शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 697

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’पासून कोणीही वंचित राहणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर, दि. 7 : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असली तरी त्यानंतरसुध्दा ही योजना सुरू राहणार आहे. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणीही यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात, महिलांसाठी तसेच इतर योजनांचा जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, नरेंद्र जीवतोडे, श्री. रमेश राजुरकर आदी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चा लाभ मिळवून देण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास 7 लक्ष पात्र लाभार्थ्यांना आपण या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो. त्यासाठी प्रशासनासोबतच सर्व सामाजिक संघटना, पदाधिकारी व नागरिकांनी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळण्यासाठी राज्य शासनाने अनेक अटी शिथील केल्या आहेत. तरीसुध्दा विनाकारण गर्दी वाढत आहे. ही योजना 31 ऑगस्ट 2024 नंतरही सुरू राहणार आहे, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते असणे अनिवार्य आहे, कारण दरमहा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 46 हजार कोटींची तरतूद केली आहे.

शासनाने नि:शुल्क सुरू केलेल्या कोणत्याही योजनेसाठी पैसे आकारण्यात येत असेल तर संबंधितांविरुध्द त्वरीत गुन्हा नोंद करावा. तसेच बनावट नावाने योजना सुरू असल्याचे आढळल्यास जिल्हा प्रशासनाने त्यावर कडक कारवाई करावी. एवढेच नव्हे तर जो विभाग, किंवा अर्ज भरून घेणारे केंद्र लाभार्थ्यांना त्रास देत असेल तर त्यांच्यावरसुध्दा कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत बोलतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणतेही पात्र कुटुंब या योजनेपासून वंचित रहाता कामा नये. शेतीविषयक योजना जलदगतीने शेतक-यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ओबीसी प्रवर्गातील मुलींच्या व्यवसायीक शिक्षणासाठी शासनाने 1900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पदवी व पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी दरमहा 10 हजार रुपये देण्यात येणार आहे. पैसे सरकार देणार, कौशल्य उद्योगांनी द्यावे, यासाठी शासनाने 10 हजार कोटींची योजना सुरू केली आहे. वयोश्री योजनेतही चंद्रपूर जिल्ह्याला पुढे न्यायचे आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000000

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 7 :  ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याचे, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आज सह्याद्री अतिथी गृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा रू.500/- चा भत्ता आता रु.1000/- इतका करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

000

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे, दि. ७: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झाले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला.

पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील सणसर येथे मुक्काम असणार आहे.

0000

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

बारामती, दि.७: राज्याच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने’सह महिला- भगिनींसाठी अनेक योजनांचा समावेश करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना विमानतळ येथे ओवाळून त्यांचे आभार मानले.

यावेळी यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, वैशाली नागवडे, मोनिका हरगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित महिलांनी महिलांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांबाबत समाधानही व्यक्त केले. त्यांनी फुलांची उधळण करीत आनंद व्यक्त केला.

0000

माऊलीच्या गजरात पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन

सातारा, दि. ६, (जिमाका):  माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यात पाडेगाव, ता. खंडाळा येथे आगमन झाले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

यावेळी खासदार धैर्यशील मोहिते – पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण,  आमदार संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे पोलीस अधिकारी पंकज देशमुख, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थामन अधिकारी देविदास ताम्हाणे, पालखी सोहळा विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली.

पालखीच्या सातारा जिल्ह्यातील आगमनावेळी नीरा नदीत पादुकांचे स्नान पार पडले. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. पालखी आज आणि उद्या लोणंद मुक्कामी असणार आहे.

०००

 

जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी चोख नियोजन करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

  • मार्च २०२४ अखेर ५९८.६७ कोटींच्या झालेल्या खर्चाला मान्यता
  • सन २०२४-२५ साठी अर्थसंकल्पित ६९५.६७ कोटी रुपयांपैकी प्राप्त २२९.४२ कोटी रुपयांच्या तरतुदीचा आढावा
  • जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देवू
  • जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा

कोल्हापूर, दि. (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2024- 25 या आर्थिक वर्षात शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी चोख नियोजन करा, तसेच आवश्यक त्या प्रशासकिय मान्यता लवकरात लवकर द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. यावेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मार्च 2024 अखेर 598.67 कोटींच्या झालेल्या खर्चाला समितीने मान्यता दिली. तसेच सन 2024-25 साठी अर्थसंकल्पित 695.67 कोटी रुपयांपैकी प्राप्त 229.42 कोटी रुपयांच्या तरतुदीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात झाली. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती,  खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबीटकर, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, जयश्री जाधव, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच समिती सदस्य व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नवनियुक्त खासदार शाहू महाराज छत्रपती व धैर्यशील माने यांना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे काम रद्द करावे, असा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मोठ्या ग्रामपंचायतींना 15 लाख व छोट्या ग्रामपंचायतींना 10 लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केल्याबद्दल सदस्यांनी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांचे आभार मानले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळांच्या इमारतींचे बांधकाम, येथील स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्याबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने करा. वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा, परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये, यासाठी नुतनीकरणाची कार्यवाही जलद करा, असे सांगून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या कामांचा व चालू वर्षात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.

प्राथमिक शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, पंचगंगा प्रदुषण नियंत्रण आदी कामांबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अशा सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी उपस्थित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्ह्यातील रस्ते, विमानसेवा सुरळीत होत आहेत. पर्यटन स्थळांना व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी पर्यटक व भाविकांची संख्या वाढत आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व पूर परिस्थितीवर उपाय म्हणून बास्केट ब्रीज लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्यावर बास्केट ब्रीजचे कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरात लवकर बैठक आयोजित करुन हे काम गतीने मार्गी लावावे, अशी सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केली.

खासदार धैर्यशील माने यांनी जिल्ह्यात वनविभागातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती व्हावी, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल व्हावा, असे सांगितले.

जुन्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा आमदार प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केली. इचलकरंजी शहरातील पाण्याच्या टाक्यांचे काम गतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. रंकाळा तलाव प्रदुषणमुक्त होण्यासठी प्रयत्न व्हावेत, असे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारीत शाळा व्हावी, अशी अपेक्षा आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. पंचगंगा नदीत गावांमधून मिसळणारे सांडपाणी थांबण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्राच्या एसटीपी प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर अडीच वर्षांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. बास्केट ब्रीजचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी तसेच विभागीय क्रीडा संकुलाचे काम व जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संबंधित प्रलंबित विषय गतीने पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले की जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यात शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येईल.

शाळांना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी निधीची तरतूद करावी. जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांमुळे खोदकाम झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी. पंचगंगा नदीचे प्रदूषण राखावे, परिख पुलाचे नूतनीकरण लवकरात करुन वाहतूक कोंडी टाळावी, ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधीची तरतूद व्हावी, रस्ते, इमारती, शाळा, आरोग्य केंद्रांच्या इमारती दुरुस्ती व्हावी आदी सूचना सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी केल्या.

जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी सादरीकरणातून मागील वर्षी झालेला खर्च व चालू वर्षात करण्यात आलेल्या तरतुदीची माहिती दिली.

जिल्हा वार्षिक योजना माहे मार्च 2024 अखेर झालेला खर्च याप्रमाणे

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  480 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 117 कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत 1.67 कोटी

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 मध्ये 480 कोटी रूपये मंजूर नियतव्ययाची राज्यस्तर व जिल्हा परिषद स्तर तरतूदीची माहिती 

राज्य स्तरीय यंत्रणा 325.99 कोटी रुपये, जिल्हा परिषद स्तरीय यंत्रणा 154.01 कोटी रुपये असे एकूण 480 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली होती.

सन 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 576 कोटी रुपये अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 118 कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत 1.67 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे.

क’ वर्ग यात्रास्थळ मान्यता –

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या जिल्ह्यातील 1 लाखावरील भाविक भेट देत असलेल्या यात्रा स्थळांना ‘क’ वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील हजरत गैबी पीर दर्गा  व भेंडवडे गावातील श्री खंडोबा देवालय व गैबी पीर दर्गा, पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी माळवाडी गावातील श्री विठठल रुखमाई मंदिर, पडळ  गावातील श्री रामेश्वर मंदिर व पिंपळे तर्फ ठाणे गावातील श्री हनुमान मंदिर, आजरा तालुक्यातील मडीलगे गावातील श्री रामलिंग मंदिर देवालय, राधानगरी तालुक्यातील कौलव गावातील श्री मारुती देवालय, कुडूत्री गावातील श्री कल्लेश्वर मंदिर, तरसंबळे गावातील श्री जोतिर्लिंग मंदिर, भुदरगड तालुक्यातील आकुडे गावातील श्री महादेव मंदिर, करवीर तालुक्यातील जैताळ गावातील श्री हनुमान मंदिर, गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नुल गावातील श्री सुरगीश्वर मंदिराचा समावेश आहे.

‘क’वर्ग पर्यटन स्थळ मान्यता

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांनी सादर केलेल्या शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण परिसर या पर्यटन स्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

०००

जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न नूतन सभागृहातून मार्गी लावावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. ६ (जिमाका): महसूल हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन सभागृह खूप छान पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न गतीने मार्गी लावावेत, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांसाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले,  विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंगराव शिंदे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सभागृह उभारण्यासाठी योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डाटा एन्ट्रीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याबद्दल कौतुक करुन पालकमंत्री श्र. मुश्रीफ म्हणाले की, या योजनेचा विनासायास लाभ महिला लाभार्थ्यांना मिळवून द्या. प्रमाणपत्र देणे अथवा अर्ज नोंदणी प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप होवू देवू नका. जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करुन घ्या, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठीचे काम या सभागृहातून होईल. तसेच प्रलंबित विषय गतीने पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला.

०००

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ….

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे.

मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्धीमत्तेकडे पाहू शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी तयार केलेल्या संगणकामधील मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण म्हणता येईल. शिकणे, तर्क करणे, समस्या सोडवणे, समज आणि भाषेचे आकलन ही सर्व या संगणकीय क्षमतांची उदाहरणे म्हणता येतील. संगणक, संगणक-नियंत्रित रोबोट किंवा सॉफ्टवेअर बनवण्याची एक पद्धत आहे जी मानवी मन आणि बुद्ध‍िप्रमाणे विचार करते. मानवी मेंदूचा अभ्यास करून आणि माहितीचे विश्लेषण करून त्याचे परिणाम दर्शविते.

वास्तववादी आणि उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा, व्हिडीओ आणि ऑडिओ तयार करण्यासाठी सुमारे एक दशकापूर्वी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर भारतात होऊ लागला. त्यासोबतच गुगल एआय, चॅट-जीपीटी आदी माध्यमातूनही याचा वापर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे सिरी किंवा अलेक्सा ही नावे सुद्धा परिचित झाली आहेत. या मशीन्स सुद्धा मर्यादित स्वरुपात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा भाग म्हणता येतील. मानवाप्रमाणे विचार करण्याची कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची क्षमता सिद्ध होऊ लागली आहे. सध्या चॅटबॉट्सने जगात वादळ आणले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात डेटाचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे. मोठमोठ्या कंपन्या दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आणि कामगारांना मदत करण्यासाठी याची मदत घेत आहेत. मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

सद्यस्थितीत शासनाच्या विविध विभागांकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असते. पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. यात गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांची संख्या देखील मोठी असते. प्रत्येक बाबीत विविध प्रकारे मानवी मेंदूच्या क्षमतेचा वापर करून आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करुन पोलीस दलाला या कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत मिळवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  16 मार्च 2024 च्या बैठकीत घेतला आणि त्या अनुषंगाने तातडीने पावले उचलून ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली.

कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करुन गुप्तवार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचा पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी राज्यात ‘Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL)’ ‘मार्वल’ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या कंपनीस शासनामार्फत 4 कोटी 20 लाख रुपये प्रतीवर्ष याप्रमाणे पाच वर्षांकरिता 100 टक्के भागभांडवल देण्यात येणार असून भागभांडवलाचा पहिला हप्ता नुकताच वितरीत करण्यात आला आहे.

‘मार्वल’ स्थापन करण्याबाबत राज्य शासन, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर आणि मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. यांच्यात दि.22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय करार करण्यात येऊन शासनाची ही कंपनी अधिनियम 2013 खाली नोंदणीकृत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासमोर पोलीस जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक (अतिरिक्त कार्यभार), पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

पोलीस दलाला कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाल्याने मशीनला माहितीचे विश्लेषण करून आणि मानवाप्रमाणे विचार करायला शिकवून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्याचबरोबर गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घडू शकतो, कुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार आहे.

या उपक्रमातील मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. ही चेन्नई स्थित कंपनी असून त्यांना भारतीय नौदल, गुप्तवार्ता विभाग, आंध्र प्रदेश, आयकर विभाग, सेबी आदी संस्थांना एआय सोल्युशन्स पुरविण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विशेषज्ञतेचा उपयोग व्हावा या उद्देशाने ‘मार्वल’ चे कार्यालय नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार ‘पिनाका’ एआय सोल्युशन्स पुरवेल तर, भारतीय व्यवस्थापन संस्था संशोधन आणि प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणार आहे. नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर चे संचालक हे या कंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि मे.पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या.चे संचालक हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असणार आहेत. तर नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

देशात नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची कार्यक्षमता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरामुळे आणखी वाढणार असून सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची उकल तातडीने होण्यासाठी हातभार लागेल, यात शंका नाही. ‘मार्वल’ थेट शासनाच्या गृह विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे. त्यामुळे भविष्यात शासनाच्या इतर विभागांनाही कृत्रिम बुद्धीमत्तेचा लाभ मिळून महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर राहील, हे निश्चित.

०००

-ब्रिजकिशोर झंवर, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यात अडीच कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळणार – मंत्री अदिती तटकरे 

रायगड,दि.६: ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ राज्यात अडीच कोटींहून अधिक तर रायगड जिल्ह्यातील दहा लाखांहून अधिक महिलांना मिळणार आहे. शेवटच्या घटकातील माता-भगिनींपर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

जिल्ह्यातील माणगाव येथे नोंदणी शिबिराचा  शुभारंभ  मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी मंचावर जिल्‍हाधिकारी किसन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका माया पकोले, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, माणगाव नगरपंचायतीचे मुख्यधिकारी सांतोष माळी, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी दिलीपकुमार उपाध्ये ,महसूल, जिल्हा परिषद व महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने नोंदणी करणाऱ्या महिलांसाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले आहे, त्याचा आज शुभारंभ आहे. अडचणी दूर करण्यासाठी व ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी  बँकांना देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन यादृष्टीने अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत .

त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा लाभ शेवटच्या घटकातील माता-भगिनींपर्यंत पोहचविण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५००/- रुपये जमा होणार आहेत. ही योजना २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लागू आहे. नोंदणीत अडीअडचणी येत असल्याचे दिसून आल्याने काही कागदपत्रांच्या बाबतीत लाभार्थी महिलांना शिथिलता दिली आहे, असे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

महिला मेळावा घेऊन मंत्री कु. तटकरे यांच्या उपस्थितीत योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.  ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ नोंदणी शिबिराचे उद्घाटनासह महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) रायगड जिल्हा बचतगट यांच्याकडून शिलाई केलेल्या शालेय गणवेशाचे विध्यार्थ्यांना वाटप व माविम तसेच उमेद महिला बचतगटांना बँक कर्ज धनादेश वाटप करण्यात आले.

प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन अपूर्वा जंगम व शिक्षक हेमंत बारटक्के यांनी केले. यावेळी माणगावचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, नगरसेवक सचिन बोंबले, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे,माजी नरगरसेवक नितीन वाढवळ,माजी नरगरसेवक  जयंत बोडेरे, देविका पाबेकर, सौरभ खैरे, सुमित काळे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी  कर्मचारी  यांच्यासह हजारोंच्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेतील माणगाव तालुक्यातील शिबिराचे नियोजन करुन त्याअनुषंगाने दिनांक ६ ते दि. ८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत महसूल मंडळनिहाय शिबिरा आयोजन करण्यात आले आहे.

०००

श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. (जिमाका): श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयी सुविधांचा विचार करा. या परिसरातील 23 गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन रोजगार निर्मितीला चालना द्या. तसेच या गावांच्या वैशिष्ट्यांचा विचार करुन त्याचा प्रचार प्रसार करा, जेणेकरुन जोतिबा डोंगर परिसरातील या गावांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधला जाईल, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर व परिसरातील गावांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमोर करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ .के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, रोहित तोंदले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री ज्योतिबा विकास प्राधिकरण अंतर्गत संपूर्ण ज्योतिबा डोंगराचा विकास करण्यात येणार असून त्यासोबतच जोतिबा डोंगराच्या परिसरातील 23 गावांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. हा आराखडा यापूर्वी शासनाला सादर करण्यात आला असून त्याची रक्कम 1530 कोटी रुपये इतकी होती. या आराखड्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्यामुळे  सुधारित आराखडा सध्या 1816 कोटी रकमेचा झाला आहे. वाढीव रकमेसह झालेल्या 1816 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली व हा आराखडा शासनाकडे फेरसादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, आराखडा तयार करताना डोंगर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व अन्य सर्व बाबींचा समावेश व्हावा. तसेच पर्यावरणपूरक पद्धतीवर भर देवून अधिकाधिक परिपूर्णरित्या आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले.

हा आराखडा करताना डोंगराच्या आसपासच्या जंगल परिसराचा विचार करुन प्राणीसंग्रहालय तयार करता येईल का याचीही चाचपणी करा. तसेच पर्यावरणपूरक पद्धतीवर भर द्या, अशा सूचना खासदार श्री. महाडिक यांनी केल्या.

ज्योतिबा डोंगरावर नारळ, फुले, दवणा अर्पण केला जातो. नारळ व निर्माल्याचा पुनर्वापर करुन बचत गटातील महिलांसाठी रोजगार निर्मिती होण्याबाबत विचार करा, असे खासदार श्री. माने यांनी सांगितले.

आर्ट अँड स्पेस स्टुडिओचे आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...