बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 7

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे.

साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, उर्दू आणि तेलुगू या भाषांमध्ये अनुवादित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो.

हे पुरस्कार एका दिमाखदार समारंभात प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे आहे.

साहित्य अकादमी यांनी भारतीय अनुवादकांना, त्यांच्या हितचिंतकांना आणि प्रकाशकांना २०२५ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त सर्व २४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित पुस्तके सादर करण्याचे आमंत्रण दिले आहे. २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये (म्हणजे १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान) प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

प्रत्येक पुस्तकाच्या १ प्रतीसह अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. पुरस्काराची सविस्तर माहिती,  www.sahitya-akademi.gov.in  या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

००००

अंजू निमसरक,मा.अ/वि.वृ.क्र.100 /दि.03.05.2025

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ‘ क्रिएट इन इंडिया’ या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी १०  ते सायंकाळी ६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

या परिषदेत मास्टरक्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत क्रीटोस्फीअर स्टेज, दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये स 10 ते 11.40 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे मनोरंजन क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नवनवीन तंत्रज्ञान यावर चर्चासत्रे होतील.

०००

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस आशय निर्मिती जागतिक स्तरावर  प्रभावशाली  ठरते, असे मत ज्येष्ठ निर्मितीतज्ज्ञ डिबेरा रिचर्ड्स यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित “वेव्हज २०२५, दृकश्राव्य मनोरंजन समिट”मध्ये टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील MPA अहवाल या विषयावर आयोजित परिसंवादात रिचर्ड्स बोलत होत्या.  या परिसंवादात केलेय डे, केवीन वज्झ, डिबेरा रिचर्ड्स, केटीलीन यार्नल, जस्टीन वाररोके हे तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन उर्मिला वेणूगोपालन यांनी केले.

मोशन पिक्चर असोसिएशन (MPA) टेलिव्हिजन आणि ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट (OCC) उद्योगाच्या आर्थिक योगदानावरील अहवाल या क्षेत्राच्या नवोपक्रम, रोजगार निर्मिती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकतो. या अनुषंगाने या परिसंवादात बदल्यात काळात टेलीव्हीजन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम ठरणार आहे, यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना कोणत्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आशय ग्रहण करण्याची इच्छा होते, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा असणार आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी ग्राहकांकडून टेलिव्हिजन,ओटीटी किंवा त्यांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्क्रीनवर ते आपल्या आवडीनुसार आवश्यक तो मजकूर,आशय बघतील, ऐकतील, यामध्ये महत्त्वाची ठरणारी गोष्ट आहे. ती‌ त्या आशयाची गुणवत्ता आणि दर्जा, कारण आशय जितका‌ आकर्षक, उपयुक्त आणि माहितीपूर्ण पद्धतीने मांडला जाईल, त्यानुसार त्याला ग्राहकांची पसंती आणि बाजारपेठेत आपले स्थान बळकट करणे शक्य होईल, त्यामुळे उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होणे आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आशयाची संपन्नता सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरणारी बाब आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा आणि त्यातील आशय निर्मितीचे मूल्य समजून घेणे, आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर जे प्रभावी, लक्षवेधक असते आणि ग्राहकांना भावते ते जागतिक पातळीवरही प्रकर्षाने यशस्वी ठरते. लोकल ते ग्लोबल हे सूत्र आशय निर्मिती करताना मध्यवर्ती असले पाहिजे, असे मत यावेळी परिसंवादात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

०००

वंदना थोरात/विसंअ/

 

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) – एक राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहकार्याला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला.

त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले की, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या  क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

वेव्हज 2025 च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या घोषणेला मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी औपचारिक रूप दिले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी आयआयसीटी भारतातील आयआयटी आणि आयआयएमच्या कार्यपद्धतीचे अनुसरण करेल.

“चित्रपट आणि मनोरंजन विश्वात पूर्णपणे नवीन असा उपक्रम सुरू करणे. हा (उपक्रम) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनविण्याचा प्रधानमंत्री यांचा दूरदृष्टिकोन असल्याचे वैष्णव म्हणाले. सहकार्य करण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योग भागीदारांचे त्यांनी मनापासून आभार मानले. आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी अभ्यासक्रम विकास, इंटर्नशिप, शिष्यवृत्ती, स्टार्टअपना  निधीपुरवठा  आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी आयआयसीटीसोबत भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे त्यांनी जाहीर केले.

“या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल मी सर्व उद्योग भागीदारांचे आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले की, ही संस्था उभी करण्यात आणि दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्यास मदत करतील. मला आशा आहे की, आयआयसीटी  (AVGC-XR) क्षेत्रासाठी एक मोठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बनेल. आम्ही आमच्या देशातील आयआयटी आणि आयआयएमसाठी तयार केलेल्या निकषांचे पालन करू, जेणेकरून ती जागतिक दर्जाची संस्था बनेल, असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओ स्टार ,ऍडोब , गुगल आणि यू-ट्यूब , मेटा , वाकॉम, मायक्रोसॉफ्ट  आणि एनव्हीआयडीआयए (NVIDIA) यांचा समावेश आहे.

या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक  मीडिया अँड एंटरटेनमेंट, एनव्हीडिया), संजोग गुप्ता (सीईओ, स्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेस, जिओ स्टार), माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक – एज्युकेशन, अ‍ॅडोब), प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्ष, गुगल इंडिया), राजीव मलिक (वरिष्ठ संचालक, वॅकॉम), संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुख, राज्य सरकार आणि आरोग्यसेवा), संदीप बांदीवडेकर (संचालक, मेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्स, मायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालक, सार्वजनिक धोरण, मेटा) यांचा समावेश होता.

आयआयसीटीचे संचालक मंडळाचे  सदस्य आणि नियामक परिषदेचे  सदस्य आशिष कुलकर्णी, बिरेन घोष, मानवेंद्र शुकुल, मुंजाल श्रॉफ, चैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आज उपस्थित  होते. आयआयसीटीच्या कार्यकारी चमूमध्ये आयआयसीटीचे सीईओ डॉ. विश्वास देवस्कर, आयआयसीटीचे सीईओ  निनाद रायकर आणि आयआयसीटीच्या विपणन प्रमुख श्वेता वर्मा यांचा समावेश आहे.

या सत्रादरम्यान आयआयसीटी आणि आघाडीच्या उद्योग भागीदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इरादा पत्रांचे आदानप्रदान करून भारतातील एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन सहयोगी प्रयत्नांचा शुभारंभ केला. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जिओस्टार, अ‍ॅडोब, गुगल, यूट्यूब आणि मेटा यासारख्या आघाडीच्या  जागतिक उद्योग कंपन्यांचा समावेश होता.

अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, चित्रपट आणि विस्तारित वास्तवात शिक्षण, संशोधन आणि विकास आणि नवोन्मेषाला  चालना देण्यासाठी या सहकार्याची रचना केली आहे. भविष्यातील वाढीसाठी एक शाश्वत परिसंस्था विकसित करून सृजनशील आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताच्या यशस्वी आयटी मॉडेलची प्रतिकृती तयार करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; आणि पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा हे करारांच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित होते.

०००

सागरकुमार कांबळे/विसंअ/

 

 

तंत्रज्ञान, कायदा आणि जागरुकतेतून पायरसी विरोधात एकत्रित कारवाईचे तज्ज्ञांचे आवाहन

मुंबई, ०३: वेव्हज्‌ 2025 मध्ये, ‘पायरसी: तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण’ या विषयावरील चर्चेत आयपी हाऊसचे आशिया पॅसिफिक विभागाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख नील गेन यांनी पायरसी एक चिंता नव्हे तर मुख्य प्रवाहातील धोका असल्याचे मत व्यक्त केले.

मीडिया पार्टनर्स आशियाचे व्यवस्थापकीय आणि कार्यकारी संचालक विवेक कौटो यांनी अनियंत्रित पायरसीमुळे होणारे आर्थिक नुकसान यावर मत मांडले. ऑनलाईन पायरसीमुळे उद्योगाला 2025 ते 2029 दरम्यान 10% पेक्षा जास्त महसूल गमावावा लागेल अशी शक्यता आहे. परंतु पायरसी विरोधी प्रभावी अंमलबजावणी केल्यास कायदेशीर व्हिडिओ सेवा वापरकर्त्यांमध्ये 25% तर आशय सामग्री गुंतवणुकीत 0.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ होऊ शकते, ज्यामुळे 2029 पर्यंत एकूण मूल्य 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. विशेषतः भारताची डिजिटल व्हिडीओ अर्थव्यवस्था वाढत असताना त्यांनी हितधारकांना पायरसी संरक्षणापासून संभाव्यतेपर्यंत सर्व शक्यता पुन्हा मांडण्याचे आवाहन केले.

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सच्या सहयोगी संचालक डॉ. श्रुती मंत्री यांनी डिजिटल पायरसी आणि सायबर क्राइम यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. पायरसीत अनेकदा ट्रोजन, रॅन्समवेअर आणि स्पायवेअर सारख्या द्वेषयुक्त साधनांचा समावेश असतो. खास करून 18 ते 24 वयोगटातील वापरकर्ते असुरक्षित असतात, असे त्यांनी निदर्शनास आणले. प्रतिबंधाची सुरवात माहितगार ग्राहकांपासून झाली पाहिजे हे नमूद करून त्यांनी व्यापक जनजागृती मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांचे आवाहन केले. त्यांनी 9-10 जुलै रोजी सीबीआय आणि इंटरपोलच्या सहकार्याने आयएसबीद्वारे आयोजित डिजिटल पायरसीविरोधी शिखर परिषदेची घोषणा देखील केली.

डॅझन (DAZN) च्या पायरसीप्रतिबंधक कार्य विभागाचे प्रमुख अनुराग कश्यप म्हणाले की, रणनीती डिटेक्शन, डिस्रप्शन आणि डिटरन्स या  तीन ‘D’ वर म्हणजेच शोध, अडथळा आणि प्रतिबंध या तीन गोष्टीवर आधारित आहे. आम्ही थेट कार्यक्रम होण्यापूर्वीच अंमलबजावणी सुरू करतो. अदृश्य वॉटरमार्किंग लीक शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

जिओ हॉटस्टारचे लीगल प्रमुख आणि या कायद्याशी संबंधित बाबींचे तज्ज्ञ अनिल लाळे यांनी कठोर अंमलबजावणीचे महत्त्व स्पष्ट केले. “सर्वात मोठा प्रतिबंधक उपाय म्हणजे म्हणजे पायरसी करणाऱ्यांवर खटला चालवणे. कायद्याच्या अंमलबजावणीत नेमकी फट कुठे आहे हे ओळखणे आवश्यक असून वरवरची कारवाई करणे थांबवले पाहिजे,” ते म्हणाले. प्रतिबंध हा प्रतिक्रियात्मक ऐवजी सक्रियपणे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आनंद अँड आनंद असोसिएट्सचे प्रवीण आनंद यांनी, तंत्रज्ञान आणि न्यायिक सुधारणा या दोन्हीमध्ये उपाय त्यावर आहे, यावर मुद्द्यावर भर दिला. “एआय, ब्लॉकचेन आणि वॉटरमार्किंग सारखी साधने महत्त्वपूर्ण आहेत. परंतु मेटल डिटेक्टर सारख्या उपायांसह कॅमकॉर्डिंग करणे कठीण होईल असे देखील करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी वेळीच कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे,” ते म्हणाले.

परिसंवादातील सहभागी वक्त्यांनी. तंत्रज्ञान, कायदे, अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सार्वजनिक जागरूकता डिजिटल आशयाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम करणारी संयुक्त आघाडी तयार करण्याच्या गरजेबाबत सहमती व्यक्त केली. WAVES 2025 मध्ये अशा चर्चांद्वारे, मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील अशा महत्त्वाच्या समस्यांवर करण्याजोग्या उपायांवर प्रकाश टाकला जात आहे.

०००

सागरकुमार कांबळे/विसंअ/

गेमिंग डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल

मुंबई दि. ०३ : गेमिंग हे करमणुकीचे माध्यम आहे. मनोरंजनासोबत, गेमिंग आता केवळ करमणूक नसून डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरत आल्याचे मत वेव्हज्‌ २०२५ मध्ये आयोजित वेव्हजएक्स या चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज्‌-२०२५ समिटमध्ये वेव्हजएक्समध्ये ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव्ह ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात या क्षेत्रातील तज्ञ दीपेन पारीख, ओथमान अलहोकैल (othman alhokail), शिवानंद पारे यांनी सहभाग घेतला.

गेमिंग हे आता केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते जगातील सर्वात प्रभावशाली  कंटेंट फॉर्म बनले आहे. भारतातही गेमिंग क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. भारतात सध्या ५० कोटींपेक्षा अधिक मोबाईल गेमर्स आहेत. मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांमुळे गेमिंगमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे.

UPI मुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचे युग सुरु झाले आहे. डिजिटल परिवर्तनात UPI ने महत्त्वाची भूमिका बजावली असून UPI मुळे डिजिटल व्यवहार सुलभ झाला. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या आता डिजिटल व्यवहारांमध्ये सहभागी होत आहे.

भारत हा गेमिंग उद्योगासाठी एक अतुलनीय संधी आहे. भारतात उच्च कार्यक्षमतेचे स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर हे सर्व घटक उत्कृष्ट गेम डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरत आहेत. स्थानिक बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन तयार होणारे गेम्स जागतिक स्तरावरही लोकप्रिय होतील, असे मत चर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज’ स्पर्धेस उदंड प्रतिसाद

मुंबई दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) आणि इमेजनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज’ स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

डिजिटल पोस्टर्स स्पर्धेसाठी ५४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वोत्तम ५० पोस्टर्स ‘क्रिएटोस्फेअर्स’मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर हँड-पेंटेड पोस्टर्ससाठी, २ मे रोजी चार संस्थांमधील १० अंतिम स्पर्धकांनी प्रत्यक्ष रंगकाम करत स्पर्धेत सहभाग नोंदवला.

हँड-पेंटेड फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – दृश्या ए. (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे)

रौप्य पदक – आदिशा ग्रोव्हर (कॉलेज ऑफ आर्ट, दिल्ली विद्यापीठ)

कांस्य पदक – तमन्ना सूरी (चितकारा युनिव्हर्सिटी, पंजाब)

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – सुरेश डी. नायर (कोची)

रौप्य पदक – सप्तसिंधु सेनगुप्ता (कोलकाता)

कांस्य पदक – शिवांगिनी सर्मा कश्यप (आसाम)

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेसाठी छायाचित्रकार आणि म्युसेओकॅमेराचे संस्थापक संचालक आदित्य आर्य, प्रिंटमेकरचे उपप्राचार्य आनंदमॉय बॅनर्जी यांनी तर हँड-पेंटेड पोस्टर्स स्पर्धेसाठी चित्रपट निर्माते आणि व्हिसलिंग वूड्सचे प्राध्यापक शरद राज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

०००

गजानन पाटील/विसंअ/

 

‘मॅजिकल महाराष्ट्र’ दालन प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

मुंबई, दि. ०३: एखाद्या परिषदेमध्ये किंवा महोत्सवामध्ये उभारलेल्या दालनात पुस्तिकेच्या रूपाने माहिती देण्याची प्रचलित पद्धत आहे. वेव्हज्‌ २०२५ मध्ये उभारलेल्या महाराष्ट्राच्या दालनाने ही परंपरा मोडीत काढली असून ‘मॅजिकल महाराष्ट्र’ या नावाने संपूर्णतः डिजिटल स्वरूपात उभारलेल्या या दालनाने येथे भेट देणाऱ्या प्रेक्षकांवर जादू केली आहे. या दालनाचे थ्रीडी डिजिटल प्रवेशद्वार आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची शानदार झलक दाखवित आहे.

हे दालन विशेषत: मराठी चित्रपटांना समर्पित करण्यात आले आहे. गाजलेल्या मराठी चित्रपटांची माहिती येथे आधुनिक स्वरूपात प्रदर्शित करण्यात आली असून महाराष्ट्राच्या समृद्ध मनोरंजन वारशाची ही जादुई झलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये ऐकण्यासाठीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीच्या प्रारंभापासून आजच्या गेमिंग आणि डिजिटल उत्क्रांतीपर्यंतचा मनोहारी प्रवास, नावाजलेले स्टुडिओज, मनोरंजन उद्योगात होत असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांमधील बदलांचा वेध घेण्यात आला आहे.

मराठीचा वारसा

मूकपटांपासून ते आधुनिक उत्कृष्ट कलाकृतींपर्यंत महाराष्ट्राने देशाला अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट दिले आहेत. या प्रदर्शनात मराठी सिनेमाच्या वारशाचा गौरव करण्यात आला आहे.

जागतिक दर्जाची निर्मिती

महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे व्हीएफएक्स, अ‍ॅनिमेशन आणि पोस्ट-प्रॉडक्शन स्टुडिओ आहेत. गाजलेल्या चित्रपटांपासून ते ओटीटी मालिकांपर्यंत निर्मिती होत असलेल्या या स्टुडिओंची माहिती येथे देण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्मिती झालेल्या आणि जागतिक स्तरावर गौरव प्राप्त झालेल्या चित्रपटांचा या प्रदर्शनात सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैविध्य, शास्त्रीय संगीत, नृत्यापासून गणेशोत्सवासारख्या सणांपर्यंतची समृद्ध परंपरा जगप्रसिद्ध आहे. याबाबतही या दालनात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्र डिजिटल क्रांतीच्या अग्रभागी आहे, येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. एआय-आधारित जाहिरातींपासून येथील क्रिएटिव्ह स्टुडिओजमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जाहिरात निर्मिती देखील करण्यात येते. यांच्यासह महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांबाबतची माहिती या दालनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सृजनात्मक उद्योगांना चालना देण्यात राज्य शासनाची भूमिका

चित्रीकरण सुविधांचा विकास, स्थानिक थिएटरचे समर्थन, कलाकृतींना अनुदान व प्रशिक्षण आदी माध्यमातून राज्य शासनाने मनोरंजन क्षेत्राच्या वाढीस सक्रिय चालना दिली आहे. या उपक्रमांमुळे महाराष्ट्र राज्य सृजनशील आणि सांस्कृतिक क्षेत्राचे भारतातील आघाडीचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

लाईव्ह स्टुडिओ – एलईडी व्हॉल्यूम

आधुनिक चित्रपट निर्मितीच्या अग्रभागी, एलईडी वॉल्यूम तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मितीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवला आहे. मोठ्या हाय डेफिनिशन एलईडी स्क्रीनद्वारे वैविध्यपूर्ण वातावरण तयार करून, दिग्दर्शक प्रत्यक्ष सेटवर गुंतागुंतीच्या दृश्यांचे चित्रीकरण करू शकतात. या दालनात उभारलेले या चित्रीकरणाचे प्रात्यक्षिक नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

डिज‍िटल युगात विद्यार्थ्यांची माती व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सातारा दि. 3 : आजच्या डिजीटल युगात विद्यार्थी हे जास्त करुन मोबाईकडे वळत आहे त्यांची आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका यासाठी शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणाची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी सातारा येथील सैनिकी शाळेत शालेय शिक्षण विभागाची कोल्हापूर आढावा बैठक घेतली.  बैठकीला शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, राजेश क्षीरसागर यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.

जे शिक्षक समर्पित, प्रतिकूल परिस्थिती विद्यार्थ्यांच्या विचार करुन उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, अशा शिक्षकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते यामध्ये कोणी गंभीर आजाराचा विद्यार्थी आढळल्यास तालुका, जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा द्याव्यात या सुविधा उपलब्ध नसतील तर मुंबई उपचारासाठी घेऊन यावे विद्यार्थ्याला बरा करुन घरी सोडावे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सी.बी.सी. मधील अभ्यासक्रमाचाही राज्य शासनाने समावेश केला आहे. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये पट वाढविण्यासाठी गुढी पाडवा पट वाढवा, शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांचे फलक असे विविध उपक्रम राबवित आहेत हे उपक्रम पुढील काळातही राबवित रहा, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची सहल शेतकऱ्यांच्या बांधावर, शासकीय कार्यालय, गॅरेज, किराणा दुकान अशा ठिकाणी घेऊन तेथे चालणाऱ्या कामकाजा विषयी सांगावे. शिक्षकांचे व संस्थाचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेतल्या आहेत हे प्रश्न टप्या टप्याने सोडविले जातील, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

जळगावातील शासकीय आरोग्य सेवा झाली हायटेक; संपूर्ण सुविधा असलेले राज्यातील पहिले केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी अत्याधुनिक थ्री टी एमआरआय कार्यान्वित

जळगाव, दि. ३ मे (जिमाका) – जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे लोकार्पण झाल्यामुळे एवढ्या सुविधा असलेले हे राज्यातील पहिले केंद्र ठरले, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होतील, असे सांगून राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला.

केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्ल्यूएस योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय मशीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शेकडो नवजात बालकांना जीवनदान देणारी मिल्क बँक, मूतखड्यांसारख्या वेदनादायक आजारांवर मात करणारी लेझर मशीन यांसह अनेक अद्ययावत साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आज एमआरआय मशीन कार्यान्वित झाले असून, लवकरच सीटी स्कॅन मशीनही बसवण्यात येईल. अशी सर्व सुविधा असलेले हे शासकीय रुग्णालय राज्यातील पहिलेच आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

तर वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय असे सर्व समाविष्ट असलेले देशातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मंत्र्यांकडून एमआरआय मशीनची पाहणी

हे मशीन कसे कार्य करते, त्यातील नव्या तंत्रज्ञानाचे स्वरूप काय आहे, दररोज किती रुग्ण तपासले जातील, यासारखी माहिती मंत्री पाटील व मंत्री महाजन यांनी सामान्यांच्या दृष्टिकोनातून जाणून घेतली.

थ्री टी एमआरआय मशीनची वैशिष्ट्ये :

ही यंत्रणा मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानावर आधारित असून ती शरीरातील अंतर्गत अवयवांची अति सुस्पष्ट प्रतिमा निर्माण करते. मेंदू, मज्जासंस्था, हृदय, सांधे, कर्करोग निदान, पचनसंस्था आणि प्रजननसंस्थेतील तपासण्यांसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरते. किरणोत्सर्ग न होत असल्याने ही चाचणी सुरक्षित आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

रुग्णांनी घ्यावयाची काळजी :

एमआरआय करताना धातुरहित कॉटनचे कपडे परिधान करावेत. कोणतीही धातूची वस्तू अंगावर न ठेवावी. पूर्वीच्या सर्व तपासणी अहवालांची फाईल सोबत आणावी. पेसमेकर, कॉक्लीअर इम्प्लांट, धातूचे इम्प्लांट असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचे लिखित प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ही तपासणी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार असून, शासननिर्धारित शुल्क आकारले जाईल.

आजपासून ही सेवा कार्यान्वित झाल्यामुळे जळगाव व परिसरातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गिरीष ठाकूर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

0
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी...

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ...

0
मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...