सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 691

दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 12 : दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पावनगड या मंत्री निवासस्थानी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पाटण मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही स्व. देसाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील – पणनमंत्री अब्दुल सत्तार

मुंबईदि. ११ : राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच देण्यात येणाऱ्या अनुदानासह कृषीपणन विभागाच्या माध्यमातून शासन राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानपरिषद नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री श्री. सत्तार बोलत होते.

मंत्री श्री सत्तार म्हणाले की, शेतमालाला हमीभाव घोषित करणे ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. घोषित केलेल्या हमीभावानुसार एकूण उत्पादनाच्या 25 टक्के प्रमाणात केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार कडधान्य व तेलबियांची नाफेड या केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे राज्यस्तरीय एजन्सी मार्फत खरेदी करण्यात येत आहे.

पणन विभागाद्वारे राज्यात एकूण 6 विकिरण प्रक्रिया केंद्र सुरु असून त्यापैकी 3 केंद्रांवर कांदा प्रक्रिया करण्यात येत आहे.राज्यात समृध्दी महामार्गालगत नियोजित औद्योगिक नोडमध्ये ईरॅडिशन या उच्च तंत्रज्ञानावर आधारित कांदा महाबँककांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 अंतर्गत निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमांतर्गत कांदा प्रक्रियेवर आधारित प्रकल्प प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यासंदर्भात पुढील कार्यवाही उद्योग विभागामार्फत सुरु आहे.

अर्थसंकल्पात कृषी विभागाकडून पणन हंगाम 2023-24 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी 5000/रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सन 2023-24 साठी तुरीचे आधारभूत दर रु.7000/- प्रति क्विंटल प्रमाणे निश्चित केले. परंतु तुरीचे बाजारभाव हे आधारभूत दरापेक्षा जास्त असल्यामुळे राज्यात तूर खरेदी करीता शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने बाजारभाव स्थिरीकरण योजनेंतर्गत (पी.एस.एफ) राज्यस्तरीय एजन्सी मार्फत तूर खरेदी करण्याचे नाफेड ला निर्देश दिले.

त्यासाठी ॲगमार्क या वेबसाईटवरील तपशीलानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील 3 दिवसात प्राप्त झालेल्या आवक व दरानुसार खरेदीचा मॉडेल दर” नाफेडद्वारा घोषित केला जात असल्याचे मंत्री श्री सत्तार यांनी सांगितले. कांदा निर्यातबाबत धोरण ठरविणे ही बाब केंद्र सरकारशी निगडित आहे.

कांदा पिकाच्या निर्यातीवर डिसेंबर 2023 मध्ये घालण्यात आलेली बंदी उठविण्याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली.

केंद्र शासनाने बांगलादेशयूएईभूतानबहारीनमॉरिशस व श्रीलंका या  सहा देशांना एकूण 99,150 टन तसेच केंद्र शासनाने मध्य- पूर्व व युरोपियन देशांना एकूण 2,000 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

राज्य शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये विक्री केलेल्या कांद्याकरीता  रु. ३५०  प्रति क्विंटल  व जास्तीत  जास्त  २००  क्विंटल  प्रति  शेतकरी  याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकूण रू.851 कोटी67 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला.

आतापर्यंत पाच टप्प्यात एकूण रू.836 कोटी06 लाख  इतके अनुदान वाटप करण्यात आले असून उर्वरित अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारामध्ये शेतमालाला चांगला भावग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यासाठी पणन विभागाच्या माध्यमातून संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान” राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात एकूण 75 आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली.  कृषी  विभागाने “ विकेल ते पिकेल” या संकल्पनेवर आधारीत कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण  निश्चित केले.  या धोरणाचा भाग म्हणून कृषी विभागाने संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान” ची सुरुवात केली.

कृषी विभागाने पुन्हा हे शेतकरी आठवडी बाजार अभियान  सहकार विभागाकडे  हस्तांतरीत केले असल्याचे सांगितले

नागपूरकाटोल व कळमेश्वर, जि. नागपूरमोर्शीजि.अमरावती तथा बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार असून त्याअंतर्गत रु. 40 कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या एकूण किंमतीच्या 50 टक्के रक्कम  शासन अनुदान म्हणून  देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील काजूच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य काजू मंडळची स्थापना करण्यात आली आहे.काजू बोर्ड स्थापन करण्याचा  उद्देश – हे काजू मंडळ काजू फळाच्या  Promotional, Processing, Value Addition व Marketing संदर्भात काम करणार आहे. काजू बोर्डाचे विभागीय कार्यालय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे स्थापन करण्यास मान्यता, तर काजू मंडळाचे मुख्यालय, नवी मुंबईवाशी ऐवजी वेंगुर्लासिंधुदुर्ग येथे स्थापन करण्यास  मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

‘हर घर नल, हर घर जल’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

केंद्राच्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या आढावा बैठकीत निधीची मागणी

नवी दिल्ली, दि. ११ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिलेले स्वप्न, ‘ घरा घरात पाणी उपलब्ध व्हावे, घरा घरात शौचालय असावे, महाराष्ट्र ओडीएफ प्लस व्हावे, हे साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्राच्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या आढावा बैठकीत केले. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणी साठी केंद्र सरकारकडून आर्थिक निधीची मागणीही श्री. पाटील यांनी केली.

राजधानीस्थित अंत्योदय भवन येथे महाराष्ट्रासंदर्भातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, केंद्रीय राज्यमंत्री वी.सोमन्ना, केंद्रीय जलशक्ती विभागाचे सचिव, श्रीमती विनी महाजन व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रगतीबद्दल केंद्रसरकारकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्र सरकारकडून जीएसटी वाढीसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती देत, २१ जून २०२२ पूर्वी कार्यादेश निर्गमित केलेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या योजनांमध्ये वाढ झालेल्या जीएसटीसाठी केंद्राकडून मान्यता मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगतिले.

महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकरिता, दि. 20.10.2022 पासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) 12% ऐवजी 18% लागू करण्यात आला आहे, तसेच दि 21.06.2022 पूर्वी कार्यादेश दिलेल्या व प्रगतीपथावर असलेल्या योजनांबाबत केंद्रीय मंत्री यांनी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगतिले. यातंर्गत 500 कोटी निधी महाराष्ट्राच्या वाट्याला येण्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली व केंद्र सरकारचे आभार मानले.

राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत केंद्राकडून आर्थिक निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री यांनी दिले असून, मार्च २०२५ पर्यंत ‘हर घर जल’ या योजनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे. तसेच, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत असलेल्या काही जुन्या योजनांच्या संकल्पनांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून, राज्यस्तरीय योजना मंजुरी समिती (SLSSC) ची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या दोन्ही मुद्द्यांवर त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली आहे. या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे काम वेळेवर पूर्ण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रात जल जीवन मिशन सौर मिशन (जेजेएम) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा योजनांमध्ये चांगली प्रगती दिसून येत असल्याबाबत केंद्रीय मंत्री यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली. एकूण ४३,३०६ योजनांपैकी ३,४८१ योजनांमध्ये सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा निर्मिती आणि वापर सुरू करण्यात आले असल्याचे सांगत, उर्वरित योजनांमध्येही लवकरच या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याचे लक्ष्य केंद्रित केल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. या योजनांमुळे दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा मिळण्यास मदत होईल आणि पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवर अवलंबित्व कमी होईल. यासोबतच, अक्षय ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढून हवामान बदलाशी लढण्यासही मदत होईल. राज्यभरात या योजनेतंर्गत  केंद्र सरकारआर्थिक पाठबळ देणार असल्याची माहिती देत, मंत्री श्री. पाटील यांनी या योजनेतंर्गत रूपये 2340 एवढ्या निधीची मागणी केली व केंद्रीय जलशक्ती मंत्री यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याचे त्यांनी सांगतिले.

०००

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.86 /

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ११: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या  हौतात्म्याचे  स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या दृष्टीने राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र होईल, असा विश्वास व्यक्त करत राजगुरुनगर जन्मस्थळ परिसर विकास 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सादर करताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही याबाबत आश्वस्त करत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात 13 मार्च 2023 ला अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शासन कटिबद्ध असून स्मारक विकासाचे कार्य प्रगतीपथावर आहे. यासंदर्भात सर्वकष अभ्यास करून करून अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली काही सदस्यांसह समिती गठित करण्यात आल्याचे सांगितल. या कामाला गती मिळण्याच्या दृष्टीने सातत्याने आढावा बैठाका घेऊन जलद गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,  1 जुलै 2023 रोजी स्मारक स्थळास प्रत्यक्ष भेट देत सल्लागारांमार्फत तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण बघितले; त्याचवेळी पालकमंत्री पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याच्या 254 कोटी 11 लक्ष रुपयांच्या प्रस्तावास 31 जुलै 2023 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने समितीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या बाबतचा 102 कोटी 48 लक्ष किमतीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती समोर मान्यतेसाठी ठेवण्याची शिफारस केली.

या विकास आराखड्याच्या 102 कोटी 48 लक्ष किमतीच्या पहिल्या टप्प्यास 10 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीने मान्यता दिली. या आराखड्यामध्ये स्मारकाचा जीर्णोद्धार,जन्म खोली, थोरला वाडा, तालीम, मुख्य दरवाजा, राम मंदिर, वाचनालय, सुविधा गृह, उपहारगृह यांसह नदी परिसर सुधारणा राम घाट चांदोली घाट व त्याकडे जाणारा दरवाजा, संरक्षित भिंत व वाहनतळ, अंतर्गत रस्ते, खुले सभागृह, पुतळे, स्मारक, प्रकाश व्यवस्था व ध्वनि शो इत्यादींसाठी 82.35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून भूसंपादनासाठी 20.13 कोटी रुपये  इत्यादी बाबी या आराखड्याच्या कामामध्ये समाविष्ट आहेत.

या आराखड्याच्या अंमलबजावणी व सह नियंत्रण करण्यासाठी पालकमंत्री, पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती, आणि जिल्हाधिकारी, पुणे तथा सनियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे.

या आराखड्यातील मंजूर कामे 31 मार्च 2026 पूर्ण करण्यात येतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

या स्मारकाच्या विकासासाठी पुरातत्व विभागाच्या कार्यक्षेत्रातील 36.45 कोटी किमतीच्या दोन कामांच्या सविस्तर अंदाजपत्रकांना 14 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकार्यालय पुणे यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली असून या कामांची 16 फेब्रुवारी 2024 रोजी निविदा देखील प्रकाशित करण्यात आली होती.

2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सदर कामांच्या निविदा अंतिम करून 15 मार्च 2024 रोजी 31.21 कोटी इतक्या रकमेच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती देखील मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या स्मारकाच्या प्रगती अहवालात स्पष्ट केले आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

संसदीय परंपरांचे पालन करुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य हवे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई, दि. ११: सामान्य नागरिक त्यांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ म्हणून विधिमंडळाकडे पाहतात. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांनी या सभागृहाची उच्च परंपरा जपून आणि संसदीय परंपरांचे पालन करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी येथे केले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विधानसभा सभागृहात विधिमंडळ सदस्यांसाठी उपराष्ट्रपती श्री. धनखड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते.

उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, भारताला संसदीय लोकशाहीची देदीप्यमान परंपरा आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेकडे पाहिले जाते. त्यामुळेच येथील संसद आणि विधिमंडळातील सदस्यांची जबाबदारी अधिक पटीने वाढते. सामान्य नागरिकांच्या या सभागृहांच्याप्रती असलेल्या अपेक्षांची पूर्तता हे सभागृह कशा पद्धतीने करते, यावर बरेच अवलंबून आहे. त्यासाठी विधिमंडळ अथवा संसदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांमध्ये मत-मतांतरे असली, तर परस्पर संवादाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्यांनी आणि राजकीय पक्षांनी ही नैतिकता आणि कामकाजाबाबतची गंभीरता पाळली पाहिजे. सभागृहात असणारे सर्व घटक महत्वाचे आहेत, असेही उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी नमूद केले. संसदेत अथवा विविध राज्यांच्या विधिमंडळात वारंवार होणारा गोंधळ, घोषणाबाजी, भाषणात अडथळे आणणे आदी प्रकारांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र हे इतरांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या राज्याला आहे. शेती, प्रशासन, उत्तरदायीत्वाची जाणीव ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच देशाला नव्या उंचीवर पोहोचवण्यात महाराष्ट्राची भूमिका ही खऱ्या अर्थाने पॉवरहाऊसची असल्याचे उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी सांगितले.

आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. त्यामध्ये कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि प्रशासन या स्तंभांची भूमिका महत्वाची आहे. कायदे बनविणे आणि विकासाची धोरणे आखणाऱ्या कायदेमंडळाची विशेष भूमिका आहे. अशावेळी तीनही महत्वाच्या स्तंभांमध्ये विचारांचे आदान-प्रदान आणि नियमित संवाद आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी तत्कालिन मंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेने नेमलेल्या इथिक्स कमिटी आणि त्यांनी सूचविलेल्या शिफारशींबाबतही सभागृहाला सांगितले. नागरिकांमध्ये विधिमंडळ अथवा संसद सदस्य म्हणून असलेली विश्वासार्हता कमी होता कामा नये आणि पदाची अप्रतिष्ठा होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज त्यात व्यक्त करण्यात आली होती. आजच्या काळातही ही बाब तितकीच लागू पडते, असेही उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी सांगितले.

विधिमंडळ अथवा संसदेत असलेल्या सदस्यांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की, यापुढे येणारी पिढी ही त्यांचे अनुकरण करणार आहे. ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे संसदीय प्रथा, परंपरा पाळल्या जायल्या हव्यात. येथील प्रतिनिधींना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. मात्र, हे करताना अध्यक्षीय पदाचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  येत्या काळात आपला देश विकसित म्हणून पुढे येत असताना राजकारण्यांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषद ही देशातील सर्वात प्रतिष्ठीत विधानपरिषद आहे. अनेक नामवंत लोकप्रतिनिधी या विधानपरिषदेने दिले. राज्याला प्रगतीशील बनवण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी या सभागृहाचे प्रतिनिधीत्व केले. या विधिमंडळात जनहिताच्या प्रश्नावर चर्चा होते. विविध समाजघटक यांच्याबद्दल येथे विचारविनिमय होतो. शेतकरी, महिला आणि युवकांच्या आशा-आकांक्षांचे हे प्रतिबिंब आहे. युवकांच्या समस्यांच्या बाबतीत अधिक संवेदनशील राहण्याची गरज आहे. या घटकांचा लोकशाहीवरील विश्वास बळकट होईल या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. विशेषत: महिला, पर्यावरण, तापमान वाढ, शेतकरी प्रश्नांना सर्वोच्च प्राथमिकता हवी. सर्व यंत्रणा गतिशील आणि उपक्रमशील व्हायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळाची गौरवशाली परंपरा आहे. राष्ट्राच्या विकासात मोठी भूमिका महाराष्ट्रातील नेत्यांनी निभावली आहे. अनेक नामवंतांनी येथे प्रतिनिधीत्व केले आहे. हा लोकशाहीचा समृद्ध स्तंभ आहे. अशा ठिकाणी संसदीय लोकशाहीसाठी उपराष्ट्रपती श्री. धनखड यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. त्यांच्या अनुभव, ज्ञान यांच्या जोरावर त्यांनी उपराष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा वाढवली असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात संसदीय लोकशाही रक्षणासाठी संपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले  तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रम – कार्यक्रमांची माहिती दिली.

०००

 

दीपक चव्हाण/विसंअ/

 

विधानसभा कामकाज

लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ११: छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.  लंडनहून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, असे सांगून ही वाघनखे महाराजांचीच असल्याचा पुनरुच्चार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला.

सदस्य रणधीर सावरकर यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर श्री. मुनगंटीवार यांनी निवेदन केले.

ते म्हणाले की, लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेल्या वाघनखांबाबत विविध पुरावे उपलब्ध आहेत. लंडनवरून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन येत्या १९ जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात येत असून, तेथे स्वागत करण्यात येणार आहे.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी पाठवली. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे वाघनखे दिली जाण्या पूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली, ज्यात ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केला असल्याचे त्या बातम्यात म्हटले होते. लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यासंदर्भात अनेक शिवभक्तांनी लंडनमधील संग्रहालय तसेच ब्रिटिश सरकारच्या संबंधित खात्यांशी पूर्वीपासून केलेला पत्रव्यवहार उपलब्ध असून त्याच आधारावर आम्ही पुन्हा लंडनमधील संबंधित संग्रहालय आणि ब्रिटिश पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याचे उत्तर देताना संबंधित संग्रहालयाने हे मान्य केले की ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरलेली आहेत, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, तरीही आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून महिती घेतली की जगात कुठे इतरत्र अशी वाघनखे आहेत का? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात किंवा बोलणी केली तेव्हाही या संग्रहालयाने कधीही ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे नाकारले नाही, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली. त्यानंतर संग्रहालयाने ही वाघनखे आधी एक वर्षाकरता देण्याचा प्रस्ताव दिला, आणि पुन्हा बोलणी केल्यानंतर ही वाघनखे तीन वर्षांकरता देण्याचे त्यांनी मान्य केले, असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

दि. १९ जुलैपासून साताऱ्यात वाघनखांचे प्रदर्शन

लंडनवरून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे येत्या दि. १९ जुलै पासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून जनतेला त्याचे दर्शन घेता येईल. या सोबतच या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रे प्रदर्शित करणाऱ्या एका शस्त्र दालनाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. या कार्यक्रमांसाठी सर्व विधिमंडळ सदस्य आणि सर्व शिवप्रेमी सादर निमंत्रित आहेत, असेही ते म्हणाले.

वाघनखे आणण्याकरता केलेला खर्च नगण्य, चुकीच्या माहितीवर जनतेने विश्वास ठेवू नये

वाघनखे आणण्याकरता एक नवीन पैशाचेही भाडे दिले जाणार नाही असे श्री. मुनगंटीवार म्हणले. यासंदर्भातील अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. ही वाघनखे आणण्याकरिता १४ लाख आठ हजार रुपयांचा खर्च करार करण्याकरता झाला आहे, अशी माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

त्याचबरोबर ही वाघनखे ठेवण्याकरता खर्च केला जात नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व शस्त्रांचे जे प्रदर्शन आपण चार ठिकाणी उभे करीत आहोत, त्या – त्या संग्रहालयांचे नूतनीकरण आणि डागडुजी याकरता ७ कोटी (अक्षरी सात कोटी) इतका खर्च झालेला आहे, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

शिवराज्याभिषेकाच्या संदर्भातील एक पुस्तिका लवकरच तयार करण्यात येईल, ज्यातून सर्व शंकांचे निरसन होईल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

ऑटोरिक्षा-टॅक्सी संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. ११ : ऑटो रिक्षा-टॅक्सी, विविध संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिवस ५०/- रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होते. या विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटनांकडून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. मोटार वाहन नियमामधील राज्य शासनास प्राप्त अधिकारांच्या आधारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंबास विलंब शुल्क आकारण्यात येते. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रति दिवस ५०/- रुपये विलंब शुल्क आकारण्यात येते. या कार्यवाहीस स्थगिती देण्यात येत आहे. या निर्णयामुळे ऑटो रिक्षा-टॅक्सी, विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

जळगाव जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून आर्थिक मदतीचे आश्वासन – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

नवी दिल्ली, दि. ११ : जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले असून, आता जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित होण्यास मदत होईल व लोकांना या प्रकल्पाचा लाभ होईल, असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे आज सांगितले.
राजधानीतील अंत्योदय भवन येथे केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या दोन योजनांबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. या सोबतच जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत केंद्रीय जल शक्ती मंत्री सी.आर पाटील, केंद्रीय राज्यमंत्री वी. सोमण्णा व सचिव विनी महाजन यांच्यासह केंद्र व राज्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील यांनी बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील निम्मतापी (पाडळसे धरण), गिरणा नदी आणि तापी खोरे पुनर्भरण अशा ३ सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे एकूण 19 हजार 344 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
निम्नतापी (पाडळसे धरण) या प्रकल्पाविषयी माहिती देताना, मंत्री श्री. पाटील यांनी सांगतिले की, या प्रकल्पातंर्गत ८०० कोटी रुपयांचे प्रकल्प काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४ हजार ५५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी केंद्रीय मंत्री यांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या प्रकल्पामुळे जळगावातील अमळनेर, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, रावेर आणि बोदवड तालुक्यातील एकूण 25,692 क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. तसेच, या प्रकल्पाला प्रधानमंत्री किसान सिंचन योजनातंर्गत समावेश करण्याची विनंती केल्याची माहिती दिली.
गिरणा नदीवरील सात गुब्बारा धरण प्रकल्पाचीही मंजुरी आणि निधी उपलब्धतेसाठी त्यांनी केंद्राकडे मागणी केल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे चाळीसगाव, भडगाव, पचोरा आणि जळगाव अशा चार तालुक्यांना सिंचनाचा लाभ मिळेल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ३ हजार ३०० कोटी रुपये असल्याची माहिती देत, त्यांनी, हा निधी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतंर्गत उपलब्ध करून देण्याबाबतच्या मागणीबद्दलची माहिती दिली.
यासोबतच, श्री. पाटील यांनी तापी खोरे पुनर्भरण योजनेसाठी केंद्र सरकारकडे निधी मंजूर करण्याची विनंती केल्याचे नमूद करत, त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांकडून राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. या योजनेसाठी एकूण रक्कम १९ हजार २४४ (60:40) कोटी रुपयांची केंद्रीय तरतूद (वर्ष 2022-23) करण्यात आली आहे. या रकमेपैकी, महाराष्ट्र राज्याचा वाटा रुपये 11 हजार 544 कोटी असून, या प्रकल्पाचा रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यातील भूजल पातळी वाढवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगतिले.
मंत्री श्री. पाटील यांनी या तीनही सिंचन प्रकल्पांमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांच्या उत्पादनात वाढ होईल. त्यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पांना त्वरित मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. या सर्व प्रकल्पांना कार्यान्वित होण्याकरिता केंद्र सरकारकडून सर्व आवश्यक मदत करण्याचे आश्वासन, केंद्रीय मंत्री श्री. पाटील यांनी दिले असल्याचे, पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
०००
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.85 /

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांची ‘दिलखुलास’ मध्ये १२ व १३ जुलै तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १२ जुलैला मुलाखत

मुंबई, दि. ११: तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील युवकांना चांगले करिअर घडविण्याची आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे डॉ. प्रमोद नाईक यांनीदिलखुलासआणिजय महाराष्ट्रकार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अलिकडच्या काळात कौशल्य विकास उपक्रमांवर विशेष भर दिला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच युवकांना चांगले करिअर आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया,अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर संचालक डॉ. नाईक यांनीदिलखुलासआणिजय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.
माहिती जनसंपर्क महासंचालनालय निर्मितदिलखुलासकार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 12 आणि शनिवार दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. तरजय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि. 12 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स– https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. ११ : मुंबई उपनगर जिल्ह्यात इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता १०० मुलींची क्षमता आणि १०० मुलांची क्षमता असलेले प्रत्येकी एक वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात १० हजार चौरस फूट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या म्हाडा, सिडको, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इमारत मालक, बांधकाम विकासक यांनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मुंबई उपनगर यांनी केले आहे.
खासगी इमारत मुंबई उपनगर परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट असावे. या इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह १० स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी पूर्णत्वाचा दाखला असावा.
इमारत भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार इमारत मालक देण्यास तयार असल्याबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील.
प्रत्येक वसतिगृहाकरिता स्वतंत्र दोन इमारती आवश्यक असतील. म्हाडा, सिडको, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इमारत मालक, बांधकाम विकासक यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, आर. सी. चेंबूरकर मार्ग, प्रशासकीय इमारत, था मजला, चेंबूर (पू.), मुंबई७१ या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी 02225222023 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
शैलजा पाटील/विसंअ/

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ११ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात सन २०२४-२५ या वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापक, शासकीय वसतिगृह, बोरिवली यांनी केले आहे.
या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...