मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 708

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

मुंबई, दि. २४ : पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

०००

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने खबरदारी घ्यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २४ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जूनपासून सुरू होत आहे. सर्व संबंधित विभागांनी उत्तमप्रकारे पूर्वतयारी करावी. अतिवृष्टीसंदर्भातील इशारा तातडीने विधिमंडळ सदस्य आणि पत्रकारांना उपलब्ध व्हावा. साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी, कर्मचाऱ्यांना रेनकोट बरोबरच पावसाळी बूट देखील उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधानभवन येथे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशन संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, हवामान विभाग, एमटीएनएल, मध्य आणि कोकण रेल्वे, मेट्रो प्रकल्प अशा सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिवेशनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विद्यमान १४व्या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचप्रमाणे दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित ११ विधानपरिषद सदस्यांची निवड प्रस्तावित आहे.  त्यादृष्टीने विधानमंडळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि सुरक्षा विभागाने नियोजन करावे. शनिवार, २९ जून, २०२४ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज होणार असल्याने सन्माननीय सदस्यांचे जाण्याचे आणि सोमवारी येण्याचे रेल्वे आरक्षण प्राधान्याने उपलब्ध व्हावे, सुरक्षा व्यवस्थेतील महिला पोलीस, अन्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी, महिला पत्रकार इत्यादींसाठी विशेष कक्ष, स्वच्छता गृहांची सकाळी आणि दुपारी स्वच्छता होईल, अशी दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

या बैठकीस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, उपसभापतींचे खाजगी सचिव रवींद्र खेबूडकर, विधानमंडळ मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख, डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय, विशेष शाखेचे दत्तात्रय कांबळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, मुंबई महापालिकेचे महेश नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, विद्याधर पाटसकर, श्रीमती रेशमा चव्हाण आणि विजय सानप, अग्न‍िशमन समादेशक अधिकारी बाळासाहेब पाटील, मध्य रेल्वेचे सहायक परिचालन प्रबंधक अरुणकुमार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

०००

जल पर्यटनच्या वाढीव विकास आराखड्यास मंजूरी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भंडारा, दि. २४ : राज्य शासन सर्व सामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंर्तगत केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा असे बारा हजार रुपये, सानुग्रह अनुदान व धानाला सातशे रुपये बोनस देणारे हे पहिले सरकार आहे. आता  ५४७ कोटी रुपये खर्च करून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. 102 कोटी रुपये खर्च करुन जल पर्यटन सुरु होत आहे.  यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील जल पर्यटनासोबतच ५४७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वैनगंगा जलाशयातील जल पर्यटनाच्या वाढीव आराखड्यास मान्यता देण्याचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त (तीन एप्रिल )  सार्वजनिक सुट्टी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

जलपर्यटन केंद्राचा प्रथम टप्पा, भूमिगत गटार योजना, अमृत योजने अंतर्गत भंडारा आणि पवनी येथील तलाव सौंदर्यीकरण, नगरोत्थान अभियानाअंतर्गत रस्ते बांधकाम, भंडारा व पवनी नगर परिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनांची कामे, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत भंडारा व पवनी नगर परिषदमध्ये विविध विकासकामे, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे विविध सुविधा, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध कामे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला.

विकास कामांमुळे भंडारा जिल्ह्याला पर्यटकांची पहिली पसंती मिळणार आहे. जल पर्यटनाचा सध्याच्या 102 कोटी रुपयांचा आरखडा 200 कोटी रुपयांचा करावा, अशी मागणी आमदार श्री. भोंडेकर यांनी आपल्या भाषणात केली होती. यावर वाढीव विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

५४७ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या विकास कामामुळे भंडारा जिल्ह्यात पर्यटन विकासासोबतच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असे आमदार श्री. भोंडेकर यांनी सांगितले.           भूमिपूजनातील विशेष उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे जलपर्यटन प्रकल्प होय. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईलच पण भंडारा जिल्हा भारताच्या नकाशावर अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी व्यक्त केला.

जलपर्यटन प्रकल्पाची वैशिष्ट्ये

भंडारा येथील मौंदी येथे असलेला हा जल प्रकल्प जागतिक दर्जाचा आहे. भंडारा जिल्ह्यातील जलपर्यटन प्रकल्पात नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृह, पर्यटकांना पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नाविन्यपूर्ण कृत्रिम तलाव, पर्यटकांसाठी  विविध सुविधा, जलतरण तलाव, माहिती केंद्र, कॉन्फरन्स हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचारी निवास तरंगती जेट्टी वाहनतळ यांचा समावेश असेल.

०००

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ : मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नाशिक,दि. 24 जून,2024 (विमाका वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 26 जून,2024  रोजी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य…

1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले दिव्यांगत्वाचे  मूळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 24: मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. एखाद्या ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास तेथील नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लवकरात लवकर पोहोचून मदत करतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतीवृष्टी व दरड प्रवण क्षेत्रात करावयाच्या उपायोजनांचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गावांमध्ये पूर किंवा दरडी कोसळल्या तर तेथील नागरिकांची विविध शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. या शाळांमध्ये औषधे, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, लाईट या सह सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी 1 जुलै पासून एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन व एनडीआरएफ मार्फत पूर प्रवण व दरड प्रवण तालुक्यामध्ये शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम तसेच साहित्याची चाचणी घेण्यात आलेली आहेत.
दरड कोसळून रस्ते वाहतूक विस्कळीत होणारी नाही यासाठी मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळून-कराड मार्ग, सज्जनगड-ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग व शेंद्रे ते बामणोली मार्गावर जेसीबी, पोकलेन, क्रेन व डंपर इत्यादी वाहने ठेवण्यात आलेली आहेत. डोंगरी तसेच पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी मान्सून  कालावधीत सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस   जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी सुनिल गाढे, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बांधकामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. मातोश्री पाणंद रस्त्याची चारशेहून अधिक कामे मंजूर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला  तीन ते चार कामे वाटून द्यावीत.  कामे वेळेत होण्यासाठी रोहयो व ग्रामपंचायत विभागाने वेळोवेळी आढावा घ्यावा.
प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषदेकडील रस्त्यांचा कामांचा  व कोयना भूकंप पुनर्वसन निधी,डोंगरी विकास निधीमधील कामांचाही आढावा घेतला.
या बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हा परिषद आवारातील लोकल बोर्डाच्या इमारतीच्या व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पोवई नाका येथील उभारण्यात येत असलेल्या पुतळ्याच्या कामाची पहाणी केली. ही कामे दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 24 (जिमाका) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री. देसई यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर  खेख, उपवन संरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, फलटण व खंडाळ्याचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासह सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सुविधा दर्जेदार असाव्यात असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याची चांगली अंमलबजावणी करण्यात यावी. महिला वारकऱ्यांसाठी बंदीस्त स्नानगृहाची व्यवस्था असावी. ठरावीत अंतरावर आरोग्य पथक तैनाक असावे. त्याशिवाय फरते आरोग्य पथकही तैनात करण्यात यावे. पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालखी मार्गावर कायमस्वरुपी शौचालये व स्नानगृहे उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जागा निश्चित कराव्यात,  अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नियोजनाची माहिती दिली. पालखी सोहळ्यासाठी यंदा 1 हजार 800 फरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 74 ठिकाणी तात्पुरती मुतारी, 24 ठिकाणी महिलांसाठी बंदीस्त स्नानगृहांची सोय करण्यात आली आहे. सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत पाडेगाव येथे 17 शौचालये आणि 5 स्नानगृहे, व लोणंद येथील तळावर 39 शौचालये आणि 2 स्नानगृहे कायमस्वरुपी उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय हॉटेल, ढाबे, सार्वजनिक शौचालय युनिट, मंगल कार्यालय अशा एकूण 135 ठिकाणी 468 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 15 निवारा शेड उभारण्यात आली आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच तळावरील व विसाव्याच्या ठिकाणासह मार्गावरील सर्व पाण्याच्या स्त्रोतांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. पालखी मार्गावर एकूण 64 वैद्यकीय अधिकारी, 536 आरोग्य कर्मचारी, 39 रुग्णवाहिका, 17 आरोग्य दूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 21 वैद्यकीय पथकेही तैनात असणार आहेत. 1 हजार 40 आंतररुग्ण खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 72 कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी 34 पथके तैनात असून टॅंकर भरण्याच्या ठिकाणी 48 पथके तैनात असतील. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षा विषयक तपासणी करणे, खाद्यगृह, खाद्यपदार्थ, शितपेय यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करणे, पालखी मार्गावर पालखी मार्गक्रमण कालावधीत ठराविक मार्गावरील वाहतूक बंद ठेवणे असे आदेश देण्यात आले आहेत. तर लोणंद मुक्कामी 5 गॅस एजन्सीमार्फत 7 हजार गॅस रिफील करण्याची व्यवस्था आणि तरडगाव, फलटण व बरड मुक्कामी 10 गॅस एजन्सीमार्फत 12 हजार गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. २४ : विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात आपले करिअर करता यावे तसेच रोजगारक्षम संस्थांना कौशल्याधिष्ठीत मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (MSSU) माध्यमातून विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जून 2024 पर्यंत अर्ज  करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि इतर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या विद्यापीठात बीबीए, पदव्युत्तर पदवी, सायबर सिक्युरिटीमध्ये व बांधकामातील मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज इत्यादी अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी 30 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत देण्यात आली असून 1 जुलै 2024 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असेही कुलगुरू डॉ. पालकर ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सांगितले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 25, बुधवार दि. 26 आणि गुरूवार दि. 27 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 26 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

 

मतदार यादी, मतदान केंद्रासंदर्भात माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध

मुंबई, दि. २४: भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, २६ जून, २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक तसेच 022 69403398 आणि 022 69403396 हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या हेल्पलाईनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे निवडणूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.

सोमवार १ जुलै, २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४. नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे पार पडणार आहे.

०००

 

२ जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार – जितेंद्र भोळे

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून 11 सदस्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड करण्यासाठी द्विवार्षिक निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे, उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शरद शिंदे, अवर सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सीमा सचिव तांबे यांच्याकडे 2 जुलै 2024 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कक्ष क्रमांक 122, पहिला मजला, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – 400032 येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल.

नामनिर्देशन पत्रांची छाननी 3 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता विधानभवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई येथे करण्यात येईल. तसेच उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवारांकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्यांच्या निवडणूक एजंटला या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या कार्यालयात 5 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल.

त्याचप्रमाणे, निवडणूक लढविली गेल्यास 12 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

 

बोटीला कोणतेही नुकसान नाही

भंडारा, दि. २४ : भंडारा जिल्हा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसीखुर्द या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री श्री.शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. तर दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकार होते. या बोटीचे वाहक गोविंद खवणेकर होते.

बोट सफर करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री बोट चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व पत्रकारांचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडासा पाण्यात गेला. बोट एका बाजूला गेल्यामुळे बोटीतील बसण्याचा भाग जो बोटीला स्क्रूने फिट केलेला असतो तो ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. घटनेमध्ये प्रसंगावधान राखून बोटीचे चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोटमध्ये बसवले आणि बोट पूर्ववत झाली.

त्यादरम्यान या कार्यक्रमासाठी महामंडळाद्वारे सुरक्षेसाठी जेटस्की आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम तैनात केली होती. ते सर्व काही क्षणात आले आणि पत्रकारांना कार्यक्रमस्थळी नेले. या घटनेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः घटनाग्रस्त बोटीकडे गेले आणि त्यांनी निश्चित केले की बोट आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही. बोटीला कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त ‘बोटीचे तुकडे झाले, बोट बुडाली’ हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे डॉ.सारंग कुलकर्णी, महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक, एमटीडीसी यांनी कळवले आहे.

०००

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...