शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 684

मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

ठाणे, दि. 24 (जिमाका) : शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी काम करीत असते. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष श्री.अनिल गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, वाहतूक उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड,महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, पोलीस उपायुक्त एस.व्ही.शिंदे, रस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, एमएमआरडीए मुख्य अभियंता एस.के.सुरवसे, अधीक्षक अभियंता रमेश खिस्ते, भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी.एस.साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.ए.तांबे, कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अवर सचिव दिपाली घोरपडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, मुंबई-ठाणे-नाशिक हा महामार्ग ठाणे ते वडपे असा 23 किलोमीटर आणि वडपे ते नाशिक 97 किलोमीटर असा मिळून 120 किलोमीटरचा असून महामार्गावर असणारे खड्डे तातडीने बुजवा, पुन्हा खड्डे होणार नाहीत, याची काळजी घ्या. पुलांची कामे लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी योग्य नियोजन करुन काम पूर्ण करा. आसनगावजवळील रेल्वे पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. हा पूल तयार होण्यासाठी तीन महिने लागणार आहेत, मात्र तोपर्यंत सध्या जो पूल आहे, त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करुन वाहतूक सुरळीत करा.

ते पुढे म्हणाले, वडपे पासून पुलाची कामे लवकरात पूर्ण करा. अवजड वाहनांना वाहतुकीसाठी योग्य वेळेचे बंधन घालून वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणती वाहने कोणत्या लेनमध्ये चालली पाहिजेत, याचे नियोजन करा. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे ते वडपे  या भागात वाहतूक पोलिसांच्या मदतीला 170 पोलीस मित्र देण्यात आले आहेत. यांचा समन्वय साधून वाहतूक नियंत्रणाविषयी योग्य ते नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी आपापसात आवश्यक तो समन्वय साधून नागरिकांना त्रास कमीत कमी कसा होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

मुंबई-नाशिक महामार्ग सुव्यवस्थित करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. अशा वेळी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे जनतेला आवाहन करुन श्री.भुसे यांनी बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची  संबधित अधिकारी-यंत्रणांनी  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, अशा अत्यंत कडक शब्दात उपस्थितांना इशारा दिला.

बैठकीच्या सुरुवातीस मंत्री महोदयांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि शेवटी मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनांचे पालन सर्व संबंधित अधिकारी-यंत्रणांकडून अत्यंत गांभीर्याने करण्यात येईल, असे आश्वस्त केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींशी मंत्री चंद्रकांत पाटील उद्या संवाद साधणार

मुंबई, दि. २४ : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने  विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या गुरुवार दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते १२ यावळेत ऑनलाईन वेबिनार होणार आहे. हा कार्यक्रम http://www.parthlive.com लिंकवरून (यू ट्यूब) वर सुद्धा थेट (Live) प्रक्षेपित करण्यात  येणार आहे.

या कार्यक्रमाकरिता राज्यातून जवळपास ५ हजार शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थिनी, पालक व संस्थांचे प्रतिनिधी ऑनलाईन  थेट प्रक्षेपणाचा लाभ घेणार आहेत.

राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खासगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवगांतील, सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नूतनीकरण केलेल्या) मुलींना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ, कुटुंबाचे आर्थोक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे,

अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या), आणि  महिला व बाल विकास विभागाच्या दि. ६ एप्रिल २०२३ नुसार “संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. अशा सर्व योजनांची माहिती या वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

00000

काशीबाई थोरात / वि.स.अ

हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 24 :राज्यात मराठा – कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाज बांधवांसाठी शासनाने अधिकच्या नोंदी मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘हैदराबाद गॅझेट’मधील नोंदी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक हैदराबाद येथे पाठविले. या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी शासनाने विहीत शुल्क भरून केली आहे. या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात मराठा समाज आरक्षण व संबंधित विषयांबाबत बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाते. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव  सुवर्णा केवल आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले की, राज्यात मागील काळात शासनाने मराठा – कुणबी नोंदी पडताळणी साठी युद्धपातळीवर सर्वेक्षण पूर्ण केले. यामध्ये आढळलेल्या नोंदीनुसार मराठा – कुणबी प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना देण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणात नोंदी न आढळल्यामुळे प्रमाणपत्र देण्यास अडचण आली. हैदराबाद गॅझेटमधील जास्तीच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. हे कामही युद्धपातळीवर पूर्ण करावे. सगे- सोयरे बाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. या छाननीचे कामही अंतिमस्तरापर्यंत नेण्यात यावे. न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना मंत्री श्री. देसाई यांनी आज दिल्या.

मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले विविध गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही करावी. यामध्ये 31 जानेवारी 2024 पूर्वी दाखल गुन्ह्यावर दोषारोपपत्र झालेल्या प्रकरणांमध्ये गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. तसेच 31 जानेवारी 2024 नंतर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत नवीन शासन निर्णय काढण्याची कारवाई करावी, असे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

0000

निलेश तायडे/विसंअ

हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार; हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २४ : देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे हळद संशोधन केंद्राबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, माजी खासदार हेमंत पाटील, कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी, केंद्रीय स्पाईस बोर्डच्या महाराष्ट्र प्रमुख ममता रुपेलिया यावेळी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एकीकृत हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र तयार होत आहे. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषध निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. या पिकास किड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होते. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक असून त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शासकीय अभिसरण योजनांचा लाभ या केंद्रास देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वसमत हळदीला जीआय मानांकन मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

या संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) रोपांसाठी प्रयोगशाळा, हळद प्रक्रीया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे. देशभरात ५० लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात उत्पादित होते. जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाईल, त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होईल, असे हळद केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.

००००

बुलढाणा जिल्ह्यातील लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २४ :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन,  रस्ते आदी लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी आणि त्याअंतर्गत कामाला गती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुलडाणा जिल्हा तसेच बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे -पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोकांना दिलासा देणारी छोटे-छोटे प्रकल्प, कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. छोट्या प्रकल्पामुळे  सिंचन क्षमता निर्माण होते, त्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा कामांना प्राधान्य देण्यात यावे. पर्यटन हे मोठे क्षमता असलेले क्षेत्र आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांना आणि सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीत हरमोड सिंचन तलावाची उंची वाढविणे, पलढग धरणाचे वाहून जाणारे पाणी नळगंगा धरणात वळविणे, गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढविणे, किन्होळा शिवारामध्ये साठवण धरण, बुलढाणा नगरपरिषदेला सामाजिक सभागृह तसेच उद्यान व चौपाटीसाठी जागा हस्तांतरण येळगांव पर्यटन प्रकल्प, बुलढाणा -चिखली- मलकापूर रस्त्याचे काम, बुलढाणा जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा फूडपार्क उभारणे अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

0000

विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणेकरांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवत कामे करा

मुंबई, दि. 24 :- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच पुणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून सर्व विभागांनी योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन आणि बंदरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा राज्यकर आयुक्त आशिष शर्मा, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा, महसूल आणि वने विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (व्ही.सी.द्वारे), क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, तर व्ही.सी.व्दारे पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पी.एम.आर.डी.ए.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, सहकार आयुक्त दीपक तावरे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिह, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील उपस्थित होते. तर पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनच्या कामाला गती द्या. तसेच हडपसर ते लोणीकाळभोर, हडपसर ते सासवड, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या वाढीव मेट्रो मार्गांच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करा. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. त्याचबरोबर पुणे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. पुणे शहरात दर वर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करावी.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सैनिक स्कुल, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

***

बंद आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर; चालू उपसा सिंचन संस्थांच्या मुद्दल थकबाकीची निम्मी रक्कम शासन भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणून मंजुरी घेण्याचे अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 24 :- राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ केल्यानंतर थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात येईल. बंद पडलेल्या आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर कार्यरत असलेल्या संस्थांची निम्मी थकबाकी राज्य शासन भरणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजुरी घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. राज्यातील 245 संस्थांच्या 40 हजार 245 सभासदांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या निर्णयाचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना नव्याने पिककर्ज मिळवण्याचा मार्गही खुला होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकीत कर्ज माफ करण्याच्या स्थानिक आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा,  वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सहकार आयुक्त दिपक तावरे हे पुण्याहून तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ हे सांगलीहून व्हीसीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याच्या शेतीविकासात सहकारी उपसा जलसिंचन योजनांची महत्त्वाची भूमिका असून शासनाने वेळोवेळी या संस्थांना मदत केली आहे. राज्यातील 245 संस्थांचे 40 हजार 245 सभासद या योजनांचे लाभार्थी आहेत. काळाच्या ओघात काही सहकारी उपसा जलसिंचन संस्था बंद पडल्या. काही अवसायानात निघाल्या तरी अनेक संस्था शेतकऱ्यांच्या जीवनात आजही सकारात्मक बदल घडवत आहेत. बंद पडलेल्या, अवसायानात निघालेल्या आणि चालू स्थितीत असलेल्या सहकारी उपसा सिंचन संस्थांकडे असलेल्या बँकांच्या थकबाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी संपूर्ण व्याजाची थकबाकी माफ केल्यास, उर्वरीत थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात यावी. बंद पडलेल्या आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर कार्यरत असलेल्या संस्थांची निम्मी थकबाकी राज्य शासन भरेल. यासंदर्भातील प्रस्ताव सहकार विभागामार्फत मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजूरी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठकीत दिले. या निर्णयाचा लाभ बँकांच्या कर्जाची थकबाकी असलेल्या राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना आणि त्यांच्या सभासदांना होणार आहे.

—-०००००—-

सर्व घटकांचा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प – मंत्री अतुल सावे

मुंबई दि.२३: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सर्व घटकांचा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प आज सादर केला, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

मंत्री सावे म्हणाले,शेतकरी, महिला, युवक, तसेच कृषी, पायाभूत सुविधा, शहरांचा विकास आदी घटकांवर लक्ष केंद्रित करणारा हा अर्थसंकल्प आहे. शैक्षणिक कर्जावर तीन टक्के व्याज परतावा दिला जाणार असून सात लाख ५० हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे ३ कोटी घरे बांधली जाणार आहे. शहरातील घरांसाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून देशासह राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे. याद्वारे पुढील पाच वर्षात २.५  लाख कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ७५४५ कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली, 23 : वर्ष 2024-25 करिता केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात राज्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रुपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून, या प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

संसेदचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरू झाले. वर्ष 2024-25 साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या विकासासाठी व देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्याच्या विविध पायाभूत प्रकल्पांसाठी 7545 कोटी रूपयांची तरतूद

राज्याच्या 13 पायाभूत प्रकल्पांसाठी आजच्या अर्थसंकल्पात रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, राज्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प ठरेल. यामध्ये विदर्भ-मराठवाडा दुष्काळग्रस्त सिंचन प्रकल्पांसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळेल. यासोबतच, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार प्रकल्पांतर्गत रूपये 400 कोटी रूपयांची, सर्वसमावेशक विकासकामांसाठी (इकॉनॉमिक कॉरिडॉर) 466 कोटी रुपये रुपयांची, पर्यावरणपूरक शाश्वत पर्यावरणपूरक कृषि प्रकल्पासाठी रूपये 598 कोटी, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी रूपये 150 कोटी (केंद्रशासनाकडून मिळणारा वाटा), मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी 908 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी रूपये, दिल्ली –मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी रूपये 499 कोटी, मुंबई महानगर प्रदेश हरित शहरी गतिशीलता प्रकल्पासाठी रूपये 150 कोटी,  नागपूर मेट्रोसाठी रूपये 683 कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी रूपये 814 कोटी, नाग-नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 500 कोटी तर मुळा मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी रूपये 690 कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

या तरतुदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार, विशेषतः ग्रामीण रस्ते सुधार, मेट्रो प्रकल्प, औद्योगिक कॉरिडॉर आणि नदी पुनरुज्जीवन यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल.

0000

 

 

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई दि.२३ : मतदार यादी अद्ययावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी २५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर २७ व २८ जुलै २०२४ तसेच ३ व ४ ऑगस्ट २०२४ या दिवशी मुंबई शहर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व बीएलओ सर्व मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव नसलेले नाव नोंदणी करु शकतात, नावांमधील दुरुस्ती करून घेवू शकतात तसेच नाव स्थलांतरित करुन घेवू शकतात. ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीनेही करता येतील. यासाठी बीएलओंमार्फत गृहभेटी कार्यक्रमही आखण्यात आला आहे. पुनरीक्षण मोहीम कालावधीत नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे आदीसारखे कार्यक्रम राबविले जातील.

मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदार याद्यांचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना, मतदार यादीमधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे फोटो बदलून चांगल्या प्रतीचे फोटो सुनिश्चित करणे, मतदार यादीमधील विनिर्देशन आणि मानवेतर प्रतिमा, जेथे आवश्यक असेल तेथे बदल करणे. विभागांची पुनर्रचना करणे आणि विभाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेस अंतिम रुप देणे, त्यानंतर मतदान केंद्रांच्या यादीची मान्यता घेणे. कंट्रोल चार्ट अद्ययावतीकरण करणे, नमुना एक ते आठ तयार करणे.

प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे : गुरुवार (२५ जुलै), मतदार यादीवरील दावे व हरकती स्वीकारणे (२५ जुलै ते ९ ऑगस्ट). विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम असा : मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निश्चित झाल्यावर दावे व हरकती निकाली काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मिळवणे, डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी यादी तयार करणे यासाठी सोमवार (ता. १९ ऑगस्ट) पर्यंत मुदत आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता. २० ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या बैठकीत मतदार नोंदणी वाढवणे आणि जन जागृती करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा. तसेच मतदार नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, जिल्ह्यात १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला भेट द्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी केले.

या बैठकीस स्वीपच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  श्यामसुंदर सुरवसे, संबंधित उपजिल्हाधिकारी, तसेच कामगार, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...