गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 69

विदर्भ ज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठ दर्जासाठी सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

अमरावती, दि. 25 (जिमाका) : शहराच्या हृदयस्थानी 167 एकरावर आणि साडेतीनशे विविध वनस्पती असलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

आज शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत, उपहारगृह, विद्यार्थी सामान्य सुविधा कक्ष, सामायिक परीक्षा कक्ष, वाचनालयाचे उद्घाटन, तसेच स्मार्ट क्लासरूमचे भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित मुख्य कार्यक्रमात उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सतीश माळोदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा दिल्याने अनेक विकास कामे चांगल्या पद्धतीने झाली. पालकमंत्री असताना शासन आणि जिल्हा नियोजनमधून दिलेल्या निधीचा चांगला उपयोग झालेला आहे. या निधीमधून देखण्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविद्यालयाने स्वायत्त विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न करावे. यामध्ये सरकार म्हणून कोणताही अडथळा येणार नाही. स्वायत्त विद्यापीठ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया करावी. तसेच कागदपत्र तयार ठेवावे. काही विद्यापीठांना संलग्न करून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करावे. स्वायत्त विद्यापीठ झाल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे अभ्यासक्रमही स्वतंत्रपणे राबविता येतील.

शैक्षणिक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यात वारणा, रयत, होमी भाभा यांना स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. त्यासोबतच येत्या काळात साडेपाचशे प्राध्यापक आणि सुमारे 3000 अशैक्षणिक कार्य करणाऱ्यांची भरती होणार आहे. विद्यार्थ्याहित लक्षात घेऊन शासनाने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. या शैक्षणिक धोरणातून माणूस केंद्रित धोरण ठेवले आहे. देशाबद्दल प्रेम असणारा एक नागरिक घडवण्यासाठी यातून प्रयत्न केले जाणार आहे. एक चांगला माणूस व्हावा आणि त्याने अर्थाजन करावे, यासाठी नवीन शैक्षणिक पद्धती उपयुक्त ठरणार आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच युवक योग, प्राणायाम, चित्रकला अशा विविध अंगांनी हे शिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक

सांगली, दि. २४ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने व दोन्ही गावच्या सरपंचांच्या सहकार्याने खुला करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

आळते आणि कार्वे या दोन गावांच्या हद्दीवरील खानापूर तासगाव रस्त्यापासून सुरू होऊन ओढा पर्यंत जाणारा अंदाजे दोन किलोमीटरचा रस्ता बऱ्याच वर्षापासून बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यास तसेच शेतामध्ये मोठी अवजारे आणि वाहने नेण्यास अडचणी येत होत्या. या कारणाने त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता. या रस्त्याची शासकीय तसेच खाजगी मोजणी होऊन सुद्धा शेतकऱ्यांमध्ये त्या रस्त्याबाबत एकमत होत नव्हते. दोन्ही तालुक्यांच्या हद्दीवरील रस्ता हा या खानापूर व तासगाव या  दोन तालुक्यांच्या शीवेवरचा हा रस्ता खुला झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आळते गावचे सरपंच बालाजी मोहिते आणि कार्वे गावचे सरपंच बाळासो जाधव यांची भेट घेऊन याकामी पुढाकार घेतल्याबद्दल दोघांचे तसेच शेतकऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी इतर शेतकऱ्यांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन महसूल प्रशासनाच्या मदतीने अधिकाधिक रस्ते खुले करून घ्यावेत तसेच त्या रस्त्यांची सात बारावर नोंद करून घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी विटा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल आणि खानापूर – विटा तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे, कार्वे गावच्या शेतकरी तसेच पोलीस पाटील ज्योत्स्ना पाटील, अमित पाटील, रोशन जाधव व आळते गावचे  माणिक सूर्यवंशी उपस्थित होते.

000

 

..ही तर महाराष्ट्रासाठी अमर्याद संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि,२४: भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारचे स्वागत केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान कियर स्टार्मर यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात की, ‘या करारामुळे भारतीय शेतकरी, विविध प्रकारच्या कारागिरांना तसेच सेवा क्षेत्राला फायदा होणार आहे. विशेषत: जागतिक पातळीवर पोहचण्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि कारागीरांचे सक्षमीकरण होणार आहे. राज्यातील आंबा, द्राक्ष, फणस तसेच तृणधान्ये आणि सेंद्रीय उत्पादक, निर्यातदार शेतकऱ्यांना या करारातून लाभ होणार आहे.

चर्मोद्योग आणि पादत्राणे क्षेत्रासाठी शुन्य निर्यात शुल्क धोरणामुळे कोल्हापूरी चपलांच्या उद्योगाला  मोठी चालना मिळणार आहे.

हळद आणि अन्य तत्सम मसाले उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. राज्यातील विविध भागांतील अशा सर्वच लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी हा करार एक मोठी संधी घेऊन येतो आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच परंपरागत उद्योग- व्यवसाय क्षेत्रासाठी अमर्याद संधीची कवाडे खुली होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या कराराचे मनापासून स्वागत करतो, त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, दि. २४ : भाषा  हे संवादाचे प्रभावी साधन असून या  माध्यमातून  ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने  आपल्या मातृभाषेचा  अभिमान  बाळगताना इतर  भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित , तंजावर घराण्याचे  छत्रपती बाबाजीराजे भोसले, कुलसचिव प्रा. रविकेश  उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टी आणि युद्धनीतीचा अभ्यास जेएनयूसारख्या प्रतिष्ठित संस्थेत सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “युनेस्कोने शिवरायांच्या १२ किल्ल्यांना ‘मराठा मिलिट्री लँडस्केप’ म्हणून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. शिवाजी महाराजांनी सह्याद्री, पश्चिम घाट आणि समुद्रकिनारी अभेद्य किल्ले बांधून परकीय धोके ओळखले आणि मराठ्यांना संपूर्ण भारतात आपला झेंडा फडकविण्यास प्रेरित केले. शिवरायांच्या युद्धनीतीचे आजही जगभरात कौतुक होते. महाराजांची प्रत्येक लढाई हे सामरीक शक्तीचे उदाहरणं असून शिवाजी महाराजांमुळे स्वराज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसामध्ये विजिगीषूवृत्ती रुजविली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

मराठी ही अतिप्राचीन भाषा आहे. आपल्या ‘नेव्ही’च्या ध्वजावर देखील राजमुद्रा झळकली आहे आणि मराठीची राजमुद्रा आता दिल्लीत देखील स्थापित झाली आहे. आजही मराठी साहित्य, मराठी नाट्यसृष्टी ही सर्वोत्तम आहे. रंगभूमी देखील ज्या भाषेने टिकवली ती भाषा म्हणजे मराठी. सगळ्या विद्यापीठांत मराठी भाषेवर संशोधन झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

मराठी ही अतिप्राचीन भाषा आहे. तिला अभिजात दर्जा मिळणे हा राजाश्रय आणि राजमुद्रेचा क्षण आहे. मराठी भाषेतील साहित्याने देशाला समृद्ध केले आहे असे त्यांनी सांगितले. ‘जेएनयू’ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली असून हा पुतळा देशासाठी बलिदान आणि समाजसेवेची प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी भाषा केंद्र: सांस्कृतिक गौरव – मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत

उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी ‘जेएनयू’मधील मराठी अध्यासन केंद्राची स्थापना हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे नमूद केले.  काश्मीरमध्ये मराठी पुस्तकांचे गाव, परदेशात मराठी बृहन् मंडळे  निर्माण करणार असल्याचे सांगितले. यावेळी नाशिक येथील विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रण देत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ‘जेएनयू’मध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  डॉ सामंत यांनी यावेळी सांगितले.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या  कुलगुरू प्रा. शांतीश्री पंडित यांनी मराठी साहित्य, नाटक आणि कवितेचे महत्त्व विषद केले. प्रा. पंडित यांनी ‘सिंधुदुर्ग संवाद’ या राष्ट्रीय संवाद कार्यक्रमाची घोषणा केली आणि ‘जेएनयू’ समानता, गुणवत्ता आणि नाविन्यावर आधारित अग्रगण्य विद्यापीठ असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ५० भारतीय भाषांच्या अभ्यासाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांनी मराठी विद्यार्थ्यांना ‘जेएनयू’मध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, धनंजय महाडिक, मेधा कुलकर्णी, हेमंत सावरा, अनिल बोंडे, अजित गोपछडे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यासह केंद्र शासनाचे विविध विभागातील अधिकारी, जेएनयू मधील प्राध्यापक आणि मराठीप्रेमी  उपस्थित होते.

0000

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. २४ :- महाराष्ट्र आता थांबणार नाही…! महाराष्ट्र सर्वच महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसेच वित्तीय संशोधन क्षेत्रातील ख्यातनाम वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनले यांनी प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्राचे नेतृत्व करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचे तसेच त्यातील निष्कर्षांचे स्वागत केले आहे. हा अहवाल, त्यातील हे निष्कर्ष म्हणजे आपल्या राज्याने विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेले धोरण आणि त्यानुसार सुरू असलेली सकारात्मक वाटचालीचे द्योतक आहे. यातून महाराष्ट्रावरचा विश्वास व्यक्त झाला आहे. त्यामुळे या अहवालाचे आणि या संस्थेचे मनापासून आभार. यात आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्तीय शिस्त, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसह विविध क्षेत्रांतील कामगिरीची दखल घेतली गेली आहे.

महाराष्ट्राने २०३० पर्यंत वन ट्रिलीयन डॉलर्स म्हणजेच एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प केला आहे. या दिशेने आपली दमदार पाऊले पडत असल्याचे, हा अहवाल म्हणजे निदर्शक आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालातून महाराष्ट्राच्या दिमाखदार वाटचालीवरच प्रकाश टाकला गेला आहे. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे मनापासून अभिनंदन!!! असेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.२४ (जिमाका) : आजचे युग हे कौशल्यावर चालते. त्यामुळे युवकांनी रोजगार स्वयंरोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजन आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वप्न पाहत असतात. असे स्वप्न पूर्ण होण्यासाठी युवकांनी परिश्रमाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जाजू महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे युवकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके, आ.बाळासाहेब मांगुळकर, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहायक आयुक्त प.भ.जाधव, हरिकिसन जाजू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू तसेच शिल्पा जाजू, प्राचार्य रितेश चांडक, प्रफुल चव्हाण उपस्थित होते.

सद्याच्या युगात शिक्षण घेवूनही अनेक तरुणांना रोजगार, नोकरी मिळत नाही. त्यामुळे शिक्षणासोबतच कौशल्य विकास देखील आवश्यक आहे. आजचे जग केवळ डिग्री, शिक्षणावर चालत नसून कौशल्य विकसित केल्यास अधिक चांगल्या संधी आपण मिळवू शकतो. या मेळाव्यात विविध कंपन्या थेट आपल्या दारात नोकऱ्या घेवून आल्या आहेत, संधी आपल्या दारातच आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.

छोट्यापासून सुरुवात करत मोठे ध्येय गाठा. शासनाने आपल्यासाठी अनेक योजना आणल्या असून यापैकीच एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. शासकीय, खाजगी कार्यालयामध्ये कामाची संधी मिळून विद्यावेतन देखील या योजनेतून दिले जाते. जे उमेदवार स्वयंरोजगार करू इच्छितात अशा युवकांना देखील शासन मदत करते. स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजकाना संधी दिली जाते. विविध कर्ज देणारी महामंडळे सुद्धा यासाठी काम करतात. त्यामुळेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करा, मोठे व्हा, असे पालकमंत्र्यांनी युवकांशी संवाद साधतांना सांगितले.

मेळाव्यामध्ये सहभागी १४ नामांकित कंपन्यांनी त्यांच्याकडील ४७० रिक्त पदाकरिता नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे संचलन सिमा खिरोडकर यांनी केले. आभार कॉलेज ऑफ मनेजमेंट ॲण्ड कॉम्प्यूटर सायन्सच्यावतीने व्यक्त करण्यात आले.

00000

 

निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे

अमरावती, दि. २४ : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व अनुषंगीक बाबी, सोयी-सुविधा संदर्भात अचूक नियोजन करुन ठेवावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा श्री. वाघमारे यांनी विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्य अधिकारी अ. गो. जाधव, जिल्हाधिकारी आशिष येरेकर (अमरावती), अजित कुंभार (अकोला), डॉ. किरण पाटील (बुलडाणा), श्रीमती बुवनेश्वरी एस. (वाशिम), यवतमाळचे प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपायुक्त संतोष कवडे यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासनचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री. वाघमारे यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती विभागाचा निवडणूक पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वाढ झालेल्या मतदारांची संख्या, मतदान केंद्राची संख्या अनुरुप मनुष्यबळाचे नियोजन करावे. मतदान केंद्रावर महिला निवडणूक अधिकारी-कर्मचारी व मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात यावी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हिलचेअर आदी सुविधांची उपलब्धता प्रत्येक मतदान केंद्रावर करुन ठेवावी. मतदान केंद्रावर मतदारांसाठी प्रशासनाने सुविधा न केल्याने मतदानाचा टक्का कमी झाला, अशी तक्रार येता कामा नये. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

ईव्हीएम मशीन उपलब्धता यादृष्टीने जिल्ह्यांनी सर्वप्रथम त्यांच्याकडील मशीनची प्रथम स्तर तपासणी (एफएलसी) करुन घ्यावी व त्यानुषंगाने कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व अनुषंगीक बाबींची दुप्पट प्रमाणात उपलब्धता करण्यात यावी. ज्या जिल्ह्यात अधिक ईव्हीएम मशीन असेल त्यांनी लगतच्या जिल्ह्यांची मागणी पूर्ण करावी. निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी लागणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आयोगाला त्यासंदर्भात एकत्रित मनुष्यबळाची मागणी कळविण्यात यावी. निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ घेताना, त्यासंबंधीचे नियुक्ती आदेश निर्गमित करताना आयोगाच्या दिशा-निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात यावे. अनुभवी मास्टर ट्रेनर यांची नेमणूक करुन प्रशिक्षणाचे आयोजन करुन निवडणूक प्रक्रिये संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. दि. 1 जुलै 2025 या अर्हता दिनांकावर मतदार यादी निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादी व विभाजन याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री. वाघमारे यांनी यावेळी दिल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका राज्यात होणार आहेत. यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी अचूक नियोजन करावे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रावर मतदार यादी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मतमोजणीसाठी तालुकास्तरावर पुरेशी जागा असलेले गोडावून उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करावे. निवडणूका पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, असे आयोगाचे सचिव श्री. काकाणी यांनी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करुन विभागात निवडणूका सुरळीत पार पाडल्या जातील, असे यावेळी सांगितले आणि पूर्व तयारीचा आढावा दिला. यावेळी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारी संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.

0000

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य – उपमुख्यमंत्री 

सोलापूर/पंढरपूर, दिनांक २४ : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ आहे. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्र बाहेर नेली, रुजवली व वाढवली. त्यामुळे वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा आहे. तसेच वारीच्या माध्यमातून देशभरातून लाखो भाविक पंढरपूरात येतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी व सेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून  संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी सर्वश्री आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, उत्तम जानकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सकल संत वंशज तथा संत समाधी संस्थान प्रमुख, विश्वस्त, फडकरी, जेष्ठ कीर्तनकार मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. तसेच हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी म्हटले.

शेतकरी व वारकरी यांचा विकास हे प्राधान्य असून संत नामदेवांच्या शिकवणीप्रमाणे तळागाळातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. शासन धार्मिक अधिष्ठानास राजकीय अधिष्ठानापेक्षा प्राधान्य देत असून, महाराष्ट्रातील तमाम साधू-संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, असेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले असून विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिरे, शुद्ध पाणी, निवास, स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा सगळा विकास लोकांना विश्वासात घेऊन आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र विकास व संस्कार केंद्रांचा महत्त्व

महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्राला सरकारने देणगी दोन कोटी रुपयांवरून पाच कोटीपर्यंत वाढवली आहे. मंदिरांना संस्कार केंद्र मानून महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला. तसेच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत वारकऱ्यांच्या गरजांवर अधिक प्रभावीपणे काम केले जाणार आहे, अशी माहिती श्री शिंदे यांनी दिली. तसेच पांडुरंग आपल्या प्रत्येक वारकऱ्यात आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली आणि धर्मरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे ठामपणे सांगितले. संत नामदेवांनी भक्तीबरोबरच ज्ञानाचा प्रसार केल्यामुळे त्यांची शिकवण देशभर पसरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संतांचे विचार आणि वारकरी संतरंपरा हीच महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हेच आपले कर्तव्य असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी म्हटले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केशवराज यांचे दर्शन घेतले व त्यानंतर नामदेव महाराजाच्या वंशज  यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी त्यांना पगडी विना तसेच सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संस्थांच्या वतीने देण्यात आलेला श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज हा पहिलाच पुरस्कार श्री. शिंदे यांना देण्यात आलेला आहे.

अक्षय महाराज भोसले यांनी प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व त्यांचे वंशज यांच्या परंपरेंची व कार्याची माहिती दिली तसेच हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश सांगितला. यावेळी ह. भ.प. चैतन्य महारज देगलूरकर, राणा महाराज वासकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

 0000

बिहार मधील मतदार यादी सुधारणा मोहीम 

मुंबईदि. २४ : बिहार मधील मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेअंतर्गत निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली असूनएकही पात्र मतदार वगळू नये हा उद्देश स्पष्ट केला आहे.

२० जुलै रोजी सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO/ERO/DEO/CEO) ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नाहीतमृत मतदारकायमस्वरूपी स्थलांतरित मतदार यादी पुरविण्यात आली आहे

कोणताही मतदार किंवा राजकीय पक्ष १ सप्टेंबर २०२५ पर्यंत यादीतील त्रुटींबाबत दावा किंवा हरकत नोंदवू शकतो. आतापर्यंत ९९ टक्के मतदारांचा समावेश पूर्ण झाला असून २१.६ लाख मृत मतदारांची नोंद करण्यात आली आहे. ३१.५ लाख मतदार स्थलांतरित असल्याचे आढळले आहे. ७ लाख मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेली आहेत. १ लाख मतदार शोधूनही सापडले नाहीत. घरोघरी भेटी देऊनही ७ लाखांहून अधिक मतदारांचे अर्ज अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

आतापर्यंत ७.२१ कोटी (९१.३२%) मतदारांचे अर्ज प्राप्त व डिजिटाइझ करण्यात आले असूनत्यांचा समावेश मसुदा मतदार यादीत केला जाणार आहे. ही मसुदा मतदार यादी १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असूनती मुद्रित व डिजिटल स्वरूपात सर्व १२ राजकीय पक्षांना दिली जाईल. यासोबतच ही यादी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेलअशी माहिती भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.२९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. २५ ऑगस्ट, २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. २६ ऑगस्ट,२०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

‘परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१’ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. २६ ऑगस्ट, २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४ (३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत्त समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२९% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस  प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील,असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

0000

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...

‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी...

शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन

0
मुंबई, दि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस...