रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 694

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी बँकेत खाते आवश्यक

मुंबई, दि. ९ : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेचे निकष जाहीर करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अशी : लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करावा, लाभार्थ्याचे आधार कार्ड असावे, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि योजनेच्या अटी- शर्तीचे पालन करण्याबाबतचे लाभार्थ्याचे स्वाक्षरीसह हमीपत्र आवश्यक आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता : ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सृजन ट्रस्टला ३० लाख रुपयांचा धनादेश! – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ९ : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सृजन ट्रस्टला ३० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

सृजन संस्था डिपेक्स या कार्यक्रमाचे आयोजन करते. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सृजशीलतेला मंच मिळतो. सृजनशीलतेला वाव मिळतो आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. डिपेक्ससारखे विविध उपक्रम मोठ्यास्तरावर आयोजित व्हावेत, नवीन संकल्पनांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने सृजन संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी  उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, “आत्मनिर्भर भारतासाठी तरुण आत्मनिर्भर झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक आत्मविश्वास तरुणांना डिपेक्ससारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळतो. आज त्यांच्या अविष्कारांना प्रोत्साहन देणारा मंच उपलब्ध आहे, त्यांच्या जिद्दीला वाव देणारी स्पर्धा आहे. यातूनच विद्यार्थ्यांचा विकास घडतो, त्यांना मार्गदर्शन मिळते आणि पुढे वाटचाल करण्याची दिशा मिळते. योग्य दिशेने वाटचाल करणारे महत्वाकांक्षी युवक हीच आपल्या देशाची संपत्ती आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. सृजन संस्थेमार्फत विविध उपक्रम आयोजित व्हावेत, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि नवीन संधींचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. “

२०२४ मध्ये डिपेक्स कार्यक्रमाच्या आयोजनाला ३३ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, टेक्नॉलॉजी, कृषी विज्ञान इत्यादी शाखांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आविष्कारांचे प्रदर्शन भरते. तसेच त्यांच्यात स्पर्धा देखील भरवली जाते. यावर्षी शासकीय औद्योगिक संस्थांचा या कार्यक्रमातील सहभाग उल्लेखनीय ठरला. धनादेश स्वीकार करताना सृजन ट्रस्टचे संकल्प फळदेसाई, अमित ढोमसे, निधी गाला, गिरीश पाळधे व प्राची सिंग हे सदस्य उपस्थित होते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची आवश्यकता – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ९ : सामाजिक परिवर्तनासाठी विकासात्मक पत्रकारितेची गरज आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

विधानभवनातील दालनात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विविध बातम्यांची शासनस्तरावर तत्काळ दखल घेवून कार्यवाही देखील केली जाते. शासनाच्या योजना, निर्णय आणि विधिमंडळाचे कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असून तसे सहकार्य देखील मिळते. परंतु, ब्रेकिंग न्यूजबरोबर सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी विकासात्मक पत्रकारितेची गरज आहे. सकारात्मक बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये आशा, आनंद निर्माण होण्यास मदत होते. विकासात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरिबांचे कल्याण होईल, असे कार्य माध्यम प्रतिनिधींनी करावे, असे आवाहनही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ, पुस्तक देवून सत्कार केला. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी डॉ. गोऱ्हे यांना स्मृतीचिन्ह भेट देवून आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप चव्हाण, टी.व्ही. जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, राजेंद्र हुंजे यांनी मनोगत व्यक्त करुन सत्काराबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले.

प्रास्ताविक उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब यांनी केले.

००००

पवन राठोड/ससं/

 

वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – मंत्री उदय सामंत

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. ९ : पुणे जिल्ह्यातील वाघोली गावातील समस्यासंदर्भात आज उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री. सामंत यांनी दिले. तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उभारणाऱ्या खासगी बससाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचे व ड्रेनेजसाठी येत्या आठ दिवसात रस्त्यांचे रेखांकन करून जागा देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आमदार अशोक पवार यांच्या विनंतीनुसार उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वाघोली गावातील विविध मूलभूत सुविधांसंदर्भात बैठक झाली. यावेळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर  विकास प्राधिकरण, एमआयडीसी आदींचे अधिकारी उपस्थित होते.

वाघोलीमध्ये ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी रस्त्यांचे रेखांकन येत्या आठ दिवसांत करून देण्यात यावे. तसेच रस्ते, वाहनतळ संदर्भातील समस्यांसंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. वाघोलीत रस्त्यांवरच खासगी बस थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ते टाळण्यासाठी या बसना रस्त्याशेजारील मोकळ्या जागेवर थांबविण्याची व्यवस्था करावी व त्यासंदर्भात पोलीस विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन मार्ग काढावा – उद्योगमंत्री उदय सामंत

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. ९ : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात येत्या आठ दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन मार्ग काढावा, असे निर्देश उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

बारवी धरणग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आज मंत्रालयात आज श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, आमदार मनीषा कायंदे, औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन शर्मा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

बारवी धरणामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा होतो. या धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन कायदा लागू करणे, धरणग्रस्तांच्या गावांना पायाभूत सुविधा पुरविणे आदीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको आदी यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, असे यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 9 : सर्वप्रथम शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. या विभागांची पुनर्रचना करतांना कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार नाही, त्‍यांना नियमित पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याचा सर्वसंमतीने विचार करावा, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.

या बैठकीला आमदार श्री.राहुल कुल, आमदार श्री.जयकुमार गोरे, आमदार श्रीमती मनीषा कायंदे, आमदार श्रीमती मंजुळा गावित, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अपर सचिव राजेश कुमार यांच्यासह महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना, महाराष्ट्र पशुचिकित्सक संघटना, पशुसंवर्धन कर्मचारी वृंद संघटना, खासगी पशु वैद्यकीय संघटना आणि विध्यार्थी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्रिमंडळांच्या दिनांक 13 मार्च 2024 च्या बैठकीत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. ही पुनर्रचना करतांना लोकसंख्येनुसार प्रचलित धोरणात बदल करून पायाभूत सुविधेतही बदल करणे आवश्यक असल्याचे मत मंत्री श्री.विखे-पाटील यांनी मांडले. विभागाची पुनर्रचना करतांना त्यात कोणत्याही त्रुटी राहू नये, अशा सूचनाही त्‍यांनी केल्या. या बैठकीत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग यांची पुर्नरचना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर दोन्ही विभागातील सुधारित आकृतिबंध, नवीन पदे आणि सेवा जेष्ठता अशा विविध मुद्यांवर मंत्री श्री.विखे-पाटील आणि विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांत चर्चा करण्यात आली.
000

डॉ. मधुकर गायकवाड यांची ‘दिलखुलास’मध्ये १० व ११ जुलैला तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ११ जुलै रोजी मुलाखत

मुंबई, दि. 9 : जागतिक हेपॅटायटीस दिवस दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पावसाळ्यात होणारे आजार तसेच झिका व्हायरस यासंदर्भात नागरिकांनी घ्यायची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती जे.जे रुग्णालय, मुंबई येथील औषध वैद्यकशास्त्राचे पथकप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.

हेपॅटायटीस हा यकृताशी निगडित आजार आहे. ज्यामध्ये यकृताला सूज येते आणि त्यामुळे पेशींचे नुकसान होते. हेपॅटायटीस ही सामान्यतः विषाणूजन्य संसर्गामुळे उद्भवणारी समस्या आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि झिका यासारखे विविध विषाणूजन्य आजार पसरत असतात. आरोग्य विभागामार्फत या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगानेच या आजारांची लक्षणे आणि त्यावरील प्रभावी औषधोपचार पद्धती तसेच गर्भवती महिलांनी घ्यायची काळजी याबाबतची सविस्तर माहिती डॉ. गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ व ‘ जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, बुधवार दि. 10 आणि गुरुवार दि. 11 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही  मुलाखत गुरुवार दि. 11 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

केशव करंदीकर/वससं/

सिल्लोड तालुक्यातील बंधाऱ्यांसह व पाझर तलावांबाबत कार्यवाहीसाठी स्वतंत्र बैठक घेणार – मंत्री अब्दुल सत्तार

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. 9 : सिल्लोड तालुक्यातील बंधारे व पाझर तलाव संदर्भातील कामांबाबत कार्यवाही व गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांअंतर्गत विषयांबाबत लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र बैठक घेऊ, असे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी प्रकल्पाबाबत मंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.  बैठकीस  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे उपस्थित होते, तर गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तीरमनवार हे दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हा विषय पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील  सोयगाव व सिल्लोड तालुक्यातील बंधारे व पाझर तलाव, निजामकालीन बंधाऱ्यांबाबत माहिती  घेण्यात आली आहे. सिल्लोड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात बाराही महिने पाणी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे व गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ अंतर्गत विविध निर्धारित कामे पूर्ण होण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाही संदर्भात यावेळी मंत्री श्री.सत्तार यांनी सूचना केल्या.

00000

किरण वाघ/विसंअ/

 

विधानसभा कामकाज

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारसीचा ठराव संमत

मुंबई, दि. ९ : विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची केंद्र शासनास शिफारस करणारा ठराव मांडला. हा ठराव सभागृहात संमत करण्यात आला.

ठरावानुसार मुंबई शहरातील मध्य रेल्वे मार्गावरील ‘करी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लालबाग’ रेल्वे स्थानक, ‘सॅंडहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘डोंगरी’ रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मरीन लाईन्स’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘मुंबादेवी’ रेल्वे स्थानक, ‘चर्नी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘गिरगाव’ रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील ‘कॉटन ग्रीन’ चे ‘काळा चौकी’ रेल्वे स्थानक, ‘डॉकयार्ड रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘माझगाव’ रेल्वे स्थानक, ‘किंग्ज सर्कल’ स्थानकाचे नाव ‘तीर्थंकर पार्श्वनाथ’ रेल्वे स्थानक करण्याबाबत केंद्र शासनास शिफारस करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

आदिवासी जमिनींच्या अवैध हस्तांतरण प्रकरणी चौकशी समिती – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुबंई, दि. ९ : आदिवासी बांधवांच्या तसेच इनामी जमिनींचे बेकायदेशीरित्या हस्तांतरण प्रकरणांची सविस्तर चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच मुंबई, नागपूर या भागातील जमिनी हस्तांतरण प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करुन महिनाभरात अहवाल घेतला जाईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मौजे नवपाडा (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे केल्याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते.

मौजे नवापाडा येथील अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीच्या नावे असेलेली  जमीन हस्तांतरण प्रकरणाची वस्तुस्थिती  तपासून  येत्या १५ दिवसांत त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले, तसेच आदिवासींच्या जमिनी तसेच इनाम म्हणून दिलेल्या जमिनी संबंधिताच्या परवानगी शिवाय बेकायदेशीरपणे हस्तांतरित करणे, भूखंड माफियांच्या माध्यमातून त्यांना भूमिहीन करण्याच्या प्रकरणांची गंभीरतेने नोंद घेत दोषींवर कारवाई केली जाईल. यासंदर्भात मुंबई तसेच नागपूर विभागातील प्रकरणांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करुन यासंदर्भात सर्व तपशील तपासण्याचे निर्देश दिले जातील. समितीकडून महिनाभरात चौकशी अहवाल घेतला जाईल. त्या अहवालानुसार संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच विभागीय आयुक्तांना यासंदर्भात आपल्या विभागातील प्रकरणांची तपासणी करुन चौकशीचे निर्देश दिले जातील, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण प्रक्रिया थांबवून त्यांच्या जमिनी परत त्यांना मिळवून द्याव्या, त्यातून आदिवासींना समाधान मिळेल.यासाठी आदिवासी जिल्ह्यात समाधान शिबिरांचे आयोजन निश्चितचं सहाय्यक ठरेल, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, अभिजित वंजारी यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

0000

वंदना थोरत/विसंअ/

 

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील   

मुंबई, दि. ९ : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय हा राज्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे. यामध्ये कोणाच्या काही शंका असल्यास त्या दूर केल्या जातील, असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची आहे, यामध्ये ज्या संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे त्यांचे मुद्दे देखील मंत्रिमंडळासमोर मांडून त्याला मान्यतेसाठी सादर केले जातील. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेमुळे विभागाचे सक्षमीकरण होवून नवीन पदे निर्माण होतील. यातील लाभधारकांना काही शंका आहेत त्यांच्याशी चर्चा करून व्यापक व सर्वांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, सतेज पाटील, सुरेश लाड यांनी सहभाग घेतला.
०००
संध्या गरवारे/विसंअ/

000

दुष्काळग्रस्तांना निधी वेळेत वाटप करणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. ९ : दुष्काळग्रस्तांना मंजूर केलेला निधी वाटप करण्यासाठी शासन कार्यवाही करत आहे. दुष्काळग्रस्तांना जी मदत शासनाने जाहीर केली आहे त्या शेतकऱ्यांना हा निधी वेळेत वाटप करणार असल्याचे विधानपरिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत वाटप करण्यासाठी शासनाला आवश्यकता भासल्यास मुदत वाढवली जाईल. आतापर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून ईकेवायसीची मोहीम लवकरात लवकर करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यासाठी दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत त्या भागातील विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत केली जाईल. एन.डी.व्ही.आय. (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार हे ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. जिरायत, बागायती पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत शासन मदत करत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद मदतीच्या निकषापेक्षा जास्त मदत दिली जात आहे, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत विराधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद सदस्य सतेज पाटील, विधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
०००

ताज्या बातम्या

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...