गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 68

“झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. 25 जुलै  2025 (जिमाका वृत्तसेवा) : “आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु आणि पहिली सावली असते. झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे. झाडांमुळे मिळणारा प्राणवायू किती महत्त्वाचा आहे, हे आपण हॉस्पिटलमध्ये अनुभवतो,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.
ते ‘एक पेड माँ के नाम’ या राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक आणि भावनिक उपक्रमांतर्गत पाळधी (ता. धरणगाव) येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल म्हणाल्या की, “प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ही आपल्या सर्वांची गौरवाची बाब आहे.”


कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पर्यावरण रक्षण विषयक गीताने झाली. यानंतर शाळेच्या परिसरात फळझाडे व छायादायक वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक एन. के. देशमुख यांनी मानले.
या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी एन. एफ. चौधरी, गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, डॉ. भावना भोसले, सरपंच विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शालेय शिक्षण समिती यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले.

००००

गावाचा सर्वांगीण विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. 25 जुलै 2025 (जिमाका वृत्तसेवा) :“गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक प्रगती हेच ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचे आधारस्तंभ आहेत,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

तालुक्यातील जळके व विटनेर येथे आयोजित कार्यक्रमात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडले. जळके येथील वसंतवाडी गावाजवळ ₹६० लक्ष निधीतून बांधलेल्या लोकल नाल्यावर संरक्षक भिंतीचे, जिल्हा परिषद शाळेच्या ₹११.५० लक्ष निधीतून बांधलेल्या इमारतीचे, तसेच महादेव मंदिर परिसरात ₹१० लक्ष निधीतून साकारलेल्या पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण कामांचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर विटनेर येथील जिल्हा परिषद शाळेच्या ₹११.५० लक्ष निधीतून उभारल्या जाणाऱ्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.

या कार्यक्रमात कामगार महिलांना भांडी संच व शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “गावच्या मातीशी माझे भावनिक नाते आहे. गावात मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेसह दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, गरजेनुसार निधी कमी पडू दिला जाणार नाही. आज फक्त इमारतींचे नव्हे, तर नव्या आशा-स्वप्नांचे लोकार्पण होत आहे. महिलांना दिलेले भांडी संच त्यांच्या कष्टमय जीवनात थोडी मदत ठरेल आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्या शिक्षणासाठी प्रेरणा देतील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. के. पाटील यांनी तर प्रास्ताविक दूध संघाचे संचालक रमेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सरपंच स्नेहा साठे यांनी केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी उपसभापती साहेबराव वराडे, सरपंच स्नेहा साठे, माजी सरपंच नितीन जैन, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, उपसरपंच सोपान सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, विटनेर ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ जाधव, योगेश गुंजाळ, सुरेश गोलांडे, सागर परदेशी, राजू परदेशी, श्यामसिंग परदेशी, भूषण पाटील, सरपंच राजूभैय्या पाटील, उपसरपंच सुशीलाबाई पाटील, कवीश्वर पाटील, सागर दिवाणे, नारायण पाटील, सुभाषवाडी सरपंच राजाराम राठोड, लोणवाडी सरपंच बाळू धाडी, वराड उपसरपंच राजू जाधव, अर्जुन पाटील, सचिन पाटील, जितेंद्र पाटील, संदीप सुरळकर, रामकृष्ण काटोले, मागासवर्गीय सेना तालुका उपाध्यक्ष सुनील ब्राम्हणे, महिला तालुका अध्यक्षा अनिता चिमणकरे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 0 0 0

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण-२०२५ : सर्वांसाठी घराच्या दिशेने वाटचाल

राज्यातील सर्वांना घरे मिळावीत, पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळावी, झोपडपट्टीमुक्त राज्य व्हावे, शाश्वत आणि समावेशक शहरीकरण व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५ लागू केले आहे. सन २०३० पर्यंत सर्वांसाठी सुरक्षित, परवडणारे आणि समावेशक घर उपलब्ध करून देण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. राज्यातील विकासात पायाभूत सुविधांप्रमाणेच गृहनिर्माण क्षेत्राचा मोठा हातभार आहे. राज्याच्या गृहनिर्माण धोरणामुळे राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्राला गती मिळेलच त्याच प्रमाणे आर्थिक विकासाला चालना मिळेल.

अठरा वर्षांनंतर जाहीर झालेल्या या धोरणात विदाआधारित निर्णय प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गतिमानता व पारदर्शकता आणि सामाजिक समावेशकता यावर भर दिला आहे. या धोरणाच्या ‘माझं घर, माझा अधिकार’ या ब्रिदवाक्यातून सर्वांसाठी घरे या स्वप्नांची पूर्तता होण्याच्या दृष्टिने वाटचाल होईल. या धोरणामध्ये सामाजिक समावेशकता, शाश्वतता, परवडणारी घरे व पुननिर्माणशिलता या मूलभूत तत्वांचा विचार केला आहे.

असे आहे गृहनिर्माण धोरण 2025

प्रस्तावना, धोरणाची गरज व आवश्यकता –

महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि क्षेत्रफळानुसार तिसरे राज्य आहे, जे देशाच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात 13 टक्के योगदान देणारे एक अत्यंत गतिशील आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते. औद्योगिकीकरण, सेवा क्षेत्रातील प्रगती आणि पायाभूत सुविधा विकासामुळे सध्या राज्याचे शहरीकरणाचे प्रमाण 45 टक्के इतके असून, मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारखी प्रमुख शहरे शहरी विकासाच्या केंद्रस्थानी आहेत. राज्यात 29 महापालिका, 244 नगर परिषद आणि 147 नगर पंचायतींच्या माध्यमातून शहरी प्रशासन कार्यरत आहे.

“सर्वांसाठी घर” आणि “झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र” ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे नवीन गृहनिर्माण धोरण तयार करण्यात येत आहे. या धोरणात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

हे धोरण “माझं घर, माझा अधिकार” या मूलभूत मार्गदर्शक तत्त्वावर आधारित आहे, जे २०३० पर्यंत राज्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

२००७ नंतरच्या गृहनिर्माण धोरणातील महत्त्वाचे बदल, जसे की मुंबईसाठी लागू करण्यात आलेले विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियम (DCPR) आणि उर्वरित राज्यासाठी लागू करण्यात आलेले एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियम (UDCPR) यांचा विचार करण्यात आला आहे.

कोविड-१९ (COVID-19) महामारीच्या काळात मजुरांचे झालेले स्थलांतर, घरापासून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्याच्या समस्यांमुळे मजुरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घर उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.

बांधकाम खर्च कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि हवामान बदलामुळे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा गृहनिर्माण क्षेत्रात समावेश करणे आवश्यक झाले आहे.

गृहनिर्माण विभागाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा), शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित (SPPL) यांसारख्या विविध शासकीय संस्था, संघटना, विकासक आणि विषय तज्ञांशी सविस्तर चर्चा करून हे धोरण तयार केले आहे. धोरणाचा मसुदा २५ सप्टेंबर २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करून हरकती/सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि सुमारे १८०० हरकती/सूचनांचा विचार करून हे धोरण अंतिम करण्यात आले.

राज्याने या धोरणात स्वतःला ‘सुविधाकार, उत्प्रेरक, गृहशिल्पी (बिल्डर) आणि नियामक’ म्हणून स्थान दिले आहे.

धोरणाची उद्दिष्टे आणि तत्त्वे – या धोरणाचे उद्दिष्ट वस्तुनिष्ठ विदा (डेटा) आधारित निर्णय प्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत, परवडणारी, पर्यावरणपूरक आणि हवामान बदल सहनशील निवास व्यवस्था निर्माण करणे आहे.

अ. धोरणाची उद्दिष्टे

गृहनिर्माण सुलभता : २०३० पर्यंत सर्वांसाठी परवडणारी, पर्यावरणपूरक व आधुनिक घरे उपलब्ध करून देऊन गृहनिर्माण सुलभतेचा उद्देश साध्य करणे.

गृहनिर्माण गरज सर्वेक्षण व विश्लेषण : २०२६ पर्यंत राज्यभर, जिल्हा-निहाय गृहनिर्माण सर्वेक्षण करून पुराव्यावर आधारित नियोजन करणे.

आर्थिक वृद्धी व गतिमानता : गृहनिर्माण क्षेत्राचा आर्थिक वाढीस चालना देणारा घटक म्हणून विकास करणे, रोजगार निर्मिती व संबंधित उद्योगांना पाठबळ देणे.

पर्यावरणीय शाश्वतता : गृहनिर्माणासाठी पर्यावरणपूरक साहित्य व तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.

परवडणारी घरे : राज्यातील अतिदुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्या, शाश्वत, सुरक्षित घरांची निर्मिती करणे.

झोपडपट्टी पुनर्वसन : झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे व राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र साध्य करणे.

शहरी नियोजन व पायाभूत एकात्मिक सुविधांचा विकास : गृहनिर्माणास रस्ते, पाणी, मलनिःस्सारण इत्यादी आवश्यक पायाभूत सुविधांशी जोडून संघटित विकास साधणे.

‘वॉक टू वर्क’ संकल्पना: गृहनिर्माण व रोजगाराच्या संधी यांचा परस्परासंबंध प्रस्थापित करून प्रवासाचा वेळ कमी करणे.

नियमन व अंमलबजावणी: दर्जा, सुरक्षितता व परिणामकारक देखरेख सुनिश्चित करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रातील नियमन अद्ययावित करणे.

भाडे तत्त्वावरील गृहनिर्माण : प्रोत्साहन व सक्षम नियामक आराखड्याद्वारे राज्यात भाडे तत्त्वावरील घरांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करणे.

सर्वसमावेशक वाढ : ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार महिला व औद्योगिक कामगार यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा विचार करणे.

आधुनिक तंत्रज्ञान : टिकाऊ, किफायतशीर व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.

स्वशासकीय संस्था व विचारवंतांचा सहभाग : धोरण अधिक लोकाभिमुख व भविष्यवेधी बनवण्यासाठी स्वशासकीय संस्था व विचारवंतांचा सहभाग.

ब. धोरणाची तत्त्वे  – परवडणारी, सर्वसमावेशक, शाश्वत आणि पुनर्निर्माणशील ही या धोरणाची चार मुख्य तत्त्वे आहेत.

परवडण्याजोगे : परवडणाऱ्या दरात जमीन, चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) प्रोत्साहन, शुल्कात सवलत इत्यादींद्वारे घरांची उपलब्धता सुनिश्चित करणे.

आर्थिक सहाय्य व गृहनिर्माणासाठी वित्त पुरवठा करून स्वस्त किमतीत घरे उपलब्ध करणे.

बांधकाम स्वस्त असले तरी गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे किमान निकष पाळणे.

सर्वसमावेशक : आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी सामाजिक गृहनिर्माण व आर्थिक सहाय्य.

ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग रहिवाशांना सर्व गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुलभ प्रवेश सुनिश्चित करणे.

नोकरदार महिला आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, परवडणाऱ्या आणि दर्जेदार घरांची उपलब्धता सुनिश्चित करणे.

शाश्वत : गृहनिर्माण बांधकामादरम्यान पर्यावरणपूरक आणि टिकाऊ पद्धतींचा वापर सुनिश्चित करणे (“कमी वापर, पुनर्वापर व पुनर्निमाणशील” – Reduce, Reuse, Recycle).

ऊर्जा कार्यक्षमता, नूतनीकरणक्षम ऊर्जा एकत्रीकरण, जलसंधारण, शाश्वत व पुनर्प्रक्रिया केलेल्या सामग्रीचा वापर, कार्यक्षम जागेचे नियोजन यास प्रोत्साहन.

हरित इमारत मानकांचा समावेश करणे आणि हरित इमारत प्रमाणपत्रांसाठी प्रोत्साहन देणे.

पुनर्निर्माणशील : हवामान बदल विचारात घेऊन, पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणारे, आपत्तींमुळे होणारी हानी मर्यादित करणारे आणि आपत्तीनंतर पुनर्निर्माण सुलभ करणारे गृहनिर्माण आवश्यक आहे.

यात जमिनीचा सक्षम वापर, पर्यावरणपूरक इमारतींचे नियोजन, टिकाऊ बांधकाम साहित्य, पूररोधक व पूरनियंत्रण नियोजन, उष्मारोधक बांधकाम साहित्य, तंत्र व तंत्रज्ञान यांचा समावेश होतो.

३. धोरणात्मक उपाय धोरणात्मक उपायांमध्ये अनेक पैलूंचा समावेश आहे:

अ. डेटा-आधारित निर्णय

गृहनिर्माण गरज व मागणी सर्वेक्षण: राज्य सरकार संपूर्ण राज्यभर गृहनिर्माण गरजेचे मूल्यांकन करण्यासाठी व्यापक सर्वेक्षण राबवणार आहे, जे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे प्रत्येक जिल्हा-निहाय गृहनिर्माण गरज समजून घेण्यास मदत होईल.

राज्यस्तरीय गृहनिर्माण माहिती पोर्टलची निर्मिती (SHIP): गृहनिर्माण क्षेत्रासाठी डेटा-आधारित धोरण आणि निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठी “राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल (SHIP)” विकसित करणे प्रस्तावित आहे. यात मागणी आणि पुरवठा दोन्ही बाजूंनी डेटा संकलित करून विश्लेषण केले जाईल. हे पोर्टल जिल्हास्तरीय भूमी निधी कोष (Land Bank) आणि विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देईल, ज्यामुळे पारदर्शकता आणि गतिशीलता वाढेल.

निवासी वापरासाठी योग्य शासकीय जमिनींची भूमी निधी कोष आधारसामग्री तयार करणे: सार्वजनिक प्राधिकरणांद्वारे गृहनिर्माण करताना उपलब्ध शासकीय/निमशासकीय प्राधिकरणांच्या जमिनींची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध झाल्यास गृहनिर्माण योजनांचे नियोजन सुलभ होते. यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण करून भूमी निधी कोष तयार करण्याचे उद्दिष्ट ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करायचे आहे.

ब. परवडणाऱ्या गृहनिर्माण साठ्याची निर्मिती – राज्याने 2030 पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी ३५ लाख घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यासाठी ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. पुढील १० वर्षांत ५० लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

नवीन गृहनिर्माण (Green Field Development):

सर्वसमावेशक गृहनिर्माण (Inclusive Housing) : १० लाख व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महापालिका हद्दीतील ४००० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्राच्या भूखंडावरील प्रकल्पांमध्ये किमान 20% बांधकाम क्षेत्र म्हाडाकडे वितरण करणे अनिवार्य आहे. शासनाने सर्वसमावेशक गृहनिर्माणांतर्गत किमान 5 लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.

औद्योगिक कामगारांसाठी गृहनिर्माण: कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ सुरक्षित, परवडणारी घरे उपलब्ध होणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रवासाचा खर्च वाचेल आणि उत्पन्नात वाढ होईल. “वॉक टू वर्क” संकल्पनेनुसार, एमआयडीसी (MIDC) क्षेत्रात १०% ते ३०% जमीन गृहनिर्माणासाठी राखीव ठेवण्यात यावी.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण: सन 2036 पर्यंत महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या १७% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ज्येष्ठ नागरिक गृहनिर्माणाला इमारतीच्या वापरासाठी एक स्वतंत्र प्रवर्ग म्हणून ओळखले जाईल. या प्रकल्पांसाठी विविध प्रोत्साहन दिले जातील.

विद्यार्थ्यांसाठी गृहनिर्माण: शहरांमध्ये स्थलांतरित विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेली सर्व गृहनिर्माण मालमत्ता केवळ भाडे करारावरच वितरित केली जाईल. विद्यापीठाजवळच्या जागेत विद्यार्थी गृहनिर्माणासाठी क्षेत्र निश्चित केले जाईल.

नोकरदार महिलांसाठी गृहनिर्माण: महाराष्ट्रातील महिला कामगार वर्गाचा सहभाग 31% आहे. नोकरदार महिलांसाठी विकसित केलेली सर्व गृहनिर्माण मालमत्ता केवळ भाडे करारावरच वितरित केली जाईल. प्रमुख नोकरी केंद्रांपासून ५ किलोमीटर अंतरावर ही गृहनिर्माण केंद्रे असतील.

एकात्मिक वसाहतींमध्ये परवडण्याजोगी गृहनिर्माण (Integrated Township Policy): ४० हेक्टर (100 एकर) किंवा त्याहून अधिक क्षेत्रावर एकात्मिक वसाहत प्रकल्प (ITP) राबवण्यास परवानगी आहे, ज्यात किमान १५% मूळ निवासी चटई क्षेत्र निर्देशांक सामाजिक गृहनिर्माणासाठी राखीव असेल.

प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी गृहनिर्माण (PAP Housing): प्रकल्पबाधित लोकांसाठी पर्यायी घर, निश्चित भरपाई आणि उपजीविकेसाठी सहाय्य प्रदान करण्याची तरतूद सुनिश्चित केली जाते. मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अंदाजे 50,000 प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी घरांची आवश्यकता आहे. तसेच मुंबई विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी 2,20,000 घरांची गरज असल्याचे टास्कफोर्सच्या निर्दशनास आले आहे.

मध्यम उत्पन्न गटांसाठी परवडण्याजोगी गृहनिर्माण (MIG Housing): शासनाने मध्यम उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी बाजारपेठांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे. यात निवास खरेदीसाठी व्याज सवलत, अधिमूल्य व विकास शुल्क विकासक हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मुभा या उपाययोजनांचा समावेश.

शासकीय कर्मचारी आणि विशेष प्रवर्गासाठी गृहनिर्माण योजना : शासकीय कर्मचारी आणि विशेष प्रवर्गातील (माजी सैनिक, स्वातंत्र्यसेनानी, दिव्यांग व्यक्ती, कलाकार, पत्रकार इ.) घटकांसाठी विशेष गृहनिर्माण योजना राबवण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच मुंबईसारख्या शहरांमध्ये आरोग्य सेवेसाठी प्रमुख रुग्णालयांजवळ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भाडेतत्वावर गृहनिर्माण करणे तसेच नवीन प्रस्तावित विमानतळांजवळ कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबविणे प्रस्तावित आहे.

परवडण्याजोगी भाडे तत्त्वावरील गृहनिर्माण: परवडणाऱ्या भाड्याच्या घरांच्या गरजेसाठी धोरणात्मक उपाययोजना प्रस्तावित आहेत, ज्यात खाजगी विकासकांना करात सूट, सबसिडी आणि नियमांमध्ये शिथिलता यांचा समावेश आहे.

पुनर्विकास (Brown Field Development):

स्वयं-पुनर्विकास (Self-Redevelopment): जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या गृहनिर्माण संस्थांना स्वयं-पुनर्विकासासाठी प्रोत्साहन दिले जाते. पात्र प्रकल्पांना अतिरिक्त १०% चटई क्षेत्र निर्देशांक मिळेल. तसेच 9 मीटरपेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यालगतच्या भूखंडासाठी 0.4 टक्के चटईक्षेत्र मोफत देण्यात येईल, यासह इतर सवलती, प्रोत्साहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी स्वयं-पुनर्विकास कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. यामार्फत सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यात येईल.

समूह पुनर्विकास (Cluster Redevelopment): शहरीकरणाच्या प्रक्रियेत एकल इमारतींचा पुनर्विकास न करता समूह पुनर्विकास केल्यास नागरी पुनरुत्थानाची प्रक्रिया अधिक समाजाभिमुख होते.

जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास – याअंतर्गत एमएमआर साठी तयार करण्यात येणाऱ्या आर्थिक मास्टर प्लॅन अंतर्गत 10 लाख परवडणाऱ्या घरकुलांची निर्मिती करणे आणि त्यासाठी पुनर्विकासाला प्रोत्साहण देण्यात येणार आहे.तसेच म्हाडाच्या वसाहती, जुन्या भाड्याने दिलेल्या इमारती तसेच उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन व पुनर्विकास (Slum Rehabilitation & Redevelopment): या अंतर्गत मोठ्या खासगी जमिनीच्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामुळे झोपडपट्टी रहिवाशांची संमती आवश्यक नाही, विकासकाकडे योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध राहिल तसेच मोठ्या क्षेत्रामुळे झोपडपट्टी रहिवाशांसाठी पर्यायी संक्रमण शिबिरांची तरतूद होईल.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये नवीन झोपडपट्ट्या निर्माण होऊ नयेत, यासाठी गृहनिर्माण विभागात विशेष अंमलबजावणी विभाग स्थापन करण्यात येणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील खाजगी जमीन मालकांना 25 टक्के नुकसान भरपाई प्रदान करण्याचे प्रस्तावित आहे.

विविध कारणांमुळे ठप्प पडलेल्या सार्वजनिक जमिनींवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंबंधित विकासक म्हणून झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणास प्रस्तावित करण्यात आले आहे.

एका प्रभागातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक झोपडपट्ट्या असल्यास त्या समूह म्हणून पुनर्विकसित करता येतील. याशिवाय इतर अनेक सुविधा झोपडपट्टी पुनर्विकासासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

क. हरित इमारत उपक्रम आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान

नावीन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञान: नवीन, नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे बांधकाम खर्च कमी होईल आणि गुणवत्ता सुधारेल. तसेच हरित पद्धती स्विकारणाऱ्या क्लस्टर प्रकल्पांना तंत्रज्ञान नवोपक्रम अनुदान प्रदान करणे, पुरस्कार देणे, नवीन बांधकाम सामग्री आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश निविदा प्रक्रियेत करणे आदींची शिफारस करण्यात आली आहे.

हरित (पर्यावरण पूरक) इमारत उपक्रम: इमारती पर्यावरणदृष्ट्या टिकाऊ आणि ऊर्जा कार्यक्षम बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पारिस्थितीकीय (इको) निवास संहितेचा स्वीकार करणे, प्रकाशविद्युत चालक सौरपट्ट बसविणे, टिकाऊ/शाश्वत साधनसामग्रीचा वापर करणे, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरणे, वृक्षारोपण करणे, उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी उपाययोजना करणे, हरित इमारतींचे प्रचालन आणि परिक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी उद्दिष्टे प्रस्तावित आहे.

हरित इमारतींच्या विकासकांना 3 टक्के, 5 टक्के आणि 7 टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र अनुज्ञेय आहे.

ड. इतर धोरणात्मक उपाय

गृहनिर्माण व बांधकामासाठी वित्तपुरवठा धोरण (महाआवास फंड) : परवडणाऱ्या व सर्वसमावेशक गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक सुरू करण्यासाठी, राज्य शासनाने ₹20,000 कोटी रुपयांच्या संभाव्य खर्चासाठी आवश्यक असलेल्या व्यवहारी तूट भरपाई अनुदानाचा (Viability Gap Funding) मोठा हिस्सा ‘परवडणारे गृहनिर्माण निधी’द्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे.

व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business): बांधकाम प्रकल्पांसाठी बांधकाम परवानग्या, पर्यावरण मंजुरी व भोगवटा प्रमाणपत्र यांसह प्रभावी संगणकीकृत प्रक्रिया तसेच एक खिडकी निपटारा प्रणाली लागू करण्यात येईल. विविध अधिमूल्य भरण्याच्या तरतुदीमध्ये समानता सुनिश्चित करणे, प्रकल्प मंजुरीमध्ये सुस्पष्टता, पारदर्शक भूसंपादन प्रक्रिया, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा,गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा देणे, आदी उपाय सुचविण्यात आले आहेत.

स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (RERA): महारेराच्या सक्षमीकरणासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग, प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करणे, तक्रार निवारणासाठी पुरेसी खंडपीठ व सदस्य संख्या असावी यासाठी उपाययोजना करण्यात प्रस्तावित आहे.

शहर नियोजन सुधारणा : याअंतर्गत डिजिटल हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्र वाटप यंत्रणेसाठी ऑनलाईन बँक पोर्टल/अप्लिकेशन तयार करणे, दर्जेदार विरंगुळा स्थळांची निर्मिती करणे, संक्रमणाभिमुख विकास क्षेत्रांमध्ये परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठई उत्तेजन देणे, उपवर्ती/उपनगरीय शहरे विकसित करणे, आदी उपाययोजना व सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत.

याशिवाय ऑनलाईन  सुधारणांमध्ये सहभागी नियोजन, सुलभ नियामक प्रक्रिया आणि कार्यक्षम प्रशासन व प्रतिसादक्षम शहरी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश यावर भर दिला आहे.

परवडणाऱ्या गृहनिर्माणात कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (CSR) सुकर करण्यासाठी धोरणात सुधारणा करणे: परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रात कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व योगदान सुलभ करण्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

क्षमता निर्मिती व कौशल्य विकास : बांधकाम कामगारांच्या क्षमता वाढीसाठी नवीन कौशल्य विकास केंद्रे उभारणे, विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्ययावतीकरण करणे, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत भागीदारीतून उपक्रम हाती घेणे, सार्वजनिक प्राधिकरणांची क्षमता वाढविणे, खासगी क्षेत्रांना कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यासाठी सहभागी करणे आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहे. तसेच धोरणात्मक चौकट अधिक बळकट, समावेश व विस्तृत करण्यासाठी नॉलेज पार्टनरची नियुक्ती तसेच बांधकाम तंत्रज्ञान अनुसंधान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.

बांधकामाच्या जागांवरील अपघातांची जबाबदारी: बांधकामाच्या जागेवरील कोणत्याही अपघाताची जबाबदारी सुरक्षा व्यवस्थापक व कंत्राटदारापेक्षा विकासकाची आहे. यासंदर्भात अधिनियमात अनुरूप बदल करणे प्रस्तावित आहे.

गुणवत्ता नियंत्रण – प्रकल्पांच्या बांधकामात गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

पुनर्विकासाकरिता तक्रार निवारण समिती: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर पुनर्विकासाकरिता राज्यस्तरीय सर्वोच्च तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे.

या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राहणीमान सुधारणार आहे, तसेच राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासातही महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे, जिथे प्रत्येक नागरिकाला योग्य घराची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता मिळेल.

०००००

नंदकुमार बलभीम वाघमारे

सहाय्यक संचालक (माहिती),

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वारसाला नोकरी देण्यासाठी कार्यपद्धती तयार करा – उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

मुंबई, दि. २५ : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत, अत्याचार प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या पदावर प्राधान्याने नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती सामाजिक न्याय विभागाने तयार करावी, असे निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या वारसाला नोकरी देण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रवींद्र गोरवे, मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, अवर सचिव सतीश खैरमोडे, विभागातील संगीता शिंदे, किशोर बडगुजर, गणेश भदाने, संजय कोठे, शिवानंद भिनगीरे यांच्यासह सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष श्री. मेश्राम म्हणाले, या प्रक्रियेसाठी प्रादेशिक उपआयुक्त कार्यालयाने जिल्हानिहाय वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील रिक्त पदांची यादी सर्व प्रादेशिक उपायुक्तांनी संकलित करून ती समाज कल्याण आयुक्तालयाकडे १५ दिवसात सादर करावी. काही जिल्ह्यात वारसांना नोकरी देण्यात आली आहे ती कोणत्या आधारावर दिली आहे त्याप्रमाणे इतर जिल्ह्यात याबाबत का कार्यवाही करण्यात आली नाही याबाबतचा अहवाल मागवावा. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत बैठक घेण्यात यावी. इतर राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी कशी करण्यात आली किंवा नेमके काय दिशानिर्देश आहेत त्याची तुलनात्मक व अभ्यासपूर्ण माहिती घ्यावी व ती पुढील बैठकीत सादर करावी, तसेच पुढील बैठकीस संपूर्ण तपशीलवार माहिती, अहवाल अभिप्रायासह महिनाभरात घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करावे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई दि.२५ : विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता या बाबी महत्त्वाच्या असल्याने राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने राज्यातील शाळा इमारत सुरक्षितेसाठी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी तातडीने बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, समग्रचे प्रकल्प संचालक संजय यादव, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि  राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व शिक्षणाधिकारी सहभागी झाले होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिक क्षेत्रातील शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही करावे. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींची तपासणी करून त्यांची बांधकामे नव्याने करण्यासाठी सर्व्हे करून सर्व समावेशक आराखडा तयार करावा. तसेच धोकादायक शाळा इमारतींच्या बांधकामासाठी प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २५ : मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्यखाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत श्री.राणे बोलत होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, सध्याच्या स्थितीत मत्स्यखाद्य मुख्यतः राज्याबाहेरून आयात करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी व गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने विविध प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन केंद्र, पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प, बायोफ्लॉक, रास पद्धती व संगोपन तलाव आदींचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण मत्स्यखाद्याची आवश्यकता आहे. राज्यातील सर्व अनुदानित मत्स्य प्रकल्पांनी केवळ राज्यातील केंद्र पुरस्कृत, राज्य शासनाच्या पथदर्शी, अनुदानित व नोंदणीकृत मत्स्यखाद्य उत्पादकांकडूनच मत्स्यखाद्य खरेदी करणे बंधनकारक राहील, असे मंत्री श्री.राणे म्हणाले.

या सूचनानुसार मत्स्यखाद्य भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (ISI / BIS / FSSAI ) प्रमाणित असणे गरजेचे आहेत. त्यावर प्रथिने, स्निग्ध, आर्द्रता, कर्बोदके इत्यादी पोषणमूल्यांचे विश्लेषण व उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख पॅकिंगवर स्पष्टपणे नमूद असावी. पुरवठ्याच्या वेळी अधिकृत पावती किंवा करबिल (Tax Invoice) देणे अनिवार्य आहे. मत्स्यखाद्य हवाबंद आणि सुरक्षित पॅकिंगमध्ये असणे गरजेचे असून कोरड्या व स्वच्छ वाहतूक साधनातून पुरवले जावे. पुरवठाधारकाची GST नोंदणी आवश्यक आहे. मत्स्यखाद्य खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे.

शाश्वत व पर्यावरणपूरक मत्स्य खाद्य उत्पादनास प्रोत्साहन देताना या अनुषंगाने गुणवत्तेबाबत शेतकरी व मच्छीमारांच्या तक्रारी आल्यास तात्काळ दखल घेतली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

00000

किरण वाघ/विसंअ/

 

राज्यात सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट 

मुंबई दि. २५ : राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि.२५ जुलै २०२५  सायंकाळी  ५.३९  ते दि. २७ जुलै २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ४.१ ते ४.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत  लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडली असून नागरीकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. पवना धरण ८२.२१% भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे पवना धरणातून १६०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाऊ शकते त्या अनुषंगाने नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा  धरणातुन विसर्ग सुरू

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातुन अनुक्रमे ४४८८.२५, २०१२.६७ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

0000

एकनाथ पोवार/विसंअ/

लोकाभिमुख शासनाच्या भूमिकेत महसूल अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 25 : शासनाचे काम गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यासाठी तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी जनसंवाद, लोकशाही दिन, लोकअदालत आदी माध्यमातून आणि विशेष शिबिरे आयोजित करुन नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री श्री. बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत 30 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करुन लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. घरकुलांना वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी 30 एप्रिल रोजीच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. भूमि अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन घ्यावा. पाणंद, शिवपाणंद रस्ते 12 फुटांचे करुन त्यांना क्रमांक द्यावेत तसेच दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्यांसाठी लोकअदालतीसारखे उपक्रम राबवून सर्व सुनावण्या येत्या तीन महिन्यात पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

जिवंत सातबाराअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, तुकडेबंदी, शेतरस्ता, भोगवटादार 2 मधून 1 मध्ये करण्याची तसेच आकारी पड जमिनीची प्रकरणे, स्वामित्व योजनेचा लाभ देणे आदी कामे विषयानुसार शिबिरांचे आयोजन करुन कालबद्धरितीने मार्गी लावावीत, असे निर्देश महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गौण खनिजांचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करावे असे सांगून ज्यांनी अवैध उत्खनन केले असेल त्यांच्याविरोधात महसूल आणि पोलीस विभागामार्फत कारवाई करण्याचे आदेश मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा यादृष्टीने ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सुरू असलेल्या विविध कामांचा अहवाल सादर केला.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

विमा संस्थांनी जनजागृती, विश्वासार्ह सेवांवर भर द्यावा – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

मुंबई, दि. २५ : विमा हा केवळ आर्थिक उत्पादन नसून तो सामाजिक सुरक्षा, जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यावश्यक साधन आहे. भारतीय विमा ब्रोकर संघटनेसारख्या संस्थांनी नागरिकांना केवळ विमा पॉलिसीची विक्री न करता जनजागृती, सुलभ माहिती आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

कफ परेड येथे भारतीय विमा ब्रोकर संघटनेच्या (आयबीएआय) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. भारतीय विमा ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवाल, राज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्ती, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलू, आयबीएआयचे उपाध्यक्ष मोहन एस, सचिव निर्मल बजाज आदींसह शासकीय व नियामक संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, विमा व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने हा आनंदाचा क्षण आहे. विमा दलाल (ब्रोकर) हे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील दुवा आहेत. ते ग्राहक केंद्रित आणि उपयोगी उपाय सूचवितात. भारत देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, त्यामध्ये कॉर्पोरेट विमा सेवांचे महत्व अधोरेखित होते. ते सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विमा उद्योगातील विस्ताराशीही संबंधित आहेत. हे सर्व राष्ट्रीय प्राधान्याचे विषय असून सुरक्षिततेची व्याप्ती आणि परस्पर सहकार्य विमा क्षेत्रातही महत्वाचे आहे. भारत क्षमतेचा विकास, ज्ञानाचे वाटप, आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार यामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. विम्याचे भविष्य डेटा उपक्रमांमध्ये, ग्राहकांच्या सूचीबद्धतेमध्ये असल्याने आयबीएआयने यामध्येही सहभागी होवून भविष्यातील अर्थव्यवस्थेचे प्रेरणास्थान बनावे,असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

विद्यापीठ स्तरावर विमा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पुढाकार

युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राज्यातील विद्यापीठात आयबीएआयसोबत संयुक्तपणे विमा शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा मानस राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

यावेळी आयबीएआयच्या २५ वर्षांतील स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, लोगोचे अनावरण झाले. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलू यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्ष श्री. भरिंदवाल यांनी प्रास्ताविक केले तर आभार निर्मल बजाज यांनी मानले.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं/

 

 

 

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशासन : सुशासनाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल

हाई ‘एआय’ बठ्ठ काम करय माय!

काळानुरूप समाज, राज्य आणि शासन व्यवस्थेतील आवश्यकतेनुसार तंत्रज्ञानाची भूमिका केवळ पूरक राहिली नाही, तर ती परिवर्तनाची सूत्रधार बनली आहे. एकेकाळी शासन म्हणजे फाईलींच्या ढिगाऱ्यात हरवलेली प्रक्रिया, कार्यालयांतील रांगा, संथ हालचाल आणि गुंतागुंतीचे नियम असा सर्वसामान्यांचा अनुभव होता. परंतु आता हा अनुभव झपाट्याने बदलतो आहे. तंत्रज्ञानातील विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence-AI) वापरामुळे शासनाच्या कार्यपद्धतीला एक नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकीय प्रणालीची अशी क्षमता जी मानवी बुद्धिप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते, अनुभवाच्या आधारे निर्णय घेऊ शकते आणि त्यावरून भविष्यातील उपाययोजना आखू शकते. ही प्रणाली शासन-प्रशासनासाठी एक अशी क्रांतिकारी संधी ठरते आहे, जी वेग, अचूकता आणि पारदर्शकतेच्या त्रिसूत्रावर आधारित प्रशासन शक्य करते.

प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता का गरजेची आहे?

भारतातील लोकसंख्येची वाढ, नागरीकरणाचा वेग, तांत्रिक साक्षरतेत आलेली प्रगती आणि जनतेच्या वाढत्या अपेक्षा या सर्वांमुळे शासनाच्या पारंपरिक कार्यपद्धतीवर ताण निर्माण झाला. शासनाकडे असंख्य अर्ज, समस्या, योजना, लाभार्थ्यांची माहिती, आर्थिक व्यवहार, सामाजिक अभिलेख इत्यादींचे दैनंदिन व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते. हे सर्व पारंपरिक पद्धतीने करणे केवळ वेळखाऊ नव्हे तर त्रुटींचं प्रमाणही वाढवणारे ठरतं. त्यामुळेच डेटा आधारित, शहाणपणाने शिकणारी आणि गतीने काम करणारी प्रणाली म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनात अनिवार्य झाली आहे.

भारत व महाराष्ट्रातील महत्त्वाचे उपक्रम

भारत सरकारने ‘इंडिया एआय’ या धोरणात्मक आराखड्याच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, शेती, महिला सुरक्षा, न्यायव्यवस्था आणि पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. पीएम-किसान PM-Kisan, फास्टॅग Fastag, आरोग्य सेतू Aarogya Setu, ई-कोर्ट्स, SUPACE, आणि पीएम गती-शक्ती अशा राष्ट्रीय योजना आणि प्रणाली एआय च्या साहाय्याने चालवल्या जात आहेत.

“एआय फॉर ऑल (AI for All)” उपक्रमातून भारतात एआय साक्षरतेवर विशेष भर दिला जात आहे. “एआय फॉर युथ” योजनेद्वारे विद्यार्थ्यांना एआय विषयी शिकवले जात आहे. न्यायप्रणालीमध्ये ‘सुपेस’ पोर्टलमुळे सर्वोच्च न्यायालयीन प्रकरणांमधील माहितीचे संक्षेप, मुद्दे, पुरावे यांचं वेगवान विश्लेषण सहज शक्य होत आहे.

महाराष्ट्रात महसूल खात्याच्या “माझी जमीन माझा अधिकार” उपक्रमांतर्गत ड्रोन व एआय च्या साहाय्याने जमिनीच्या मोजणीपासून ते डिजिटल प्रमाणपत्रांपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह बनली आहे. गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया यांसारख्या दुर्गम भागांतही हे काम प्रभावीपणे सुरू आहे.

मुंबई पोलिस विभागात क्राईम-मॅपिंग Crime Mapping व फेशियल रेकगनाईजेशन Facial Recognition प्रणाली वापरून गुन्ह्यांचा संभाव्य ठिकाणी पूर्वानुमान लावून बंदोबस्त वाढवला जात आहे. पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन व पाणीपुरवठा व्यवस्थापनात एआय चा वापर प्रभावीपणे केला जात आहे. शिक्षण विभागात दिक्षा, मित्रा (DIKSHA, MITRA) प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण, शिक्षक प्रशिक्षण व शिक्षण सुधारणा केली जात आहे. आरोग्य सेवा डिजिटल हेल्थ कार्ड्स, एआय डॉक्टर असिस्टंट (AI Doctor Assistant) प्रणाली आणि  आरोग्य सेतू (Aarogya Setu) अ‍ॅपच्या माध्यमातून अधिक सक्षम बनली आहे.

कृषीआरोग्यशिक्षणन्याय आणि महसूल यंत्रणांतील प्रभाव

‘एआय’च्या साहाय्याने कृषी क्षेत्रात हवामान माहिती संकलन व विश्लेषण प्रणाली वाईंड्स (WINDS) तयार करण्यात आली असून, ती शेतकऱ्यांना पेरणीचा योग्य काळ, हवामानाचा अंदाज, कीटक प्रकोप याबाबत अचूक सल्ला देते.

आरोग्य क्षेत्रात ‘एआय’चा वापर रुग्णालयांतील निदान, वैद्यकीय इमेजिंग, औषध योजना आणि संभाव्य साथींच्या प्रसाराचा अंदाज लावण्यासाठी केला जात आहे. जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून एआय आधारित सल्ला दिला जात आहे.

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार अभ्यासक्रम आखणे, त्यांच्या अडचणींचा मागोवा घेणे आणि पालक-शिक्षक संवादाला डेटा-आधारित दिशा देणे या बाबतीत एआय कार्यरत आहे.

न्याय विभागात केसेस ट्रॅकिंग, तारखांचे व्यवस्थापन आणि निर्णय सहाय्य अशा बाबतींत एआय प्रभावी ठरतो आहे. ई-कोर्ट (e-Courts) प्रणाली न्यायाधीश व वकिलांना कामकाजात वेग आणि अचूकता देते.

महसूल यंत्रणेत भू-नकाशे, सीमेचे निर्धारण, मालकीची पडताळणी हे काम ड्रोन व एआय च्या मदतीने जलद आणि वादरहित पद्धतीने पूर्ण होत आहे.

चित्रकलाप्रेझेंटेशनबांधकामरस्तेविकास आणि दुर्गम भागांतील क्रांती

एआय चा वापर सृजनशील क्षेत्रांमध्येही होत आहे. माहिती व जनसंपर्क विभागातील पोस्टर, जनजागृती बॅनर, व्हिडिओ ग्राफिक्स, लोकशाही प्रचार मोहीम, निवडणुका व कोविडसारख्या आपत्कालीन कालखंडांमध्ये एआय आधारित सृजनशीलतेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

बांधकाम क्षेत्रात भूगर्भीय तपशील, हवामान आकडे, पर्यावरणीय विश्लेषण आणि वाहतुकीची डेटा आधारित माहिती वापरून एआय सुरक्षित इमारत डिझाईन, थ्रीडी मॉडेलिंग व रचना सल्ला देते. सेन्सर-आधारित गुणवत्ता तपासणीमुळे काम वेळेत पूर्ण होते.

प्रेझेंटेशन आणि सादरीकरण यामध्ये अधिकारी सध्या एआय आधारित डॅशबोर्ड वापरतात. या डॅशबोर्डमधून विभागीय खर्च, लाभार्थी संख्येचे विश्लेषण, कार्यक्षमतेचे निदर्शन आणि धोरणात्मक कमतरतांची नोंद घेतली जाते.

रस्तेविकासात उपग्रह प्रतिमा, ड्रोन मोजणी, हवामान डेटा, पावसाळी धोके आणि वाहतुकीचा दाब यांचा एआय एकत्रित अभ्यास करून रस्त्यांच्या डिझाईन, मजबुतीकरण आणि देखभाल आराखडे तयार करतो.

दुर्गम भागांमध्ये एआय आधारित ऑफलाइन साधने वापरून आरोग्य तपासणी, शैक्षणिक व्हिडिओ, भाषांतर सेवा आणि सौर उर्जेच्या व्यवस्थापनासारख्या मूलभूत सुविधा पोहोचल्या आहेत. वनरक्षण, जलस्त्रोत व्यवस्थापन, आपत्तीची सूचना/ संकेत/ अलकाचे या ठिकाणीही एआय चे योगदान मोठे आहे.

फायदे आणि जबाबदाऱ्या

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनाला गतिमान करते. ही प्रणाली मोठ्या प्रमाणात माहितीचा वेगाने अभ्यास करते, त्रुटी ओळखते, धोरण आखते, आणि पुनरावृत्ती न करता निर्णय घेते. यामुळे शासन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि पारदर्शक बनते.

तथापि, ही यंत्रणा वापरताना डेटा गोपनीयता, नैतिकता आणि मानवी मूल्यांचा विचार गरजेचा असतो. नागरिकांच्या माहितीचा गैरवापर, पूर्वग्रह असलेली प्रणाली, सामाजिक भानाचा अभाव यामुळे एआय चा निर्णयही चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे एआय ही एक सहाय्यक प्रणाली असली, तरी अंतिम निर्णय मानवी विवेकावर आधारित असायला हवा.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही आज प्रशासनाचा अविभाज्य भाग बनली आहे. भारत सरकार  आणि महाराष्ट्र शासनाने तिचा उपयोग प्रभावीपणे करून दाखवला आहे. महसूल, कृषी, आरोग्य, पोलीस, शिक्षण, बांधकाम, माहिती विभाग, आणि दुर्गम भागांमध्ये ती क्रांती घडवत आहे.

एआय प्रशासनाला केवळ गती देते असे नाही, ती प्रशासनाला भविष्याकडे पाहण्याची दृष्टी देते. सुशासनाची व्याख्या बदलून आता प्रशासन डेटा-सक्षम, अचूक, गतिमान आणि जनतेच्या गरजेनुसार झपाट्याने बदलणारं यंत्र बनत आहे. या दृष्टीकोनातून पाहिलं, तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही तांत्रिक क्रांती नसून जनहिताची नैतिक जबाबदारी बनते. कारण शेवटी शासनाची खरी ताकद ही त्याच्या लोकांमध्ये असते आणि त्या लोकांपर्यंत न्याय, सेवा आणि विश्वास अचूकपणे पोहोचवण्याचं सामर्थ्य आता एआय कडे आहे. थोडक्यात आमच्या बोली भाषेत सांगायचं झालं तर हाई एआय बठ्ठ काम करत माय !

शासनातील एआय आधारित महत्त्वाचे प्रयोग

  •  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM-Kisan) एआयद्वारे लाभार्थी तपासणी व स्क्रूटनी
  •  फास्टॅग (FASTag) टोल वसुलीसाठी वाहन ओळख व ट्रॅफिक विश्लेषण
  •  आरोग्य सेतू (Aarogya Setu) कोविड संदर्भात संपर्क ट्रेसिंग व धोका विश्लेषण
  •  ई-कोर्ट्स (e-Courts)  न्यायालयीन वेळबचतीसाठी केस मॅनेजमेंट
  •  सुपेस (SUPACE) सर्वोच्च न्यायालयासाठी एआय सहाय्यक पोर्टल
  •  पुणे स्मार्ट सिटी वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा क्षेत्रांमध्ये एआय वापर
  •  माझी जमीन माझा अधिकार (महाराष्ट्र) डिजिटल नकाशे, सीमांकन, मालकीचे प्रमाणपत्र
  •  मुंबई पोलिस फेशिएल रेकगनायजेशन व क्राईम मॅपिंग प्रणाली
  •  दुर्गम आदिवासी भागांत सौर ऊर्जेचे नियमन, शिक्षण, आरोग्य सेवा एआय च्या सहाय्याने

 

रणजितसिंह राजपूत

(जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार)

ताज्या बातम्या

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

0
नांदेड दि. २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध...

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...

‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी...