शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 593

मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदान दिवसापूर्वी आणि मतदानादिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

तसेच कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदानादिवशी (दि. २० नोव्हेंबर २०२४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) मुद्रित  माध्यमांत कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व – प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत प्रकाशित करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. तरी सर्व संबंधितांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी कळवले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टी

मुंबई, दि. ११ : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नमूद केले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त आचारसंहिता भंगाच्या ४,६८३ तक्रारी निकाली

मुंबई, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत दि. १५ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

सोबत : जिल्हानिहाय तक्ता

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/seizure-all-distwise-report-2024-11-11-1731303146.pdf”]

०००

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची उद्या ‘जय महाराष्ट्र’ तर १२ व १३ रोजी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. ११: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता राज्य निवडणूक आयोगाची तयारी’  याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर प्रसारित होणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १२ आणि बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोई सुविधा, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम, कायदा व सुव्यवस्था, राज्यातील सर्वच घटकातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केलेली तयारी याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. 

०००

मतदार जनजागृतीसाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार शुभारंभ व बाईक फेरी

नंदुरबार, दि. ११ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅन व बाईक रॅलीच शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार शहरात करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, नंदुरबार विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शरद पाटील, सचिन गोसावी, नंदुरबार तालुक्याचे सर्व केंद्रप्रमुख, नंदुरबार तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच नंदुरबार तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून रॅलीस सुरुवात होऊन नवापूर चौफुली- धुळे चौफुली- श्रॉफ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर-अंधारे चौक- नगरपालिका-नेहरू पुतळा-गांधी पुतळा- उड्डाण पूल-सिंधी कॉलनी या मार्गाने रॅलीचे आयोजन होऊन शहरातील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीचा शुभारंभ SVEEP चा झेंडा तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डीजिटल व्हॅनला देखील हिरवी झंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही व्हॅन नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीचे उपक्रम राबविणार आहे. रॅलीच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निवडणुकीचे घोषवाक्य लावलेले फुगे हवेत सोडून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत तसेच फ्लॅश मॉब अंतर्गत निवडणुकीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. समारोप प्रसंगी उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.

०००

लोकशाही बळकटीकरणसाठी उत्स्फूर्तपणे मतदान करा – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर

  • मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी उपक्रम
  • मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम

सोलापूर. दि. ११ : भारतीय  लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. विशेषतः नव मतदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी आज येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वीप मल्टीमीडिया व्हॅनच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, शिक्षणाधिकारी कादर शेख, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मागील विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांमध्ये मल्टीमीडिया व्हॅनच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ही व्हॅन सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील १०० हून अधिक ठिकाणी प्रवास करेल, ज्यात मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांचा समावेश आहे. ही व्हॅन मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधाची माहिती आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे व्हिडिओ संदेश एलईडी स्क्रीनवर पाहता येणार आहे.मतदारांचा सहभाग वाढविणे आणि नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबद्दल साक्षर करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. शाहीर रमेश खाडे यांच्या पथकाने मतदान करण्याविषयी गाण्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावर्षी प्रथमच मतदान करत असलेल्या भाग्यश्री अंकलगी आणि नागेश सोनसाखळे यांनी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत सर्वानी मतदान करावे, असे आवाहन केले. या नव मतदारांचा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी स्वीपचे सहायक नोडल अधिकारी रुपाली भावसार, गोदावरी राठोड, स्वाती स्वामी, अमोल भोसले, शाहबाज काजी, अनिल थोरबोले, साईराज राउळ, योगीराज कोंडाबत्तीन आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संगमेश्वर कॉलेज आणि वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

मतदार जनजागृतीसाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचाराचा शुभारंभ आणि बाईक फेरी संपन्न

नंदुरबार, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डिजिटल व्हॅनचा व बाईक रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार शहरात करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, नंदुरबार विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, शरद पाटील, सचिन गोसावी, नंदुरबार तालुक्याचे सर्व केंद्रप्रमुख, नंदुरबार तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच नंदुरबार तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ‌्या प्रमाणावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून रॅलीस सुरुवात होऊन नवापूर चौफुली- धुळे चौफुली- श्रॉफ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर-अंधारे चौक- नगरपालिका-नेहरू पुतळा-गांधी पुतळा- उड्डाण पूल-सिधी कॉलनी या मार्गाने रॅलीचे आयोजन होऊन शहरातील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीचा शुभारंभ SVEEP चा झेंडा तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या  केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत मतदान जनजागृतीसाठी पाठविण्यात आलेल्या डिजिटल व्हॅनला देखील हिरवी झंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. सदर व्हॅन नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीचे उपक्रम राबविणार आहे.

रॅलीच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निवडणुकीचे घोषवाक्य लावलेले फुगे हवेत सोडून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत तसेच फ्लॅश मॉब अंतर्गत निवडणुकीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. समारोपप्रसंगी उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.

0000000000

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर, दि. १० (जिमाका):  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम. मस्करे यांनी दिली आहे.

कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर- नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 ला राधानगरी – कोल्हापूर रोडवरुन एका चारचाकी सिल्व्हर कलरच्या जेनिओ वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली असता दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची जेनिओ रजि.क्र. MH-07-P-4755 येत असलेली दिसली. या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले विविध ब्रँडचे 180, 500 तसेच 750 मिलीचे एकुण 151 बॉक्स आढळून आले.

या प्रकरणी प्रसाद महादेव नराम मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदर्ग या व्यक्तीस अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या गाडीत मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य व बिअर चा मद्यसाठा आढळून आला. अटक केलेल्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भातील पुढील तपास सुरु आहे.

०००

आक्षेपार्ह विधानाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर, दि. १०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता १५ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता. करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना देण्यात आली होती. याबाबत धनंजय महडिक यांनी खुलासा सादर केला. याबाबत सादर केलेला खुलासा अमान्य करीत खासदार श्री. महडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यानुसार भारतीय न्याय संहिता बी एन एन एस २०२३ अंतर्गत १७१ (२) (a) अंतर्गत दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२३ वा जुना राजवाडा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

०००

निवडणूक प्रचारासाठी कोल्हापुरात १ हजार ४०६ अर्जांना परवानग्या

कोल्हापूर, दि. १० (जिमाका) : विधानसभा निवडणूक 2024 लढविणाऱ्या उमेदवारांना प्रचाराच्या अनुषंगाने लाऊडस्पीकर, हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड, पक्षाचे तात्पुरते कार्यालय उघडणे, पॅम्प्लेट वाटप, व्हिडिओ व्हॅन, सभा, रॅली, मिरवणूक, बॅनर, पोस्टर, होर्डिंग, वाहन तसेच अन्य आवश्यक त्या परवानग्यांची आवश्यकता असते. त्याअनुषंगाने विविध परवानग्या देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक खिडकी कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाकडे दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत 1 हजार 715 अर्ज परवानग्या मागण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 हजार 406 अर्जांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच 69 अर्ज नामंजूर करण्यात आले असून 232 अर्जांवर कार्यवाही सुरु आहे. तर 8 अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

प्रचारासाठी आवश्यक परवानग्यांची माहिती पुढीलप्रमाणे…

घरोघरी प्रचार (Door to Door) करीता आलेले अर्ज- 60, मंजूर -36.

हेलिकॉप्टर आणि हेलिपॅडसाठी आलेले अर्ज -8, मंजूर-8.

लाऊडस्पीकर परवानगीसाठी आलेले अर्ज- 5, मंजूर- 1.

पक्षाचे तात्पुरते कार्यालय उघडण्यासाठी आलेले अर्ज-33, मंजूर-30.

पॅम्प्लेट वाटपासाठी आलेले अर्ज-20, मंजूर-10,

व्हिडिओ व्हॅनच्या परवानगीसाठी आलेले अर्ज-69, मंजूर-55,

सभा आणि लाऊड स्पीकर परवानगीसाठी आलेले अर्ज-311, मंजूर-250,

लाऊड स्पीकर शिवाय सभा घेण्याच्या परवानगीसाठी आलेले अर्ज -12, मंजूर-12.

रत्यावरील कोपरा सभा आणि लाऊड स्पीकर परवानगीसाठी आलेले अर्ज-182, मंजूर- 142,

मिरवणूक आणि लाऊड स्पीकर काढण्यासाठी परवागनी आलेले अर्ज-5, मंजूर-5.

रॅलीसाठी आलेले अर्ज-306, मंजूर-246.

बॅनर आणि ध्वज प्रदर्शित करण्यासाठी अर्ज-9, मंजूर-7.

पोस्टर, होर्डिंग आणि युनिपोल प्रदर्शित करण्यासाठी अर्ज- 53, मंजूर-48.

वाहन परमिटसाठी अर्ज-245,  मंजूर-212,

वाहन परमिटसाठी अर्ज (जिल्हा अंतर्गत)-1, मंजूर-0,

लाऊडस्पीकर परमिट असलेल्या वाहनासाठी अर्ज- 333, मंजूर-290.

उमेदवारासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रासाठी एक वाहन साठी अर्ज-23, मंजूर-19.

उमेदवार निवडणूक प्रतिनिधीसाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रासाठी एक वाहन साठी अर्ज-4, मंजूर-4.

पक्ष/पक्ष कार्यकर्त्यासाठी प्रति विधानसभा क्षेत्र एक वाहन साठी अर्ज-2, मंजूर-2.

रोस्ट्रम/बॅरिकेड बांधण्यासाठी परवानगी अर्ज- 1, मंजूर-1.

मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी वाहन परवानगी अर्ज- 9, मंजूर-4.

एसी असलेल्या वाहनाची परवानगी अर्ज- 24, मंजूर-24

या प्रमाणे विविध बाबींसाठी परवानग्या देण्यात आल्या आहेत.

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...