शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 698

सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना घरकुल मिळवून देणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर, दि. ६ (जिमाका):सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा सातबारा उतारा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्याचा मानस आहे. तसेच या समाजातील कुटुंबांना याच भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचे घरकुल देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सेटलमेंट ग्राउंड येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, विद्यार्थिंनीना मोफत शिक्षण बाबत कृतज्ञता तसेच विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य वाटप  व उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भारत जाधव, डॉ. सोनाली वळसंगकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील सर्व नागरिकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून विशेषत: महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या असून त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरेल, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील एक ही महिला लाभार्थी त्यांच्यासाठी असलेल्या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

तसेच या सेटलमेंट भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून या समाजातील कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचा उतारा देण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

भरत जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाला शासनाने पक्के घरे द्यावीत. तसेच एक ते सहा नंबर कॉलनीत ज्यांची घरे आहेत त्यांना त्या घराचा उतारा द्यावा, अशा मागण्या केल्या.

यावेळी आई प्रतिष्ठान सोलापूर व माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल राज्य शासनाविषयी कृतज्ञता समारंभ पार पडला. तर यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले.

०००

महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून राज्यातील ३ कोटी महिलांना लाभ मिळणार
  • राज्य शासनाने महिलांना प्रतिवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला
  • शासनाची महिलांसाठी पिंक ऑटो योजना लागू
  • महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध करून देणार

सोलापूर, दि. ६ (जिमाका): राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, महिलांना वर्षभरात ३ सिलेंडर मोफत, आश्रम शाळा मधील १८ वर्षांपुढील मुलींना शिक्षण शुल्क माफ, पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी योजनेसह अन्य योजनांचा समावेश आहे. अशा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या कृतज्ञता मेळाव्यात पालकमंत्री श्री. पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. शिंदे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी नुकतेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तीन कोटी महिलांना प्रतिमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी प्रतिवर्षी शासनाने 46 हजार कोटीची तरतूद केलेली आहे. शासनाने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पिंक रिक्षा योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम भरून शासन महिलांना गुलाबी रंगाची रिक्षा घेण्यासाठी अर्थसहाय्य देणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.

तसेच वर्षभरात महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी माफी केलेली आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर एक लाख दोन हजाराचे अर्थसहाय्य शासन जमा करत आहे. शासन महिलांसाठी विविध योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणून पुरुषाच्या बरोबरीने सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी महिला बचत गटांना सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध केले जात आहे आरोग्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या सर्व योजनांचा राज्यातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.  ए.आर बुर्ला महाविद्यालयासाठी विशेष बाब म्हणून कायमस्वरूपी शिक्षक व मुलींना हद्दवाढ भागात  मोफत बस पास देणे आणि  एक कार्यक्रमासाठी एक सभागृह बांधून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या वतीने कला शाखेचे विद्यार्थिनी प्राची भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर दशरथ गोप यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य याविषयी माहिती दिली. तसेच राज्य शासनाने मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे त्यांनी आभार मानले. या कृतज्ञता मेळाव्यास महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

 

रोजगारनिर्मितीसह विदर्भाच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर औद्योगिक क्षेत्राच्या गौरवात भर

नागपूर, दि. ६ : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण पूर्वी भर दिला. इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूह आता नागपूरकडे आकर्षित होत असून विविध देशात कार्यरत असलेल्या जपान येथील होरिबा कंपनीच्या या नवीन अत्याधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरच्या औद्योगिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जपानस्थित होरिबा या कंपनीच्या सुविधा केंद्राच्या कोनशीलेचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. बुटीबोरी येथील कंपनीच्या परिसरात आयोजित केलेल्या या समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कंपनीचे अध्यक्ष आत्सूशी होरिबा, होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ. जय हाकू, कॅार्पोरट ऑफिसर डॉ. राजीव गौतम, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या या प्रकल्पामुळे भारतातील सुमारे ३० हजार डायग्नॉस्टिक लॅब यांना अत्यावश्यक महत्त्वाची उपकरणे पुरवली जाणार आहेत. तपासणी प्रयोगशाळेसाठी लागणारे सोल्यूशन्स व इलेक्ट्रॉनिक चिप्सवर होरीबा कंपनीचे कार्य असून वैद्यकीय क्षेत्रासाठी ही निर्मिती महत्वाची आहे. सुमारे  १२ एकर जागेवर उभारलेल्या या कंपनीचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी माझ्या हस्ते करण्यात आले होते. अत्यंत युद्धपातळीवर हे काम कंपनीने पूर्ण केल्याबद्दल आनंद झाल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

नागपूर हे आता केवळ आकर्षक महानगरच नव्हे तर पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेले महानगर झाले आहे. कंपनीच्या भविष्यात लागणाऱ्या प्रकल्पांना जी जागा व पायाभूत सुविधा लागेल ती उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

जगातील मेडिकल टुरिझम हबमध्ये भारताने अल्पावधीत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.  आजच्या तुलनेत आपण जगात दहाव्या स्थानी आहोत. इथल्या वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून आपण जगाला वेगळी ओळख देऊ. याचबरोबर भारत आता सेमी कंडक्टरचा हब ठरला आहे.

होरीबा कंपनीने इथे सेमिकंडक्टर प्रकल्पाबाबत विचार करावा. अशा नवीन प्रकल्पांना सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर  असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. होरीबाचे नागपूर येथील सुविधा केंद्र हे आदर्शाचा मापदंड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपुरातील उद्योग वसाहतींमध्ये विविध औद्योगिक कंपन्या आल्यास स्थानिक रोजगारास चालना मिळेल. विदर्भाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती व्हावी हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल आहे. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण राहिले आहे. यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. औद्योगिक वसाहतींचा विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर 

पर्यावरण रक्षण,अन्न सुरक्षेसह विविध शाश्वत  उपाययोजनांची दखल

मुंबई, दि. ६ : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात बांबू लागवड, तृण धान्य- श्रीअन्न अभियान आणि औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावले उचलली आहेत. या पावलांमुळेच हा प्रतिष्ठेच्या मानांकित पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव कोरले गेल्याचे श्री. पटेल यांनी नमूद केले आहे.

हा पुरस्कार १० जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १५ व्या कृषी नेतृत्व संमेलनात प्रदान केला जाईल. या संमेलनात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान तसेच ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत, महाराष्ट्र, यूपी, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड या राज्याचे  मंत्रीगण व इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळणे प्रतिष्ठेचे अत्यंत समाधानाचे असल्याचे नमूद करून श्री. पटेल म्हणाले की, युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले आहे. आता होरपळीचे युग सुरु झाले आहे. आता तातडीच्या प्रयत्नांची गरज आहे, अशी जगातील कारभाऱ्यांना हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देणारे आणि त्यावर गांभीर्याने पावले उचलणारे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले नेतृत्व आहे. गुट्रेस यांनी दगडी कोळसा जाळणे थांबवा आणि वृक्षारोपणाची गती वाढवा, असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आता २१ लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दगडी कोळसा जाळणे कमी व्हावे, यासाठी कोळशा ऐवजी ५ टक्के बायोमास वापरण्याचा निर्देश देणारे श्री. शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. गुट्रेस यांचा मानव जात वाचवण्याच्या हाकेला संवेदनशीलतेने प्रतिसाद देणाऱ्या त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे यांची या पुरस्कारासाठी दखल घेतली गेली आहे. जगात नव्हे, किमान देशात तरी अशी क्रांतिकारी पावले उचलणारे खरोखरच आपल्या मुख्यमंत्री पदासोबतच पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे निर्णय घेणारे श्री. शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेतले आहेत. यात २१ लाख हेक्टर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठे बांबू मिशन राबविण्याचा निर्णय आहे. यात नंदुरबार येथील धडगांव तालुक्यातील ७० गावच्या सरपंचांनी केंद्रीय फलोत्पादन सचिव प्रभातकूमार यांच्या समोरच आमचा प्रश्न बांबू लागवडीशिवाय सूटणार नाही, अशी मागणी केली. केंद्रानेही त्याला होकार दिला. या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. पवार यांनी नंदूरबार जिल्ह्यातील एक लाख २० हजार एकर जमिनीमध्ये केंद्र आणि राज्य मिळून हरित पट्टा निर्माण करण्याचे जाहीर केले आहे.  या अभियानासाठी अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे.  याशिवाय सरकारने १२३ प्रकल्पांना मार्गी लावून सुमारे १७ लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याचा चंग बांधला आहे.

नुकत्याच झालेल्या खरीप आढावा बैठकीत मायक्रो मिलेटचे उत्पादन वाढीसाठी पेरा आणि प्रत्यक्ष उत्पादन वाढीसाठी सर्व संबंधित यंत्रणांना आदेश दिले गेले आहेत. भारतातील पहिले मायक्रो मिलेट क्लस्टर लातूर जिल्ह्यात सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा निर्णय घेणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. याशिवाय लाखो शेतकऱ्यांना नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण करण्याची सुरवातही केली आहे. तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावा, राळा-भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करणारे महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे. या तृणधान्यांना एमएसपी देण्याचा निर्णयही महाराष्ट्राने घेतला आहे. नुकताच देशातील विविध सहा ( महाराष्ट्रासह, राजस्थान, म.प्रदेश, गुजरात, गोवा आणि दमण)  राज्यांच्या रब्बी पिकांच्या हमी भावाच्या शिफारशीकरिता मुंबईत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांच्या समोर झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे अशा बैठकीत उपस्थित राहिले. या दोघांनीही या बैठकीत ठोस अशी भूमिका मांडली. एमएसपी ठरवणाऱ्या बैठकीत आपल्या राज्याची भूमिका मांडणारे, सत्तर वर्षातील एकमेव मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे यांचा उल्लेख केला जाईल. या शिवाय केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी आयोगांची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविला जाईल, असे सूतोवाच केले. हे केवळ मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमुळेच शक्य झाले आहे, असेही श्री. पटेल यांनी नमूद केले आहे. अन्न सुरक्षा आणि पर्यावरणाची काळजी या दोन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार काम करत आहे. त्यामागे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा पुढाकार कारणीभूत आहे. अलिकडेच औष्णिक वीज केंद्रांनी बायोमासमध्ये बांबूचाही वापर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. यासाठी राज्यातील बांबू लागवडीचे मिशनही उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीसाठी हेक्टरी ७ लाख रुपायांचे अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शिर्डी आणि मुंबईसह शक्य त्या सर्वच विमानतळांच्या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरिता पोलाद आणि अन्य धातूंऐवजी बांबूचा वापर करण्यावर भर देण्याचेही राज्य सरकारने धोरण आखले आहे.  या सगळ्याचा परिपाक म्हणूनच महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे.

यापुर्वी हा पुरस्कार २०२३ मध्ये तामिळनाडुला, २०२२ मध्ये  उत्तर प्रदेशला मिळाला होता. समितीचे विद्यमान अध्यक्ष न्या. सदाशिवम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश आहे.

आतापर्यंत हा पुरस्कार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अखिलेश यादव तसेच  स्व. प्रकाशसिंह बादल, स्व. वर्गीस कुरियन, स्व. एमएस. स्वामिनाथन यांना दिला गेला आहे. अँग्रीकल्चर टुडेच्यावतीने या पुरस्कारांची सुरवात केली आहे. स्व. स्वामीनाथन यांनी दहा वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद भुषवलेले आहे. सध्या डॉ. एम. जे. खान या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मानव जातीवरील संकट ओळखून, तिला वाचवण्यासाठी जे निर्णय घेतले आहेत, उपाययोजा केल्या आहेत. त्याबद्दल या तिघांचेही आणि महाराष्ट्राच्या या प्रयत्नांची दखल घेऊन, त्याला पुरस्कार दिल्याबद्दल डॉ. खान यांचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी आभार मानले आहेत.

०००

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ महिलांसाठी ऐतिहासिक योजना -पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. (जिमाका) : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही राज्यातील महिलांसाठी ऐतिहासिक योजना आहे. अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे पत्र वितरण करुन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, राहूल पंडित, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी 46 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एकाच दिवशी 5 हजार लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचा आजचा कार्यक्रम हा राज्यातील एकमेव कार्यक्रम आहे. ही योजना जनतेपर्यंत पोहचविणे अधिकाऱ्यांशिवाय शक्य नव्हते.

ही योजना केवळ निवडणुकीपुरती नसून वर्षानुवर्षांसाठी असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की,  या योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरुन घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत. महिलांना सक्षम करणारे शासन आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून त्यांना लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकाचा ठरेल. प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले.

अंगणवाडी सेविकांसाठी पुण्यकर्म

या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात येत आहेत. आपल्याच महिला भगिनींसाठी या योजनेचा लाभ देण्यास अंगणवाडी सेविकांचा हातभार लागत आहे. हे काम त्यांच्यासाठी पुण्यकर्म आहे. अंगणवाडी सेविकांना त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद देत असल्याचे पालकमंत्री म्हणाले. 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार विद्यावेतन तरुणांना देणारी योजना सुरु केली आहे. शुभमंगल योजनेचे अनुदान 10 हजारावरुन 25 हजार केले आहे. तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. 7.5 एचपी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीज बील माफीचा निर्णय घेतला असल्याचेही पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. सिंह प्रास्ताविक करताना म्हणाले की, जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर शासनाच्या सर्वच लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी पारदर्शक आणि युध्दपातळीवर प्रशासन तत्पर आहे. या योजनेत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देणारा रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा आहे.

मंजुरीपत्राचे लाभार्थी

मृणाल कामतेकर, पल्लवी धानबा, वृषाली डोर्लेकर, साक्षी धाडवे, अनामिका सावंत, आरती चव्हाण, ज्योती माने, संतोषी शिंदे,आरती सुवारे,  पल्लवी सावंत, साक्षी माचकर, राधिका माचकर या लाभार्थी महिलांना आज प्रायोगिक मंजुरीची पत्रे देण्यात आली. तसेच संगिता लोगडे, उज्ज्वला मालप, श्रेया गुरव, राजश्री नाखरेकर, सुजाता आग्रे या महिला लाभार्थ्यांना केसरी शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.

क्षणचित्रे

. अर्ज भरुन घेण्यापासून  अपलोड करुन पोच देणारेस्टॉल उभारण्यात आले होते.

. एकाच दिवशी 5 हजार लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणारे अन् मंजुरी पत्रे देणारे एकमेव शिबीर.

. प्रत्येक तहसिल कार्यालयात तक्रार निवारण केंद्र .

०००

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात जिल्हा अग्रेसर ठेवा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त सुरू असलेली सर्व कामे अत्यंत काटेकोरपणे पूर्ण करून घ्यावीत

सोलापूर, दि. ६ (जिमाका): ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. शासनाने या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त महिलांना घेता यावा, यासाठी यात अत्यंत सुटसुटीतपणा आणलेला आहे. हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून 21 ते 65 वयोगटातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी, उपजिल्हाधकारी संतोष देशमुख, महिला व बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद. मिरकाले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत राज्यातील सुमारे तीन कोटी महिलांना प्रति महिना १५००/-रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी 46 हजार कोटीची तरतूद केलेली आहे. ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे समजली आहे का? तसेच या योजनेतील तरतुदी सर्वसामान्य महिला पर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावेत याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी संबंधित यंत्रणेला केले. तसेच राज्य शासन महिलांसाठी राबवत असलेल्या अन्य योजनांची सविस्तर माहिती देऊन महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगाम 2023 मधील ५ लाख १९ हजार शेतकरी लाभार्थ्यांना 689 कोटीचे अनुदान प्राप्त झाले असून त्यातील 33 हजार 768 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 489 कोटीचे वाटप झालेले आहे तरी उर्वरित शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम त्वरित पाठवण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी देऊन जिल्ह्यातील खरीप पेरणीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा मुबलक पुरवठा होईल या अनुषंगाने कृषी विभागाने दक्षता बाळगावी. तसेच पिक विमा 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना 216 कोटी 25 टक्के आग्रिम मिळणे अपेक्षित असताना ते 136 कोटी मिळालेले असून उर्वरित अग्रीम रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी निर्देशित केले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ज्या विभागांना मंत्रालय स्तरावरून निधी मिळणे अपेक्षित आहे, अशा मंत्रालय विभागांना पत्र देऊन सदरचा निधी संबंधित जिल्हास्तरीय यंत्रणांना पाठवण्याबाबत पालकमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. जलयुक्त शिवार अभियान 1.0 मध्ये मधील कामांचा आढावा घ्यावा. या अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाला का याची खात्री करावी. तर जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये उर्वरित 233 गावामध्ये पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

सोलापूर जिल्ह्यातील पायाभूत प्रकल्पाचा आढावा घेत असताना सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी पुढील दौऱ्यात स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण होत आलेले असून महापालिकेच्या माहितीनुसार माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी  या सर्व पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामकाजाची पाहणी लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्या विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामे विहित कालावधीत मार्गी लागतील त्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या नारी ॲपवर 3500 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बियाणे व खताचा मुबलक साठा उपलब्ध झाला असून त्या अनुषंगाने प्रशासन दक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विकास कामांची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी शेतकऱ्यांना अनुदान वाटप माहिती, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाची माहिती, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात आलेल्या अर्जांची माहिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी रस्त्यांची माहिती बैठकीत सादर केली.

पालकमंत्री यांची महा-ई-सेवा केंद्र ला भेट

पालकमंत्री श्री. पाटील यांनी सोलापूर शहरातील एका महा-ई-सेवा केंद्राला भेट दिली. यावेळी त्या केंद्रावर ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या प्रक्रियेची सविस्तर माहिती पालकमंत्री यांनी घेतली. तसेच ऑनलाइन अर्ज यशस्वीपणे अपलोड केलेल्या दोन महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

०००

भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ            

मुंबईदि. 5 :- भटके, विमुक्त जमातींकडे ओळखपत्र व वास्तव्याचा पुरावा नसल्याने त्यांना शिधापत्रिका मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून राज्यातील भटके विमुक्त जमातींना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना शिधापत्रिका मिळण्यासाठी ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भटके, विमुक्त जमातींतील बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना सर्वसामान्य जनतेप्रमाणे शिधापत्रिका वितरित करताना कागदोपत्री अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील भटके विमुक्त समाजाचा व्यक्ती हा समाजाचा घटक असून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मुलभूत अधिकार आहे. ही बाब विचारात घेता राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा सहानभूतीपूर्वक विचार करून त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी सुलभ कार्यपध्दती अनुसरून त्यांना पात्रतेनुसार योग्य ती शिधापत्रिका देऊन त्यावरील अनुज्ञेय लाभ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यासाठी नवीन शिधापत्रिकेसाठी २९.०६.२०१३ अन्वये निश्चित केलेल्या प्रचलित पध्दतीनुसार आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपूर्वक विचार करून त्यांना ओळखीचा पुरावा व वास्तव्याचा पुरावा सादर करण्याबाबत सूट देण्यात आली आहे.

भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांकडून नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज भरून घेऊन त्यांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करावे.  मोहिमेंतर्गत भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना अनुज्ञेय शिधापत्रिका वितरित करून त्यावरील लाभ देण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयांनुसार भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याने प्राप्त झालेले मतदार ओळखपत्रसामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचे भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासासंदर्भात शहरी भागात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच/उपसरपंचांचे त्या भागातील रहिवाशी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापैकी कोणतेही कागदपत्र व आधारकार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र भरुन घेण्यात येणार आहे.

०००

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान

मुंबई दि. 5 : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागाने दिली आहे.

अल्पसंख्याकांना संविधानाने दिलेल्या हक्काचे संरक्षण करणे. अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना बाबतीत शासनास शिफारस करणे आदि स्वरुपाची कामे केली जातात. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ आयोगाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुढील 5 वर्षांकरिता नियुक्ती असते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांची मुलाखत               

मुंबई, दि. 5 : पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय आहे. राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढावा आणि पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी विशेष अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेवून विद्यार्थ्यांनी पर्यटन व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाव्यवस्थापक श्री. जयस्वाल यांची मुलाखत सोमवार, दि. 8 आणि मंगळवार दि.9 जुलै 2024, रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि.9 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

केशव करंदीकर/विसंअ/

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 5 :- भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली. तसेच भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले. मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह, त्याचे सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम् दुबे, प्रशिक्षक पारस म्हाब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. खचाखच भरलेले हे मध्यवर्ती सभागृह आज क्रिकेटच्या जल्लोषाने दणाणून गेले. भारतीय राष्ट्रध्वज उंचावून सभागृहात भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणाही घुमल्या. ‘…हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला या क्रिकेटमधीलच विक्रमादित्य लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाण्याने आणि हिंदी चित्रपट “चक दे इंडिया..!’ च्या जल्लोषी सुरांनी सभागृह सुरुवातीपासूनच निनादून गेले. यातच टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांचं आगमन होताच सभागृहातील घोषणा आणखी टिपेला पोहोचल्या.

या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार अॅड. आशिष शेलार, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला हरवलं तेव्हाच आपण अर्धा विश्वचषक जिंकला. सुर्यकुमार यादव च्या अजरामर झेलमुळे आपण विश्वचषक जिंकला आणि देशभरात गेले आठवडाभर जल्लोष सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केले आहे. या विजयामुळे देशवासियांचा, देशाचा गौरव झाला आहे, या भावनाने भारतीय संघाचे स्वागत करत आहेत. याचसाठी काल विजेत्या संघाच्या स्वागतासाठी मुंबईत अरबी समुद्राच्या शेजारीच जनसागर उसळला होता. आपल्या या संघाने भारतच क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे सिद्ध केले आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. आपले वारकरी विठ्ठलच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. तर काल क्रिकेटप्रेमी वारकरी याच भावनेने मुंबईकडे आले आहोते. मुंबईत दिवाळी-दसराच साजरा झाला. भारतीय संघात मुंबईकर चार खेळाडू आहेत. कर्णधार रोहीत शर्मासह, सूर्यकुमार हे विजयाचे शिल्पकार आहेत याचा सर्वांनाच अभिमान आहे. विशेष म्हणजे एकही सामना न हारता, या संघांने विश्वचषक जिंकला आहे, ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भारतीय संघातील मुंबईतील अनेक दिग्गज आणि महान क्रिकेटपटूंचा समावेश असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, 1983 चा विश्वचषक आपण कपिल देव यांनी घेतलेल्या त्या एका झेलमुळे जिंकलो होतो. कपिल देव यांचा तो झेल आणि सुर्यकुमार यादव यांचा या स्पर्धेतील झेल हा भारतीयांसाठी अजरामर क्षण ठरला आहे. हे विश्वविजेतेपद प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतिक आहे. या मुंबईकर खेळाडूंनी आपल्या नावाप्रमाणेच भारताची विजयी पताका जगात फडकवली आहे. त्यांनी यापुढेही भारतीयांना असाच आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळवून द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आणला आहे. एका अपराजित संघाने विश्वचषक जिंकला आहे. रोहीत शर्मांनी अद्वितीय कामगिरी करत, भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांच्या मांदियाळीत स्थान पटकावले आहे. रोहित यांनी कपिल देव, महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर आपला नावलौकीक केला आहे. कर्णधार म्हणून रोहित यांनी संघातील सहकाऱ्यांचा जिंकलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्यांची नेतृत्व शैली ही भारतीय संघाच्या कर्णधाराची परंपरा राखणारी आहे. मुंबईकर हे सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान असल्याचेही  सांगून आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईत 1 लाखापेक्षा जास्त क्षमतेचे आधुनिक स्टेडियम बांधण्याची सूचना त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी केलेली गर्दी अभूतपूर्व होती. मात्र मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही, त्यामुळे त्यांनी मुंबईकराचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की विधानभवनात असा दिमाखदार समारंभ होतो आहे, याचे मोठे समाधान आहे. चमत्कार घडेल असे वाटत होते आणि चमत्कार घडला. आपला क्रीडा रसिक आगळावेगळा आहे. मरिन ड्राईव्हला अभूतपूर्व गर्दी झाली होती. भारतीय लोक क्रिकेटवर प्रेम करतात, असे प्रेम जगात कुठेही दिसत नाही. यात अमेरिकासारखा संघही आता पुढे आला आहे. सूर्यकुमार यांचा झेल हा अप्रतिमच होता. यापुढे रोहित टी-20 खेळणार नाही.पण यापुढे ज्या-ज्यावेळी आपण टी-20 पाहू, त्यावेळी रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाने प्रत्येकाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला. क्रिकेटमुळे विधिमंडळ कामकाज करतांनाही मदत होते, असे सांगत त्यांनी विधिमंडळातर्फे खेळाडूंना शुभेच्छा देऊन आगामी काळात गौरवशाली क्षण मिळवून देण्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विधानभवनात प्रथमच अशाप्रकारचा कार्यक्रम होत आहे. हा सोहळा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने होणारा सत्कार होता. खेळाडूंच्या विजयासाठी प्रत्येक नागरिकाने शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. या अभूतपूर्व विजयानंतर क्रिकेटसह सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी एकत्र यावे, असेही आवाहन उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह खेळाडूंचे वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅाफी, विधानमंडळाचे स्मृतीचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या सत्कार सोहळ्याने आनंदीत झालो आहोत. काल आणि आज झालेले स्वागत आम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. मुंबई पोलिसांनी केलेले नियोजन अप्रतिम होते. विश्वकरंडक जिंकणे हे आमचे स्वप्न होते. सर्व खेळाडूंनी बजावलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे हा करंडक जिंकता आला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले.

विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

0000

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...