शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 592

राज्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी लाभो : विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

लातूर जिल्ह्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर (दि.12)  : वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी  श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सौ. सायली पुलकुंडवार तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. भाविकांच्या सेवेसाठी दर्शन मंडप स्काय वॉक, दर्शन रांग आदी विविध सुविधांची कामे प्रस्तावित केली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सतत पाठपुरावा करीत आहेत.  भविष्यात पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत ही निवडणुकीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडो जास्तीत जास्त संख्येने मतदार राजांनी भाग घेऊन देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी सर्व भाविकांचा तसेच जनतेचा सहभाग लाभो असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मानाचे वारकरी

कार्तिकी एकादशी यात्रा 2024 निमित्त मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर  2024 रोजी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सगर दापत्य हे  गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.  हे दाम्पत्य मागील १४ वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहे. या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.

प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार  व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात सांगितले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांना मंदिर समितीमार्फत पत्रा शेड, दर्शन रांग, दर्शन मंडप आदी ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच मंदिर समिती मार्फत मोफत अन्नदान करण्यात येत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसरातील परिवार देवतांच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराच्या अनुषंगाने जतन व संवर्धन कामास सुरवात झाली असून, मंदिरास मुळ रूप येत आहे. याशिवाय, दर्शनरांगेत स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकामास देखील लवकर सुरुवात करून दर्शनरांगेतील भाविकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच भाविकांसाठी येत्या आषाढी वारीपर्यंत टोकन दर्शन व्यवस्था उपलब्ध  करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले. तर सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले.

000000

 नांदेड येथे मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ

नांदेड, दि. ११: मागच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे, त्याठिकाणी  एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आजपासून केंद्रीय संचार ब्युरो  यांच्यामार्फत नांदेड विधानसभा मतदार संघातील गावामध्ये एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. आज या एलईडी व्हॅनला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी परिसरात हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल आदींची  उपस्थिती होती.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. सर्व मतदार संघातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे. यासाठी स्वीपअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. मतदारापर्यत पोहोचवून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच स्वीपचे नोडल अधिकारी यांच्यामार्फत विविध मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम सुरु आहेत.

मागील निवडणुकीत जेथे मतदान कमी झाले आहे, तेथे हे एलईडी वाहन जाऊन जनजागृती करेल. या वाहनामार्फत दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन मतदारांना आवाहन करणारे मतदानाचा संदेश देणे या वाहनाचा उद्देश आहे. या वाहनासोबत जिल्ह्यातील व राज्यातील मान्यवरांचे आवाहानात्मक संदेश प्रसारित होणार आहे. या वाहनाच्या वापरामुळे जिल्ह्यात नक्कीच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार असून, चांगल्या प्रकारे जनजागृती होईल, असे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

येत्या २० नोव्हेंबरला मतदानासाठी घराबाहेर पडा

जिल्ह्यात मागील निवडणुकीत जिथे जिथे मतदान कमी झाले आहे, तीथे तीथे ही मतदार जनजागृतीची एलईडी व्हॅन फिरणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात नांदेडला 25 वर्षानंतर या दोन्ही निवडणूक एकत्र होत आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला जेव्हा मतदार बुथवर जातील तेव्हा त्यांना दोन वेगवेगळे मशिन दिसतील. यावेळेस मतदारांना लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभेसाठी दोन बटन दाबायचे आहे. प्रत्येक नागरिक, युवा-युवतींनी मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी केले आहे.

मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन जाणार या गावात

मतदार जनजागृतीसाठी केंद्रीय संचार ब्युरो यांच्यामार्फत एलईडी व्हॅन 11 ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील विविध गावामधून फिरणार आहे. यामध्ये 11 नोव्हेंबर रोजी नांदेड उत्तरच्या जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, एसपी ऑफीस चौक, शिवाजीनगर, आयटीआय चौक, राज कार्नर, तरोडा नाका, भावसार चौक, अर्धापूर शहरात 3 ते 4 ठिकाणे (अर्धापूर येथे मुक्काम). दि. 12 नोव्हेंबर रोजी हदगाव व किनवट विधानसभा क्षेत्रात लहान फाटा, तामसा गावात 3 ते 4 ठिकाणी, हदगाव येथे 3 ते 4 ठिकाणी, माहूर 3 ते 4 ठिकाणी. (माहूर येथे मुक्काम). दिनांक 13 नोव्हेंबर रोजी हदगाव किनवट मतदार संघात वाई, सारखणी येथे 2 ठिकाणी, किनवट शहरात 4 ते 5 ठिकाणी, बोधडी, इस्लापूर येथे 2 ठिकाणी, हिमायतनगर 3 ते 4 ठिकाणी. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी भोकर मतदारसंघातील भोकर शहरात 4 ते 5 ठिकाणे, बारड येथे 2 ठिकाणी, मुदखेड येथे 3 ते 4 ठिकाणी तसेच उमरी येथे मुक्काम. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी उमरी शहर, धर्माबाद शहर, कुंडलवाडी शहर, बिलोली शहर, नायगाव शहर, दिनांक 16 नोव्हेंबर रोजी देगलूर शहर, होट्टल, मरखेल, करडखेड, मुक्रमाबाद,, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुखेड मतदारसंघातील बाऱ्हाळी, मुखेड शहर, कुरुळा, पेठवडज, कंधार मुक्काम, 18 नोव्हेंबर रोजी लोहा मतदार संघातील कंधार शहर, माळाकोळी, लोहा शहर, सोनखेड, 19 नोव्हेंबर रोजी नांदेड दक्षिण मतदारसंघातील कारेगाव, जानापुरी, वाडी पाटी, विष्णुपुरी, हडको नांदेड, सिडको नांदेड, वाजेगाव, देगलूर नाका याठिकाण जाणार आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी नांदेड दक्षिण उत्तर मतदार संघातील नमस्कार चौक नांदेड, हिंगोली नाका, अण्णाभाऊ साठे चौक, नवीन मोंढा चौक, आनंदनगर, भाग्यनगर, वर्कशाप कॉर्नर नांदेड याठिकाणी जाणार आहे.

०००

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

धुळे, दि. ११ (जिमाका): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होत आहे. या  दिवशी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून लोकशाही बळकटी करणासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आमळी येथे चित्रप्रदर्शन उद्धाटन प्रसंगी केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, जळगाव आणि जिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणूक 2024 मतदान जनजागृती मल्टीमिडीया चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन आज साक्री तालुक्यातील आमळी येथे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी डी. सर्वानंद, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अपर तहसिलदार दत्ता शेजुळ, सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, माहिती व प्रसारण विभागाचे सहायक प्रचार अधिकारी विकास तापकीर, तलाठी कंचन पवार, कन्हैयालाल ट्रस्टचे अध्यक्ष किरण दहिते आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले की, भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, जळगाव आणि जिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती मल्टीमिडीया चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन आज होत असून या मतदान जनजागृती प्रदर्शनाचा येथील नागरिक लाभ घेऊन त्याचा मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निश्चित मदत होईल. येत्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे. या मतदानाच्या उत्सवात सर्वांनी आवर्जुन सहभागी होऊन आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच, आपल्या परिसरातील नातेवाईक कामानिमित्त जर बाहेरगावी गेले असतील तर त्यांना मतदानाच्या दिवशी बोलावून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्धाटन केले. यावेळी येथे मांडण्यात आलेल्या प्रदर्शनाची मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी आप की जय बहुउद्देशीय संस्था, अंमलपाडा, जि.नंदुरबार यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रमाचे सादरीकरण केले. हे प्रदर्शन तीन दिवस नागरीकांसाठी खुले राहणार आहे. याचा आमळी येथे यात्रेनिमित्त येणाऱ्या नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तसेच बाहेर गावाहून आलेले नागरीक उपस्थित होते.

०००

चंद्रपूर येथे ईव्हीएम वर ‘मॉकपोल’ करून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केली खात्री

चंद्रपूर, दि. ११ : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालयामध्ये मतदान यंत्र सज्ज करण्याच्या प्रक्रियेची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी पाहणी करून एका मशीनवर स्वत: ‘मॉकपोल’ करून बघितले. यावेळी चंद्रपुरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार उपस्थित होते.

मतदानासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाबाबत प्रशासनाची लगबग वाढली आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया चंद्रपूर तहसील कार्यालयात दोन दिवस पार पडली. आज (दि. 11) जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तहसील कार्यालयाला भेट देत मतदान यंत्र  सज्ज करण्याची प्रक्रिया पाहिली. तसेच उमेदवारांच्या नावासंदर्भात तपासणी करून घेतली. यावेळी त्यांनी एका मशीनवर ‘मॉकपोल’ करून व्हीव्हीपॅटद्वारे दिसणाऱ्या चिठ्ठीचीही स्वत: खात्री केली.

मतदानानंतर लगेच तीन दिवसांनी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी कक्षाच्या पुर्वतयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्ष ले-आऊट बद्दल तसेच सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण परिसर कव्हर व्हायला पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 936 बॅलेट युनीट, 468 कंट्रोल युनीट आणि 503 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. मशीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे एकूण 30 टेबल लावण्यात आले. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी याप्रमाणे एकूण 90 कर्मचाऱ्यांमार्फत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह मशीन सज्ज करण्यात आल्या. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 390 मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी 5 टक्के म्हणजे 23 मशीन मॉक पोलकरीता रॅन्डम पद्धतीने निवडण्यात आल्या. प्रत्येक मशीनवर 1000 याप्रमाणे दोन दिवसांत 23 मशीनवर 23 हजार मॉक पोल घेण्यात आले.

०००

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रचाररथ रवाना

छत्रपती संभाजीनगर, दि.११ (जिमाका):  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलिप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या चित्ररथास रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदार मतदान करणार, अशा घोषणा देत यावेळी  उपस्थित प्रत्येकाने आपण स्वतः तर मतदान करुच शिवाय आपल्या संपर्कातील आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनाही मतदान करण्यास सांगू असा निर्धार व्यक्त केला.

केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ चित्ररथातून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सोमवार दि.११ते बुधवार दि.२० पर्यंत मतदार जनजागृतीची मोहिम राबविण्यात येत आहे.  चित्ररथास आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास मार्गस्थ केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर. पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी डॉ .मिलिंद दुसाने स्वीप कक्षाचे  सहायक नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, आर जे प्रेषित, आर जे श्रेयस, आरजे अर्चना, आयर्न लेडी ऐश्वर्या, आयर्न मॅन डॉ. प्रफुल्ल जटाले, आघाव जिल्हा स्विप कक्षाचे नोडल अधिकारी स्वप्निल सरदार,तसेच सर्व तालुका स्वीप चे अधिकारी, कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये यानिमित्त पथनाट्य ,भारुड व विविध गीतामधून मतदान जाणीव जागृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये हा चित्ररथ फिरणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे येणार आहे,  सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन संजीव सोनार यांनी केले.

०००

 

जळगाव जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत डिजिटल चित्ररथास प्रारंभ

जळगाव दि. ११ (जिमाका):  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी  एकाच टप्यात मतदान होणार आहे. त्याकरिता केंद्रीय संचार ब्यूरो विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यात दिनांक 11 पासून ते 20 नोव्हेंबर पर्यंत डिजिटल चित्ररथ मार्फत  मतदार जनजागृती करण्यात येत आहे.

या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या प्रागंणात मा मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिशा संस्था, जळगाव यांच्यामार्फत श्री. विनोद ढगे व चमूने पथनाट्य सादर केले. त्यानंतर श्री. अंकित यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ देत उपक्रमास शुभेच्छा देऊन चित्ररथास हिरवा झेंडा दाखविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केंद्रीय संचार ब्यूरोचे  नोडल ऑफिसर पंकज दाभाडे यांनी केले. या प्रसंगी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तथा नोडल अधिकारी स्वीप योगेश पाटील,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भाऊसाहेब अकलाडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सुनील पाटील तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

दिव्यांगांना मतदानासाठी दिव्यांग रथाची सोय

अमरावती, दि. ११ (जिमाका) : अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाणे सुलभ व्हावे, यासाठी दिव्यांग रथ तयार करण्यात आला आहे. हा दिव्यांग रथ दिव्यांगांना मतदान केंद्रावर घेऊन जाणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दिव्यांग मतदारांकरीता मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याकरीता अमरावती विधानसभा मतदारसंघात दिव्यांग रथाची सोय करण्यात आली आहे. मतदारसंघ क्षेत्रातील दिव्यांग मतदारांच्या सोयीकरीता या दिव्यांग रथाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या दिव्यांग मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्याची गरज आहे, अशा मतदारांनी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी या दिव्यांग रथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

तसेच अमरावती विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील दिव्यांग मतदारांकरीता मदत कक्षाची स्थापना केले आहे. दिव्यांग रथाची आवश्यकता असलेल्या मतदारांना मदत कक्ष प्रतिनिधी तथा ग्राम महसूल अधिकारी सुनिल भगत, संपर्क क्रमांक 9890698712 यांच्याशी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

मतदारांच्या सक्रीय सहभागाने मतदानाचा टक्का वाढणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. ११ : स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, महापालिका आणि विविध संस्था, संघटनांच्या मदतीने आज अमरावती येथे मतदार जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली काढण्यात आली.

नेहरू मैदान येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. राजकमल,  जयस्तंभ, इर्विन चौक मार्गे ही रॅली निघून विभागीय क्रीडा संकुलात समारोप करण्यात आला.

समारोपावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, महारॅलीचे आयोजन उत्कृष्ट प्रकारे झाले आहे. यात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली होती. मात्र, शहरी भागात मतदान कमी होत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता करणे गरजेचे आहे. त्यांच्यापर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचल्यास मतदानाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून मतदान करावे, असे आवाहन केले.

श्री. कलंत्रे यांनी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक शाळा रहाटगाव आणि प्रगती विद्यालय रहाटगाव यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच मतदानासाठी नागरिकांना जागरूक करण्यासाठी मान्यवरांनी हवेत फुगे सोडले.

विभागीय क्रीडा संकुलात मानवी साखळी करण्यात आली. यातून ‘गो वोट’चा संदेश देण्यात आला. तसेच मनपा शाळेने पथनाट्य सादर करण्यात आले. दिव्यांनी ‘गो वोट’ साकारण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. मेश्राम यांनी आभार मानले.

०००

 

 

 

८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची दि. ९ डिसेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १० डिसेंबर २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात १०३ ज्येष्ठ नागरिकांसह ११ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या, प्रपत्र १२ ड भरलेल्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान पथकामार्फत घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात आज एकूण १०३ ज्येष्ठ नागरिक आणि ११ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबादेवी मतदारसंघात ८५ वर्षांवरील एकूण ११८ ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, त्यापैकी १०३ अर्जदारांनी, तसेच १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. या ११४ अर्जदारांचे आज गृह टपाली मतदान घेण्यात आले.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत ८५ वर्षांवरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या घरपोच मतदान सुविधेचे स्वागत केले असून, टपाली मतदान पथकाचे आभार मानले आहेत.

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...