शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 683

पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई, दि. 25 :- पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
——00000—-

सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. 24 : सध्या समाजात डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारांच्या माहितीअभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘व्हॉट नाऊ’च्या फाऊंडर निती गोयल, निवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते.

महापे येथे सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी

सायबर गुन्हे व ऑनलाईन छळवणुकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या, महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व उलगड्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापे येथे सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. ‘व्हॉट नाऊ’ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक  झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शाळा, महाविद्यालय, कार्यालये, रहिवासी संकुले यामध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या ‘व्हॉट नाऊ’ चळवळीच्या माध्यमातून  सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.

सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर

बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलीस आपल्या सदैव पाठिशी आहे. मुंबई पोलिस सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी समाजमाध्यमे वापरताना अनोळखी व्यक्तींचे कॉल, फ्रेंड रिक्वेस्ट यांना प्रतिसाद देवू नये. फसवणुकीची घटना घडल्यास आपल्या पालकांना कल्पना द्यावी. तसेच कुठलीही शंका न बाळगता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकाची सुद्धा मदत घ्यावी. व्हॉट नाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली मोहीम प्रशंसनीय आहे. युवकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायबर विषयक जनजागृती करावी, असे आवाहन करून मुंबई पोलिस आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिलेले नसून आपली ओळख बनले आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती संकलित असते. त्यामुळे मोबाईलला हॅक करून, त्यामधील माहिती चोरून आपली फसवणूक होऊ शकते. देशात नवीन कायदे लागू झाले असून याबाबत पोलिसांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. हे कायदे पीडितांना नक्कीच न्याय देणारे आहेत. व्हॉट नाऊ संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच समाजात सायबर सुरक्षा विषयक साक्षरता निर्माण करणारा ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांनी सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगत ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. ‘व्हॉट नाऊ’च्या संस्थापक निती गोयल व सहसंस्थापक निवेदिता श्रेयांश यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. ऑनलाईन फसवणूक झाल्यास मदत करणारा हा उपक्रम युवकांना निश्चितच सहाय्यभूत ठरणारा असून युवकांमार्फत युवकांसाठी सुरू झालेली ही चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राज्यातील मत्स्य व्यवसायाला बळ देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २४:  राज्याला ७२०  किलोमीटर लांबीचा सागरी किनारा असून सात सागरी जिल्ह्यांचा समावेश यात आहे; मत्स्यव्यवसाय हा राज्यात रोजगार निर्मितीस अनुकूल व अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यासाठी मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यापासून, या विभागासाठी खास धोरण समिती गठित करण्यासारखे विविध महत्त्वाचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. यामागे केवळ राज्यातील मत्स्य व्यवसायाला बळ देणे आणि संपूर्ण देशात महाराष्ट्राचे मत्स्यधोरण अव्वल असावे हीच भूमिका असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंगळवारी (दि. २३ जुलै २०२४) सायंकाळी सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्याच्या मत्स्यव्यवसाय धोरण समितीची पहिली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. धोरण समितीचे अध्यक्ष राम नाईक उपस्थित होते.

राज्याच्या मत्स्य व्यवसाय क्षमतेच्या केवळ १५ टक्के क्षमतेचाच आज वापर होत असून, क्षमतेचा पूर्ण वापर झाला तर राज्य या क्षेत्रात देशात अव्वल ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ही क्षमता पूर्ण वापरण्याकरता राज्याचे सर्वंकष मत्स्यव्यवसाय धोरण असणे आवश्यक आहे.

गोड्या पाण्यातील मासेमारी, भूजल मत्स्यमालन हे मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतात. तसेच समाजातील मोठ्या घटकांना अन्न पुरवठा करू शकतात. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने गोड्या पाण्यातील मासेमारीकरता विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा संपूर्ण लाभ राज्याला घ्यायचा असेल, तर राज्याचे मत्स्यव्यवसाय धोरण लवकरात लवकर तयार केले पाहिजे, असेही मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले. या विषयात जेथे अडचणी येतील तेथे केंद्र सरकारच्या मत्स्योद्योग विभागाची मदत घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सागरी किनारपट्टी वरील इतर राज्यांच्या मत्स्य व्यवसाय विषयक धोरणांचा तसेच इतर राज्यांच्या गोड्या पाण्यातील मासेमारी व भूजल मत्स्यपालन विषयक धोरणांचाही राज्याच्या मत्स्यव्यवसाय धोरण समितीने तौलनिक अभ्यास करावा आणि राज्याचे मत्स्य धोरण लवकरात लवकर तयार करावे, अशी सूचनाही श्री.  मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

समितीचे अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले की, राज्याचे नवीन मत्स्यव्यवसाय धोरण हे सर्वसमावेशक आणि सर्वंकष होईल. राज्यातील कुठल्याच भागावर आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी आपली समिती घेईल. त्यासाठी या समितीच्या दर आठवड्याला बैठका घेऊन लवकरात लवकर धोरणाचा मसुदा तयार करून शासनाला सादर केला जाईल. केवळ आमदार, नेते आणि मच्छिमार संस्थाच नव्हे, तर जनसामान्यांकडूनही धोरणविषयक सूचनांचे स्वागत आहे, असे सांगून श्री. नाईक यांनी समितीला आपल्या सूचना लेखी पाठविण्याचे आवाहन यावेळी केले.

मत्स्यव्यवसाय धोरण समितीच्या या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री सर्वश्री उदय सामंत,  दीपक केसरकर, आमदार सर्वश्री महेश बालदी, प्रशांत ठाकूर, नितेश राणे, आशिष जयस्वाल, रमेश पाटील,  प्रवीण दटके,  राजन साळवी, राजेश पाटील, भारती लव्हेकर, श्रीमती मनीषा चौधरी,  गीता जैन यांच्यासह मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार,  कांदळवन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व मत्स्यव्यवसाय विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व आमदारांनी व मच्छिमार प्रतिनिधींनी मच्छिमारांच्या विविध समस्या मांडल्या तसेच पायाभूत सुविधांविषयीच्या विविध मागण्या मांडल्या. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. संभाव्य धोरणात या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून योग्य धोरण आखू, असे या चर्चेअंती समितीचे अध्यक्ष राम नाईक यांनी सांगितले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

कृषीविषयक योजनांबाबत डॉ. अशोककुमार पिसाळ यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २५, २६, २७, २९ व ३० जुलैला मुलाखत

मुंबई, दि. 24: खरीप हंगामातील पीक पेरणीचे नियोजन व कृषी विषयक विविध योजनांबाबत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.अशोककुमार पिसाळ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली असून शाश्वत शेतीबद्दलही मार्गदर्शन केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील या मुलाखतीत डॉ. पिसाळ यांनी खरीप हंगामातील शेतीची कामे, पीक पेरणीचे नियोजन, नैसर्गिक, सेंद्रिय, शाश्वत शेती, तृणधान्ये उत्पादन, कृषी विषयक तंत्रज्ञान व संशोधन तसेच पीक विमा योजनेसह कृषी विभागाच्या अन्य विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 25, शुक्रवार दि.26, शनिवार दि.27, सोमवार दि.29, मंगळवार दि.30 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

—-00000 —

केशव करंदीकर/व.स.सं

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून, 2024 रोजीचे पत्रान्वये दि.1.7.2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)” बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

मात्र, भारत निवडणूक आयोगाने  आज दि. २४ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असून, सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे, तो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे,  विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे,  कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना १-८ तयार करणे, ०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे – २५ जून ते १ ऑगस्ट २०२४.

एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- २ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २ ते १६ ऑगस्ट २०२४.

विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध करणे- २७ ऑगस्ट २०२४.

०००००

राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

मुंबई, दि.24 : राज्यातील स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या अडचणीबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती  तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

यावेळी सुरेखा ठाकरे, संस्थेचे प्रतिनिधी बाबूसिंग जाधव, कविता वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या प्रतिनिधींनी बालगृहांसंबंधी विविध समस्या मांडल्या. यामध्ये बालगृहातील कर्मचाऱ्यांना मानधन मंजूर करणे, बालगृहाच्या इमारतींना बांधकाम व्हॅल्युएशन प्रमाणे इमारत भाडे मंजूर करणे, बाल गृहातील प्रवेशितांच्या परिपोषण अनुदान वाढ करणे याबाबत चर्चा झाली.

‘मिशन वात्सल्य’च्या धर्तीवर कर्मचारी संख्यावाढ संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री कु.तटकरे यांनी  यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी ‘आर्टी’ कार्यालयाचा शुभारंभ करावा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 24 : मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. यामधील बऱ्याच मागण्या शासनाकडून पूर्णत्वास आणण्यात येत आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे कार्यालय अण्णाभाऊ साठे स्मारक, चिराग नगर, चेंबूर, मुंबई येथे असणार आहे. या कार्यालयाचा शुभारंभ 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी करण्यात यावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे उपस्थित होते.

‘आर्टी’ संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज एका महिन्याच्या आत सुरूवात झाल्यास मातंग समाज बांधवांची ही  मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. कार्यालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात यावे. याबाबत कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात यावे. या संस्थेची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी करण्याची प्रक्रियाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची बैठक

मुंबई, दि.24 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 242 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील यांच्यासह महामंडळाचे सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गोवा राज्यात पशुखाद्य आणि भात शेती मध्ये फवारणी साहित्य तसेच शेत उपयोगी औजारे व निविष्ठा यांची आवश्यकता आहे.यामध्ये महामंडळाने पुरवठा केल्यास महामंडळाला सुध्दा गोवा राज्यात व्यवसायाची संधी मिळेल व महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल, याबाबत चर्चा करण्यात आली.महामंडळाच्या रिक्त पदाबाबत लोकसेवा आयोगामार्फत कार्यवाही करण्यात यावी.तसेच अनुकंपा तत्त्वावर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.महामंडळाच्या कामकाजाच्या अनुषंगाने इतर विषयांचीही चर्चा करण्यात आली.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे फेर सर्व्हेक्षण करीत दावे निकाली काढावेत – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई, दि 24 : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे फेर सर्वेक्षण करून पीक विम्याचे दावे निकालात काढावेत व महिनाभरात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

चिखली व बुलढाणा तालुक्यातील पीक विम्याबाबत आमदार श्वेता महाले यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस कृषी संचालक विजयकुमार आवटे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील 89 हजार 780 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी 28 हजार 293 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी केवळ 2278 तक्रारी ग्राह्य करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 26015 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते.

बुलढाणा तालुक्यातील 54804 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी 24,585 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यातील केवळ 1611 तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या. त्यामुळे 22974 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी होत्या.

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की,  केवळ 5 टक्के शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आल्याने 95 टक्के शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सॅटॅलाइट इमेज उपलब्ध करून कारणांसह दावे निकाली काढावीत. त्यासाठी कृषी आयुक्त आणि जिल्हा कृषी प्रशासनाने आवश्यक ती मदत करावी. महिन्याभरात दावे निकाली करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा करावी, असे निर्देश श्री. मुंडे यांनी दिले.

000000

पूर पीडितांना पूर्ण शक्तिनिशी मदत करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

भर पावसात चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील नागरिकांसोबत संवाद

चंद्रपूर, दि. 24 : गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अशात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत. आज (दि.24) पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे. या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोहचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पूरपीडितांच्या पाठीशी पूर्ण शक्तिनिशी उभा राहील, असा शब्द राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

चिचपल्ली येथे पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, तहसीलदार विजय पवार, पोलिस निरीक्षक सुनील गाडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, संध्या गुरुनुले, डॉ.मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, गौतम निमगडे, अशोक आलाम, सोहम बुटले आदी उपस्थित होते.

पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे, अशा सर्व नागरिकांची जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पूरपीडितांना चहा-बिस्कीटसह नाश्ता व उत्तम जेवण द्यावे. नागरिकांना तेल, मीठ, तिखट, धान्य, कणीक यासोबतच कपडे देण्यात येईल. तसेच गाद्या, चादर, ब्लँकेटची व्यवस्था करावी. चिचपल्ली येथील पूरपीडित कुटुंबाना पहिली मदत म्हणून 5 हजार तात्काळ जमा होणार आहे. या पूरपरिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दुसरी मदत जास्तीत जास्त मिळावी, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. गावातील नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करून देऊ. तसेच पुल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री म्हणाले, ‘पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. तसेच पावसानंतर साथरोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी करावी. तसेच नालेसफाई, बोअरीग, विहीर आदींमध्ये ब्लिचींग पावडरची फवारणी करावी. ज्या नागरिकांचे धान्य, भांडे, बकऱ्या, बैलजोडी वाहून गेली, त्यांची यादी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

पंचनाम्यापासून एकही जण सुटणार नाही : ज्या घरांचे नुकसान झाले आहेत, त्याचे पंचनामे फोटो आणि व्हीडीओ घेऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान झाले पण घर पडले नाही, आणि दोन दिवसांनी कदाचित ते घर पडू शकते, अशाही घरांचे पंचनामे करावे. पंचनाम्यापासून एकही घर सूटणार नाही, याची काळजी घ्यावी. गावात पंचनामे झाल्यानंतर गावकऱ्यांनीच कोणी सुटणार नाही याची खात्री करावी. तसेच पंचनाम्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये जाहीर करावी, अश्या सूचनाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. 

चिचपल्ली येथे 224 तर पिंपळखुट येथे 109 लोकांचे पैसे जमा होण्यास सुरवात

चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे पूरपीडितांसोबत संवाद साधत असतानाच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूरग्रस्तांना पहिली मदत पाच हजार रुपये तात्काळ बँकेत जमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. लगेच खात्यात पैसे जमा होत असल्याचे मॅसेज नागरिकांकडून प्राप्त झाले, असे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले. चिचपल्ली येथील 224 तर पिंपळखुट येथील 109 लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.

धनादेशाचे वाटप : पुरामध्ये बकऱ्या आणि बैलजोडी वाहून गेलेल्या नागरिकांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात चिचपल्ली येथील देवरात मत्ते यांना 17200 रुपयांचा धनादेश, बाबुखान पठाण यांना 8 हजार रुपयांचा धनादेश, वसंत मडावी यांना 8 हजार, भाऊराव दुर्योधन यांना 16 हजार रुपये, प्रमोद आडे यांना 60 हजार रुपये तर दिनेश लाकडे यांना 84 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सोबतच पिंपळखुट येथील अभिमन्यू आत्राम यांना 16 हजार रुपयांचा आणि महादेव आत्राम यांना 28 हजार 600 रुपयांचा धनादेश देण्यात आला.

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवेदन

0
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे नामांतर "ईश्वरपूर" करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. १८ : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता....

विधानपरिषद कामकाज

0
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार - उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम  मुंबई, दि. १८ : देशातील टेस्लाचे पहिले शोरुम मुंबईमध्ये...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. १८ : कराडजवळील कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी...

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

0
मुंबई, दि. 18 : केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही...

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. 18 : शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त तांत्रिक शिक्षणापुरते न राहता, व्यक्तिमत्व घडविणारे...