शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 594

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात ८ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. १० : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर रोजी विभागाने एकूण 33 ठिकाणी धडक कारवाया करुन दि. 7 नोव्हेंबर रोजी 2 लाख 26 हजार 520 आणि 8 ते 9 नोव्हेंबर 2024 रोजी एकूण 5 लाख 90 हजार 510 रुपयांच्या असा एकूण 8 लाख 17 हजार 30 रुपयांचा मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

तसेच 7 नोव्हेंबर रोजी भोकर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव व भोकर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांचेसमवेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करुन 7 कारवाया करुन 57 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

7 नोंव्हेबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये एकूण गुन्हे 14, वारस 13, अटक आरोपी 13, हातभट्टी 30 लि, रसायन 810 लि. देशी मद्य 79.90 लि, विदेशी मद्य 17.28 लि, ताडी 170 लि, जप्त वाहन संख्या 01 असा एकूण 2 लाख 26 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईत एकूण गुन्हे 19, वारस 19, अटक आरोपी 19, हातभट्टी 40 लि, देशी मद्य 81.36 , विदेश मद्य 22.96 लि, ताडी 110 लि, जप्त वाहन संख्या 2 असा एकूण सर्व मुद्येमाल 5 लाख 90 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात नागरिकांनी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

०००

युवाशक्तीने दिला ‘वोटथॉन’ च्या माध्यमातून ‘नागपूरकर, मतदान कर’ चा संदेश

नागपूर , दि. 9 – ज्या उत्साहाने नागपुरकरांनी स्वीप अंतर्गत वोटथॉन दौडमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचा निश्चय केला आहे त्याचे रुपांतर आता शेजारच्यांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त  करण्यात व्हावे.  प्रत्येक मतदारांमध्ये हा विश्वास देण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले. या ठिकाणी आपण मतदान करण्याची शपथ घेतली आहे. आता इतरांनी मतदान करावे अशी प्रत्येकांने प्रेरणा द्यावी, असे ते म्हणाले.

मतदारांच्या जागृतीसाठी स्वीप अंतर्गत यशवंत स्टेडियम येथे आयोजित वोटेथॉन रॅलीच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.  यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, नागपूरचे निवडणूक निरीक्षक भोर सिंग, सुनील कुमार, पवनकुमार सिंन्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. मतदाराचे प्रमाण किमान 75 टक्क्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही प्रत्येक मतदारांची आहे. यासाठी प्रत्येक मतदाराने कृतिशील सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. आपल्या घरी  येणाऱ्या बीएलओंकडून आपले मतदान केंद्र लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

वोटथॉन माध्यमातून युवकांनी आपला उत्साह या ठिकाणी वृद्धींगत केला आहे. मतदान करुन याला कृतीची जोड दिली पाहिजे. लोकशाहीचे दूत म्हणून आपले योगदान देण्यासाठी पुढे या असे  आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

“व्होटथॉन”च्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी उपस्थित सर्वाना मतदानाची प्रतिज्ञा दिली. एक स्वरात प्रतिज्ञा घेत उपस्थितांनी आम्ही मतदान करणार असा संदेश दिला.

भारतीय निवडणूक आयोगाच्या स्वीप आयकॉन व दिव्यांग खेळाडू श्रीमती सुवर्णा राज यांनी दिव्यांग व ज्येष्ठ मतदार यांच्या मतदानासाठी उत्तम सोयीसुविधा करून देत असल्याचे सांगितले. निवडणूक निरीक्षक सुनील कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत नागपूरकर रेकॉड ब्रेक कामगिरी करीत मतदान करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर निवडणूक निरीक्षक पवनकुमार सिंन्हा यांनी “वोटथॉन”तून निर्माण झालेला उत्साह मतदानाच्या दिवसापर्यत तसाच कायम ठेवावा आणि मतदानासाठी अधिकाधिक संख्येत मतदान करावे, असे आवाहन केले. या माध्यमातून “नागपूरकर, मतदान कर” असा संदेश देण्यात आला.

वोटथॉन मतदार जनजागृती दौड स्पर्धेत मतदार विद्यार्थी, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या महिला जवान, सर्व सामान्य नागरिक यांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ज्येष्ठ धावपटू आणि चिमुकल्यांनी ही सहभाग नोंदविला.

नागपूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे याकरिता ज्येष्ठ संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले. अमित स्पोर्ट अकादमीच्या योगपटूंनी चित्तथरारक योग प्रात्यक्षिक सादर करीत मतदान करावे असा संदेश दिला. यावेळी व्ही जे अमोल यांनी लहान फन गेम्स घेतले त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

▪️“वोटेथॉन” 5 किलोमीटर स्पर्धेतील विजेते

महिला:

प्रथम: अंजली मडावी, द्वितीय: रिता तरारे, तृतीय : सुचिता वडामे, चतुर्थ: निकिता साहू, पाच: रितू मडावी

पुरुष प्रथम: गौरव खडटकर, द्वितीय: मनीष पथे, तृतीय : अभय मस्के, चतुर्थ: रोहित राहंगडाले

पाच: मोहित कोरे

लहान मुलांचा गट

मुलं: सौरभ भट्ट (७ वर्ष), लक्ष पटेल(८ वर्ष) अद्वित भोसले(९ वर्ष) मुली: आर्या टाकोने(६ वर्ष), नव्या बाराई(१० वर्ष),श्रावणी लसने (१२ वर्ष)ज्येष्ठ नागरिक:दिवाकर भोयर(७९ वर्ष), दामोधर वानखेडे(६५ वर्ष) संतोष तायडे(४७ वर्ष)

महिला श्रीमती रेणू सिद्धू (४९ वर्ष )

फॅन्सी ड्रेस- संतोषी धूम, दिव्या घुमने, जीवा सूर्यवंशी, रुद्र टाकोने,

सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नागपूर जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक, मनपाचे उपायुक्त श्मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, श्विजय देशमुख, डॉ. गजेंद्र महल्ले, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपा, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित  होते.

00000

१८ विधानसभा मतदारसंघातील ३ विधानसभा मतदारसंघातून ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान

ठाणे,दि.09 (जिमाका):- येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 933 जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी दि.8 व 9 नोव्हेंबर 2024 या दोन दिवसात 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मिळून एकूण 202 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला आहे.

गृहमतदानास दि.8 नोव्हेंबर 2024 पासून सुरूवात झाली असून दि.17 नोव्हेंबरपर्यत हे मतदान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमून दिलेल्या तारखांदिवशी त्या त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. 40 टक्के अंपगत्व (Locomotive) व 85 वर्षांवरील वृद्ध यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी विधानसभा निवडणुक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 D फॉर्म भरून दिले होते त्यांनाच या गृहमतदानाचा लाभ घेता येणार आहे.

 ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ व 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शुक्रवार, दि.8 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमतदान पार पडले. या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून 85 वर्षांवरील एकूण 77 ज्येष्ठ मतदारांनी तर 6 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

     8 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या गृहमतदानाची आकडेवारी:

     143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 42, दिव्यांग व्यक्ती – 01

     147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 35, दिव्यांग व्यक्ती – 05

     आज शनिवार, दि.9 नोव्हेंबर 2024 रोजी 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ व 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान पार पडले. या गृहमतदानात तिन्ही विधानसभा मतदारसंघातून एकूण 85 वर्षांवरील एकूण 89 ज्येष्ठ मतदारांनी तर 30 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

     9 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या गृहमतदानाची आकडेवारी:

     143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 36, दिव्यांग व्यक्ती – 01

     146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 43, दिव्यांग व्यक्ती – 18

     149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 10, दिव्यांग व्यक्ती – 11

00000

‘पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते’ – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ९ : जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले आहे. पंडित राम नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय, शिष्यपरिवार व संगीत प्रेमींना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००

His music touched hearts and heavens: Governor Radhakrishnan

Mumbai, November 9: Maharashtra Governor C P Radhakrishnan has expressed grief on the demise of Sarangi maestro Pt Ram Narayan in Mumbai. In a condolence message, the Governor said:

“I was saddened to know about the demise of internationally acclaimed Sarangi maestro Pt Ram Narayan Ji. Pt Ram Narayan took Sarangi to global heights through his masterly performances. The sound of his Sarangi touched hearts and heavens. In the true Indian tradition, Pt Narayan passed on the knowledge of Sarangi to numerous disciples from India and abroad. His divine music will live on for centuries. With his demise, an era in Sarangi has come to an end. My heartfelt condolences to his family, disciples and music lovers. Om Shanti.”

०००

 

आचारसंहिता भंगाच्या ३७३४ तक्रारी निकाली; ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. ९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३७६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३७३४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

00000

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

मुंबई, दि. ९ : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती – चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

0000

 

तिरंग्याच्या साक्षीने नांदेडकरांनी घेतली मतदानाची शपथ

नांदेड,दि 8 नोव्हेंबर:-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोट निवडणुकीच्या मतदार जागृतीच्या संदर्भाने स्वीप कार्यक्रमांतर्गत अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मतदार जनजागृती कार्यक्रमाची राज्यस्तरीय  लॉन्चिंग मुंबई येथे झाली. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीने जिल्हास्तरीय मतदार जागृती आणि शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

व्हीआयपी रोड वरील तिरंगा ध्वज कॉर्नरवर एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्रीमती बी.बाला मायादेवी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी उपस्थित जनसमुवेत समुदायाला मतदानाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना तिरंगा ध्वजाच्या साक्षीने मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीप बनसोडे, नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त सुप्रिया टवलारे, अजितपालसिंघ संधू, ज्येष्ठ नागरिक अशोक तेरकर, प्रभारी उपायुक्त संजय जाधव, मनीषा नरसाळे, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, विभाग प्रमुख प.ला.आलूरकर, महेंद्र पवार, सदाशिव पतंगे, मिर्झा बेग, निलावती डावरे, रावण सोनसळे, रमेश चवरे हे उपस्थित होते.

यावेळी शाहीर रमेश गिरी आणि साहेबराव डोंगरे यांच्या संचाने मतदान जागृतीची गीते सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सेल्फी पॉईंट आणि स्वाक्षरी “मी मतदान करणारच” या स्वाक्षरी फलकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच तरुण व दिव्यांग मतदारांच्या हस्ते पहिल्यांदा स्वाक्षरी करून स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ सहाय्यक साईराज मुदिराज, संदीप लबडे, संजय ढवळे, आशा घुले, सारिका आचमे, माणिक भोसले यांच्यासह जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी शहरातील नागरिक, तरुण व दिव्यांग मतदार तसेच महिला मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.

०००००

निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

परभणी, दि. 7 (जिमाका) – जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, उपायुक्त अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करुन विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की, मतदानाच्या दिवशी मतदारांना कुठल्या प्रकारे अडचणी जाणवू देऊ नयेत. मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर अधिक भर द्यावा. स्वीप अंतर्गत मतदानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करावी. पोस्टल मतदानाची प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडावी. उमेदवारांचे खर्च बारकाईने नोंदवावेत. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत विशेषत: मतदान यंत्राबाबत अद्यावत माहिती द्यावी. निवडणूक काळात पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे व्यवस्थित नियोजन करावे. कुठेही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाई करावी. तपासणी पथकांनी दक्ष राहून तपासण्या कराव्यात. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगितले. तर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परेदशी यांनी बंदोबस्ताचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे सांगितले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. विधाते यांनी सादरीकरणाव्दारे निवडणूक कामकाजाबाबत यावेळी सविस्तर माहिती दिली.  प्रारंभी कलापथकामार्फत “मतदारांनो करा तुम्ही मतदान, लोकशाहीला बळकट करा” हे गीत सादर करण्यात आले. शेवटी सर्व उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.

मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा पुरवाव्यात -उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार

मुंबई, दि. ८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील, यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी आज कोंकण व नाशिक विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कोकण व नाशिक विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार, अवर सचिव अनिलकुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासह मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण)  सत्यप्रकाश टी. एल., हिमांशू गुप्ता, समीर वर्मा, अंजना एम.,शिल्पा शिंदे, केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजी, केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता, अमन प्रीत आदी उपस्थित होते.

श्री. हिरदेश कुमार म्हणाले की, मतदान केंद्रावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले अशा प्रकारच्या विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी,  रॅम्प,  सावली इ. सुविधांची निर्मिती, वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे, अशा सूचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सूर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करावे. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तत्काळ दखल घ्यावी. मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत; या दृष्टीने स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रमांवर भर द्यावा, दहा हजारांहून अधिक मतदार केंद्रांच्या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष तयार करावा, अशाही सूचना श्री. कुमार यांनी दिल्या.

शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे सांगून हिरदेश कुमार म्हणाले, मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. सर्व जिल्ह्यात ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जात असून त्याप्रमाणे विभागातील इतर जिल्ह्यातही राबविला जावा. मतदारांना मोबाईल ॲपद्वारे मतदान केंद्रांची माहिती कशा प्रकारे पहावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्या, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, पिण्याचे पाणी, कामकाजाची सुविधा, मतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काम, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, भोजन, पाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तत्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईल, याची खबरदारी घ्यावी.

अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.

श्री. संजय कुमार म्हणाले, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. मतदानावेळी गर्दी होऊ नये यासाठी मतदारांच्या रांगाचे व्यवस्थापन करावे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांना सर्व टप्प्यांवर आवश्यक ती माहिती द्यावी.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शक, ठिकाणदर्शक फलक असावेत. मतदारांना आपले मतदान केंद्र माहित असावे, यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी भरावयाचे सर्व नमुने,  अहवाल व्यवस्थितरित्या भरुन वेळेत पोहोचतील आदी बाबींबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरुन येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.

उमेदवार, राजकीय पक्ष यांना निवडणूक प्रक्रियेची वेळोवेळी माहिती देऊन त्यामध्ये पारदर्शकता राहील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सूचना घ्याव्यात, त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले की, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदार चिठ्ठ्यांचे शंभर टक्के वितरण स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याकरिता उपाययोजना,  एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर समसमान मतदारसंख्या असेल अशी रचना करण्यात आली आहे. मतदानावेळी रांगाच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तेथे राखीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

बैठकीस कोकण व नाशिक विभागातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक यांच्यासह निवडणूक प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

०००

‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय मतदान जनजागृती अभियानाची दिमाखदार सुरुवात

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक पंकज श्रीवास्तव, प्रधान सचिव अविनाश कुमार, सचिव सुमन कुमार, अवर सचिव   अनिल कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई शहर व उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छादूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छादूत निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, अभिनेते मनोज जोशी, अभिनेता बजाज आनंद, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता अली असगर यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

आवर्जून मतदान करण्याचे मान्यवरांचे आवाहन

अभिनेत्री वर्षा उसगावकर म्हणाल्या की, “प्रत्येक मत महत्त्वाचे असून तो महत्त्वपूर्ण अधिकार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत याचा आवर्जून लाभ घेवून मतदानाचा अधिकार बजवावा”.

 

अभिनेत्री सोनाली खरे म्हणाल्या की, “आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा योग्य उपाय म्हणजे मतदान करणे हेच आहे. मी देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहे. आपण देखील मतदान करा”.

दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले की, “20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करावे. तो प्रत्येकाचा हक्क आहे तो आपण बजवावा”.

हास्य कलाकार भारती सिंग म्हणाल्या की, “प्रत्येक सण आणि उत्सव आपण न सांगता साजरे करतो. मतदान करणे हा देखील लोकशाहीचा उत्सव आहे. आपण देखील २० नोव्हेंबरला मतदान करा मी देखील मतदान करणार आहे”.

अभिनेता बजाज आनंद म्हणाले की, “मनोरंजनासाठी आपण अनेकदा वेळेचा विचार करत नाही. मतदान हे पवित्र कार्य आहे यासाठी देखील आपण जरूर वेळ काढावा”.

 

अभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेते मनोज जोशी यांनी देखील मतदान हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता या दिवशी जरूर मतदान करावे, असे आवाहन केले.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले की, “२० नोव्हेंबर रोजी मी स्वतः माझे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलून या दिवशी मतदान करणार आहे”.

या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी निश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

यावेळी मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात आले. तर, डाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्याचप्रमाणे यावेळी मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात आली होती. मतदार जागृती रॅली, मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली

या कार्यक्रमानंतर गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...