मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 706

ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा

शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी

मुंबई, दि. 26 : ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना आज दिले.

पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

000

मंत्रिमंडळ निर्णय : दि. २६ जून २०२४

विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता

७५ हजारऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क

पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे ७५ हजार रुपयांचे शुल्क कमी करून १० हजार रुपये करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना बऱ्याच वेळा आर्थिक उत्पन्नाचे पुरेसे साधन राहत नाही. त्यामुळे कोर्ट फी शुल्काची रक्कम व वकील फी यामुळे अनेकवेळा मिळकतीवर वारस म्हणून नाव नोंद करणे राहून जाते. भविष्यात मिळकतीचे कौटुंबिक वाद उद्भवल्यास या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात आर्थिक समस्या ही प्रमुख बाब आहे. सधन कुटुंबातील महिलांनाही अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. विधवा महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तुलनेत शासन महसूलाची हानी अल्प प्रमाणात असल्याचे निरीक्षण सर्वच उत्पन्न गटातील महिलांना ही सवलत लागू करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

—–०—–

चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनला

भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कास सूट

 

चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर व टाटा न्यास (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून खाजगी भागीदारी तत्त्वावर चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. या फाऊंडेशनला जमीन भाडेपट्टयाच्या करारनाम्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णाय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर व टाटा न्यास (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या खाजगी भागीदारी तत्त्वावरील १०० खाटांच्या कर्करोग रुग्णालयाकरिता चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन या कंपनीस / संस्थेस मौजे चांदा रै., ता.जि. चंद्रपूर येथील १० एकर जमीन ३० वर्षासाठी नाममात्र रू. १/- प्रतीवर्ष या दराने भुईभाडयाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णालयामुळे खेड्यातील तसेच शहरातील सर्वसामान्य स्तरातील कर्करोगग्रस्तांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. यठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य योजनेच्या दरामध्ये कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यासह रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अटीस अधीन राहून या फाऊंडेशनला दिलेल्या जागेच्या भाडेपट्टा करारनाम्यास मुद्रांक शुल्क भरणा करण्यापासून सूट देण्यास आज मान्यता देण्यात आली.

—–०—–

विरार ते अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी

हुडकोकडून कर्जास मान्यता

 

विरार ते अलिबाग या बहुउद्देशीय वाहतूक मार्गीका प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २२ हजार २५० कोटी हुडकोकडून कर्जरुपाने घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मागणी केल्यानुसार या कर्जासाठी शासन हमी देण्यात येईल.  एकूण ११३० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून एकूण २१५.८० हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २३४१ कोटी ७१ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

—–०—–

पुणे रिंग रोड संपादनासाठी

हुडकोकडून कर्जास मान्यता

 

पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ५ हजार ५०० कोटी हुडकोकडून कर्जरुपाने घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मागणी केल्यानुसार या कर्जासाठी शासन हमी देण्यात येईल.  एकूण ९७२.०७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून एकूण ५३५.४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी १ हजार ८७६ कोटी २९ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

—–०—–

मुंबई मेट्रो-३ लवकरच सुरु होणार

शासनाच्या हिश्श्याची रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला देण्यास मान्यता

 

मुंबई मेट्रो-३ लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्श्याची ११६३ कोटी एवढी रक्कम एमएमआरडीएला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पाची सुधारित किंमत ३७ हजार २७५ कोटी ५० लाख असून प्रकल्पाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.  याचा सिप्झ ते बीकेसी पहिला टप्पा सप्टेंबर २०२४ पर्यंत आणि डिसेंबर २०२४ अखेरीपर्यंत पूर्ण प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन आहे.

—–०—–

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा 

रेसकोर्सवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम होणार नाही

 

महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून तो विहित कालावधीत पूर्ण करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या संदर्भात मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महालक्ष्मी रेसर्कोर्सवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम होणार नाही असेही मंत्रिमंडळ बैठकीत विभागाने स्पष्ट केले आहे.

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना यथील एकूण २११ एकर भूखंडापैकी अंदाजे ९१ एकर शासकीय भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे दि.०१ जून. २०२३ पासून ते दि. ३१ मे. २०५३ या ३० वर्षाच्या महत्तम कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास अटी व शर्तीमह मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे, मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना यापुवों दण्यात आलल्या २११ एकर भुखंडापैकी अंदाजे ९१ एकर भुभाग ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क उभारण्याकरिता मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांच्या ताब्यात असलेली उर्वरित १२० एकर जागा या संस्थेने बृहन्मुंबई महानगरपालिकस उपलब्ध होत आहे.

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. याच्या क्लब स्टेबल्स आणि इतर सरचनांनी व्यापलेल्या बांधीव क्षेत्राकरीता दि.१४.०३.२०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयामध्य स्पष्ट केल्यानुसार जमिनीच्या वार्षिक मुल्य दर तक्त्यातील (रेडीरेकनरने येणाऱ्या) किमनांच्या १०% रकमेवर १% या प्रचलित दराने भाडेपट्टा आकारणी करण्यात यईल. उर्वरित माकळी जागा अश्व शर्यतीच्या दिवसांव्यतीरिक्त इतर दिवसांकरिता सार्वजनिक वापराकरिता उपलब्ध राहणार असल्याने या जागेवर सवलतीच्या दराने भाडेपट्टा आकारण्यात येणार आहे. मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांचेवर दरवर्षी आकारण्यात येणारी दरवाढ ही ३% पेक्षा जास्त नसेल मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना भाडेपट्टा कराराने दण्यात आलल्या महालक्ष्मी रेसकोर्स येथील शासकीय भूखंडावर दि.०१.०१.२०१७ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीकरीता अतिरिक्त भाडेपट्ट्यापोटी अनुज्ञेय होणा-या फरकाची रक्कम वसूल करण्यात याणार नाही

भाडेपट्टा कराराने दिलेल्या भूखंडावर म. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांचद्वार आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व क्रीडेत्तर कार्यक्रमाकरिता प्रतीदिन आकारावयाचे अनुज्ञप्ती शुल्क (License Fee) हे शासन निर्णय, महसूल व वन विभाग, दि. २३.०६.२०१७ अन्वये विहित केलेल्या धोरणानुसार क्रीडेत्तर कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसासाठी रु.१,५०,०००/- प्रती कार्यक्रम व एकाच आयोजकाचा तोच कार्यक्रम एकापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल, तर लगतच्या प्रत्येक दिवसासाठी रु.१,००,०००/- प्रति कार्यक्रम प्रतिदिन याप्रमाणे आकारण्यात येईल

—–०—–

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी

३१० मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता

 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा-२ मधून ३ हजार ९०९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून ३१० मिलियन डॉलर्सचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार कि.मी. रस्त्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.  त्यापैकी नियमित ७ हजार कि.मी. रस्ते कोणत्या जिल्ह्यात करायचे ते वाटप निश्चित केले आहे.

जनहितासाठी धाडसी निर्णय घेणारे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला यांच्यासह समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न हे राज्य शासन करीत असून अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. मागील दोन वर्षात राज्यातील विविध पायाभूत सुविधांसह अन्य विकासकामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून जनतेच्या हितासाठी धाडसी निर्णय घेणारे हे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून (दि. 27 जून) सुरुवात होत आहे.  अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांत सुमारे 45 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिलाच निर्णय शेतकरी हिताचा घेतला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजना 2.0 सुरु करण्यात आलेली आहे. समृद्धी महामार्ग, मेट्रो, मुंबईतील रस्ते, कोस्टल रोड, अटल सेतू यासारखे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. वाढवण बंदर प्रकल्प गेम चेंजर ठरणार असून आजूबाजूच्या भागाचा विकास होईल. महिला व युवकांसाठी विविध योजना, शासन आपल्या दारी योजनेतून लाखो लोकांना फायदा देण्यात आला आहे.

विदर्भासह राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यात उद्योगधंद्यांना पोषक वातावरण आहे. राज्य औद्योगिक क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे. सरकारी नोकऱ्या, पोलीस भरती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, तर काहींना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहेत. राज्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेवून पुढे जात आहोत. मुंबईसारख्या शहरात जागतिक दर्जाचा 300 एकराचा सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम होणार नाही. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसह कॅशलेस सेवा सुद्धा देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून 87 प्रकल्प पूर्ण होत आले आहेत. वैधानिक विकास मंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचा हर घर जल या योजनेमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. गुंतवणुकीमध्ये राज्य आघाडीवर आहे. पुण्यातील पोर्शे घटना दुर्दैवी असून याबाबतीत राज्य शासनाने कडक भूमिका ठेवली आहे. ड्रग्ज व अमली पदार्थविरोधी मोहीम धडकपणे राबविली जात आहे. पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राला बळ देणारे ठरेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दुर्बळ घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारउपमुख्यमंत्री अजित पवार

यंदाचे वर्ष छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आहे. राज्य शासन शाहू-फुले-आंबेडकर यांच्‍या विचाराने काम करीत आहे. दुर्बळ घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला राज्य शासन उत्तर देण्यास तयार आहे.

पत्रकार परिषदेपूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

००००

दत्तात्रय कोकरे/पवन राठोड/विसंअ/

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणुकीसाठीची  मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

मतदानाची ६ वाजेपर्यंतची आकेडवारी पुढीलप्रमाणे –

कोकण पदवीधर मतदारसंघ मतदानाची सायंकाळी ६ वाजेपर्यंतची टक्केवारी  ६३.०० टक्के इतकी आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ  सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ५६.०० टक्के इतकी आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघ  सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची  टक्केवारी  ७५.०० इतकी आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ  ६ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी  ९३.४८ टक्के  इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.

अल्पसंख्याक आयुक्तालय अल्पसंख्याकाच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरेल – अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका)- अल्पसंख्याक आयुक्तालय हे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींच्या शिक्षण, रोजगारासह सर्वांगीण विकासासाठी कार्य करेल, असा विश्वास अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

आज श्री. सत्तार यांच्या हस्ते हज हाऊस येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अल्पसंख्याक आयुक्त मोईन ताशिलदार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,पोलीस अधीक्षक  मनीष कलवानिया, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मंत्री सत्तार म्हणाले की देशातील पहिले अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे होत असून या आयुक्तालयाअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विविध घटकातील लोकांसाठी विविध विकास योजना अंमलबजावणी,पाठपुरावा करून त्यांना वेळीच लाभ देणे शक्य होईल. करण्यात येणार आहे असे यावेळी सांगितले अल्पसंख्याक आयुक्तालयामुळे अर्जदाराच्या अर्जावर तात्काळ कारवाई होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद  मदत होईल.

अल्पसंख्याक विभागाच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी हे एक विभाग कार्य करणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. शिष्यवृत्ती रोज शिष्यवृत्ती रोजगार उर्दू घर यासारख्या विविध सुविधा या आयुक्तालय मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व संबंधित विविध विभागाचे एकत्रित समन्वयन व शासन व अल्पसंख्याक विभाग हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा एक दुवा ठरेल असा विश्वास मंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला.

भागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,अल्पसंख्याक आयुक्त मोईन तहसीलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ८५.४२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 26 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संगीता इलेक्ट्रिक अॅण्ड हार्डवेअर स्टोअरच्या समोर, पनवेल – मुंब्रा रस्ता, पिंपरीगाव ता. जि. ठाणे  या ठिकाणी गोवा राज्यात निर्मित, विक्रीस परवानगी असलेला व राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याचा साठा, दहाचाकी वाहन, दोन मोबाईलसह जप्त केला आहे. या कारवाईमध्ये एकूण 85 लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ह्या ठिकाणी अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला आर. जे. 09 जी.सी 1907 क्रमांकाच्या ट्रकमधील विदेशी मद्याचे 960 बॉक्स आढळून आले. या गुन्ह्यापोटी मोहम्मद शाहीद कमरूद्दीन हुसेन (वय 24) व नासीर सोकत हुसेन (वय 26)  रा. कोटला जि. मेवात (हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे.  उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्लीतून महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँण्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्यांची मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. जे जरांडे, जवान केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नारायण जानकर, नानासाहेब शिरसाट, भाऊसाहेब कराड, विजय पाटील, सागर चौधरी  यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. दांगट करीत आहेत, असे निरीक्षक श्री. शेवाळे यांनी कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

निम्न तापी पाडळसे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश व्हावा  

मुंबई, दि. २६ : जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई (PMKSY-AIBP) योजनेत होण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्लीत भेट घेतली.

निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई  योजनेत होण्याबाबतच्या प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने (CWC) इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स (Investment Clearance) दिलेले होते. असून या प्रकल्पाच्या टप्पा-१ चा समावेश या योजनेत होणेबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली आहे. आज झालेल्या बैठकीत याविषयी सकारात्मक चर्चा झाली. निम्न तापी (पाडळसे) प्रकल्पाबाबतची कार्यवाही पूर्ण करून (PMKSY-AIBP) या योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत लवकरच अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात निर्देश मंत्री सी. आर. पाटील यांनी विभागाच्या सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव देबाश्री मुखर्जी, जलसंधारण विभागाच्या सचिव विनी महाजन तसेच जलशक्ती विभाग आयुक्त  ए. एस. गोयल उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 26 :  मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप लांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त देविदास क्षीरसागर, इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच हनुमान टेकडी येथे पाहणीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, यापूर्वी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्व्हे करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबईमध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी येथे सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे त्यासाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. खडकाच्या आतमध्ये आठ मीटर खोल इतके सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढणार आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे.  दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, २००१ मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळल्याची घटना घडून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता अशा घटना मुंबई मध्ये कुठेच घडू नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मुंबई – पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेच याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फुलांनी स्वागत

स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे तीन वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे पोहोचले. त्यावेळी दरड कोसळण्याच्या घटनांपासून संरक्षणासाठी ज्या सेफ्टी नेट बसवल्या आहेत. त्यामुळे जीवाचा धोका कमी झाल्याची भावना व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करीत सहृद स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचा चालत पायथा ते टेकडी थेट प्रवास

असल्फा विलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे. हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत.पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कार्यभार स्वीकारला

Oplus_131072

छत्रपती संभाजीनगर, दि. 26 :  नूतन विभागीय आयुक्त  दिलीप गावडे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी विभागीय आयुक्त जगदिश मिनीयार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी श्री गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त अनंत गव्हाणे, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, डॉ. सिमा जगताप, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधला. मराठवाड्यातील शेती, टंचाई तसेच सामाजिक विषयांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व मिळून समन्वयाने काम करूया, असेही ते म्हणाले.

Oplus_131072

श्री. गावडे हे 1990 मध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर रूजू झाले होते. वाई येथे प्रांत अधिकारी, पुणे येथे राजशिष्टाचार विभागात उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त, विदर्भात एमआयडीसीचे सीईओ पदावर त्यांनी काम केले आहे.

सन 2007 मध्ये त्यांना आयएएस पदावर बढती मिळाल्यानंतर गोंदिया जि. प. सीईओ, अहिल्यादेवीनगर येथे मनपा आयुक्त, नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, पर्यटन विभागाचे संचालक व मानवी हक्क संरक्षण विभागाचे सदस्य सचिव या पदावरही त्यांनी काम केले आहे.

लोकराज्य मे २०२४

लोकराज्य मे २०२४ (भाग-१)

Open Book

 

लोकराज्य मे २०२४ (भाग-२)

Open Book

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ : विद्यार्थी हितासाठी निर्णय

0
मुंबई, दि. 8 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि...

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई, दि. ८ : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या...

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0
मुंबई, दि. ८ : फनेल झोनमध्ये उड्डाण मर्यादा आणि विविध तांत्रिक कारणांमुळे या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. मुंबईतील विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या आणि...