गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 70

कर नियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे विकासाला चालना – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २४ :- देशाच्या प्रगतीसाठी आयकर विभाग देत असलेले योगदान मोठे आहे. कर नियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देशाच्या विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

आयकर विभागाच्या १६६ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील कौटिल्य भवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल श्री.राधाकृष्णन बोलत होते. या कार्यक्रमास आयकर अपीलेट ट्रिब्युनलचे उपाध्यक्ष शक्तिजित डे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त श्रीमती मालती श्रीधरन, विविध कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त क्रीडापटू उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले की, २०२५ मध्ये आपण ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत आहोत. यापार्श्वभूमीवर कर प्रशासनाने बदलांना सामोरे गेले पाहिजे. आपण नेहमी करदात्यांच्या चुका शोधतो. दंड आकारतो. परिणामी, जास्तीत जास्त लोक करचक्राबाहेर राहण्याचा प्रयत्न करतात. उलटपक्षी करदात्यांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवणे, अधिकाधिक लोकांना कर प्रणालीच्या कक्षेत आणण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स च्या संमेलनांचे आयोजन करणे तसेच कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर आयकर विभागाने अधिक भर दिला पाहिजे. कर रचनेत कालसुसंगत सुधारणा करणेही आवश्यक असते. याबरोबरच करचुकवेगिरीला आळा घातला पाहिजे.

जर्मनीचा दाखला देत ते म्हणाले की, तेथे नियमित आयकर भरणाऱ्यांना सन्मान मिळतो, ओळखपत्र मिळते. अशा प्रोत्साहनात्मक उपक्रमांचा अंगिकार करावा. ज्यांचे मुख्य उत्पन्न शेती नसून इतर व्यवसाय आहे, त्यांनी केवळ नावापुरती शेती दाखवून कर टाळू नये. यासाठी पारदर्शक आणि तर्कशुद्ध निकषांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असेही राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी कौटिल्य (चाणक्य) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच, सर्वाधिक कर भरलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा सन्स प्रा. लि., एचडीएफसी बँक लि. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तसेच सेवनिवृत्त अधिकारी आणि आयकर विभागाचे उत्कृष्ट खेळाडूंना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

000000

संजय ओरके/विसंअ/

अणुशक्तीनगर येथे तालुका क्रीडा संकुल उभारणीच्या प्रक्रियेस गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • अल्पसंख्याकांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी योजना प्रभावीपणे राबवा
  • अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीस गती

मुंबई, दि. २४ : अणुशक्तीनगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असलेल्या १०,३३३.९१ चौ.मी. क्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामास गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अणुशक्तीनगर येथे म्युन्सिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणेबाबत तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार  म्हणाले की, मुंबई शहरात क्रीडापटूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व प्रशिक्षण देण्यास हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महत्वाचे ठरणार आहे. संबंधित भूखंड हा  म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असल्याने, यापूर्वी त्या जागेसंदर्भात दि चिल्ड्रन एड सोसायटीसोबत असलेले भाडेकरार संपुष्टात आणावे. यासंदर्भात महसूल विभागाशी समन्वय साधून सदर भूखंड हा महानगरपालिकेकडे क्रीडा संकुल उभारणीसाठी हस्तांतरित करावा. तसेच या जागेवर अतिक्रमण असल्यास ते निष्कासित करण्यात यावे. या क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसह क्रीडा संकुल उभारावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय

मौजे अनिक, चेंबूर येथे शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासंदर्भात अल्पसंख्याक विकास विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.  महाविद्यालय निर्मितीनंतर आवश्यक शैक्षणिक पदांची निर्मिती, पदभरती, देखभाल दुरूस्ती याचीही तरतूद करण्यात यावी. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे असलेले अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे. मान्यता असलेल्या ११ पदांची भरती तत्काळ करावी.

अल्पसंख्याकाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना राबविण्यात यावी. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दरवर्षी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी विद्यार्थ्यांची मर्यादा ठरवावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजातील मुलांना उच्च व परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख,महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे, क्रीडा आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ग.पी.मगदूम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारीकरणाकरिता भुसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पुणे, दि. 24: ‘महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण’ म्हणून आरक्षित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तारीकरणाकरिता आरक्षित क्षेत्राच्या भुसंपादनाचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश दिले.

भिडेवाडा, महात्मा फुलेवाडा येथे भेट देवून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाबाबत माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त अविनाश संकपाळ, सहायक आयुक्त किसन दगडखैर, भूसंपादन उपायुक्त वसुंधरा बारवे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, अधिक्षक अभियंता राजेश बनकर आदी उपस्थित होते.

श्री भुजबळ म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राचे पुणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले आहे. स्मारकांचे कामे करतांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केलेल्या सूचनाचा विचार करावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

प्रारंभी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची पाहणी तसेच याठिकाणी बसविण्यात येणाऱ्या खिडक्यांबाबत माहिती घेवून स्मारकाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या श्री. भुजबळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

श्री. चंद्रन म्हणाले, महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणाकरिता महानगरपालिकेने स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राअंतर्गत 119 घरांक (सिटी सर्वे क्रमांक), 624 मालक, 358 भाडेकरु, गलिच्छ वस्ती निर्मूलनाअंतर्गत 36 गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, भुसंपादनाच्या कामे गतीने पूर्ण करण्यात येईल, असेही श्री.चंद्रन म्हणाले.

०००००

सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. 24 :- विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास हेच शासनाचे उद्दिष्ट असून शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि आधुनिकतेचा समन्वय साधला जावा. यासाठी या सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी, मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आणि पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी या विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसचिव समीर सावंत, उपसचिव तुषार महाजन आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

गडचिरोलीत कृषिभवन उभारण्यास मान्यता – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. २४ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण व्हाव्यात, कृषी विषयक सेवा एका छताखाली मिळाव्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा या व्यापक हेतूने गडचिरोलीत नवे कृषिभवन इमारत बांधकामास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

या प्रकल्पासाठी ११.६७ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, हे भवन सोनापूर येथील फळरोपवाटिकेच्या जागेत उभारले जाणार आहे. या निर्णयामागे शेतकऱ्यांना तातडीने, प्रभावी व आधुनिक सेवा मिळाव्यात हा मूळ उद्देश आहे. कृषी विभागाची जिल्हा व तालुक्यामधील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीमध्ये असावीत, जेणेकरून कामकाजात सुलभता येईल आणि शेतकरी आणि प्रशासनाच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी सोनापूर कॉम्प्लेक्स, ता. व जि. गडचिरोली येथे नवीन कृषिभवन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत्तचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. नव्याने होणाऱ्या कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा तसेच शेतकरी प्रशिक्षण गृह याचा या बांधकामामध्ये समावेश असणार आहे. या कामासाठी ११ कोटी ६७ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि.२२ जुलै २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

00000

संध्या गरवारे/विसंअ/

पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २४ :- पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त योगेश म्हसे, यशदाच्या प्रभारी महासंचालक पवनीत कौर, निबंधक राजीव नंदकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात भारतासाठी १४ ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), वायझॅग (आंध्र प्रदेश) आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) या चार शहरी क्षेत्रात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये ग्रोथ हब (G-HUB) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली असून आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्र ग्रोथ हब (G-HUB) म्हणून विकसित करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यानुसार नीती आयोगाने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश केला आहे. पुण्यामध्ये आयटी कंपन्या, कारखाने, मेट्रो, रिंग रोड, औद्योगिक कॉरिडोर्स आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, रुग्णालये असल्याने ग्रोथ हब बनण्यासाठी पुणे महानगर प्रदेश आघाडीवर आहे. पुण्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था यशदा ही पुणे महानगर प्रदेश क्षेत्रासाठी आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार असून कामाबाबतचे निरीक्षण आणि समन्वय विभागीय आयुक्त करणार आहेत. यशदाचा आराखडा तयार झाल्यानंतर मनपा, पीएमआरडीए यांच्यासह संबंधित यंत्रणेने कामाबाबत अंमलबजावणी करावी.

पुण्याचे सकल उत्पन्न ४.२ लाख कोटी असून २०३० पर्यंत १५ ते १८ लाख नोकऱ्या तयार होणार आहेत. यामध्ये किमान ६ लाख महिला कामगार असतील, असे नियोजन करण्यात येणार असल्याने देशात सर्वात प्रथम आर्थिक विकास आराखडा स्वीकारणाऱ्या शहरात पुणे असेल, यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह पुण्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सुरू असलेल्या विविध प्रकल्पातील कामात सातत्य ठेवावे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. कामाच्या प्रगतीसाठी पुण्यामध्य यशदा येथे लवकरच सर्व संबंधित यंत्रणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

ग्रोथ हबसाठी आवश्यक प्रमुख विकास घटक

पुण्यात माहिती तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन उपलब्ध आहेत. शिवाय एमआयडीसी क्षेत्रांमध्ये (चाकण, तळेगाव, रांजणगाव इ.) ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, प्रिसीजन इंजिनीयरिंग आणि फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. आठशेहून अधिक उच्च शिक्षण संस्थांचा लाभ घेऊन भारताचे टॉप विकसित कौशल्य घेणाऱ्यांची सेवा पुरविणारे स्किलिंग-एक्सपोर्ट शहर होणार आहे. मेट्रो व रिंग रोड कॉरिडोरसह नवीन टाउनशिप असल्याने हरित आणि स्मार्ट नागरीकरणास पोषक वातावरण आहे. पुण्यात पर्यटनासाठी वाव असल्याने पर्यटन, कृषी पर्यटन, आध्यात्मिक सर्किट, अ‍ॅडव्हेंचर झोन्ससाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय कौशल्य प्रमाणपत्र, स्टार्टअप गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने परदेशी गुंतवणुकीतही वाढ होणार आहे.

००००

धोंडिराम अर्जुन/स.सं

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

मुंबई, दि. २४ : राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कानील कार्य केंद्राने कळविले आहे.

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला दि. २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३०  पासून ते दि. २६ जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  तसेच समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील गोमणी येथे कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात ग्रामसेवक उमेश धोडरे अडकले असता, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांना सुरक्षित  बाहेर काढण्यात आले.

मुंबई शहर आणि उपनगर यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातून अनुक्रमे २०४३.७४, २११८.९५ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

20250724 State Situation Report

००००

एकनाथ पोवार/विसंअ

माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत माहिती द्यावी

मुंबई, दि. २४ : इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक,पत्नी यांच्या पाल्यांना रुपये १० हजाराचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटूंबियांनी ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी.

आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगित, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे, तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य, यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरी पात्रता धारक लाभार्थीनी दूरध्वनी क्र ०२२- ३५१८३८६१ / ८५९१९८३८६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

कंत्राटदाराच्या आत्महत्येस जल जीवन मिशनचा संबंध नाही : जल जीवन विभागाचा खुलासा

मुंबई, दि. २४ : सांगली जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार श्री. हर्षल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जल जीवन मिशन अंतर्गत कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे त्यांचे देयक प्रलंबित असल्याचा प्रश्नच येत नाही.

दि. २३ व २४ जुलै २०२५ रोजी वृत्तपत्रांमध्ये व वृत्तवाहिन्यांवर सांगली जिल्ह्यातील हर्षल अशोक पाटील यांनी जल जीवन मिशनमधील प्रलंबित कामांमुळे आत्महत्या केल्याचे वृत्त प्रसारित झाले. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने श्री.पाटील यांचे कोणतेही देयक प्रलंबित नसल्याचा खुलासा केला आहे.

००००

जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 24 : महसूल विभागाचे काम गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. जनसंवाद, लोकशाही दिन आदी माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री श्री.बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करुन लाभार्थ्यांना घरांसाठी पट्टे उपलब्ध करुन द्यावेत. नवीन वाळू धोरण आणि मार्गदर्शक सूचनांनुसार वाळू उपलब्ध करुन द्यावी. भूमि अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून खर्च करण्यात यावा. पाणंद रस्त्यांना क्रमांक देऊन दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. लोकअदालत सारख्या माध्यमांतून अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्या येत्या तीन महिन्यात पूर्ण कराव्यात. याचबरोबर जिवंत सातबारा, तुकडेबंदी, शेतरस्ता, भोगवटादार 2 मधून 1 मध्ये करण्याची तसेच आकारी पड जमिनीची प्रकरणे, स्वामित्व योजनेचा लाभ देणे आदी कामे देखील कालमर्यादेत मार्गी लावावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सुरू असलेल्या विविध कामांचा अहवाल सादर केला.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ

ताज्या बातम्या

कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा):    कुंभमेळ्यानिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि...

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे...

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी मुंबई, दि. २१ :  कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना...

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या...

0
सातारा दि.२१ - पावसाचे प्रमाण व धरणातून विसर्ग कमी झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे बाधीत, शेती, पशुधन, घरे, विद्युत यंत्रणा, रस्ते, पुल व अन्य सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ...

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून लोकाभिमुख कामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात वर्धा प्रथम येईल यासाठी प्रयत्न करा वर्धा, दि.२१ (जिमाका) : वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व...