मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 707

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

मुंबई, दि. २५ :- सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक, रयतेचे राजे, लोकराजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखविलेल्या मार्गाने सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाच्या वाटेवरची महाराष्ट्राची वाटचाल कायम राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांवर देशाची दमदार वाटचाल सुरु आहे. ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ या विचारांवरच पुरोगामी महाराष्ट्र देशात आपले वेगळेपण टिकवून आहे, तोच महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, त्यांच्या विचारांचा, कार्याचा कृतिशील वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी सक्षमपणे केले. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रत्येक राज्यकर्त्यासाठी, सरकारसाठी मार्गदर्शक आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकोत्तर राजे होते. लोकांनी त्यांच्या कामासाठी सरकारच्या दारात येण्याची गरज नाही, सरकारचं लोकांच्या दारात जाईल, हा विचार शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात अंमलात आणला. त्याच विचारांवर राज्य शासन काम करत आहे. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’सारख्या लोककल्याणकारी अभियानाची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरु आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने यापुढेही महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल सुरु राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

विकासासाठी कोल्हापूर जिल्हा सर्वोत्तम – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, (जिमाका) : दि. २५ : राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) मार्फत कोल्हापूर जिल्हयात सयाजी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली.  यावेळी जिल्ह्यात विकासाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांसमवेत उद्योजकांनी सामंजस्य करार केले. शाश्वत विकास परिषदेमधून कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून उदयास येण्यासाठी घोषणापत्राची निर्मिती चर्चासत्रानंतर करण्यात आली. जिल्ह्याची विकासाबद्दल त्या त्या क्षेत्रात निश्चित दिशा देण्यासाठी या घोषणापत्राची मदत होणार आहे.

परिषदेचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाले. यावेळी मित्र संस्थेचे सीईओ प्रविणसिंह परदेशी, जॉइंट सीईओ सुशील खोडवेकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जॉइंट सीईओ अमन मित्तल, जागतिक बँकेचे अधिकारी विजय के., आयुक्त वस्त्रोद्योग अवश्यंत पांडा, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. सहसचिव प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात उद्घाटन, मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी करून जिल्हयात पहिली परिषद घेतल्याबद्दल मित्र संस्थेचे आभार मानले. त्यानंतर ‘मित्रा’चे सीईओ प्रविणसिंह परदेशी यांनी सादरीकरणाद्वारे मित्र संस्थेची कार्यपद्धती उपस्थितांना सांगितली. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर क्रेडाई कोल्हापूर आणि ॲडव्हेन्चर टुरीझम ऑपरेटर यांचे सोबत पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार मान्यवरांच्या उपस्थित झाले. उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया या पाच विषयांवर चर्चासत्र संपन्न झाली. यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याबाहेरील तसेच जिल्ह्यातील मोठमोठे उद्योग व्यावसायिक सहभागी होते. याच पाच विषयांवर चर्चासत्रासाठी पॅनलही नेमण्यात आले.

विकासासाठी कोल्हापूर जिल्हा सर्वोत्तम – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हयात राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी होत असून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला परिषदेचे आयोजन केलेबद्दल ‘मित्रा’ संस्थेचे विशेष आभार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मानले. कोल्हापूरच्या विकासाचा पाया आणि विकासाला गती देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. शाहू मील, उद्यमनगरी, कृषी, क्रीडा अशा अनेक मार्गातून जिल्हयाला शाश्वत विकासाची सुरूवात करून दिली. त्यामुळेच आजही हा जिल्हा प्रत्येक क्षेत्रासाठी गुंतवणूक करण्यासाठी चांगला असून विकासासाठी सर्वोत्तम जिल्हा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगलीत येणाऱ्या पूर निवारणासाठी ३२०० कोटी रूपये जागतिक बँकेकडून मिळणार आहेत. भविष्यात यामुळे या सर्व शहरात पूर येणारच नाही असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विकासाला बाधा येणार नाही. जिल्हयातील दरडोई उत्पन्न अडीच लाखाहून सहा लाखांपर्यंत नेहायचे आहे. यातून कोल्हापूर जिल्हा देशात अग्रक्रमांकावर नेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 टेक्नीकल पार्कसाठी शेंडा पार्कमधे २० एकर जागा मिळणार – कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागर

कोल्हापूर जिल्हयातील तरूणवर्ग शिकून नोकरीसाठी मुंबई पुण्याकडे जातो. आपल्या जिल्हयात त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सामाजिक दृष्टीनेही या विषयाकडे पाहिले पाहिजे. टेक्नीकल पार्क उभारणीसाठी किमान २० एकर जागा हवी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून जागेबाबतचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेंडा पार्क मधील २० एकर जमीन टेक्लीकल पार्कसाठी उपलब्ध होईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. यातून जिल्ह्यातील रोजगार वाढणार असून युवकांना जिल्हयातच नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. तसेच जिल्हयात कन्वेंशन सेंटर उभारणीसाठी २५० कोटीही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढ जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचा विषय आहे तसेच कोल्हापूर खंडपीठ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच मंजुरी दिलेल्या ३२०० कोटींमधून जिल्ह्यातील पुरस्थिती नाहीशी होईल. ईव्हीएम आणि एयरोस्पेस पार्ट्स मधील उद्योगांना चालना देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘मित्रा’चे सीईओ प्रविणसिंह परदेशी यांनी जिल्हा केंद्रबिंदू मानून विकास करणे शक्य असल्याचे सांगितले. युवकांमधील कौशल्य वाढ शैक्षणिक काळातच होणे आवश्यक असल्याचेही ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समन्वयक डॉ.अरुण धोंगडे यांनी प्रयत्न केले. परिषदेचे सूत्रसंचलन समीर देशपांडे, चारुदत्त जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मानले.

मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध

मुंबई, दि. २५ : विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदारांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर निवडणूक शाखेने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील  मतदारांना मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्र संदर्भात माहिती  देण्यासाठी 022-20822693 हा हेल्पलाइन क्रमांक तसेच https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे मुंबई शहर, जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

खरीप हंगाम : कृषी विभागामार्फत नियंत्रण कक्ष कार्यान्वित

मुंबई, दि. २५ :  राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५  उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

राज्यातील खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री  (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४०००  क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

संबंधितांनी व्हॉट्सॲप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.

ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी या टोल फ्री क्रमांकावर आपल्या संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

सिमी संघटनेवरील बंदीबाबत बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधासंदर्भात न्यायाधिकरणाची राज्यात २६ ते २८ जूनदरम्यान सुनावणी

मुंबई, दि. 25 : बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3 (1) नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ ‘सिमी’ या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 अन्वये केंद्र शासनाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतच्या उलट तपासणीसाठी नवी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्रकुमार कौरव यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधीकरणाचा दौरा राज्यात होत आहे.

न्यायाधीकरणाने 26 जून 2024 रोजी कोर्ट रूम नंबर 19, पहिला मजला, मुख्य इमारत, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई आणि कोर्ट रूम नंबर एफ, उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे 28 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून दिवसअखेर सुनावणी आयोजित केली आहे. या संदर्भात ज्या इच्छुक व्यक्तींना साक्ष द्यावयाची असेल, त्यांनी त्यांची दुय्यम प्रतितील शपथपत्रे निमस्वाक्षरीत न्यायाधीकरणाकडे दाखल करावीत. तसेच स्वत: 26 जून रोजी उलट तपासणीसाठी न्यायाधीकरणासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन गृह विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

Central Government issues notification

SIMI notifies cross examination

Mumbai, 25th June : According to Section 3 (1) of the Unlawful Activies (Prevention) Act, the Indian Islamic Student Movement ‘SIMI’ has been notified by the Central Government under the Unlawful Activities (Prevention) Act, 1967 vide notification No.S.O.722 (E), dated 16.02.2024 issued on for cross-examination. In this regard Hon. Justice Mr. Purushaindra Kumar Kaurav, Delhi High Court, will held sitting at Court Room No. 19, first floor, High Court Main Building, Fort, Mumbai, Maharashtra on 26th June, 2024 at 10.00 a.m. onwards and at Nagpur Bench on 28th June at 10.00 a.m. onwards.

Interested persons who wish to give evidence in this regard may file their affidavits (in duplicate) with the undersigned, and present themselves for cross-examination on the above date respectively, to appear before the Tribunal.

दरडीने, भूस्खलनाने संपूर्ण गाडलेल्या गावातील बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Oplus_131072

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची बैठक

मुंबई, दि. 25 :- राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या 18 नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. या निर्णयामुळे राज्यातील अनेक पुनर्वसित गावठाणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. त्याचबरोबर दरड कोसळून तसेच भूस्खलनामुळे पूर्णपणे गाडले गेलेल्या वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, गावांतील बाधितांना सुद्धा प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.

सह्याद्री राज्य अतिथीगृहातील समिती कक्षात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्राधिकरणाचे सहअध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन  मंत्री अनिल पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल व वने विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव बुशरा सय्यद, रस्ते सचिव संजय दशपुते उपस्थित होते.

राज्याच्या विकासात विविध प्रकल्पांचे मोठे योगदान आहे. या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यात ठिकठिकाणी पुनर्वसित गावठाणे उभारण्यात आली आहेत. मात्र, अनेक पुनर्वसित गावठाणे अद्यापि ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरित झाली नसल्याने त्यांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांचा विकास रखडतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ त्यांच्या ताब्यात घ्यावीत. या गावठाणांना 18 नागरी सुविधांसह विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज घेतला. त्याचबरोबर पुनर्वसित गावठाणात अनेक वर्षापासून वाटपाविना रिक्त असलेले भूखंड संबंधित प्रकल्पातील बाधितांना द्यावेत, त्यानंतर या जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना द्यावेत, त्यानंतरही शिल्लक राहिले, तर राज्यातील इतर प्रकल्पग्रस्तांना या प्राधान्य क्रमानुसार देण्यात यावेत, अथवा कोणी हे भूखंड घ्यायला तयार नसतील, तर नियमाप्रमाणे त्यांचे लिलाव करावेत, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कोयना धरण प्रकल्पबाधीत गोकुळ, रासाटी, हेळवाक मधील जलविद्युत प्रकल्पामुळे बाधीत शिवनदेश्वर प्रकल्पबाधित गावांसाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा. सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पामध्ये शंभर टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यांमध्ये चारशे रुपयांवरून दरमहा एका कुटुंबाला एका वर्षासाठी तीन हजार रुपये वाढ करणे, तसेच याच प्रकल्पातील सावरघर येथील 29 कुटुंबाची खास बाब म्हणून रोख रक्कम देऊन पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली.

बीड जिल्ह्यातील गुणवंती पाटबंधारे प्रकल्पातील सुकळी (ता.धारूर) येथील प्रकल्पग्रस्तांसाठी खास बाब म्हणून पुनर्वसन तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अमडापूर लघु पाटबंधारे प्रकल्पातील कुरळी व घामापूर (ता.उमरखेड) गावातील पात्र प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचा‍ निर्णय घेण्यात आला.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

RAJU DONGRE Mantralay Mumbai

मुंबई, दि. २५:- शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत ते बोलत होते. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन २०२४-२५ साठीच्या ४१ लाख २८६ कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आरबीआय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावेत, असे निर्देशही देण्यात आले.

RAJU DONGRE Mantralay Mumbai

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील तसेच राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अविरल जैन, सचिन शेंडे, नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापक रश्मी दरड, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. महाराष्ट्र कृषिप्रधान आणि प्रगतीशील आहे. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रातही अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आमचा शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्यावर संकट येऊ राहते. अशावेळी आम्ही शासन म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत त्यासाठी आम्ही संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या निकषाहून दुपटीने मदत केली आहे हेक्टर मर्यादाही वाढवली आहे एक रुपयात पिक विमा दिला आहे. बँकांनी त्याला संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो. यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तिसऱ्यांदा सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीच्या योजनेला प्रथम प्राधान्य दिले आहे. केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्याचे सहा हजार रुपये मिळून आम्ही शेतकरी सन्मान योजनेतून मदतीचा हात दिला आहे. बँका मोठ्या शेतकऱ्यांना आणि काही कृषी उद्योगांना कर्ज देतात. पण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना हात आखडता घेतला जाऊ नये. तुम्ही त्याच्या संकट काळात मागे उभे राहिल्यास तेही भक्कमपणे उभे राहतील. आम्ही देखील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करावी यासाठी प्रयत्न करतो. प्रोत्साहन देत असतो. केंद्रीय सहकार मंत्रालय निर्माण करून सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकरी आणि सहकार क्षेत्राला मजबूत करण्याचा धोरण आखले आहे. बँकानी शेतकऱ्यांसाठीच्या या संस्थांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरी सहकारी बँका, कृषी पतपुरवठा संस्था, जिल्हा बँकांना राष्ट्रीयकृत बँकांनी मदत केली पाहिजे. महाराष्ट्राकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. उद्योग क्षेत्राचेही महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलेले असते.  आपल्याकडे चांगले मनुष्यबळ आहे. आम्ही उद्योगांना रेड कार्पेट घातले आहे. दावोस येथूनही दीड लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करार केले गेले आहेत. राज्याच्या विकासाला केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनची ताकद आहे त्यामुळे बँकांनाही यात सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना विश्वास दिला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांप्रमाणेच बँकानाही शासन म्हणून सहकार्य करू, आपल्यामागे ठामपणे उभे राहू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूलमंत्री श्री. विखे-पाटील, सहकार मंत्री श्री. वळसे -पाटील, कृषी मंत्री श्री. मुंडे यांनीही महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली. तसेच चर्चेत सहभाग घेतला. सहकारी बँकांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्यावर या सर्वांनीच विविध सूचना केल्या.

बैठकीत श्री. पांडे यांनी राज्याचा वार्षिक पत आराखडा सादर केला. तसेच गतवर्षीच्या‌ उद्दीष्टांची तौलनिक माहिती सादर केली.

मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्याच्या वार्षिक पतपुरवठयाचे उद्दिष्ट हे रक्कम रु. ३३,९०, ६०१ कोटी होते. राज्यातील बँकांनी सक्रिय सहभागाद्वारे रु. ३८,७०,३८२ कोटी रु. वाटप करून ११८% एवढे लक्ष्य साध्य केले आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्राधान्य क्षेत्रांतर्गत एकूण उपलब्धी वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत रु. ६, ४०, २९६ कोटी इतकी असून जे उद्दिष्टाच्या ९८% आहे. (वार्षिक उद्दिष्ट रु. ६,५१, ४०१ कोटी होते).

कृषी क्षेत्रांतर्गत रु. १,६८,४८१ कोटी ह्या वार्षीक उद्दिष्टांच्या तुलनेत बँकांनी रक्कम रु. १,५४,१२० कोटींचे वितरण मागील आर्थिक केले असून ते वार्षिक उद्दिष्टाच्या ९१% आहे.

एमएसएमई क्षेत्रांतर्गत वार्षिक उद्दिष्ट रु. ३,६१,९१६ कोटी रु. च्या उद्दिष्टाच्या तुलनेत बँकांनी रु. ४,२३, ११५ कोटी रु. वितरण केले असून, जे वार्षिक उद्दिष्टाच्या ११७% आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता वार्षिक पत आराखडा हा रु. ४१,००, २८६ कोटी प्रस्तावित केला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत २१% वाढ दर्शविते. एकूण पत आराखड्या पैकी, प्राधान्य क्षेत्रासाठी रु. ६,७८,५४० कोटी प्रस्तावित आहेत, जे गेल्या आर्थिक वर्षात ६,५१,४०१ कोटी रुपये होते.

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरास पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट

सातारा दि. २५: कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली.

यावेळी जिल्हा व्यवस्थापक पी.बी. देशमाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार, योगेंद्र सातपुते आदी उपस्थित होते.

युवकांनी करिअरसाठी जे  क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात प्राविण्य मिळावावे.  युवकांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून प्रशिक्षणासाठी शेतकरी केले मार्गस्त

सातारा दि. २५: शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शन करणेसाठी डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विदयापीठ, दापोली येथे बांबू लागवडीबाबतचे प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून या प्रशिणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे वाहन मार्गस्थ केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय माईनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बांबू लागवडीच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने पहिल्या टप्पयात 55 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रशिक्षणासाठी दापोली येथे गेले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला सोयी सुविधा देण्यावर शासनाचा भर – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. २५:  राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देत आहे. या विभागाला तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेायी सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

गोडोली, सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख,  उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक अभियंता संतोष राखडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य आदी उपस्थित होते.

पोलीस विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाला नवीन वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई  म्हणाले, 17 ठिकाणी स्वतंत्र उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतींचे काम सुरु आहे. या विभागाच्या विविध प्रस्तांवाना मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे.

पोलीस विभगाच्या जागेत उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयत होत आहे. पोलीस विभागाने त्यांच्यासाठी नवीन जागेचा प्रस्ताव द्यावा.   प्रशासनाला सुविधा दिल्या तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जोमाने काम करतात. समाजामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने सुरु करा. काम दर्जेदार झाले पाहिजे सातारच्या वैभवात भर घालणारी वास्तु निर्माण करा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभाग चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात 25 टक्के  वाढ झालेली आहे, असे  प्रास्ताविकात आयुक्त श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले

नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तळ घर, तळ मजला, पहिला मजला असे एकूण 2 हजार 207.69 चौ.मी क्षेत्रफळ असणार आहे. त्याचबरोबर विश्रामगृह इमारतीचेही बांधकाम होणार आहे त्याचे क्षेत्रफळ 504.11 चौ.मी. असणार आहे.

०००

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करा –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

RAJU DONGRE Mantralay Mumbai

मुंबई, दि. २५: राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरिपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,  मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, शेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके, जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ते केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीयस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ला निना मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हाट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी असे आवाहन कृषिमंत्री श्री.मुंडे यांनी प्रास्ताविक करताना केले.

यंदा खरीपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४०.२० लाख हेक्टर, सोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टर, भात पिकाखाली १५.३०लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.८० लाख हेक्टर, कडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे. राज्यात २४.९१ लाख क्वि. बियाणे उपलब्ध असून १.५० लाख मे. टन युरिया व २५ हजार मे. टन डीएपी खतांचा संरक्षित साठा  करण्यात आल्याची माहिती प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली.

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

0
विधानसभा/विधानपरिषद निवेदन मुंबई दि. ८ : राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५०...

विधानसभा लक्षवेधी

0
खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ८ :  खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार...

 ‘दिलखुलास’ मध्ये मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांची १०, ११, १२ व १४...

0
मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात, 'हवामान अंदाज तंत्रज्ञान आणि प्रादेशिक हवामान केंद्राची कार्यपद्धती' या विषयावर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या...

संसदीय राजभाषा समिती सदस्यांकडून राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि. ८: संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई...

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...