रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 693

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

  • प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत उत्तर मार्गिका वाहतुकीसाठी राहणार खुली
  • प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार व रविवार असे दोन दिवस वाहतूक बंद
  • संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्पापैकी आतापर्यंत ९१ टक्के काम पूर्ण

मुंबई दि.१० : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आणि हाजी अली आंतरबदलातील आर्म ८ (लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तर वाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल) उद्या गुरुवार दिनांक ११ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याची आज (दिनांक १० जुलै २०२४) प्रत्यक्ष पाहणी केली.

किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी अली (लोटस जंक्शन) ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा तिसरा टप्पा उद्या ११ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता खुला करण्यात येईल. हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहील. तर प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा टप्पा बंद राहील. सागरी सेतूपर्यंत जाण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरुपाचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी आदींसह अभियंते, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

दौऱ्याच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकल्पाविषयी तसेच टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या मार्गिकांची माहिती दिली. हाजी अली ते खान अब्दुल गफार खान पर्यंतचा उत्तर दिशेने जाणाऱ्या साधारण ३.५ किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात उद्या, दिनांक ११ जुलै २०२४ सकाळी ७ वाजेपासून ही मार्गिका खुली करण्यात येत आहे. या मार्गिकेवरुन पुढे जावून फक्त सागरी सेतूकडे जाता येईल. (वरळी व प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ.अ‍ॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करावा.)

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबईतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहे. प्रकल्पातील विविध टप्पे जसजसे पूर्ण होत आहेत तसतसे ते वाहतुकीसाठी खुले करून दिले जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी प्रकल्पाचे काम होत असताना वाहतुकीला देखील वेग मिळतो आहे. संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्पापैकी ९१ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असे श्री. शिंदे यांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे वरळी सी लिंक) टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे आजतागायत ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

नागरिकांच्या सुविधेसाठी व वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी प्रकल्पामधील पूर्ण झालेले टप्पे एका पाठोपाठ खुले करण्यात येत आहेत. सर्वात आधी दिनांक ११ मार्च २०२४ रोजी दक्षिणेला प्रवासाची सुविधा देणारी बिंदूमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राईव्ह ही ९.२५ किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका खुली करण्यात आली होती.

त्यानंतर उत्तर दिशेने प्रवासाची सुविधा देण्यासाठी दिनांक १० जून २०२४ रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोट्स जंक्शनपर्यंत सुमारे ६.२५ किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला करण्यात आला होता. आता हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत सुमारे ३.५ किलोमीटरचा तिसरा टप्पा तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांच्या सोयीसाठी खुला करण्यात येत आहे. याचाच अर्थ उत्तरेकडे प्रवासासाठी मरीन ड्राईव्ह ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा एकूण ९.७५ किलोमीटरचा टप्पा उपलब्ध होणार आहे. खान अब्दुल गफार खान मार्गावर प्रवेश केल्यानंतर तेथून पुढे राजीव गांधी सागरी सेतू (वरळी वांद्रे सागरी सेतू) वर प्रवेश करणे शक्य होणार आहे. मरीन ड्राईव्हवरून थेट सागरी सेतूपर्यंत जलद प्रवास करता येईल. वरळी व प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ.अ‍ॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा नागरिकांनी वापर करावा.
00000

दूधाचे दर व अनुदानाच्या अंमलबजावणीची खात्री करणार – दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. १० :- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून दुधास १ जुलै २०२४ पासून तीस रुपये दर देण्याबाबत यापूर्वीच शासन निर्णय झाला आहे. यासह पाच रुपये अनुदान  दिले जाणार आहे. हा लाभ  दूध उत्पादकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासंदर्भात दूध प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी तपासणी करण्यात येईल, असे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत दूध संघ आणि दूध उत्पादकांसोबत मंत्रालयात बैठक झाली. याप्रसंगी श्री. विखे पाटील बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे ,सुरेश धस , सदाभाऊ खोत, सत्यजित तांबे, रवी पाटील, महेंद्र थोरवे, अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विविध दूध संघांचे प्रतिनिधी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यासह महसूल, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

दुग्धव्यवसाय विकास मंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, शासन दूध  उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे. इतर राज्य व दूध संस्थांपेक्षा हा दर जास्त आहे. शासनाने शेतकऱ्यांचे हीत ध्यानात घेऊन केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध व्यवसायिक कंपन्यांनी दर देण्यासाठी कार्यवाही करावी, असे मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.

यावेळी दूध उत्पादकांना अनुदान वेळेत मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे माहिती एकत्रित करणे, दुधास हमी भावाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे, दूध प्रक्रिया उद्योगांच्या दूध पावडर निर्यातीच्या विषयाबाबत चर्चा झाली.  यावेळी विविध प्रतिनिधींनी मते व्यक्त केले.

00000

किरण वाघ/विसंअ/

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सुत्रबद्ध नियोजन करावे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दिनांक 10 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यात 2026-27 मध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे. त्यादृष्टीने या महापर्वाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी सुत्रबद्ध नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत आयुक्त प्रविण गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपआयुक्त महसूल राणी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, नाशिक एमटीडीसी च्या उपसंचालक मधुमती सरदेसाई, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रत्ये‍क विभागाने आपला आराखडा तयार करतांना अत्यावश्यक बाबींना प्राधान्य द्यावे. तसेच आराखड्यामध्ये आवश्यक ठिकाणी नकाशांचा वापर करावा. त्याचप्रमाणे आराखड्यानुसार अंदाजित निधीची मागणी करतांना त्यात समाविष्ठ बाबींचा स्पष्ट व सविस्तर उल्लेख असणे गरजेचे आहे. नाशिकचे ब्रँण्डिग करतांना धार्मिक स्थळांशी निगडित थिम असावी. तसचे कुंभमेळा महापर्वाच्या काळात अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नियोजन करावे. आरखडा तयार करतांना कामांची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, जेणेकरून एकसारख्या कामांवर निधीचा अपव्यय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. सिंहस्थ कुंभमेळा काळात देशभरातून भाविक व नागरिक जिल्ह्यात येणार असल्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण व विकसित करण्याच्या दृष्टीनेही योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी असल्याने सर्व यंत्रणांना नियोजनासाठी पुरेसा अवधी आहे. यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांनी तयार केलेल्या कुंभमेळाच्या अंदाजित बाबनिहाय आराखड्याचे सादरीकरण केले.
00000000

आरटीएस (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम) अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयांनी अधिसूचित सेवांचे फलक दर्शनी भागात लावावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

  • विभागात सर्वत्र अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा
  • विभागातील पाचही जिल्ह्यांचा मुख्य आयुक्तांनी घेतला आढावा
  •  लोकसेवा ऑनलाईन प्राप्त करण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’चा वापर करा 

अमरावती, दि. 10 : राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमंलात आणला आहे. या अधिनियमान्वये प्रत्येक शासकीय विभागाने पात्र व्यक्तींना लोकसेवा विहित कालमर्यादेत प्रदान करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार नागरिकांना शासकीय विभागाच्या अधिसूचित सेवा विहित वेळेत मिळण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

तसेच नागरिकांच्या माहितीसाठी प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्या कार्यालयाव्दारे प्रदान करण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवांचे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देशही डॉ. पाण्डेय यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी नुकतेच अमरावती विभागाचा (पाचही जिल्ह्यांचा) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अंमलबजावणीबाबतचा सविस्तर आढावा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतला. त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय जिल्हा प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार प्रत्यक्षरित्या तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 होय.  या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या कायद्यामुळे नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळविता येणार आहे. या कायद्याद्वारे राज्य शासनाच्या विविध 38 विभागाच्या एकूण 642 लोकसेवा अधिसूचित केलेल्या आहेत. त्यापैकी 451 सेवा ह्या ऑनलाईन पोर्टलवर प्रदान करण्यात येतात. नागरिकांनी कायद्याचे महत्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेण्यासाठी “आपले सरकार पोर्टलचा” वापर करावा. तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास आयोगाकडे दाद मागावी, असे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, या कायद्याच्या अनुषंगाने शासकीय विभागाव्दारे पुरविण्यात येणाऱ्या सेवा, विहित कालमर्यादा, प्राधिकृत अधिकारी, अपिलीय अधिकारी याची माहिती असणारे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करुन त्याचा अहवाल अमरावती विभागीय लोकसेवा हक्क आयुक्तांना सादर करावा. अमरावती महसूल विभागाकरिता डॉ. एन. रामबाबू,(भा.व.से.) (से. नि.) यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय ‘कार्य आयोजना इमारत, पहिला मजला, वन विभाग, उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहत मार्ग, कॅम्प, अमरावती 444602’ येथे कार्यरत आहे.

शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सेवा प्रदान करण्यामध्ये विलंब होत असल्यास अथवा दिरंगाई होत असल्यास, त्यानुषंगाने पात्र व्यक्ती या आयोगाकडे तृतीय अपिल दाखल करु शकतो. आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या अपिल प्रकरणांवर आयोगाव्दारे कार्यवाही करण्यात येते. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अधिसूचित असलेली लोकसेवा प्रदान करण्यामध्ये दिरंगाई अथवा दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या प्रकरणांमध्ये आयोगाकडून दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात येते, असेही विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

0000

राघवेंद्र स्वामी यांच्या ‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ लघु ग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. १० : श्रीक्षेत्र ‘मंत्रालयम्’ येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी १७ व्या शतकात लिहिलेल्या ‘श्रीकृष्णचारित्र्यमंजिरी’ या लघु ग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. १० जुलै) राजभवन मुंबई येथे करण्यात आले.

यावेळी श्री राघवेंद्र स्वामी मठ, मंत्रालयम् येथील विद्यमान पिठाधिपती स्वामी सुबुधेन्द्र तीर्थ, मुंबई येथील मठाचे विश्वस्त रामकृष्ण तेरकर व अनुवादकर्ते प्रा. गुरुराज कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्रालयम, आंध्र प्रदेश येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी वेद, उपनिषद, प्रभू राम चरित्र व श्री कृष्ण चरित्र यांसह विविध विषयांवर लिखाण करून वेदांचे सार सोप्या भाषेत सामान्य जनांना उपलब्ध करून दिले.

‘श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी’ केवळ २७ श्लोकांचे संकलन असले तरीही ते श्रीमद भगवद्गीते प्रमाणे सारगर्भित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या ग्रंथावरील टीका प्रा. कुलकर्णी यांनी मराठी भाषेत आणल्यामुळे हा ग्रंथ मराठी भाषिकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. हा ग्रंथ हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये देखील अनुवादित केला जावा तसेच त्याचे ऑडिओ बुक देखील तयार केले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

श्री राघवेंद्र स्वामी यांनी ३५० वर्षांपूर्वी मंत्रालयम येथे संजीवन समाधी घेतली. आपल्या जीवनकाळात त्यांनी ४८ ग्रंथांची निर्मिती केली. रामायण व महाभारताचे सार त्यांनी लिहिले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. द्रविड देशातील भक्ती – ज्ञानाची अभिवृद्धी महाराष्ट्रात झाली, असे सांगून श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरित झाल्याबद्दल पिठाधिपती सुबुधेन्द्र तीर्थ यांनी आनंद व्यक्त केला.

०००

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या वसतिगृहांचे संरचनात्मकपरीक्षण सहा महिन्यांत करणार – मंत्री गुलाबराव पाटील

मुबंई, दि. १०: राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या सर्व वसतिगृहांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चर्ल ऑडिट) येत्या ६ महिन्यांच्या आत पूर्ण करुन त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी  विधानपरिषदेत सांगितले.

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या मराठवाड्यातील वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मराठवाडा विभागात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ५१ वसतिगृह येतात. त्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किलेअर्क येथील शासकीय वसतिगृह इमारतींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनांनुसार या इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी २ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या सर्व वसतिगृहांचे परीक्षण येत्या ६ महिन्यांत करण्यात येईल. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांच्या देखरेखीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागात स्वतंत्र कक्ष कार्यरत केल्यास तत्परतेने वसतिगृहांची दुरस्ती, देखरेख संदर्भातील कामे करता येतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चैत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य वजाहत मिर्जा, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

०००

वंदना थोरात/विसंअ/

‘बार्टी’च्या माध्यमातून अधिछात्रवृत्ती अदा करण्याची कार्यवाही सुरू- मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १० : राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) एमपीएससी, यूपीएससी, आयबीपीएस, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, सैन्यदल यांच्या पूर्व परीक्षांच्या प्रशिक्षणाचे काम केले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2021 अंतर्गत एकूण 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिछात्रवृत्ती रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती, मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य धीरज लिंगाडे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत अभिजित वंजारी, ज.मो.अभ्यंकर, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, बार्टीसाठी 2021-22 मध्ये अर्थसंकल्पात 300 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 255 कोटी रुपये वितरीत करण्यात आले. 2022-23 मध्ये 245 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 245 कोटी वितरीत करण्यात आले. तर 2023-24 मध्ये 350 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यातील 350 कोटी रुपये वितरीत करण्यात येऊन 326 कोटी रुपये खर्च झाले आहेत. चालू वर्षी 2024-25 मध्ये 300 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बार्टी’ मार्फत 2007 पासून 85,512 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून आतापर्यंत 21,093 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत बायोमायनिंग प्रकल्पासाठीचे कार्यादेश महिन्याभरात – मंत्री उदय सामंत

मुबंई, दि. १० : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याचे कार्यादेश येत्या महिन्याभरात  देण्यात येतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत बायोमायनिंग प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून यामध्ये तीन निविदा पात्र ठरल्या आहेत.  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रियेमध्ये अटींचा समावेश करण्यात आला आहे.  या पात्र ठरलेल्या निविदांचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, असे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नावरील चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.

०००

वंदना थोरात/विसंअ/

 

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने काँक्रिटीकरण -मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १० : मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये, यासाठी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहीर, ॲड.अनिल परब, प्रवीण दटके आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया झाली असून दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील 212 रस्त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून त्याऐवजी 208 रस्त्यांची नवीन निविदा मागविण्यात आलेली आहे. दोन्ही टप्प्यांतील रस्ते वेगवेगळे असून पहिल्या टप्प्यातील कोणत्याही रस्त्याचा दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये समावेश केलेला नाही. पहिल्या टप्प्यातील एकूण 114 रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत असून पश्चिम उपनगरात 246 व पूर्व उपनगरात 89 रस्त्यांची कामे सुरू आहेत.

हमी कालावधीत रस्त्यावर खड्डा पडल्यास संबंधित कंत्राटदाराकडून योग्य ती दुरुस्ती विनामूल्य करुन घेण्यात येते. तसेच याबाबत कंत्राटदाराकडून दिरंगाई झाल्यास संबंधित कंत्राटदारावर निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते, असे श्री.सामंत यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत शहर विभागातील पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या कामाकरिता नेमण्यात आलेल्या कंत्राटदार मे.रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा. लि. यांच्या रस्त्यांच्या कामाची प्रगती समाधानकारक नसल्यामुळे व त्यांनी निविदेतील अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे महानगरपालिकेमार्फत सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे व त्याची अनामत रक्कम व कंत्राट जप्त करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मे.रोडवेज यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळविले असल्यास त्याबाबची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

विधानसभा प्रश्नोत्तरे 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. १० : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जातील, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

विधानसभेत आज सदस्य संजय सावकारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राम सातपुते, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, राज्यातील १ लाख २६२ अधिकारी आणि कर्मचारी यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील ३ हजार १२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शिधापत्रिका योग्य योजनेत वर्ग करण्याच्या सूचनाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

भेसळयुक्त अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी ‘पीपीपी’ पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

मुंबई, दि. १० : भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, प्रयोगशाळांची अन्न नमुने तपासण्याची मर्यादीत क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्ल‍िक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुत्ता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे 2024 दरम्यान 6 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 610.5 किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे.

भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात 196 दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 25 हजार 338 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून 13 लाख 44 हजार 406 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी 20 अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.   भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाया वाढल्या आहेत, असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

महामार्ग प्रकल्प अहवालात पाणी निचऱ्याच्या उपाययोजनांचा समावेश करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 10 : महामार्ग निर्मितीचे काम करताना पाण्याचा निचरा होणे महत्वाचे असते. त्यामुळे रस्ते काम करतानाच पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजनांचा रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविताना समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य डॉ. राहूल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावेळी सदस्य नाना पटोले, प्रशांत बंब, सुरेश वरपुडकर, संजय सावकारे, अमित देशमुख, उदयसिंह राजपूत, संदीप क्षीरसागर यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, परभणी – गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावरील पी क्यू सी पॅनल्स मध्ये भेगा पडल्याचे निदर्शनास आले. या महामार्गावर पडलेल्या भेगांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या मार्फत नेमलेल्या तांत्रिक सल्लागारांकडून त्रयस्थ पद्धतीने अंकेक्षण करण्यात आले. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ओवर फ्लडींग होऊन रस्त्याच्या सबग्रेड मध्ये पाण्याचा अंश वाढल्यामुळे काही ठिकाणी काँक्रीट पी क्यू सी पॅनेल्स मध्ये भेगा पडल्याचे निदर्शनास आले. या पॅनेल्सची दुरुस्ती कंत्राटदाराने आय.आर.सी. मानकानुसार स्व-खर्चाने पूर्ण केलेली आहे. तसेच पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस कच्ची गटारे व गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूस काँक्रीट ड्रेन बांधण्यात आली आहेत. कंत्राटदाराने केलेल्या पी क्यू सी  पॅनेल्स दुरुस्तीकामाची आय. आय. टी., रुरकी व सेवानिवृत्त मुख्य अभियंता यांच्या टीममार्फत तपासणी करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार दुरुस्तीचे काम आय. आर. सी. मानकानुसार योग्यप्रकारे झाले आहे. सद्यःस्थितीत सदर रस्ता वाहतुकीस सुस्थितीत आहे.

जिंतूर- परभणी व पाथरी- परभणी या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची बैठक घेवून उर्वरित कामाची सुरुवात करण्यात येईल, असे मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

विधानसभा लक्षवेधी

राज्यातील मोठ्या शहरांमधील शासकीय रुग्णालयांतील सोयी सुविधांचा आढावा घेणार मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १० : नगर विकास विभागाअंतर्गत मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून रूग्णालये कार्यान्वित आहेत. रुग्णालयातील जनरेटरची व्यवस्था, विविध आजारांचे निदान करणारी तपासणी यंत्रणा आदींबाबत मोठ्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय रूग्णालयांचा आढावा घेण्यात येईल. या आढाव्यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

भांडूप येथील सुषमा स्वराज प्रसुतिगृहाच्या प्रकरणाबाबत सदस्य रमेश कोरगांवकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सुचनेच्या चर्चेत सदस्य श्री. रोहित पवार यांनीही भाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित भांडूप (पश्चिम) येथे सावित्रीबाई फुले उपनगरीय प्रसुतिगृहाची जानेवारी 2024 पासून दुरूस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रसुतीगृहात नोंदणी केलेल्या रूग्णांना जवळील सुषमा स्वराज प्रसुतीगृहात आवश्यक सेवा देण्यात येत आहे. या रूग्णालयात झालेल्या माता व बाल मृत्यूप्रकरणी नविन समिती स्थापन करून याबाबत चौकशी अहवाल मागविण्यात येईल. या अहवालानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांची विभागीय चौकशी करण्यात येत असून तर स्त्रीरोगतज्ज्ञ यांचे कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आले नाही. या रूग्णालयातच नवजात बालकांच्या उपचारासाठी असलेल्या 20 खाटा ठेवण्यात येतील. तसेच काम पूर्ण करून सावित्रीबाई फुले उपनगरीय प्रसुतिगृह सुरू करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

०००

निलेश तायडे/विसंअ/

 

तळेगांव दाभाडे येथील मुख्याधिकारी यांच्या कारकिर्दीतील कारभाराच्या चौकशीसाठी समिती – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १०: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगांव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधातील तक्रारीनुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित मुख्याधिकारी यांच्या कारकिर्दीतील सर्व कारभाराची चौकशी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभेत याबाबत सदस्य सुनील शेळके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सुचनेच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी यांनीही भाग घेतला.

मंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले की, मुख्याधिकारी यांच्या तक्रारींबाबत उपविभागीय अधिकारी, मावळ यांच्यामार्फत चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे.  तसेच संबंधित मुख्याधिकारी यांनी 1 जून 2024 रोजी मद्य प्राशन करून वाहन चालवित अपघात केल्याप्रकरणी तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ/

 

पूरग्रस्त वसाहतीमधील बांधकामासाठी धोरण तयार करण्यासाठी समिती – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १० : पूरग्रस्त वसाहतींमध्ये बांधकामासाठी धोरण नसल्याने हे धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिका हद्दीमधील पेठ शिवाजीनगर भागातील गोखलेनगर परिसरामध्ये पानशेत व खडकवासला पूरग्रस्तांसाठी मिळकती दिलेल्या आहेत. याबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत एसआय सर्व्हे करण्यात आला असून या सर्व्हेमध्ये पुणे गृहनिर्माण महामंडळामार्फत वितरित केलेल्या मूळ बांधकामापेक्षा वाढीव बांधकामे आढळून आलेली आहेत. या परिसरातील इमारतींना मिळकत करावर लावण्यात आलेला कर धोरण ठरत नाही, तोपर्यंत निवासी बांधकामांना पूर्वीप्रमाणेच कर आकारण्यात येईल, असे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत मंत्रालयीन स्तरावर चौकशी –मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १० : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपातील दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत मंत्रालयीन स्तरावर चौकशी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी ६,०६६ अर्जापैकी १,७३८ अर्ज मंजूर करण्यात आले असून ५०८ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे, तर ७० प्रस्तावांबाबत तांत्रिक कारणांमुळे अहवाल तयार करण्यात आलेला नाही. ११२ लाभार्थ्यांनी मागणी केलेली घरकुलांची जागा नदी पात्रात असल्याने तसेच ६३८ लाभार्थ्यांनी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. चांदूर बाजार नगरपरिषदेतील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी एकूण ६०७ अर्जापैकी ४१५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून १९२ घरकुलांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

अचलपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरिता ९८६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीस सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३६० लाभार्थ्यांचे प्रस्ताव  जिल्हास्तरीय समितीकडून तपासण्यात आले. तसेच ४०२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीकरीता सादर केले असता शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे पुढील निर्णयापर्यंत नियमित करण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

दिव्यांग उपक्रमांच्या अनुदानबाबतचे धोरण मंजूर – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १० : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून राज्यातील कायमस्वरूपी विनाअनुदानित, दिव्यांगांच्या विनाअनुदानित विशेष शाळा, संलग्न वसतिगृहे, कार्यशाळा व अनाथ, मतिमंदांची बालगृहे यांना अनुदान मंजुरीबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी प्राप्त झाली आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

याबाबत सदस्य ॲड. आशिष जयस्वाल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य बच्चू कडू यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत दिव्यांगांचे विविध उपक्रम चालविले जातात. सद्य:स्थितीत राज्यात 932 अनुदानित उपक्रम सुरू असून त्यामध्ये 46 हजार 466 विद्यार्थी लाभ घेत आहेत. विविध शासन निर्णयांनुसार या उपक्रमांमध्ये 2464 पदे मंजूर करण्यात आली आहेत. मागील काळात शासनाने विशेष बाब म्हणून 17 दिव्यांगांच्या शाळांना पदमान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र 17 पैकी 4 शाळांना पदमान्यता देण्यात आली. उर्वरित 13 शाळांना पदमान्यता देण्यात आली नाही. याबाबत चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल. या शाळांमध्ये 10 दिवसांच्या आत पदमान्यता मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

दिव्यांगांच्या विविध उपक्रमांबाबत अनुदानाबाबत शासनाने धोरण ठरविले आहे. दिव्यांगासंबंधित काही उपक्रमांना धोरण लागू पडत नसल्यास अशा उपक्रमांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 

सातपूर व अंबड वसाहतीमधील भूखंड विभाजनाची उच्चस्तरीय चौकशी – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. १०: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नाशिक शहर परिसरात सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्र आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये 10 ते 15 वर्षे भूखंड उपयोगाविना पडून असल्यास ते भूखंड परत घेण्याचा शासनाचा नियम आहे. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील भूखंडांचे विभाजन (सबडिव्हिजन) करण्यात आल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

याबाबत सदस्य सीमा हिरे, सुहास कांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंडाचे विभाजन करणाऱ्या विकासकांची व संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येईल. महामंडळामध्ये क्षेत्रीय अधिकारी महसूल विभागाकडून येतात. संबंधित अधिकारी महसूल विभागाचे असल्यामुळे या विभागाला चौकशी करण्याचे कळविण्यात येईल. चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

पुणे रिंग रोड व विरार – अलिबाग मार्गिकेसाठी भूसंपादनासह निविदा प्रक्रिया राबविण्यास विशेष प्रकल्प म्हणून परवानगी – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १०: पुणे रिंग रोड व विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी भूसंपादन करण्यात येत आहे. हे दोन्ही प्रकल्प राज्याच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये भर घालणारे आहेत. या प्रकल्पांच्या भूसंपादन सोबतच निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी विशेष प्रकल्प म्हणून परवानगी घेण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका ९८.५०० किलोमीटर लांबीची असून यासाठी ११३० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. ही मार्गिका पालघर, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांमधून जाते. तसेच वसई, भिवंडी, कल्याण, उरण, पनवेल व तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देणारी आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी ९० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कार्यादेश देण्यात येणार नाहीत, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, दि.२९ ऑगस्ट २०१६ रोजीच्या परिपत्रकातील सूचनेनुसार प्रकल्पासाठी आवश्यक जमीन १०० टक्के क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात नसताना निविदा प्रक्रिया करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असल्याने, महामंडळाकडील २५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये पूर्व परवानगी मागण्यात आलेली होती. त्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निविदा मागविण्यासाठी विशेष बाब परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या निविदा उघडण्यात आल्या असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू आहे. विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आणि पुणे रिंग रोड कामाचे 70 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कंत्राटदारास स्वीकृती पत्र तसेच 90 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय संबंधित कंत्राटारास कार्यारंभ आदेश देण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई, दि. 10 :- राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली.

विधानसभेत राज्य शासनाच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

०००००००

दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. १० :- राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

दूधभेसळीसंदर्भात विधानसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सभागृहाला दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दूधभेसळीच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन यापूर्वी राज्य सरकारने दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा केला होता. हा कायदा राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, दूधभेसळीच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देणे ही शिक्षा तुलनेने फार मोठी असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाचे मत असावे, त्यामुळे त्यावर अद्याप राष्ट्रपतींची  सही झालेली नाही.

दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना निर्भेळ-भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. याबाबत शासन गंभीर असून त्यासंदर्भात वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, संबंधित मंत्री महोदयांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक घेतली जाईल. दूध भेसळ रोखण्यासाठी विभागाला आवश्यक असणारे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.

सध्याच्या परिस्थितीत दूध उत्पादकांच्या दुधाला बऱ्यापैकी दर मिळू लागले आहेत. अशावेळी झोपडपट्टी भागामध्ये किंवा इतर अज्ञात ठिकाणी काही व्यक्तींकडून भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जास्त दर असणाऱ्या ब्रॅन्डच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी मिसळणे, इंजेक्शनने भेसळसारखे गैरप्रकार केले जातात. अशा भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात अत्यंत कडक भूमिका घेण्याची राज्य शासनाची तयारी आहे. या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

०००००

ताज्या बातम्या

युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि.१३: राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन त्यांचे भविष्य घडविणे राज्य शासनाची जबाबदारी असून स्वयंरोजगाराकरिता युवकांना राज्य शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन...

सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक सहाय्य योजना

0
वंचित घटकांतील नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग...

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...