शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 65

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती

नागपूर, दि. 27 – प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. येत्या काळात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

लष्करीबाग येथील कमाल चौकात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे आणि स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष कांचन ताई गडकरी यांची विशेष उपस्थिती होती.

आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार आशीष देशमुख, बेंगलुरू येथील महाबोधी सोसायटीचे महासचिव पुज्य भंते आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष  राघवेंद्र स्वामी, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा,माजी महापौर  दयाशंकर तिवारी,  माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार टेकचंद सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या क्षेत्रात सेवेसोबतच संवेदनेलाही तेवढेच महत्त्व आहे. नितीनजीकडे सेवा आणि संवेदना या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच आईच्या नावाने डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून गरिबांची सेवा करण्याचा विचार त्यांनी केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला. हे केंद्र आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी  व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, स्व. भानुताई गडकरी यांच्याकडून नितीनजींना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच ते देशात मोठ्या प्रमाणात काम करू शकत आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तीचे कल्याण हा नितीनजींच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. उपेक्षितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने काम करीत आहेत. उद्योग, कृषी, आरोग्य क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. याच मालिकेत डायग्नोस्टिक सेंटरचा समावेश होतो. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हे खूप मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले.

एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात विकसित तंत्रज्ञानाचा वापर वाढला असताना सेवांचे शुल्क देखील जास्त आहे. अशात एमआरआय आणि सिटी स्कॅनच्या मशीन्स भारतीय बनावटीच्या असतील तर सेवांचे शुल्क देखील कमी राहील. त्याचवेळी भविष्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हॉस्पिटल्सची संख्या वाढवावी लागणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना सेवाभाव आणि संवेदना ह्या गोष्टी आवश्यक असतात. पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार असून सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार असल्याचे ते म्हणाले.

डायग्नोस्टिक सेंटर हे व्यवसायाचे नव्हे तर सेवेचे माध्यम –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

समाजातील वंचितांची, शेवटच्याच्या माणसाची सेवा करण्याचे, त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा अंत्योदयाचा विचार पं. दीनदयाल उपाध्याय यांनी दिला. त्या मार्गावर सातत्याने कार्य करीत आहे. राष्ट्रकारण, समाजकारण आणि सेवाकारण, हाच राजकारणाचा खरा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या कार्यातून गरिबांचे जीवन कसे बदलू शकतो, याचा विचार मी करत असतो. त्याच प्रेरणेतून अनेकांच्या सहकार्याने स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची स्थापना होऊ शकली आहे. ज्या आईने जन्म दिला तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकलो याचे समाधान आहे, अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली व्यक्त केली. हे केंद्र व्यवसायाचे नव्हे तर सेवेचे माध्यम आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.प्रास्ताविक कांचनताई गडकरी यांनी केले. तर संचालन डॉ. रिचा सुगंध यांनी केले.

स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची वैशिष्ट्ये

  • 6000 चौरस फूटांचे बांधकाम
  • वेटिंग एरियासह संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा
  • पूर्णपणे पेपरलेस कार्यप्रणाली
  • उच्च क्षमतेचे सर्व्हर्स
  • तांत्रिकदृष्ट्या पात्र व प्रशिक्षित कर्मचारी

एमआरआय (MRI)

  • मेड इन इंडिया मशिन्स
  • 1.5 टेस्ला हाय-एंड इमेजिंग, 16 चॅनल
  • MUSIC तंत्रज्ञानामुळे जलद स्कॅन शक्य, इमेज क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड नाही

सीटी स्कॅन (CT Scan)

  • मेड इन इंडिया मशिन्स
  • मोठी शरीरयष्टी असलेल्या रुग्णांसाठी मोठे बोअर
  • कमी वेळात स्कॅन – संपूर्ण छातीचे स्कॅन फक्त 6 सेकंदांत
  • BIS, AERB, CDSCO मान्यताप्राप्त

डिजिटल एक्स-रे (Digital X-Ray)

  • उच्च दर्जाची डिजिटल एक्स-रे सेवा

डायलिसिस (Dialysis)

  • 5 उच्च दर्जाच्या डायलिसिस मशिन्स

00000

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन
  • भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध
  • सुमारे २५ हजार ५६७ कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा

        नागपूर, दि. 27 : नागपूरच्या वाढत्या विस्तारात सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभ वाहतूक व्यवस्थेसह सर्व भागांना जोडणाऱ्या उत्तम वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत नागपूर मध्ये रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असल्या तरी त्या कमी पडत आहेत. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पायी चालणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित फुटपाथसह सर्व भागांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांची निर्मिती, अपुऱ्या स्थितीतील चौकांचे विस्तारीकरण, महानगरात धावणाऱ्या बसेसचे थांबे, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेसचे मार्ग, मेट्रो स्टेशन पासून त्याला बसेसची कनेक्टीव्हिटी आदी मुलभूत विकासासाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे 25 हजार 567 कोटी रूपयांच्या प्रारूप आरखड्याला अधिक लोकाभिमुख करून सक्षम करण्यासाठी जनतेचीही मते याबाबत जाणून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपूर महानगराच्या सर्वसमावेशक गतिशिलता आराखड्याबाबत आज मेट्रो भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,  नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, राजीव त्यागी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील तसेच महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोविड नंतरच्या कालावधीत महानगराच्या विस्ताराने अधिक गती घेतली आहे. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. दररोज शेकडो वाहनांचे रजिस्ट्रेशन होत आहे. रस्ते अपुरे व वाहनांची संख्या अधिक अशा स्थितीत नागपूर आहे.  प्रत्येक दिशेला नवनवीन महानगर होत आहेत. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार येत आहेत. स्वाभाविकच याचा ताण हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत आल्याने नवीन आराखड्यानुसार कामे लवकर व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणेने भर द्यावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नागपूर महानगराच्या विकासासह ऊर्जेची निर्मिती करणारे दोन मोठे प्रकल्प आणि काही खाणी  कोराडी, कामठी, कन्हान, खापरखेडा परिसरात आहेत. याभागातही वाढत्या नागरिकीकरणामुळे रस्त्यांची सुविधा अपुरी झाली आहे. रस्ते रुंदीकरणासह नवीन होऊ घातलेल्या मेट्रो स्टेशनपासून नागरी वस्त्यांपर्यंत नवीन रस्त्यांची निर्मिती, याचबरोबर या परिसरात असलेल्या औद्योगिक आस्थापनापर्यंत भक्कम वाहतूक सुविधांचा नवीन आरखड्यात समावेश करण्याच्या सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशखेर बावनकुळे यांनी केल्या.

भविष्यातील गरजा लक्षात घेता नागरिकांना अधिकाधिक सुलभ सुविधा देण्यासाठी मोरभवन व गणेशपेठ बस स्थानकाच्या विकासासमवेत परसोडी, खैरी, वाडी, कापसी, कामठी या ठिकाणी सार्वजनिक बस स्थानकांचे हब विकसित करण्यासह ज्या भागात मेट्रो जात नाही त्या भागात सार्वजनिक वाहतुकीसाठी बस सुविधा परिपूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांनी नागपूर शहर व नागपूर महानगर प्रदेशासाठी नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (Comprehensive Mobility Plan CMP) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ती केंद्र सरकारच्या गृह व नगरविकास मंत्रालय (MoHUA) यांनी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात येत आहे. CMP हा एक दीर्घकालीन धोरणात्मक दस्तावेज असून, तो नागरी व माल वाहतुकीच्या व्यवस्थेस दिशा देतो. त्याद्वारे एकात्मिक, समावेशक आणि शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक त्या गुंतवणुकीस मार्गदर्शन मिळते.

नागपूर शहरासाठीचा पहिला आराखडा 2013 मध्ये नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामार्फत तयार करण्यात आला होता. त्यानंतर जुलै 2018 मध्ये महामेट्रो यांनी नव्याने सर्वेक्षण व सल्लामसलतीनंतर यामध्ये सुधारणा केली होती. नागपूरचा वाढता विस्तार लक्षात घेऊन या आराखड्यात नव्याने संशोधन करून भविष्यातील व्यापक गरजांचा विचार व नागरिाकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लामसलत बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राप्त झालेल्या सूचनांवर आधारित हा नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यावर आज लोकप्रतिनिधींसमवेत व्यापक चर्चा करण्यात आली.

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ

नागपूर, दि. 27: नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, महानगरातील मुलांना ज्या सेवासुविधांच्या माध्यमातून घरच्याघरीच जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा यादृष्टीने ‘मिशन बाल भरारी’ उपक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

मेट्रो भवन येथे भारतातील पहिल्या एआय अंगणवाडी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रविण दटके, संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व मान्यवर उपस्थित होते.

ही भारतामधील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून, अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘मिशन बाल भरारी’ अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यात आणखी 41 एआय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी मिटवून प्रत्येक मुलाचा उत्साह वाढावा, आनंद आणि कुतूहलाने त्याला शिकता यावे, हा या उपक्रमामागील भावनिक संकल्प आहे. हा संकल्प महाराष्ट्रातील बालशिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल असा विश्वास विनायक महामुनी यांनी व्यक्त केला.

भारताची पहिली एआय-सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱ्या  हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता, गाणी आणि अभ्यासक्रम शिकविण्यासाठी व्हिआर हेडसेट्स, एआय-संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही सोय प्रीमियम खासगी बालवाड्यांमध्येही उपलब्ध नाही, असे वैशिष्ट्य या प्रकल्पात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षयरोगमुक्त नागपूर मोहिमेचा शुभारंभ

नागपूर, दि 27 : संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षयरूग्णांवर वेळीच निदान आणि वेळीच उपचार झाला तर यातून संसर्गाचा धोका उरत नाही. नागपूर महानगरात उपचारा अभावी कोणताही क्षयरोग रूग्ण राहू नये यादृष्टीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर वतीने फिरते क्षयरोग निदान व तपासणी केंद्राच्या वाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी आमदार प्रविण दटके, डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, दयाशंकर तिवारी, अधिष्ठता डॉ. रवि चव्हाण व मान्यवर उपस्थित होते. नागपूर महानगरातील सुमारे 1 लाख उच्च जोखमीच्या व्यक्तींची या मोहिमेद्वारे तपासणी केली जाणार आहे.

00000

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

सातारा दि.27 (जिमाका) : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ झाला. वर्षभरात पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे सांगून हा उपक्रम सर्व ग्रामपंचायतींना आदर्शवत ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतच्या लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम सचिवालयामध्ये या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच किरण दशवंत, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण, ग्रामसेवक प्रमोद ठोके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, 1500 हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मल्हारपेठ ग्रामपंचायतने डिजिटल नेमप्लेट आणि क्यू आर कोड प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल युगाकडे झेप घेतली आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामप्रशासन अधिक लोकाभिमुख आणि अधिक स्मार्ट बनेल. लोकांना विविध प्रकारच्या सेवांसाठी ग्रामपंचायतमध्ये हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही. यामुळे त्यांच्या वेळ आणि पैसा यांचीही बचत होईल असेही सांगितले.
मल्हारपेठ ग्रामपंचायतीमधील प्रत्येक घराला डिजिटल नेमप्लेट देण्यात आली आहे. यावर दिलेल्या क्यूआर कोड स्कॅन करताच मालमत्ता कोणाच्या नावावर आहे, यावर कोणता कर भरलेला आहे, कोणता कर भरावयाचे बाकी आहे याबाबतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. घराचा आणि घर मालकाचा फोटो पाहण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आलेली आहे. कर मागणी पावती डाऊनलोड सुविधा असून चालू आणि थकीत कर ऑनलाइन भरण्याची सुविधा आहे.
सदरची डिजिटल नेमप्लेट गडद ग्रे रंगाची ॲल्युमिनियमची आहे. यावर मिळकत क्रमांक सोबत क्यूआर कोड आहे. प्रत्येक मिळकतीला एक युनिक नंबर देण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम साकारला आहे. या उपक्रमाद्वारे सर्व रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे. यातून पारदर्शकता वाढीस लागणार आहे. ग्रामप्रशासन अधिक लोकाभिमुख आणि अधिक स्मार्ट बनणार आहे. जीआयएस आधारित स्मार्ट नकाशाही तयार करता येईल. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनाच्या सूक्ष्म नियोजनासाठीही हे ॲप उपयुक्त ठरेल.

पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पत्रकारिता करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 27: पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)ने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पत्रकारांसाठी एकदिवशीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राम कैलाश मीना, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, प्रा. दीपक रंगारी, तुकाराम झाडे, नंदकिशोर तोष्णीवाल उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील मुद्रित माध्यमे, ईलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमांत काम करणा-या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार माध्यमात काम करताना दैनंदिन कमकाजात जास्तीत जास्त वापर करता येईल, याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात चँट जीपीटीच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या विषयाची माहिती टंकलिखित करताक्षणी काही सेकंदात उपलब्ध होते, आणखी काही शिक्षण विभागातील मुलांसाठी अभ्यासक्रमातील चाचणी परीक्षा घेण्यासाठी प्रश्न पत्रिकेचा मजकूर टाकल्यास प्रश्न आणि त्याचे उत्तरही सहज मिळते, त्यामुळे या चँट जीपीटीचा वापर करून सविस्तर माहिती मिळविता येते. मात्र आपल्याला काय हवे याची माहिती असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हा सूचना अधिकारी राम मीना यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याबाबत मार्गदर्शन करताना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

प्रा. दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन-संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना मराठी प्रमाणभाषेच्या शुद्धलेखनाचे नियम, शब्दाचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व, दीर्घ, ईकारांत याबरोबरच एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्भव शब्दांविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून पत्रकाराचे निर्दोष लिखाण कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले.

जिल्हा माहिती अधिकारी  प्रभाकर बारहाते यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अधिस्वीकृती पत्रिका, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आदी विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल, संतोष भिसे यांनी पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन चांगल्या प्रकारची माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रद्मुम्न गिरीकर यांनी केले, तर आभार चंद्रकांत कारभारी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत कारभारी, श्रीकांत देशमुख, गंगा देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

नाशिक, दि. २७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार श्री. पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नद्यांवर घाट बांधले. बारव, विहिरी बांधून जलसंवर्धनाचे काम त्यांनी केले.

सुवर्ण पदक विजेते महेश हिरे यांचा सत्कार

अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलिस आणि फायर स्पर्धा २०२५ मध्ये 10 मीटर एअर पिस्टल शुटिंग या प्रकारात सुवर्ण पदक विजेते सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांचा आज दुपारी जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अत्रे, डॉ. आरती हिरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील केदार, रतन लथ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत नव्या पिढीला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पोलिस दलाचे वरीष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिर्डी, दि. २७ जुलै –  राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहारगृहाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. केरू पानसरे, बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे, हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरी व समाजाच्या मालकीच्या संस्था असून, त्या नफ्यात व काटकसरीने कशा चालतील, याचा विचार आवश्यक आहे. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये वाढवण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढविण्याचा विचार शेतकऱ्यांनी करावा. शेतीमध्ये फळबाग लागवड, तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यात बदल, आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. नवीन पिढीने पर्यावरणपूरक व कचरामुक्त शहर उभारण्यास पुढाकार घ्यावा.
शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० लाख घरे मंजूर केली असून या घरांच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. लाडकी बहिण योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या योजनेचा लाभ केवळ अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील बहीणींनाच मिळणार आहे; नोकरदार कुटुंबांतील सदस्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असेही आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
श्री.पवार म्हणाले, राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविण्यासाठी २० हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, शेतकरी कल्याणाच्या विविध योजनांसाठी दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून पाच वर्षांत एकूण २५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणारे मासिक मानधन दीड हजार रुपयांवरून वाढवून आता अडीच हजार रुपये करण्यात आले आहे. कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडच्या माध्यमातून शासन कटिबद्ध असून त्यासाठीही आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. राज्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत शासनास कर्ज घेण्याची मुभा असून, देशातील एकूण जीएसटीपैकी महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के आहे. यातील ५० टक्के म्हणजे ८ टक्के जीएसटीचा वाटा राज्य शासनास प्राप्त होतो.
केंद्र शासनाने पुणे – अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली असून, भूसंपादन प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार असून, त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल. या मार्गामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. याठिकाणी सुसज्ज टर्मिनलसाठीही मंजुरी मिळालेली असून, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांद्वारे देश-विदेशातील भाविक शिर्डीत येऊ शकणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
राहूरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचे कौतूक करतांना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील उत्कृष्ट पहिल्या दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राहुरी बाजार समितीचा समावेश असून, लवकरच वाबूरी येथे १५ एकर जागेत अद्ययावत जिनिंग मिल सुरू करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीचे बांधकाम १ कोटी ८० लाख रुपये खर्चून करण्यात आले असून, समितीकडे १९ कोटी रुपयांचे ठेवी आहेत.
***

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. २७: – रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट  परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीने धोका पातळी, रायगड जिल्ह्यातील कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात हादगाव पाथरी येथे २० लोकांना मास्जिदीमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. तसेच माटेगाव येथे पूलावरुन पाणी जात असल्याने झीरो फाटा रस्ता सुरक्षास्तव बंद करण्यात आला आहे.  रायगड जिल्ह्यातील उरण जवळ समुद्रात बोट पलटी झाली असता त्यामध्ये असणाऱ्या ८ जणांपैकी ५ व्यक्ती पोहत बाहेर आल्या असून ३ व्यक्तींचे कोस्ट गार्ड, स्थानिक प्रशासन व बचाव पथकांच्या मदतीने शोधकार्य चालू आहे.

तापोळा महाबळेश्वर रस्ता बंद

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या असून भूस्खलनाच्या अनुषंगाने तापोळा महाबळेश्वर रस्ता सुरक्षास्तव बंद ठेवण्यात आला असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

०००००

‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर फुलणार हसू

मुंबई, दि. 27 : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम महा स्माईल्स मोहिमेमुळे आणि मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या सवंदेनशील पुढाकारातून हे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे ध्येय असून यासाठी त्यांनी विदर्भातील अशा बालकांवर उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या आवाहनाला ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे स्वप्न आता मिशन मोडवर साकार होतांना दिसत आहे.

‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्व यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून आता ही मोहीम पूर्णपणे मोफत राबविली जाणार आहे. ‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नसून, हजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे.

या आगळ्यावेगळ्या मोहिमेचा शुभारंभ नागपूर येथे 31 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन हॉस्पिटल, खापरी, येथून होणार आहे.

या पहिल्यावहिल्या उपक्रमाअंतर्गत पुढील 90 दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यात फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहेत. यामध्ये लवकर निदान, उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बालकांवर नागपूर, गोंदिया, अकोला, वर्धा येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

क्लेफ्ट विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात. जवळपास 700 मुलांपैकी एका मुलांमध्ये हा विकार दिसून येतो. यावर शस्त्रक्रिया करूनच हा विकास दूर करता येते. वेळीच उपचार केले नाहीत तर कान बधिर होणे, बोलण्यात अडथळा येणे अशा वेगवेगळ्या व्यंगासोबत सामाजिक एकटेपणा येऊ शकतो. तथापि या विकारावर उपचार असून 6-7 शस्त्रक्रियेनंतर यावर पूर्णपणे मात करता येते. या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही. म्हणूनच संवेदशील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी क्लेफ्ट वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावे, यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.

क्लेफ्ट विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते. यासाठी केवळ उपचारच नव्हे, तर जागरूकता ही देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे ‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो कुटुंबांना एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे. अपूर्ण माहितीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या समस्येवर आता तज्ज्ञांच्या मदतीने प्रभावी उपचार मिळणार आहे.

स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या 11 जिल्ह्यातील मुलांमध्ये जन्मजात आलेले दुभंगलेले ओठ आणि टाळू विकार दूर होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

 

0000

‘ई-लायब्ररी’ चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण: वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

अमरावती, दि. २६ (जिमाका): अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज  ‘स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी’चे अमरावती ल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना इंजिनिअरींग कॉलेज, बडनेरा रोड येथे करण्यात आले. सरन्यायाधीश, न्या. भूषण गवई यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे,  मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती  न्या. अनिल किलोर, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. नितीन सांबरे, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ तथा अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती  न्या. प्रविण पाटील, अमरावतीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, ज्येष्ठ अधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा आदी यावेळी उपस्थित होते.

सरन्यायाधीश न्या. गवई म्हणाले, व्यावसायिक विस्तारीकरण झाले आहे. ई -हिअरिंग अशा विविध माध्यमातून नव तंत्रज्ञान आज न्यायदान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावित आहे. आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर न्यायदान क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे .कायदेशीर अभ्यासाला आणि संशोधनाला गती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ई-लायब्ररीमुळे वकील तसेच कायदेविषयक अभ्यासकांना डिजिटल माध्यमातून अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या ई-लायब्ररीमुळे कायदेशीर संदर्भ, निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील, ज्यामुळे वकिलांना खटल्यांची तयारी करणे अधिक सोयीचे होईल. ॲड. टी. आर. गिल्डा यांच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांच्या नावाने सुरू झालेली ही ई-लायब्ररी कायदेशीर व्यवसायातील नव्या पायंडा रचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

न्यायदानाच्या प्रक्रियेत खूप बदल झाले आहे. इंटरनेट सुविधेमुळे कामकाजाचे स्वरूप बदलले आहे. यासाठी ई -लायबरी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ई-लायब्ररीचा आपल्या कार्यक्षेत्रात उपयोग करून घ्यावा. नवीन पिढीतील वकिलांना याचा निश्चित फायदा होईल. वकिलांनी रोज वाचन करणे आणि ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. ‘वाचाल तर वाचवाल’ यानुसार अशीलाला मदत करण्यासाठी पारंपारिक वाचन पद्धतीसोबतच ई -लायबरी निश्चितच मदतनीस ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सरन्यायाधीश. न्या. गवई यांनी ई-लायब्ररीच्या गरजेवर आणि तिच्यामुळे कायदेक्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांबाबत यावेळी समाधान व्यक्त केले. कारगिल दिनानिमित्त त्यांनी शहिदांचे स्मरण करून अभिवादन केले.

ज्येष्ठ अधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा यांनी इ लायब्ररीच्या स्थापनेसाठी देणगी दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी केले. सूत्रसंचलन जिल्हा सरकारी वकील ॲड. परीक्षित गणोरकर आणि सहायक सरकारी वकील ॲड. सोनाली क्षीरसागर यांनी केले. आभार अमरावती जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. लांडे यांनी मानले.

कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे अमरावती विमानतळ येथून प्रस्थान झाले. यावेळी आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

00000

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...