शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 66

आरोग्य शिबिरातून मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात गतीने पुढे नेणार असून, नागरिकांना मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. कोल्हापूर येथील सेवा रुग्णालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयोजित मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, या ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिरात 1 हजार नागरिकांची तपासणी, आवश्यक साहित्यांचे वाटप आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. सेवा रुग्णालयात येणाऱ्या काळात एम.आर.आय., सी.टी. स्कॅन मशीन, कॅथ लॅब आणि आय.पी.एच.एल. लॅब या अत्याधुनिक प्रस्तावित सुविधांमुळे नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत चष्मे आणि श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले.

राज्यात शासनाने सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केले. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्याच परिसरात आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून भविष्यात आरोग्यसेवेसाठी रुग्णांना खर्चच करावा लागणार नाही, यासाठी राज्यभर मोफत आरोग्य सुविधा उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

खासदार डॉ. शिंदे पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, त्यांची आरोग्य तपासणी, शासन आपल्या दारी अशा अनेक योजनांद्वारे उल्लेखनीय काम केले आहे. आतापर्यंत राज्यातील एक कोटी महिलांची कर्करोग तपासणी पूर्ण झाली आहे.

उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी आभार मानले. या शिबिरात आणि प्रस्तावित कामांच्या शुभारंभ सोहळ्यात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

000000

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय  – पालकमंत्री शंभूराज देसाई 

सातारा दि.२६ : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना लोकप्रतिनिधींसह समाजातील नागरिकांनी आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सैनिक स्कूलच्या सभागृहात कारगिल विजय दिवस पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या समारंभाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सैनिक स्कूलचे प्राचार्य के. श्रीनिवासन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे, जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, निवृत्त कर्नल आर.जे. कांबळे, शंकर माळवदे आदी उपस्थित होते.
१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने शत्रू राष्ट्राला चांगला धडा शिकवला, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शत्रू राष्ट्राला एक इंचही जागा भारतीय सैन्य दलाने घेऊ दिली नाही, याद्वारे आपल्या सैन्याने आपले शौर्य आणि बलिदान पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. त्यांच्या पराक्रम व शौर्यामुळे आपण निर्धास्तपणे राहत आहोत. भारतीय सैन्य दलातील आजी माजी सैनिकांना नेहमीच मान, सन्मान दिला पाहिजे.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक योजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मुलांसाठी वसतिगृह, माजी सैनिकांसाठी विश्रामगृह उभारणी या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून प्रथम करण्यात येणार आहे. यासाठी उद्योगांकडील सीएसआर फंड सामाजिक बांधीलकी म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. जनता दबाराच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले. त्यांना एक प्रकारे आधार देण्याचे कामही या माध्यमातून करण्यात येत आहे. समाजातील प्रत्येकाने सामाजिक बांधीलकी म्हणून त्यांच्या कार्याची त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. हंगे यांनी कारगिल युद्धातील सहभागाच्या आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमास वीरपत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक आणि माजी सैनिकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील भारतमातेच्या रक्षणार्थ कारगिल युध्दामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच या युध्दामध्ये दिव्यांगत्व आलेल्या आणि शौर्य पुरस्कारधारक यांचा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई व्यासपीठावरून खाली उतरले आणि प्रत्येकाजवळ स्वतः जाऊन त्यांनी त्यांना सन्मानित केले. सैनिकांप्रती असणाऱ्या आदर अशाप्रकारे त्यांनी व्यक्त केला.
000

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई 

सातारा दि.२६ – पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मंजूर केलेल्या  घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकींना जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक निलेश गहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्द, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त कुटुंबांची संख्या ५४६ आहे. या सर्व कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी घरकुले मंजूर करण्यात आली
आहे. यासाठी निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. धावडे येथे ७९, काहीर ३७, आंबेघर ३०, गोकुळ तर्फ ८, चाफेर १०२ येथे काम सुरू आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. देशमुखवाडी येथील १९२ घरकुलांचे काम पावसाळ्यानंतर त्वरित सुरू करावे.
 त्याबरोबरच मोडकवाडी येथील ८८ घरकुलांच्या जागेसाठी पाहणी तातडीने करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
पापर्डे व येराड येथील जल पर्यटन केंद्राचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कामांची निविदा तात्काळ काढावी या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या कामांमध्ये काही अडचणी असतील तर त्या तातडीने दूर कराव्यात.
कराड चिपळूण मार्गाचा आढावा घेताना पालकमंत्री देसाई म्हणाले, म्हावशी फाटा ते संगम धक्का मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदाराने मिशन मोडवर काम करावे. कुठे अतिक्रमणे असतील तर ती तातडीने काढावी, अशा सूचना करून वाटोळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर 

सातारा दि.२६ – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी ता. माण या संस्थेचे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या नामांतर सोहळ्याला दहिवडीच्या नगराध्यक्षा नीलम जाधव, प्राचार्य दाजी ओंबासे, अक्षय जाधव, गोंदवलेकर महाराज मंदिर संस्थांचे विश्वस्त विजय कुलकर्णी, जयंत परांजपे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. गोरे म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने नवनवीन व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करावे, विद्यार्थ्यांना सहज रोजगार उपलब्ध होतील असे प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षण संस्थेला माझी नेहमी सहकार्याची भूमिका राहील.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री श्री. गोरे म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये सहज रोजगार उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनीही कोणत्याही कामाला कमी लेखू नये, त्यातूनच प्रगती साधली जाईल,
0000

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणांनी सज्ज रहावे – महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. २६ : येत्या काळात जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सव व यात्रा प्रसंगी कायदा-सुव्यवस्था व शांतता कायम राखण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

पोलीस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शहर व ग्रामीण पोलीस विभागाची आगामी सण उत्सव व यात्रांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशी, शिवाजी राठोड, राजेंद्र दाभाडे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

येत्या काळात नागपंचमी उत्सव, नारळी पोर्णिमा, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव, बैलपोळा, तान्हापोळा, मारबत मिरवणूक उत्सव, गणेशोत्सव आदी सणोत्सव नागपूर शहरात शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी परिमंडळानुसार शांतता समितीच्या बैठका आयोजित कराव्या. तसेच शहरात कायदा व  सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सर्व उपाय करण्याच्या सूचना श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. शहर पोलिसांना आवश्यक अद्ययावत साधन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, कामठी येथील पोलीस भवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पालकमंत्री  श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी सण उत्सव व यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त सर्वश्री अनिल म्हस्कर, दीपक अग्रवाल, वृष्टी जैन, विजय माहुलकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आगामी सणोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती यावेळी श्री. पोद्दार यांनी दिली. तसेच विभागाकडून राबविण्यात येत असलेला झिरो फॅटॅलिटी प्रोग्राम आणि याअंतर्गत माहिती विश्लेषणासह गुन्हे तपासात आलेली सुकरता, एआयचा करण्यात येत असलेला प्रभावी उपयोग आदींची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण भागात अवैध लॉटरी, अवैध वाळू व्यवहार आदींना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले. पोलीस स्टेशन परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या तसेच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांनी वेळोवेळी ग्राम भेटींच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या सूचनाही केल्या.

 तत्पूर्वी, महिला व बालकांच्या लैंगिक शोषणा विरोधी आणि मानवी तस्करी विरोधात नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन शक्ती आणि शक्ती हेल्प डेस्कचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

             000000

वंचित घटकांना न्याय देणे हे सर्वांचे कर्तव्य -पालकमंत्री नितेश राणे

प्राप्त तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश
नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी दि. २६ (जिमाका) :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना घटनात्मक अधिकार मिळाले आहेत. सामान्य माणसाला मिळालेले अधिकार आबाधित राहिले पाहिजे. आज लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी ,अधिकारी म्हणून जी खुर्ची किंवा अधिकार आपल्याला प्राप्त झाले आहेत ते वंचित घटकांच्या, जनतेच्या सेवेसाठी, त्यांचे भविष्य घडविण्यासाठी आहेत. समाजातील वंचित घटकांच्या अडीअडचणी दूर करुन त्यांना न्याय मिळवून देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘वंचित घटकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे,  जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.


या जनता दरबारात २०० पेक्षा जास्त तक्रारी, निवेदन नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडले. पालकमंत्र्यांनी देखील तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करत अनेकांचे प्रश्न सोडविले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, वंचित घटकांसाठी आज जो ‘जनता दरबार’ आयोजित केलेला आहे, हा एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.  आपल्याला वंचित समाजाच्या प्रत्येक घटकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचे आहे. वंचित घटकांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु आपण जनतेच्या अडी अडचणी सोडवत नसल्याने त्यांना जनता दरबारामध्ये येऊनच न्याय मागण्याची वेळ येत असेल तर प्रत्येकांनी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आजच्या दरबारात नागरिकांनी एखादा दाखला मिळत नाही, जमिनीवर अतिक्रमण झाले आहे असे आपणाला लहान वाटणारे प्रश्न परंतु त्यांच्या आयुष्यामधील ते महत्त्वाचे आहेत. परंतु असे प्रश्न देखील आपण सोडवू शकत नसू तर ही बाब प्रशासन म्हणन योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे सरकार पारदर्शक आणि लोकांचं आयुष्य घडवणारे सरकार आहे. लोकांच्या  हिताचे निर्णय घेऊन त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असणार आहोत. आज जे निवेदन, तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सोडवाव्यात. या तक्रारी पुन्हा माझ्याकडे येणार नाहीत याची संबंधित विभाग प्रमुखांनी गांभीर्यांने दखल घ्यावी. आजच्या दरबाराच्या माध्यमातून वंचित घटकांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. परंतु काही प्रश्न हे धोरणात्मक असल्याने ते शासनाकडे पाठविले जाणार  असून पालकमंत्री म्हणून त्या प्रस्तावाचा पाठपुरावा मी करणार असल्याचेही ते म्हणाले.
पुढे पालकमंत्री म्हणाले की, पालकमंत्री म्हणून मी नेहमीच आपल्या जिल्ह्यात नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला आहे. प्रशासनामध्ये ए.आय. चा प्रभावी वापर हा प्रयोग आता इतर जिल्ह्यांमध्ये देखील अंगिकारला जात आहे. आजचा जनता दरबाराची देखील नक्कीच दखल घेतली जात असून काही दिवसांनी हा पॅटर्न इतर जिल्ह्यात देखील राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.

०००००

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

मुंबईदि. २६:- यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये मातीचा मलबा ढासळल्याने दि. २५ रोजी सायंकाळी काही काळ वाहतूक बंद झाली होती. याबाबत तात्काळ कार्यवाही करून महामार्गावरील या दोन्ही लेनमधील वरील वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू आहे असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

एक्सप्रेस वे वर ४५/३०० किमी अंतरावर सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये रस्त्यावर झाडाच्या फांद्या व काही मातीचा मलबा ढासळला होता. काही काळ वाहतूक बंद झाल्याने त्याबाबत माध्यमातून वृत्त आले होते. एमपीईडब्ल्यू पॉईंट येथे तैनात असलेल्या पथकाने जेसीबी व यंत्रणेच्या सहाय्याने पावणे सात वाजता ते पूर्णपणे दूर करण्यात आले. महामार्गावरील या दोन्ही लेनमधील वरील वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात आली.

तोपर्यंत एक लेन मोकळी करण्यात आली. त्यानंतर १८:४४ वाजता सर्व लेन मोकळी करण्यात आल्या आणि १८:४५ पर्यंत वाहतूक पूर्णपणे मोकळी झाली. एक्सप्रेसवेची वाहतूक स्थिती सामान्य आहे आणि सर्व लेनमधील सर्व वाहनांसाठी खुली आहेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

000

कृषी औद्योगिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २९ जुलै २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री ८.०० वाजता प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते, किटकनाशके, कृषी अभियांत्रिकी उपकरणे व पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळामार्फत रासायनिक व जैविक किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, तसेच प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक यंत्रसामग्री शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम, सुरक्षित आणि शाश्वत होण्यास हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या योजना, उपक्रम व महामंडळाची कार्यपद्धती याविषयी डॉ. गोंदावले यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संवाद साधला आहे.

000

बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि. २६:- अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी  छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी  ५९ कोटी ९८ लाख २० हजार, पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार,नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार, कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदतीचा समावेश आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मंत्री मकरंद जाधव-पाटील

राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे  तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या  मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे, असेही मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

0000

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. २६ : सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, रेशीम संचालनालयाचे संचालक विनय मुन, उपसचिव श्री.पवार, उपसचिव श्रीमती कोचरेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकारी सूतगिरण्यांना प्रति चाती रुपये पाच हजार प्रमाणे द्यावयाच्या कर्जावरील व्याज अनुदान योजनेस मुदतवाढ देताना यामध्ये आधुनिकीकरण आणि श्रेणीकरण करण्यात यावी. राज्यामधील राष्ट्रीय वस्त्र महामंडळाच्या अंतर्गत बंद असलेल्या मिल पुन्हा सुरू करण्याबाबत अहवाल तयार करावा. त्या आधारे बंद मिल पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. याचबरोबर सहकारी सूतगिरण्या व सहकारी यंत्रमाग संस्थाकडील शासकीय देणी वसुलीबाबत धोरण तयार करण्यात यावे. याचबरोबर राज्यातील सर्व यंत्रमागाच्या नोंदी करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. पुणे येथील रेशीम संचालनालयाच्या वापरात असलेली इमारत दुरुस्ती व इतर सोयी सुविधा निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

नवीन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ निर्माण करणे, वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालयाचे विलीनीकरण करून वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालयाची निर्मिती करणे, सहकारी सूतगिरण्यांकडील अतिरिक्त जमीन विक्रीस परवानगी देण्याबाबतची योजना, सूतगिरण्यांना पुनर्वसन कर्ज देण्यासाठी नवीन योजना तसेच सूतगिरण्या भाडेपट्टीवर देण्यासाठी योजना तयार करणे, सहकारी सूतगिरणी यांची प्रकल्प अहवाल किंमत रुपये ८०.९० कोटी वरून रुपये ११८ कोटी इतकी सुधारित करण्याबाबतची कार्यवाही करणे, सातारा जिल्ह्यातील वाई येथील रेड क्रॉस सोसायटी यांच्याकडील लिजवरील जागा जिल्हा रेशीम कार्यालयाकरिता कायमस्वरूपी घेणे आदी महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
००००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...