शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 685

जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग राज्यास कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या उपक्रमास गती देणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 23 :- जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध 30 अभ्यासक्रमांना शासनाने मान्यता दिली असून इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषेच्या शिक्षणासह विविध संस्थांमधून कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील पथदर्शी प्रकल्पात 10 हजार उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती गटाची बैठक मंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज झाली. समितीचे उपाध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, सदस्य उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, सदस्य सचिव तथा शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन आदी उपस्थित होते.

उमेदवारांची निवड, त्यांची पात्रता आणि नोंदणी प्रक्रियेची रुपरेषा ठरवून इच्छुक उमेदवारांपर्यंत त्याची माहिती पोहोचविण्याची सूचना मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केली. तर अभ्यासक्रम, त्यांचे वेतन आणि राहण्याची व्यवस्था याबाबतही उमेदवारांना अवगत करण्यात यावे, असे मंत्री श्री.खाडे यांनी सांगितले.

बाडेन-वुटेनबर्गची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याबरोबरच महाराष्ट्रातील मनुष्यबळाला जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दोन्ही राज्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या समन्वयाने विविध 30 ट्रेड निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला गती देण्याकरिता समन्वय साधण्यासाठी जर्मन शासनाच्या वतीने स्टुटगार्ट येथे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यालयास ‘महाराष्ट्र हाऊस’ असे नाव देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कार्यालयाचे उद्घाटन येत्या 31 जुलै रोजी करण्यात येणार असून त्यासाठी बाडेन-वुटेनबर्ग शासनाने मुख्यमंत्र्यांसह राज्यातील संबंधित मंत्री आणि सचिवांना निमंत्रण दिले आहे. त्याचा आजच्या बैठकीत स्वीकार करण्यात आला.

बाडेन-वुटेनबर्ग येथे जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषेच्या शिक्षणाबरोबरच राज्यात शासनाच्या इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये त्याचबरोबर दर्जेदार खासगी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. स्टुटगार्ट येथील महाराष्ट्र हाऊसच्या उद्घाटनानंतर दोन्ही राज्यांच्या सुकाणू समितीची बैठक होऊन उमेदवारांचे प्रशिक्षण, वेतन, राहण्याची व्यवस्था आदी अनुषंगिक बाबींना अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई दि.23:–महसूल खात्याच्या विविध विभागातील कर्मचारी. महसूल कर्मचाऱ्यांच्या संप आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी  संप थांबवण्याचे आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, राज्य महसूल संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, मुंबई उपनगर जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष अविनाश सांगाडे आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

त्यानुसार आज अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्रालयात बैठक होऊन चर्चा झाली. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वच जिल्ह्यातील   १५ जुलैपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते . ११ जुलैला या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तर दुसऱ्या दिवशी लेखणीबंद ठेवून आंदोलन केले होते.

मंत्री विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले. मंत्री विखे पाटील यांच्या अश्वासनानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले.

0000

 

आषाढी वारीमध्ये १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य सेवा..!

मुंबई, दि. 23 : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे आलेल्या विविध पालखी, दिंड्यांमधील लाखो वारकऱ्यांना आरोग्य विभागाच्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात आली. मागील वर्षीपासून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम लोकप्रिय झाला आहे. यावर्षी 21 जुलैपर्यंत 15 लाख 12 हजार 774 वारकऱ्यांची विनामूल्य आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेनुसार रुग्णांवर उपचार करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला.

श्री. संत गजानन महाराज शेगाव, जि. बुलढाणा, श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर पालखी कौंडण्यपूर जि. अमरावती, श्री. संत मुक्ताबाई मुक्ताईनगर जि. जळगाव यासह श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी जि. पुणे, श्री संत तुकाराम महाराज देहू जि. पुणे, श्री संत एकनाथ महाराज पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर आदी जवळपास छोट्या – मोठ्या  अनेक दिंड्यांमधून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला आले. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी या उपक्रमातून आरोग्य विभागाने घेतली आहे.

प्रत्येक पाच किलोमीटरवर एक याप्रमाणे 258 तात्पुरते ‘आपला दवाखाना’ ची सुविधा निर्माण करण्यात आली. वारी दरम्यान 6 हजार 368 आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या.  पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 5 खाटांचे तात्पुरता अति दक्षता विभाग (आयसीयू) सज्ज ठेवण्यात आला होता. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

पालखी मार्गावर 102 व 108 रुग्णवाहिका सेवा असलेल्या 707 रुग्ण वाहिकांनी अविरत सेवा दिली. रूग्ण वाहिकेमार्फत 1561 वारकऱ्यांना अति तातडीची सेवा देण्यात आली. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना 5885 आरोग्य कीट देण्यात आले होते. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती. महिला वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी एकूण 136 स्त्री रोगतज्ञ कार्यरत होते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 136  हिरकणी कक्षांची स्थापना करण्यात आली होती. पालखी बरोबर एकूण 4 आरोग्य पथके सुसज्ज रुग्ण वाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत राहणार आहेत.  पालखी मार्गावर 186 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला. मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर ूफवारणीदेखील करण्यात आली.

वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार असे सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर ताप, सर्दी, खोकला, ड्रेसिंग, जुलाब चा त्रास झाल्यास सेवेसाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात आली होती. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यासाठी 212 आरोग्यदूत बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

महाआरोग्य शिबिरांमधून वारकऱ्यांची आरोग्य सेवा

पालखी मार्गावरील आरोग्याच्या सुविधांव्यतिरिक्त आरोग्य विभागाने पंढरपूर शहरात वाखरी, 3 रस्ता, गोपाळपूर या तीन विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन 14 ते 18 जुलै दरम्यान करण्यात आले. पंढरपूरमधील 65 एकर व गोपाळपूर येथे रूग्णालयाची व्यवस्थाही उभारण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी 6 अतिदक्षता विभाग, 14 तात्पुरता आपला दवाखाना तर ग्रामीण भागात 26 ठिकाणी अतिदक्षता विभाग  कार्यान्वित करण्यात आले होते. ही सुविधा गोपाळकालापर्यंत असणार आहे. तसेच एकूण 121 आरोग्य दुतामार्फत आरोग्य सेवा देण्यात आली. महाआरोग्य शिबिरांत विशेषज्ञ 153, वैद्यकीय अधिकारी 490, पॅरामेडीकल कर्मचारी 541, नर्सेस 426, आशा कार्यकर्ता 466, अन्य कर्मचारी 636 व स्वयंसेवक 1000 अशाप्रकारे एकूण 3712 मनुष्यबळांकरवी आरोग्य सेवा देण्यात आली आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा अर्थसंकल्प – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.23 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात देशातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत अभिनंदनीय आणि उल्लेखनीय बाब आहे. अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र  सरकारने  10 लाखांचे कर्ज जाहीर केले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाऊचरही दिले जाणार आहेत.या कर्जाच्या रकमेच्या ३ टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी हे ई-वाव्हाचर दिले जाणार आहेत

या सोबतच मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाणार आहे . तसेच  नवोन्मेषाला चालना देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासह एक यंत्रणा उभारणे अतिशय कौतुकास्पद आहे. आजचा अर्थसंकल्प शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करणारा आणि  उच्च शिक्षणाला नवीन दिशा देणारा आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख रूपये सानुग्रह अनुदान – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 23 :   राज्यात गावपातळीवर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक यांच्यावर असते. या घटकांना आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सानुग्रह अनुदान देवून मदत देण्याचा शासनाचा मानस होता. राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सानुग्रह अनुदानासाठी प्रति वर्षी अंदाजे 1 कोटी 5 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे.   सध्या 75 हजार 578 अशा स्वयंसेविका आणि 3622 गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात.  हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

—–०—–

निलेश तायडे/विसंअ

आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

पालघर दि.23 (जिमाका) : आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आपल्याला बहुआयामी धोरणाची आवश्यकता आहे आदिवासी बांधवांसाठी त्यांच्याच गावात रोजगार निर्माण केल्यास त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. वाडा तालुक्यातील गलतारे येथील  इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे चेंज मेकर्सचा गौरव राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी श्री.बैस बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, वाडा प्रांताधिकारी  आगे पाटील   इस्कॉन चे संचालक गौरांग दास प्रभू, इस्कॉनच्या संचालिका मैथिली देसाई  तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व इस्कॉन चे पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असून याची सुरुवात शाळे पासून विशेषतः आदिवासी आश्रमशाळा पासून करणे आवश्यक आहे. आदिवासी बांधव आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी इतर शहरात पाठवत नाहीत त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये आदिवासी मुलींची संख्या कमी आहे. आदिवासी आणि ग्रामीण मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वसतिगृहे निर्माण करण्याची गरज आहे. आदिवासी समुदयाच्या विकासासाठी  कॉर्पोरेट, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, आणि इस्कॉन सारख्या संस्थांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते चेंज मेकर्स हा पुरस्कार देऊन विद्यार्थी,महिला व शेतकरी  यांना गौरविण्यात आले.

*******

न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित वर्गणी ईपीएफमध्ये जमा करणार – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि.२५ :- न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा एक अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) २००९ ते २०१८ पर्यंतच्या प्रलंबित वर्गणी शासनाकडून जमा करण्यात येणार आहे. यासाठी ६९ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मजीप्रा अंतर्गत विविध विषयांबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मजीप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, ईपीएफ ऑर्गनायझेशन कडून प्रलंबित वर्गणी जमा होण्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ईपीएफओकडे पाठपुरावा सुरू असून आवश्यकता भासल्यास कामगार सचिव यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल. न्हावा शेवा पाणीपुरवठा प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या ईपीएफसाठी व विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांकडून उपोषण केले होते. तसेच आमदार श्री. बालदी यांच्यासह विविध संघटनांनी मागणी केली होती.

०००००

किरण वाघ/विसंअ

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि.२३ :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) मधील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून  सकारात्मक भूमिका  घेतली असून कालबद्ध पदोन्नती, बोनस, प्रलंबित फरक या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा करू व या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

‘मजीप्रा’ अंतर्गत विविध विषयांबाबत मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार महेश बालदी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे  प्रधान सचिव संजय खंदारे, मजीप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सेवेत असताना मृत्यू झाल्याने ४६० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा पद्धतीने नियुक्ती देण्यात आली आहे.  यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या ३५०० रूपये वेतनवाढ दिली आहे.

यावेळी मजीप्रा संचालक मंडळाची बैठक होऊन विविध योजनांतील कामांचा आढावा घेण्यात आला. कर्मचारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी अनुकंपाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत मंत्री श्री.पाटील यांचे आभार मानले.

००००

 

किरण वाघ/विसंअ

 

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय समित्या तातडीने गठित कराव्यात – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 23 : ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय, तालुकापातळीवर तालुकास्तरीय समिती आणि  महानगरपालिका क्षेत्रासाठी वॉर्ड स्तरीय समिती तातडीने गठीत करावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री यांनी आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेचा आढावा मंत्री कु. तटकरे यांनी घेतला.या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई शहर, अकोला, धाराशिव,हिंगोली,वर्धा जिल्हाधिकारी (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ.सुधाकर शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की,  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला अधिक गती देण्यासाठी आणि या समित्या तातडीने गठित करव्यात. असे सांगून राज्यातील या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्जांची सद्य: स्थिती याबद्दल  त्यांनी माहिती घेतली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

 

तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.२३  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प आज सादर केला.  हा अर्थसंकल्प देशाला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून युवा, महिला, शेतकरी आणि गरीब सक्षम होतील. या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने जाहीर केलेल्या योजना तरुणांच्या आकांक्षाना बळ देतील, अशी प्रतिक्रिया कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, “केंद्र सरकारने रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी विशेष तरतूद केली आहे. प्रधानमंत्री पॅकेज अंतर्गत ‘रोजगार संबंधित प्रोत्साहन’ या योजनेत तीन प्रमुख योजना जाहीर करण्यात आल्या असून, रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रीत करत सरकारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या काळात चार कोटींहून अधिक तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प भारतातील सर्व वर्गांना विशेषतः तरुण पिढीला विकसित बनवणारा अर्थसंकल्प आहे. या महत्त्वकांक्षी अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार मानतो, अशा शब्दात मंत्री श्री.लोढा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

“देशातील २० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट असून, त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. कालानुरूप आवश्यक नवे कौशल्य अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत. विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना महाराष्ट्र देखील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती करून, लाखो युवकांना प्रशिक्षण देण्यास सज्ज आहोत. पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये कौशल्य शिक्षण दिले जाणार आहे, दरमहा ५ हजार रुपये इंटर्नशिप भत्ता आणि सहा हजार रुपयांची एकरकमी मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील ‘मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना विद्यावेतन, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे. मॉडेल स्किल लोन योजनेद्वारे जवळपास २५ हजार तरुणांना ७.५ लाख रुपयापर्यंतचे कौशल विकास शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याने त्याचा दुप्पट लाभ महाराष्ट्रातील तरुणांना होईल!” असे देखील कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...