बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप तसेच कुपोषणाच्या नोंदी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे.  घरकुल योजने संदर्भातली माहिती देताना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की अमृत आवास योजना, शबरी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, तसेच मोदी आवाज योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुडे मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्ह्याने मोठी कामगिरी केली असल्यामुळे घरकुलांमध्ये दिलेली उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली आहे. यावेळी उत्कृष्ट शेतकरी म्हणून अनिल राजाराम ताडे शिरसोली तसेच भगवान फकीरचंद पाटील, गाढोदा यांना शाल श्रीफळ पुष्पहार तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणारे गट विकास अधिकारी यावल ग टविकास अधिकारी बोदवड, जामनेर धरणगाव भुसावळ येथील गट विकास अधिकाऱ्यांना देखील गौरविण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोरगाव तालुका जामनेर देवगाव तालुका पारोळा खेडगाव तालुका एरंडोल हिंगणा बुद्रुक तालुका अमळनेर, कानडा तालुका जळगाव व चिंचोली तालुका यावल येथील सरपंच ग्रामसेवक यांना देखील पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळालेले अनिल ताडे यांच्या पत्नी मनीषा ताडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी मनोगत व्यक्त केले. तर अंगणवाडी सेविकांमधून प्रेमप्रताप पाटील यांनी प्राथमिक स्वरूपात मनोगत व्यक्त करून शासकीय यंत्रणेचे आभार मानले. विलास बोंडे यांनी सूत्रसंचालन तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी आभार मानले.

०००

वाड्या-पाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. ६ (जिमाका): जिल्ह्यातील प्रत्येक वाडा, पाडा आणि तेथील नागरिकांच्या आत्मनिरर्भतेसोबत भजन, अध्यात्म, क्रीडा यासारख्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक केली जाईल. तसेच नागरिकांच्या वैयक्तिक विकासासोबतच सामूहिक विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

अक्कलकुवा येथे तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून विविध वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना साहित्य व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य प्रताप वसावे व पंचक्रोशील सरपंच, स्थानिक अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, अक्कलकुवा तालुक्यातील विद्युतीकरणासाठी लवकरच १३२ के.व्ही.चे विद्युत सबस्टेशन उभारण्याबरोबरच भगवान बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागात बारमाही रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोंमैल होणारी पायपीट थांबवून जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. शेतात विजेसोबत सिंचनसुविधा निर्माण करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू असून मुख्यतः आदिवासी बांधवांना शेती अवजारे, कोंबड्या, बकऱ्या, गाईंच्या वितरणातून आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करण्याबरोबरच एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी अल्प दरात कर्ज दिले जाणार आहे. याशिवाय आदिवासी तरुण-तरुणींसाठी प्रशिक्षण, खावटी कर्ज, मृदसंधारण, वनीकरण अशा योजनाही राबवल्या जात असून केंद्रीय सहाय्याच्या योजनांतूनही घरे बांधणे, महिलांना शेतीपूरक उद्योग अथवा जोडधंद्यासाठी सहाय्य, बांबू रोपवाटिका लागवडीचे प्रशिक्षण याशिवाय निरनिरळ्या ठिकाणांच्या गरजांनुसार काही विशेष, अभिनव व तातडीच्या योजना उत्पन्नवाढीच्या, प्रशिक्षणाच्या वा इतर कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आदिवासी विकास विभागामार्फत सुरू आहे.

या कार्यक्रमात जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी यांचीही भाषणे झाली.

आज झालेल्या कार्यक्रमात

गॅस जोडणी- ६२९, शेळी महिला बचत गट- ३१, गाय गट निवड पत्र-१२१ (अक्कलकुवा),७१ (तळोदा), वैयक्तिक वन हक्क शेळी गट-११६, क्रिकेट साहित्य- ११० टीम्स, ४७ बचत गटांन प्रत्येकी १० हजार रूपयांचे धनादेश वितरण, २५३ भजनी मंडळांना साहित्य वितरण करण्यात आले.

०००

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई येथून प्रयाण

दिनाक 6 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथून भारतीय वायु सेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, आमदार अमित साटम, आमदार योगेश सागर तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, तसेच  राजशिष्टाचार व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित

मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या एक वर्ष ८ महिन्यात २५,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तत्काळ सुरू केला. मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही. पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष प्रमुख श्री. चिवटे यांनी केले आहे.

0000

रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ई-पॉस मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय

मुंबई, दि. 6 : रेशन दुकानांमध्ये आता 4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार/गैरव्यवहार थांबविण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रास्तभाव दुकानांमध्ये 2जी/3जी ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या होत्या. सदर सेवा देणाऱ्या संस्थाचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानांमध्ये नविन ई-पॉस मशिन बसविण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार ओयॅस्तिस विजनटेक आणि इंअैग्रा या तीन 3 सिस्टम इंटीग्रेटर  संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर कंपन्या सोबत नुकताच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आला आहे. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपसचिव नेत्रा मानकामे, अवर सचिव पूजा मानकर, कक्ष अधिकारी आशिष आत्राम यांच्यासह संबंधित संस्थाचे प्रतिनिधी मंजुनाथ, राजेंद्र नझरबागवाले व गिरीष पालकर उपस्थित होते.

रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नविन ई-पॉस मशिन 4जी व आयरीस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधारकार्ड वरील फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी? हा मोठा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागला आहे. शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना ‘IRIS स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे. सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने रेशन दुकानावरील अन्न धान्य वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना रेशन सहज व सुलभतेने उपलब्ध होणार असल्याचे विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/स.सं/

रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा

 मुंबई, दि. 6 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

प्रधानमंत्री यांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले होते.

प्रधानमंत्री लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.

मागील पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.

सर्व प्रकल्प आणि विकासकामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

0000

लातूरच्या पथदर्शी कामाचा इतर जिल्ह्यांनी आदर्श घ्यावा – विभागीय आयुक्त श्री. मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगर,दि. 5 (विमाका) :- लातूर जिल्हयाने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. मराठवाडयातील इतर जिल्हयांनीही लातूरच्या पथदर्शी कामाचा आदर्श घ्यावा, लातूरप्रमाणेच आपल्या जिल्हयातही पथदर्शी काम उभे करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. मधुकर राजे अर्दड यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 2020-21 व 2022-23 या वर्षातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनमोल सागर, उपायुक्त सुरेश बेदमुथा, डॉ. सीमा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले, लातूर जिल्हा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहीला आहे. गुड गर्व्हर्नसमध्येही जिल्ह्याने पथदर्शी काम केले आहे. लातूरचा एक पॅटर्न आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच लातूर जिल्हयाने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. मराठवाडयातील इतर जिल्हयांनीही लातूरच्या पथदर्शी कामाचा आदर्श घेत आपल्या जिल्हयातही पथदर्शी काम उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पंचायतराज व्यवस्थेत पुरस्कार प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव करून श्री. अर्दड म्हणाले,  मराठवाडयात  पंचायतराज व्यवस्थेत चांगल्या पध्दतीने काम सुरू आहे. पर्यावरण क्षेत्रात कामाची गरज असून यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाातचा आहे. पर्यावरणाचा समतोल जपला गेला पाहीजे. गावशिवारात हिरवाई जपण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक घटकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

2020-21 विभागीय स्तर प्रथम क्रमांक पंचायत समिती लातूर रू. 11 लक्ष, द्वितीय क्रमांक पंचायत समिती नांदेड रू. 8 लक्ष, तृतीय क्रमांक पंचायत समिती शिरूर अनंतपाळ, जि. लातूर रू.6 लक्ष. धनादेश आणि स्मृतीचिन्ह यांचे  विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सन 2022-23 जिल्हा परिषद लातूर यांना राज्यस्तरीय तृतीय क्रमांक रू.17 लक्ष, पंचायत समिती लातूर यांना राज्यस्तर प्रथम क्रमांक रू.20 लक्ष, पंचायत समिती लातूर यांना विभागस्तर प्रथम क्रमांक रू.11 लक्ष, पंचायत समिती जळकोट, जि.लातूर यांना विभागस्तर द्वितीय क्रमांक रू.8 लक्ष, पंचायत समिती, अर्धापूर जि.नांदेड यांना विभागस्तर तृतीय क्रमांक रू.6 लक्ष असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. डॉ. सीमा जगताप यांनी आभार मानले. विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नंदुरबार तालुक्यात ३ हजार २३६ नागरिकांना देणार शबरी योजनेतून घरकुले – डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 05 मार्च 2024 (जिमाका वृत्त) – नंदुरबार तालुक्यात ३ हजार ३३६ पात्र आदिवासी बांधवांना शबरी योजनेतून घरकुले देण्याचा मानस आहे. तसेच कामगार, मजूर बांधवांना आवश्यक असलेली गृहोपयोगी भांडी तसेच मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शनही दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित शबरी घरकुल योजनेचे आदेश वाटप व कामगार कल्याण मंडळाच्या गृहोपयोगी वस्तुंच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावित, अर्चना गावित नटावदच्या सरपंच जयश्री गावित नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे आम्ही लोकसेवक आहोत. येथील नागरिकांचे गुजरात राज्यातील स्थलांतर रोखण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या सर्व उपाययोजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यास कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील पेयजल, सिंचनासाठी पाणी, दळणवळण, आरोग्य संस्थांचे निर्माण आणि विस्तारीकरण त्याच बरोबर शेतीपूरक उद्योगासाठी भरीव अशा निधी आणि उपक्रमांची तरतूद करण्यात आली आहे. जन्मापासून मनुष्याचे संपूर्ण जीवन समृद्ध करणाऱ्या योजना शासनाच्या आहेत. अलिकडे गेल्या १० वर्षात जीवनमान उंचावणाऱ्या योजना तळागाळातल्या माणसांसाठी केंद्र व राज्य शासनाने तयार केल्या आहेत. या सर्व योजना जिल्ह्यात पोहचवण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान सुधारण्याचे आवाहन यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले.

पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांसाठी वरदान ठरली असून आजतागायत जिल्ह्यात अडिच लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आल्याचे यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले.

 

000

वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 5 : ‘जंगल से जीवन के मंगल तक’ आणि ‘वन से धन तक’ या संकल्पनेवरच वन विभाग काम करीत आहे. वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे. त्यामुळे या भवनातून वन संवर्धन आणि वनांची सुरक्षेचे काम होईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

नवीन वनभवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता (वन्यजीव), ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनरंक्षक कुशाग्र पाठक, जितेश मल्होत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर – नागपूर रस्त्यावर जवळपास 8153 चौ. मी. वर नवीन वनभवन उभे राहत आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथे कार्यरत असलेले सात विविध कार्यालये एकाच छताखाली आता येणार आहे. वन संवर्धन आणि वनांची सुरक्षा या भवनातून होईल. राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे प्रगतीच्या विविध क्षेत्रात अधोरेखांकित झाले आहेत. आपल्या राज्याचा वनविभाग हा उत्तम व्हावा, यासाठी आपण सर्वजण संकल्प करू या, असे आवाहन त्यांनी केले.

वनविभागाचा सुवर्णकाळ :  सध्या वनविभागाचा सुवर्णकाळ सुरू आहे. इतर विभागांनी हेवा करावा, असे काम वनविभागात होत आहे. यासाठी वरिष्ठ अधिका-यांसह गावस्तरावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचा-यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे अतिशय बुध्दीमान आणि संयमी अधिकारी आहेत. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता हे कल्पक अधिकारी आहेत, असे गौरवोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

असे राहील नवीन वनभवन : चंद्रपूर – नागपूर रस्त्यावर सिव्हील लाईन येथे 60 कोटी 92 लक्ष रुपये खर्च करून नवीन वनभवन साकारण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर (2229.74 चौ.मी.) मुख्य वनसंरक्षक कार्यालय, पहिल्या माळ्यावर (1507.82 चौ.मी.) उपवनसंरक्षक, मध्यचांदा विभाग कार्यालय, दुस-या माळ्यावर (1497.05 चौ.मी.)  विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग कार्यालय, तिस-या माळ्यावर (1497.05 चौ.मी.) विभागीय वन अधिकारी, चवथ्या माळ्यावर (1421.63 चौ.मी.) विभागीय वन अधिकारी, मुल्यमापन विभाग आणि संशोधन विभाग राहणार आहे. याशिवाय वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक कक्ष, संरक्षण भिंतीचे बांधकाम, सिमेंट काँक्रिट अंतर्गत रस्ते बांधकाम, सिमेंट नाली बांधकाम, वाहनतळ, वाहनशेड, पेव्हींग ब्लॉक, फर्निचर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, जलपुनर्भरण व पाणी साठवण टाकी, बागबगीचा व लॅन्डस्केप, म्युलर, पेंटींग व स्क्लप्चर, पाणी पुरवठा व मलनि:सारण आदी कामे करण्यात येणार आहे.

 

०००

कारागृह हे सुधारगृह व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 5 मार्च : कारागृहात राहणे, ही म्हटले तर शिक्षा आहे आणि एका दृष्टीने दीक्षाही आहे. वाल्याचा वाल्मिकी झाल्याची कथा सर्वांनी ऐकली आहे. आज तुम्ही सारे आंधारात आहात, कदाचित चांगल्या वर्तणुकीने उद्या प्रकाशात याल. बाहेर आल्यानंतर तुमच्या हातून उत्तम काम व्हावे, यासाठी हे केवळ कारागृह न राहता सुधारगृह व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

जिल्हा कारागृह येथे वरिष्ठ तुरंगाधिकारी निवासस्थानाचे भूमिपूजन व महिला – पुरुष बंदीसाठी स्वतंत्र बॅरेक्सचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, अभियंता श्री. येरगुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतिश सोनवणे, नागेश कांबळे, तुरुंगअधिकारी महेश माळी, जनरल सुभेदार महेंद्र हिरोळे आदी उपस्थित होते.

येथील निवासस्थान व इतर सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, क्षमतेपेक्षा जास्त संख्या या कारागृहात आहे. चार वर्षांपूर्वी येथील व्यवस्थेची पाहणी केली असता विविध सोयीसुविधांसाठी 14 कोटी रुपये दिले. हा केवळ तुरुंग न राहता हे सुधार केंद्र व्हावे, यासाठी 33 कोटींची मागणी करण्यात आली आहे. कारागृहाची क्षमता 486 असून सद्यस्थितीत येथे 720 कैदी आहेत. त्यामुळे क्षमतेमध्ये तसेच सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या सुचना प्रशसनाला दिल्या आहेत.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथे वाचनालय आणि खेळाचे प्रकार आहेत. कैद्यांना वाचण्यासाठी उत्तमातीत उत्तम पुस्तके आपण स्वत:च्या ‍निधीमधून देण्यासाठी तयार आहोत. प्रत्येकाच्या मनात द्वंद सुरू असते. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पुस्तके वाचली तर मनातील द्वंद संपुष्टात येऊ शकते. या कारागृहात आयुष्याचे तत्व शिकण्याचे, उत्तम संस्काराचे शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी कारागृह परिसरात असलेल्या हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा यांच्या दर्ग्याला भेट देऊन पाहणी केली. तसेच चादर चढवून प्रार्थना सुद्धा केली. सोबतच कारागृहाच्या नवीन बराकीचे आणि येथे कैद्यांसाठी नव्याने बांधलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

14 कोटी रुपयांतून झालेल्या सुविधा

चंद्रपूर जिल्हा कारागृहात 500 बंद्यांकरीता नवीन बॅरेक्सचे बांधकाम व अन्य अनुषंगिक कामांतर्गत पुरुष बंद्यांकरीता 2 बॅरेक इमारतींचे बांधकाम, महिला बंद्यांकरीता बॅरेक इमारत, पुरुष विभक्त बंदी कक्ष, महिला विभक्त बंदी कक्ष, दवाखाना, तपासणी कक्ष, पुरुष कक्ष, महिला कक्ष, औषध भांडार आदी कामे करण्यात आली आहेत.

 

000

ताज्या बातम्या

पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड....

0
पुणे दि.१४: पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न...

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणीची कामे तातडीने पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता...

0
मुंबई, दि 14 : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावांसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांकरिता मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), जिल्हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू – सांस्कृतिक कार्यमंत्री...

0
पुणे, दि. १४ : पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक...

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे ‘भूषण’

0
मुंबई दि १४ : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ...