गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 72

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज बुधवार, दिनांक २३ जुलै, २०२५ रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधानपरिषदेचे सदस्य संजय खोडके, विधानसभेच्या सदस्या सुलभा संजय खोडके, महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ. विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये, उप सचिव विजय कोमटवार, उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश रणखांब, संचालक, वि.स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व ७ लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार

मुंबई दि. २३ : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे १८.६६ लाख मतदार मृत २६.०१ लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून ७.५ लाख मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळली आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम हाती घेतली असून येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १ लाख बीएलओ (BLO) ४ लाख स्वयंसेवक आणि १२ प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले १.५ लाख बीएलए (BLA) कार्यरत आहेत.

 

       आतापर्यंत प्राप्त माहिती :

एकूण मतदार (२४ जून २०२५ रोजीपर्यंत): ७,८९,६९,८४४

प्राप्त गणनापत्रक (Enumeration Forms): ७,१६,०४,१०२ (९०.६७%)

डिजिटायझ्ड गणनापत्रक: ७,१३,६५,४६० (९०.३७%)

पत्त्यावर न सापडलेले मतदार: ५२,३०,१२६ (६.६२%)

मृत मतदार: १८,६६,८६९ (२.३६%)

कायमचे स्थलांतरित: २६,०१,०३१ (३.२९%)

दुहेरी नोंदणी: ७,५०,७४२ (०.९५%)

न सापडणारे: ११,४८४ (०.०१%)

एकूण कव्हर झालेले मतदार : ७,६८,३४,२२८ (९७.३०%)

अद्याप प्राप्त न झालेले गणनापत्रक: २१,३५,६१६ (२.७०%)

याबाबत 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे हरकती, दुरुस्ती, समावेश किंवा वगळण्याबाबत अर्ज करता येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात २५-२६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, दि. 23 : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा २७ जुलैपर्यंत मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) २५-२६ जुलैदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे.

पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील यादरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार २६ तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे. २५-२६ जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही; तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात काही प्रमाणात दरड कोसळणे, आणि सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

0000

विभागांनी अनुकंपा नियुक्तीची कारवाई कालमर्यादेत करावी – पालकमंत्री संजय राठोड

भरतीच्या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांची बैठक

यवतमाळ, दि.23 (जिमाका) : राज्य शासनाने 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीची कालमर्यादा निश्चित करून दिली आहे. विभागांनी या मर्यादेत अनुकंपा पदे निश्चित करून वेळेत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व विभागांना दिले आहे.

राज्य शासनाच्या 150 दिवस विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना कालमर्यादेत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जास्तीत जास्त अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी शासनाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा सूची अद्ययावत करणे, उमेदवारांच्या विनंतीनुसार गट बदलण्याची कार्यवाही, अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची परिगणना, गट ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जिवित करण्याचे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. ही सर्व प्रक्रिया दि.15 ऑगस्ट पर्यंत पुर्ण करावयाची आहे. दि.18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी याबाबत बैठक घेऊन अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदे व नियुक्तीच्या अनुषंगाने माहिती घेणार आहे.

त्यानंतर जिल्ह्याची गट क ची सामायिक प्रतिक्षासूची अद्ययावत केली जातील. तसेच नियुक्तीस उपलब्ध पदसंख्या प्रसिद्ध करण्यात येतील. नियुक्त प्राधिकाऱ्याच्या यादीप्रमाणे गट ड च्या पदावर नियुक्तीसाठी सिफारस केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या सिफारसीनुसार गट ड ची मृत करण्यात आलेली पदे नियुक्ती देण्यासाठी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येतील. ही प्रक्रिया दि.22 ऑगस्ट पुर्वी पुर्ण करण्यात येणार आहे.

अनुकंपा उमेदवारांचा दि.1 सप्टेंबर रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात उमेदवारांची नियुक्तीसाठी सिफारस करण्यात येतील. त्यापुर्वी विभागाच्यावतीने गट ड ची मृत पदे पुनर्जीवित करण्याची कार्यवाही पुर्ण करण्यात येणार आहे. दि.15 सप्टेंबर रोजी गट क च्या व पुनर्जीवित केल्या गट ड च्या सिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. याप्रमाणे शासनाने निर्धारीत केल्याप्रमाणे विभागाने कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुकंपा भरतीचा आढावा

शासनाने अनुकंपा नियुक्तीसाठी निर्धारीत केलेला कालबद्ध कार्यक्रम व पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशान्वये प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सर्व नियुक्ती प्राधिकारी तथा विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी उपस्थित होते. शासनाने जो कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. त्याप्रमाणे कारवाई करून पुढील बैठकीत आपल्या विभागाची माहिती सादर करण्याच्या सूचना श्री.खंडागळे यांनी केल्या.

00000

धुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : पालकमंत्री जयकुमार रावल

????????????????????????????????????

धुळे, दि. 23 जुलै (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळणवळणाच्या सुविधांमार्फत जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी रस्ते, पुल, नवीन शासकीय इमारतीचा सुसंगत आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचे  निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम विभाग जिल्हा परिषद, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बैठक पालकमंत्री श्री.रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत येलाई, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सोनार, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर यांच्यासह बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 150 दिवसांच्या सेवाकालीन कार्यक्रमांतर्गत भविष्यवेध घेणारे विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट राज्य शासन तयार करीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘धुळे जिल्हा विकास योजना’ आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम विभागाने  धुळे जिल्ह्यातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, शहरांतील अंतर्गत रस्ते तसेच नवीन प्रस्तावित रस्ते, पुल, नवीन शासकीय इमारत, प्रस्तावित बांधकांमाचा समावेश असलेला तसेच आवश्यक त्या दुरुस्ती कामांचा स्थांनिक लोकप्रतिनिधींशी चर्चा, अभ्यास करून सुसंगत, दीर्घकालीन रस्ते विकास आराखडा तयार करावा.

हा आराखडा तयार करतांना संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. जिल्ह्यात ज्या ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे झाली नाहीत त्यांचा शोध घेवून पाणंद रस्ते तयार करावे. जिल्ह्यात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण करुन मुख्य मार्गांशी जोडण्यासाठी आराखडा तयार करावा. धुळ्यातील मोठ्या पुलाच्या शेजारी नवीन पुल बांधण्यात यावा. नवीन पुल बांधतांना दिर्घकाळ टिकण्यासाठी दर्जात्मक कामे करावीत. तापी नदीवरील गिधाडे पुलावर चेअरींग जाळी लावण्यात यावीत. शासकीय इमारतींचे  नवीन बांधकाम करतांना  सुसज्ज असा आराखडा तयार करुन त्यात सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने बांधावीत. नवीन इमारती बांधतांना हेरीटेज इमारतीचे संवर्धन करावे. दोंडाईचा येथे 100 खाटांचे रुग्णालय बांधकामाचा आराखडा तयार करावा. राष्ट्रीय महामार्गावर नवीन विश्रामगृहाचे काम प्रस्तावीत करावे.

नवीन तसेच जुने रस्ते दुरुस्तीसाठी कंत्राटदाराना वेळोवेळी सूचना द्याव्यात. जे कत्रांटदार विहित कालावधीत काम करणार नाहीत, त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावेत. रस्ते, पुल, इमारतीच्या ठिकाणी कामांचे फलक लावण्यात यावेत. बांधकाम विभागाने नवीन रस्त्यांच्या कामांची नियमित पाहणी करावी. रस्त्यावरील अपघात क्षेत्राची पाहणी करुन आवश्यक ती दुरुस्तीसह दिशादर्शक लावावेत. रस्ते, पुल, इमारती कामांसाठी विविध लेखाशिर्षातंर्गत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करावा. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने  नवीन ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी, शाळा, स्मशान भूमीची नवीन कामे करतांना आवश्यक भौतीक सुविधा देण्यात याव्यात. यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.रावल यांनी दिल्यात.

बैठकीत मागील 5 वर्षांत झालेल्या कामांची माहिती, सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती व भविष्यात करावयाची कामांची विस्तृत माहिती, शहर, तालुका, गावातील नवीन इमारती, पुल, रस्ते, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या व प्रस्तावीत कामांची माहिती  पालकमंत्री श्री.रावल यांनी संबंधित विभाग प्रमुखाकडून घेतली.

यावेळी जिल्ह्यात बांधकाम विभागामार्फत विविध योजनेतंर्गत सुरू असलेल्या, प्रस्तावित कामांची माहिती संबंधित विभागप्रमुखांनी बैठकीत दिली.

000000

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष : जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना गरजूंना दिलासा देणारे कार्य

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून तसेच मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सक्रिय सहभागातून सुरु झालेला आहे. ही जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना असून यामार्फत गरजूंना दिलासा देणारे कार्य शीघ्रतेने सुरु आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर  उपचार करण्यासाठी या योजनेतून अर्थसहाय्य पुरविले जाते. राज्यातील तसेच देशातील  आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्य देणे, हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उदिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठया नैसर्गिक आपत्तींमुळे  बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

 अमरावती जिल्हयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे औपचारिक उद्घाटन 1 मे 2025 रोजी करण्यात आले असून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष कार्यरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीतील या कक्षामार्फत यशस्वीरित्या कार्य चालू आहे. यात एकूण लाभार्थी रुग्ण 173 असून यांच्या उपचारासाठी  एकूण 1 कोटी 69 लक्ष 15 हजार रुपये निधीचे वितरण करण्यात आले. या कालावधीत विविध गंभीर आजारांवर उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आर्थिक मदत करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा अंतर्गत जिल्ह्यातील 66 नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष योजनेतंर्गत कोक्लेअर इम्प्लांट, हार्ट, लिव्हर, किडनी, लंग, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हँड री-कन्स्ट्रक्शन, हिप,नी रिप्लेसमेंट,  कॅन्सर सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, नवजात अर्भकांचे विकार, अपघात व विद्युत जळीत, डायलिसिस, हृदयरोग, लिगामेंट सर्जरी, बालकांच्या शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा समावेश आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा जिओ-टॅग फोटो, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणित अंदाजपत्रक, उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजारापेक्षा कमी असणे आवश्यक)  आधार व रेशन कार्ड, संबंधित निदान, उपचाराची कागदपत्रे, अपघात असल्यास एफआयआर, अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी अधिकृत प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. ई-मेलद्वारे अर्ज सादर करण्यासाठी aao.cmrf-mh@gov.in  या मेल आयडीवर मेल करावे. अथवा रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक वरील ईमेलवर सर्व कागदपत्रांसह पीडीएफ स्वरूपात अर्ज सादर करू शकतात. आवश्यकतेनुसार संबंधितांनी कक्षाशी थेट संपर्क साधावा.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष योजनेत पुढील बाबींचा समावेश नाही. जसे राज्याबाहेरील रुग्णालयातील उपचार, योजनेच्या व्याप्तीतील नसलेले आजार, आधीच डिस्चार्ज झालेल्या किंवा उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत अर्थसहाय्य नाही. पूर्वी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंत्रालय, मुंबई येथे जावे लागत होते.  आता मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन झाल्याने, सर्व आवश्यक प्रक्रिया, मार्गदर्शन व मदत स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध झाली आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाचून गरजूंना त्वरित मदत मिळविणे शक्य झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉ. श्याम सुरेश गावंडे  यांनी सांगितले.

                                                                                                                             अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-३)

मा. मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना संबधीत रुग्णालय मार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात सदर अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असल्याने नागरीकांना या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.01 मे 2025 रोजी औपचारिक उद्घाटन करुन सुरु करण्यात आलेला आहे.

यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी प्रत्येक जिल्हयातच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सहज उपलब्ध, संलग्न रुग्णालयाची यादी, अर्ज आणि पाठपुराव्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही तसेच अर्ज स्विकृती व सध्यस्थिती इत्यादी मदत पुरवली जाणार आहे.

जिल्ह्यात या योजनेचा अनेक गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यातील एका लाभार्थ्यानी दिलेली प्रतिक्रिया….
माझे वडील श्री. रविंद्र दुदाजी दामणे, रा. तिवणे, ता. कर्जत, जि. रायगड, माझ्या वडिलांची  प्रकृती दि. ३० मे २०२५ रोजी अचानक बिघडली. त्यांना बोलण्यात व हालचाली करण्यात अडचण निर्माण झाली. तातडीने त्यांना डॉ. आर. एन. पाटील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना Acute Left Thalamic Bleed असल्याचे निदान दिले.

या गंभीर परिस्थितीत आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे आम्ही चिंतेत होतो. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेबद्दल माहिती दिली. त्यानुसार आम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. सुदैवाने आम्हाला या योजनेअंतर्गत ५० हजार रुपये  आर्थिक मदत प्राप्त झाली.

या मदतीमुळे आम्हाला उपचार सुरू ठेवणे शक्य झाले आणि माझ्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे मी व माझा संपूर्ण परिवार माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो. आपण गरजू रुग्णांसाठी सुरु केलेली ही योजना आमच्यासारख्या अनेक कुटुंबासाठी खूपच मोलाची आहे.

आपली कृपाभिलाषी,
कु. वृणाली रविंद्र पामने
रा. तिवणे, ता. कर्जत, जि. रायगड.

उमेदवारांनी रोजगार स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा – मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके

Ø जाजू महाविद्यालयात रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्ती प्रतिसाद

Ø मंत्र्यांच्याहस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण

यवतमाळ, दि.23 (जिमाका) : युवकांच्या हाताला काम देणे शासनाचे प्राधान्याचे धोरण आहे. त्यामुळेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जाजू कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॅाम्पूटर सायन्सच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जाजू महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, सहाय्यक आयुक्त प. भ.  जाधव, जाजू कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश जाजू, प्राचार्य रितेश चांडक, सचिव आशिष जाजू, कोषाध्यक्ष शिल्पा जाजू, प्रफुल चव्हाण उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी चित्रफितीद्वारे मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.

आ.बाळासाहेब मांगुळकर यांनी सुद्धा उमेदवारांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी कोणतेही काम छोटे नसते. स्वतःमध्ये कौशल्य विकसित करा. छोट्या कामापासून सुरुवात केली तर मोठी संधी नक्कीच मिळते, असे सांगतांना नोकरीच्या भरवशावर न राहता स्वतःमध्ये उत्तम कौशल्य विकसित करा व चांगले जीवनमान जगा असे सांगितले.

मेळाव्यामध्ये 15 नामांकीत कंपन्यामार्फत एकुण 470 रिक्तपदाकरिता नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यास 707 उमेदवारांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला. त्यातील 196 उमेदवारांची प्राथमिक तर 119 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यापैकी 48 उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीच्या ठिकाणी नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले आहे. मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशान्वये संपुर्ण राज्यात एकाचवेळी घेण्यात आला. मेळाव्यास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा.संजय देशमुख, जिल्हाधिकारी विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, प्रथम एज्युकेशन फांऊडेशन, इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, खादीग्राम उद्योग महामंडळ, महात्मा फुले आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक वित्त विकास महामंडळाने आपल्या स्टॉलद्वारे विविध योजनांची माहिती उमेदवारांना दिली. मेळाव्यास आयटीआय प्रशिक्षणार्थी, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमधील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सहायक आयुक्त प.भ.जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाचे सुचिता घाडगे, राहुल गुल्हाणे, नितीन खडसे, संदीप यादव, सुचित वाटगुरे, निलेश भगत तसेच जाजु कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

00000

राजधानीत लोकमान्य टिळक जयंती दिनी अभिवादन

नवी दिल्ली, 23 :  “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या घोषणेचे प्रणेते, थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन केले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र. उपसंचालक मनिषा पिंगळे, यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलप्ते यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

यावेळी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास – सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा ६० टक्के वाटा आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये या सहकारी संस्थाचा मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्षानिमित्त सहकार क्षेत्रातील उत्कृष्टरित्या काम केलेल्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार हा अत्यंत चांगला उपक्रम असल्याचे गौरवोद्गार सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी काढले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर बोलत होते.यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकरराव घोणसे यासह राज्यातील विविध सहकारी बँकाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की,सहकाराच्या माध्यमातून साखर उद्योग सह शेतीला पूरक विकास झालेला आहे.सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांनी अत्यंत उत्कृष्टरित्या काम केलेले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक सहकारी संस्था काम करत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अनेक संस्था शेतकऱ्यांसाठी शेती भवनची निर्मिती, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत हे कौतुकास्पद आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यामुळे समाजोपयोगी कामे होत राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला बळकटी मिळत आहे.

यावेळी सन २०२३-२४ चे कै.विष्णु अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार, श्रीमती सुशीलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार(संपूर्ण महाराष्ट्र), सहकार महर्षी कै.बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरुण सहकारी कार्यकारी पुरस्कार(संपूर्ण महाराष्ट्र), कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार, राजमाता जिजाऊ उत्कृष्ट महिला सहकारी बँक, लोकनेत कै.राजारामबापू पाटील उत्कृष्‌ट शेड्युल/मल्टी स्टेट नागरी सहकारी बँक पुरस्कार, पदभूषण कै.वसंतदादा उत्कृष्ठ नागरी  सहकारी बँक पुरस्कार, १०० कोटी रूपये पर्यंत ठेवी असलेल्या बँका, १०० ते २५० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँका, २५० ते ५०० कोटी रूपयापर्यंत ठेवी असलेल्या बँका, ५०० ते १००० कोटी रूपयापर्यंत ठेवी असलेल्या बँका, १००० कोटी ते १५०० कोटी रूपयापर्यंत ठेवी असलेल्या बँका, पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक पुरस्कार, शतकोत्तर वाटचाल-विशेष सन्मान, कै.बाबुरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, नामदार कै.भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ट नागरी सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार, नागरी सहकारी बँका या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...