गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 71

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात येतील. कौशल्य विकास विभागाकडे जवळपास ६ हजार कोटींचा निधी उपलब्ध असून या मधून राज्यातील सर्व आयटीआय चे सक्षमीकरण करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
सातारा एमआयडीसी येथील मास भवन मध्ये  उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी, इंडस्ट्रियल मिट चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मनोज घोरपडे, श्रीमती प्रिया महेश शिंदे, उद्योग विभागाचे सहसंचालक चंद्रकांत ढेकणे, मासचे अध्यक्ष संजोग मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, उद्योगजगात आणि शासन यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. उद्योगजग आनंदी असेल तर विकासाला हातभार लागतो. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चंगली आहे. अनेक उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक आहेत. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तरुण पिढीला नवनवीन कौशल्य वृध्दी झाल्यास त्यांच्याही हाताला काम मिळेल या कौशल्य विकासासाठीच आयटीआय मध्ये नवनवीन कोर्सेस सुरु केले जात आहेत. पार्ट टाईम प्रशिक्षण कोर्सेंसही लक्षात घेवून सुरु करता येतील. मासमध्येही सातारा येथील उद्योगांना पूरक ठरेल असे स्किल सेंटर उभे करावे. त्याला 30 दिवसात आवश्यक त्या सर्व परवाणग्या व निधी उपलब्ध करुन देता येतील.
या इंडस्ट्रियल मिटमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उद्योजकांशी मोकळेपणाने संवाद साधून कुशल मनुष्यबळ विषयक त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर सकारात्मक पावले टाकण्यात येतील, असे आश्वस्त केले.
यावेळी आमदार मनोज घोरपडे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी जमिन यासर्वच बाबतीत संपन्न आहे.  पुढील काळात या ठिकाणी मोठया प्रमाणात नवनवीन उद्योग यावेत, यासाठी सर्वातोपरी प्रयत्न केले जातील.
या  याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील अनेक उद्योजक आयटीआय चे प्राचार्य उपस्थित होते.
0 0 0 00

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे निर्देशही दिले.

एमआयडीसी येथील मास भवन येथे सर धनाजीशा कूपर सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण संचालनायातील प्राचार्य व कर्मचाऱ्यांचा जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. या जनसंवाद कार्यक्रमास आमदार मनोज घोरपडे, कौशल्य विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, प्रिया शिंदे, विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.

विविध संस्थांच्या व शासनाच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सेायी-सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे, असे सांगून मंत्री श्री. लोढा म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील प्रत्येक तरुण तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या जर्मन शेडची उभारणी करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी बाह्यस्थ प्रशिक्षकांरोबर  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. या शिक्षकांना वाढीव मानधही देण्यात येणार आहे. यातून युवक रोजगारक्षम झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे.

अनेक वर्षापासून ताशी मानधन तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. जे शिक्षण परीक्षेत पास होतील त्यांना जागी कायम स्वरुपी ठेवण्यात येईल. जनसंवाद कार्यक्रमामध्ये देण्यात आलेल्या निवेदन व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मंत्री लोढा यांनी दिली.

जनसंवाद कार्यक्रमामध्ये मांडण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्न मंत्री महोदय सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा आमदार श्री. घोरपडे यांनी व्यक्त केली.
000000

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व निर्भय पारपडतील असे नियोजन करा – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

  • मनुष्यबळ, मतदानयंत्र व मतदान केंद्रनिहाय आढावा
  • मतदानयंत्रांच्या उपलब्धतेसाठी समन्वय अधिकारी
  • मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या

 नागपूर, दि. २३ :  जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क सूलभपणे बजावता यावा तसेच निवडणूक प्रकिया पारदर्शक व निर्भयपणे पारपाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिल्यात.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा श्री. वाघमारे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तसेच निवडणुकी संदर्भातील सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषद, 55 नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र, एकूण मतदारांची संख्या त्यानुसार मतदान केंद्रांची रचना करतांना मतदारांना सूलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने मतदान यादी तयार करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना, श्री. वाघमारे यांनी यावेळी दिल्या.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदार संख्येमध्ये झालेल्या वाढीनुसार मतदान केंद्रामध्ये वाढ करण्यात यावी तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा निर्माण करतांना दिव्यांग मतदारांना मतदान करतांना अडचण जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच आदर्श मतदान केंद्र, पिंक मतदार केंद्र तयार करावे. मतदारांना मतदान करतांना अडचण जाणार नाही यादृष्टीनेही आवश्यक तयारी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मतदान यादीचे मतदान केंद्रनिहाय विभाजन करतांना 1 जुलै 2025 ची यादी ग्राहय धरण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मध्यप्रदेश राज्य निवडणूक आयोगासोबत करार करण्यात आला आहेृ, त्यानुसार मतदान यंत्र उपलब्ध होणार आहेत. तसेच ईसीआयकडून 50 हजार कंट्रोल युनिट तसेच 1 लक्ष बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राची वाहतूक करावी. तसेच मतदान यंत्र ठेवण्यासाठी आवश्यक शासकीय गोदामाची व्यवस्था करावी, प्रत्यक्ष मतदानापूर्वी मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करावी तसेच प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेतांना मतदान केंद्रांची संख्या, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांचे नियोजन तसेच मतदान यंत्रांची आवश्यकतेनुसार एकाच प्रकारचे यंत्र उपलब्ध होतील यादृष्टीने विभागीय स्तरावर समन्वय अधिकारीची नियुक्ती करावी तसेच मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष लक्ष द्यावे यावेळी त्यांनी सांगितले.

विभागात 4 जिल्हा परिषदा, 55 नगर परिषदा व नगर पंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने पूर्वतयारीचा आढावा सांगतांना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी म्हणाल्या की, जिल्हा परिषदेसाठी 1 जुलै 2025 च्या मतदार यादीनुसार 40 लाख 23 हजार 029 मतदार असून मतदानासाठी 6 हजार 441 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहे. या मतदानासाठी 7 हजार 280 कंट्रोल युनिट व 16 हजार 288 बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 55 नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये 18 लाख 12 हजार 167 मतदारांची संख्या आहे. यासाठी 2 हजार 378 मतदान केंद्र राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे निवडणूक पूर्वतयारीला सुरूवात करण्यात आली आहे.

नागपूर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 च्या यादीनुसार 24 लाख 84 हजार 250 मतदार संख्या असून यासाठी 3 हजार 150 मतदान केंद्र प्रस्तावित आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध राहावे यासाठी महानगर पालिकेतर्फे उपाययोजना करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पारपाडण्यासाठी मतदान यंत्राची उपलब्धता तसेच आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याला प्राधान्य असल्याचे महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय सादरीकरण करुन स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीसाठी करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचे सादरीकरण केले.

राज्य कामगार विमा योजनेचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, दि. २३ : राज्य कामगार विमा योजना ही केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून यांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामकाजाबाबतच्या आढावा बैठकीत श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्य कामगार विमा महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी सुकांतचंद्र दास, कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बाळकृष्ण रंगदळ, बिबवेवाडी येथील विमा महामंडळाच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकक्षक डॉ. अभिमन्यू पांडा आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, या योजनेत कामगारांची नोदणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तळेगाव, रांजणगाव, चाकण, इ. कामगार असोसिएशनचे सहकार्य घ्यावे. एमआयडीसी मधील विविध कंपन्या तसेच इतर आस्थापनांनी कामगारांच्या विमा नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन करावे व यामाध्यमातून जास्तीत जास्त कामगारांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्य कामगार विमा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उद्दीष्ट निश्चित करुन जास्तीत जास्त कामगारांपर्यंत या योजनेचा प्रचार प्रसार करुन पुणे जिल्ह्यातील २१ कामगार सेवा दवाखान्यात नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, बिबवेवाडीच्या कामगार रुग्णालयाचे काम उत्तमप्रकारे सुरू असून त्याठिकाणी दुय्यम आरोग्यसेवा चांगल्याप्रकारे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणेच पुणे जिल्हा रुग्णालयात उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करावा. तसेच पुणे जिल्ह्यातील कामगारांसंबंधित सर्व आस्थापनांनी समन्वय साधून विमा कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करुन एक महिन्यात उद्दीष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण यांनी कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली व या योजनेत विमा रुग्णांच्या उपचारासाठी कोणतीही उच्चतम मर्यादा नसल्याने सर्वात चांगली योजना असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
०००००

रुग्णालयांनी गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा तत्परतेने लाभ द्यावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, दि. २३: धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांना तत्परतेने लाभ देण्याकरिता पुढाकार घ्यावा,  या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयानी नोंदणी करुन घ्यावी, याकामी राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

यशदा येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. आबिटकर म्हणाले, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या योजना आहे. धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत जिल्ह्यात विविध रुग्णालये नोंदणीकृत असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आजारपणाच्या काळात सकारात्मक पद्धतीने मदत करण्याची भावना ठेवावी. त्यांची सेवा करण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.

धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी तत्परतेने काम करावे, शासनाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना खाटा उपलब्ध करुन द्याव्यात.

पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या तसेच वैद्यकीय उपचाराकरिता येणाऱ्या खर्चाचा विचार करता धर्मादाय रुग्णालयाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, सेवा दिल्यानंतर रुग्णाच्या मनात रुग्णालयाप्रती समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.

डॉ. शेटे म्हणाले,  शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयांनी पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देवून सहकार्य करावे, याकामात हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत रुग्णालय व्यस्थापनाने दक्षता घ्यावी, असेही डॉ. शेटे म्हणाले.

राज्य कामगार विमा रुग्णालयाची पाहणी

पिंपरी-चिंचवड मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी भेट देऊन बाहय रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषधी भंडार,आहार कक्षाला  भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. येथील रुग्णांशीही संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.

रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरिता डॉक्टर व प्रशासनानी काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात, अशा सूचना श्री. आबीटकर यांनी  केल्या.

00000

खेळाडूंना अधिक सुविधा देण्यासाठी निधी व्यवस्थापनात संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २३ : राज्यातील खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाच्या निधीचे पारदर्शक आणि सुसूत्र व्यवस्थापन करण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

क्रीडा विभागातील विविध योजनांसाठीचे अनुदान व निधीचा प्रभावी वापर आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी बँकांच्या मदतीने डिजिटल प्रणाली लागू करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसचिव सुनील पांढरेउपसंचालक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले कीराज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत क्रीडा सुविधा पोहोचाव्यात यासाठी निधीचे पारदर्शक आणि नियमबद्ध व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी खासगी बँकांच्या समन्वयाने नियम व कार्यपद्धतीचे पालन करीत योग्य कार्यवाही करण्यात येईल. तसेच क्रीडा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा आणि सुरक्षाविषयक इतर लाभ मिळावेत यासाठी देखील या प्रणालीद्वारे उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या कामांना गती देण्याचे निर्देश – अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २३ : प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामे करण्याकरता आवश्यक प्रस्ताव सादर करणेअल्पसंख्याक बहुल ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रातील वस्तीमध्ये पायiभूत सुविधा निर्माण करण्याकरिता वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे तसेच शासनाच्या विविध योजनाची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  निर्देश दिले.

या कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिव रूचेश जयवंशीसहसचिव किरण वाघोलअवर सचिव मिलिंद शेणॉय तसेच राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.भरणे म्हणाले कीप्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक बहुल क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा उभारणेमागास भागांचा विकास आणि सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कामे सुरू आहेत. विभागाकडून मिळणारा निधी योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. निधी उपयोगिता प्रमाणपत्र सादर झाल्यास पुढील निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देता येईल.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

वक्फ मंडळाच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करा – अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २३ : परभणीसह राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर अतिक्रमण व बेकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

मंत्रालयात आयोजित बैठकीत आशुरखाना नाले हैदर (परभणी)हजरत मोहम्मद हनीफ मस्तान रहेमान सैलानी (वाशिम)पीर साहेब सय्यद रहिमुद्दीन दर्गाह ट्रस्ट (उरण) आणि ईदगाह व्यवस्थापन कमेटी (लातूर) या वक्फ संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सचिव रूचेश जयवंशीमुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सिंहअवर सचिव मिलिंद शेनॉयतहसिलदार संदीप राजपुरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीवक्फ मंडळाच्या जागांवर अतिक्रमण आढळल्यास प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर योग्य ती कारवाई करावी. जागेवरील दुकाने अथवा मालमत्तांचे संपुष्टात आलेले भाडेकरार नव्याने करण्यात यावेत. संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना याबाबत सूचना द्याव्यात.

तसेच वक्फ संस्थांमधील गैरव्यवहारांबाबत तक्रारींची चौकशी करून अहवाल पुढील दहा दिवसांत सादर करण्याचेही आदेश श्री. भरणे यांनी दिले.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची प्रारंभिक प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. २३ : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे यास अधिकृत मान्यता दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, १९७४’ च्या अधीन राहून केले जाते.

उपराष्ट्रपतीपदाच्या २०२५ मधील निवडणुकीसाठी आयोगाने आवश्यक तयारीस आरंभ केला असून, ही प्रारंभिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निवडणुकीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

या निवडणुकीपूर्वी करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कार्यवाहीमध्ये लोकसभा व राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश असलेल्या निर्वाचक मंडळाची तयारी, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक आणि पूर्वी झालेल्या सर्व उपराष्ट्रपती निवडणुकांचे संदर्भ साहित्य तयार करणे व प्रसारित करणे या गोष्टींचा समावेश आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २३ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या १५० दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असलेली विविध कामे, उपक्रमांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज आढावा घेतला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव संजय दशपुते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले, राज्यातील विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी १५० दिवसांच्या कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने विहित कालमर्यादेत काम करून विकास कामाबरोबरच प्रशासकीय कामातही विभागाचे वेगळेपण सिद्ध करावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५० दिवसाच्या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले, विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. यामध्ये सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध,अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती, सेवाज्येष्ठता आणि पदोन्नतीची प्रक्रिया यावर वेगाने काम करावे.

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून काम करणे गरजेचे आहे. यासाठी व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मुदतीत पूर्ण करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारत बांधकाम प्रकल्पांचा आढावा एका बैठकीत घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव संजय दशपुते आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालय नवीन इमारतीचे बांधकाम कालमर्यादेत करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

ताज्या बातम्या

जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाय योजनांबाबत बैठक

0
मुंबई, दि. २१ : अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने...

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

0
आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण मुंबई, दि. २१ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध...

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ – सांस्कृतिक...

0
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच...

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

0
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली...

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत...

0
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD)...