शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 696

‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’मुळे सामाजिक-आर्थिकदृष्ट्या उपेक्षित पिढ्या शिक्षित, स्वावलंबी – राज्यपाल रमेश बैस

उज्ज्वल निकम, संजीवनी मुजुमदार, प्रा.सुरेश गोसावी, नागसेन कांबळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित

मुंबई दि. ०८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४५ मध्ये स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था असून गेल्या ८ दशकांमध्ये, सोसायटीने सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या अनेक पिढ्यांना शिक्षित व स्वावलंबी केले आहे.  आज संस्था विविध अडचणींना तोंड देत आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या मुख्य उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचा ७९ वा वर्धापन दिन सोमवार  (दि. ८) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे  झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पीपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त उज्ज्वल निकम, ॲड. बी.के. बर्वे, सचिव डॉ. वामन आचार्य, सहसचिव डॉ. यू. एम. मस्के, कार्यकारी समिती अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.

ज्यांनी जोखीम पत्करली, महासागरांवर वर्चस्व निर्माण केले आणि उद्योजक आणि व्यवसाय करण्यासाठी देश आणि खंड पार केले, त्यांनी जगावर राज्य केले. अनेक शतकांपासून सागरी राष्ट्र असलेल्या भारताचे जगातील अनेक दूरवरच्या देशांशी व्यापारी संबंध होते. देशाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य शिक्षण आणि उद्यमशीलतेला प्राधान्य द्यावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

उपेक्षित, वंचितांच्या उन्नतीसाठी शिक्षण हे एकमात्र प्रभावी माध्यम आहे. केवळ शिक्षणाद्वारे पीडित भारतीय जनतेला त्यांच्या मानव म्हणून असलेल्या अधिकारांची जाणीव करून दिली जाऊ शकते, असे डॉ. आंबेडकरांचे ठाम मत होते, असे राज्यपालांनी सांगितले.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, बंगळूर आणि बिहारमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे चालविली जात असून एकूण दीड लाख विद्यार्थी विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून उदयास आले आहे. जगातील अनेक देश, त्यांच्या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या दृष्टीने पीपल्स एज्युकेशन सोसायटीने उच्च शिक्षणाला कौशल्य शिक्षणाची जोड द्यावी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते. विद्यापीठे तसेच महाविद्यालयांच्या नियामक मंडळांवर तसेच इतर महत्त्वाच्या निर्णय घेणाऱ्या संस्थांवर महिलांचा समावेश करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

समाजातील विषमता संपावी या दृष्टीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एजुकेशन सोसायटीची रचना सर्वसमावेशक केली होती. आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी अनेक समस्यांना तोंड देत आहे. या सोसायटीला राज्यपाल सहकार्य करतील, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री श्री. आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रात उच्च शिक्षणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले आहे. परंतु, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील युवकांचे सकल नोंदणीतील प्रमाण कमी आहे. ही तफावत कमी करण्यासाठी पीपल्स एजुकेशन सोसायटीसारख्या संस्थांना सरकारने विशेष अनुदान देऊन मदत करणे आवश्यक आहे, असे प्रा.सुखदेव थोरात यांनी यावेळी सांगितले.

डॉ. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थांपैकी सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृहे या संस्थांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी श्री. थोरात यांनी केली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सिम्बायोसिस सोसायटीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालक संजीवनी शांताराम मुजुमदार, सरकारी वकील उज्ज्वल निकम, ॲड. बी.के. बर्वे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेश गोसावी, चैत्यभूमी स्मारक समितीचे महासचिव नागसेन कांबळे, लोककलेचे अभ्यासक गणेश चंदनशिवे, ‘यशदा’चे बबन जोगदंड, सिंघानिया शाळेच्या संचालक रेवती श्रीनिवासन आदींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

०००

कृषी निविष्ठा जादा दराने विकल्यास फौजदारी कारवाई -प्रधान कृषी सचिव व्ही. राधा 

नाशिक, दि. ०८ (जिमाका) : जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक दर्जेदार बियाणे, खते व औषधे उपलब्ध करून द्यावीत. त्याचप्रमाणे खतांची जादा दराने विक्री अथवा इतर विद्राव्य खतांचे लिंकिंग केल्याचे आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रधान सचिव (कृषी) व्ही. राधा यांनी कृषी विभाग व जिल्ह्यातील कृषी निविष्ठा संघास दिल्या.

प्रधान सचिव (कृषी) व्ही. राधा यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील सामाईक सूविधा केंद्रांना अचानक भेट दिली व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, उपसचिव प्रतिभा पाटील, संचालक, फलोत्पादन डॉ. कैलास मोते, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  विवेक सोनवणे समवेत होते.

जिल्ह्यातील सामाईक सुविधा केंद्र संचालकांनी कुठल्याही प्रकारच्या देय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारल्यास सामाईक सुविधा केंद्र कायमस्वरुपी रद्द करण्याच्या सक्त सूचना व्ही. राधा यांनी यावेळी दिल्या. कृषी विभागाच्या विविध योजनांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्याच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करीत असतात. जिल्ह्यामध्ये १ रुपया पिकविम्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी योजनेत सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत सामाईक सुविधा केंद्रात गर्दी होते व त्याचाच गैरफायदा म्हणून शेतकऱ्याकडून अतिरीक्त शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तातडीने कृषी विभागाने संबंधित सामाईक सुविधा केंद्रावर प्रशासनाच्या माध्यमातून निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी यावेळी दिली.

०००

 

‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. ०८: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गत दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

 

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम, सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. मंत्री श्री. लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगारनिर्मितीसाठी प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.

गत दोन वर्षात कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. कौशल्ययुक्त व बेरोजगारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. आजचा सक्षम युवा उद्याचा उज्वल महाराष्ट्र घडवणार आहे, हे लक्षात घेऊन राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

मंत्री श्री.लोढा पुढे म्हणाले की, विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थाना आर्थिक सहाय्य योजना, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, करिअर विषयक साहित्य, डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना, मॉडेल करिअर सेंटर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंमरोजगार नोंदणी, प्रशिक्षण व मार्गदर्शन, राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

०००

‘मुख्यमंत्री : वयोश्री योजने’साठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

मुंबई, दि. 8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री-वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्हयांच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केले आहे.

राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने,उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना”सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपयांच्या मर्यादेत डीबीटी प्रणालीव्दारे निधी वितरीत करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार जाहीर

मुंबई दि 8:- माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये 15 व्या ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप कॅान्क्लेव्ह’मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ॲग्रीकल्चर टुडेच्या वतीने या पुरस्काराची सुरुवात सन 2008 पासून करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षा, सर्वात मोठी बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर यांसारखे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य, त्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरण, सूक्ष्म बाजरी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थान, तसेच एक रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.

ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत प्रमुख भागधारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँड इत्यादी देशांचे राजदूत, तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आदी राज्यांचे मंत्री यांचा समावेश असणार आहे.

सन 2008 पासून या पुरस्काराची प्रथम सुरुवात करण्यात आली असून कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता. आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, अखिलेश यादव, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, वर्गीस कुरियन, एम. एस. स्वामिनाथन इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आलेला असून स्वामिनाथन यांनी दहा वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

2023 करिता सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार, तर 2022 करिता तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

0000

 

 

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

मुंबई, दि. 8: विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. श्री.डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर श्री.अभ्यंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत.

सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ९ जुलै रोजी मुलुंड येथे आयोजन

मुंबई, दि.८: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवर ९ जुलै २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मिठागर रोड, ठाकूरवाडी, मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०००८१ येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे या रोजगार मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या कौशल्य रोजगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

या मेळाव्यात  मुंबई जिल्ह्यातील सीआयआय (CII), शिंडलर(Schndilar),महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड, पेटीएम, मॅजिक बस, चाणक्य स्टाफिंग, एमईपी इन्फ्रॉस्ट्रक्चर, एलआयसी, एड्रॉमेडा सेल्स अॅन्ड डिस्ट्रीब्युशन प्रा. लि., बीटीडब्लू व्हीसा सर्व्हिस प्रा.लि., युवा शक्ती प्रा.लि. यासारख्या नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी मुलाखती होणार आहेतत्यानुसार त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास शासनाचे विविध महामंडळाच्या कर्जाच्या योजनेबाबत महामंडळाचे प्रतिनिधी माहितीसह उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १० वी नापास/१० वी पास/१२ वी पास/आय.टी.आय/पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी संबंधित पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

नागरिकांच्या मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य ; सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईत ३०० मिलीमीटर एवढा पाऊस; होल्डिंग पाँडस्, मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत

मुंबई, दि. ०८: हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहल, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण कक्षातून मुंबईतील विविध भागातील पावसाची माहिती घेतानाच महामार्ग, रेल्वे, प्रमुख रस्ते येथील परिस्थितीचा देखील आढावा घेतला.  या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, एरवी मुंबईत ६५ मिलीमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मेठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुना भट्टी, सायन या भागात पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महापालिकेने पंप बसविले आहेत.

एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या होल्डींग पाँण्डस् मुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळपासून मी रेल्वे, मुंबई महापालिका, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील सुमारे ५००० ठिकाणांवर मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

०००

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी कडक कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०८: मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाई करण्याच्या  सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंड दिवशी तापासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई आणि दंडाची वसूली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टारंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदुषणाचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत.  महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

मद्यप्राशन करुन वाहने चालविण्याने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.

०००

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०८: राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले.

 

०००

ताज्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
नवी दिल्ली १२: भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक...

हॉटेल मालकांनी संप न करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १२: हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (आहार संघटना) यांनी 14 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणीय संप करण्याचे निवेदन दिले...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. १२: केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना केली असून त्याची अधिसूचना जाहीर केली आहे. राज्यातील...

जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामांचा आढावा  रायगड, दि. १२(जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी

0
बारामती, दि.१२: तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे,  तसेच मंजूर कामांचा आराखडा तयार करताना...