गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 589

मतदारांच्या जागरासाठी ‘त्यांचीही’ प्रभात फेरी

नागपूर,दि. 13 : “भारतीय राज्य घटनेने इतर नागरिकांप्रमाणेच आम्हालाही अमुल्य असा मतदानाचा अधिकार बहाल केला. आमच्या असंख्य तृतीय पंथीयांनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करुन आमचे कर्तव्य पार पाडले. या विधानसभेच्या निवडणुकीतही आम्ही कर्तव्य नव्हे तर आत्मसन्मानाने मतदान करणार असून नागपुरकरांनीही मोठ्या प्रमाणात येत्या 20 तारखेला मतदानासाठी बाहेर पडावे,” असे आवाहन सोनू नयना या तृतीयपंथी मतदाराने केले. ‘जे मतदार मतदान करतील त्यांच्या परिवाराला आमचे आर्शिवाद पोहचतील’ अशी भावनिक सादही सोनूने घातली.

स्वीप अंतर्गत आज मतदारांच्या जनजागृतीसाठी व समाजातील प्रत्येक घटकाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत व सर्व मतदारांनी येत्या 20 तारखेला मतदान करावे या उद्देशाने तृतीय पंथीयांनी गितांजली चौक परिसरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीनंतर सोनू नयना यांनी ते भावनिक आवाहन केले. या जनजागृती अभियानाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

गितांजली टॉकीज परिसरामध्ये आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीस झोनल अधिकारी सुरेश खरे, विद्या कांबळे, राखीबाई, मुस्कानबाई, विद्याबाई यांच्यासह अनेक तृतीयपंथीय उपस्थित होते. मतदानासाठी सर्व मिळून पुढाकार घेण्याची यावेळी उपस्थितांनी शपथ घेतली.

00000

कराड व रहिमतपूर येथे शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या रॅली  व मानवी साखळीद्वारे मतदान जागृती

सातारा दिनांक 13 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती अभियानातंर्गत रहिमतपूर नगरपरिषदेमार्फत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि कन्या प्रशाला रहिमतपूर यांच्या सहयोगाने मतदान जनजागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीचे रहिमतपूर शहरात आयोजन करण्यात आले. ‘आपल्या मतामुळे होणार आहे लोकशाहीचा सन्मान, अवश्य करा मतदान’ असे  संदेश फलक घेऊन रॅली काढण्यात आली होती.

कराड 259 उत्तर विधानसभा मतदार संघात उंब्रज, तळबीड येळगाव, वाघेश्वर येथे विविध शाळांमध्ये मानवी साखळी तयार करून मतदान शप्पथ, घोषणा देऊन मतदान जनजागृती करण्यात आली आहे. चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या., नवे वारे नवी दिशा, मतदानच आहे उद्याची दिशा., आपले मत आपले भविष्य., ना जातीवर ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर., मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा आशयाची विविध फलक घेऊन विद्यार्थ्यांमार्फत येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

००

अमरावती जिल्ह्यातील मतदार जनजागृती रॅलीत सजविलेल्या बैलगाडीचे आकर्षण

अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्वीप उपक्रमात पिंक फोर्स समितीने शिराळा येथे मतदार जनजागृती रॅली काढली. या रॅलीत सजविलेली बैलगाडी नागरिकांचे आकर्षण ठरली. या रॅलीत जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीता  महापात्र  यांनी  सहभागी  होत मतदार चिठ्ठीचे वाटप केले.

शिराळा गावात रॅली काढण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. सहभागी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा दिल्या. गावफेरीत मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. रॅलीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा सेविका, शिक्षक आदींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. उपस्थितांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.

विस्तार अधिकारी योगेश वानखडे, कल्पना ठाकरे, आशिष गाडेकर, मंगेश मानकर, राजेश श्रीखंडे,  आरती चिटके, जिल्हा स्वीप कक्षाचे संजय राठी, राजेश सावरकर, हेमंतकुमार यावले, अमरावती तालुका स्वीप कक्षाचे विनायक लकडे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

00000

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिकदि.13 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा):  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्तीत संख्येने मतदान करावे यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता ‘वोटोथॉन’ चे आयोजन केले आहे. या ‘वोटोथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी  प्रत्येक नागरिकांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत  विभागीय आयुक्त डॉ.गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, तहसीलदार मंजुषा घाटगे, अमोल निकम यांच्यासह अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

‘स्वीप’च्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हावासियांनी 20 नोव्हेंबर रोजी घराच्या बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा. मतदान झाल्यावर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांनाही प्रोत्साहित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  श्री. शर्मा यांनी केले.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून जास्तीत जास्त नागरिकांना स्वीपच्या माध्यमातून मतदानास   प्रोत्साहीत करण्यासाठी  व त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वोटोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात तीन किलोमीटर व पाच किलोमीटर  अशा दोन मॅरेथॉन होणार आहेत. या वोटॉथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  आयोजन समितीकडून  https://wwww.surveymonkey.com/r/qrcode/MHVXR5M    हि रेजिस्ट्रेशन लिंक व QR Code  जाहीर करण्यात आला असून नोंदणी विनाशुल्क आहे. तसेच प्रथम नोंदणी करणाऱ्या 750 सहभागी स्पर्धकांना व्होटिंग अँम्बेसेडर टी शर्ट देण्यात येणार असून मतदार जनजागृतीसाठी संदेश देणारे,विशेष पोशाख परिधान करणाऱ्या स्पर्धकांना समितीच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी यावेळी विषद केली. वोटोथॉन मध्ये सहभागी होतांना नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहनही श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.

असा आहे वेाटोथॉनचा मार्ग

3 किलोमीटर- महात्मा नगर ग्राऊंड- डॉ.बी.एस.मुंजे मार्ग- भोसला महाविद्यालय सर्कल मार्गे कॉलेजरोड- कृषी नगर मार्गे- सायकल सर्कल- Six sigma हॉस्पिटल- परत महात्मा नगर ग्राऊंड आणि समारोप

5 किलोमीटर- महात्मा नगर ग्राऊंड- डॉ.बी.एस.मुंजे मार्ग- भोसला महाविद्यालय सर्कल मार्गे जेहान सर्कल, गंगापूर रोड – विवेकानंद मार्ग- पूर्णवाद नगर- प्रसाद सर्कल- कॉलेज रोड- कृषी नगर- सायकल सर्कल- Six sigma हॉस्पिटल- परत महात्मा नगर ग्राऊंड आणि समारोप

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटोथॉन पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

0000000

बाईक रॅलीद्वारे सांगलीत मतदार जनजागृती

सांगलीदि. 13 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हा स्वीप कक्षामार्फत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः सहभाग घेऊन इतरांना प्रोत्साहन दिले.

नवमतदार, युवा मतदार यांच्यामध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा स्वीप कक्ष व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सांगली यांच्यामार्फत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या बाईक रॅलीमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील आदिंनी सहभाग घेतला.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली. मतदानाचे महत्त्व व 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बाईक रॅली विश्रामबाग चौक – माळी चित्रमंदिर – शंभर फुटी रस्ता – कोल्हापूर रोड – मारुती मंदिर रोड मार्गे शिवाजी स्टेडियम येथे या रॅलीची सांगता झाली.

बाईक रॅलीमध्ये पोलीस विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, एमएच 10 बाइकर्स असोसिएशन, विविध कॉलेजचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन जिल्हा परिषद अभियान कक्षाचे ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. शिंदे यांनी केले.

00000

मतदान कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 13 : अमरावती विभागातील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरणाची अनुभूती व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी सर्व मतदान केंद्रावर अनुषंगिक सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले. हे काम काटेकोरपणे होण्यासाठी विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरावर एका नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र व  अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मतदान कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, कार्यक्षमता व सुविधा पुरविण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सक्षम व सर्व सोयीयुक्त वातावरण लाभण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधांची तजवीज करुन ठेवावी. यासाठी विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसाठी निवास, स्वच्छ-शुध्द पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास त्यावर तत्काळ औषधोपचारासाठी महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय पथके व रुग्णवाहीका तैनात असतील. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात मतदान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसांची विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाईल, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. तसेच उपरोक्त बाबी संदर्भात जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचना दिल्या .
निवडणुकीच्या कामासाठी मतदान कर्मचाऱ्यांना  वेळेवर मानधन व चांगले काम करणा करणाऱ्या कर्मचारी यांना  प्रशस्तीपत्र  देण्याची व्यवस्था निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी  करावी अशा सूचना देण्यात आल्या . सदर उपक्रमाच्या माध्यमातून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, महिला व दिव्यांग मतदान केंद्रे तसेच युवा मतदान केंद्र व दुर्गम भागात निवडणुकीचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुविधा (PPWF) कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. मतदान कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात यावा. व त्याकरिता वेगळ्या संपर्क अधिकारी यांची नेमणूक करावी ,मतदान कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली सुसज्ज ठेवण्यात यावी, जेणेकरून वास्तविक-वेळ ट्रॅकिंगद्वारे सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन सुलभ होईल. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, बसण्याची सोय यासारख्या आवश्यक सुविधा प्राथम्याने पुरवाव्यात तसेच मतदानाच्या  दिवसापूर्वी मुलभूत सुविधा उपलब्धतेची तपासणी करुन खात्री करावी. मतदान कर्मचाऱ्यांसाठी नियोजित सुविधा व कल्याणकारी उपक्रमांची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपाच्या वेळी द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी बैठकीत दिल्या. सदर बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या  नियोजन व कार्यवाहीची माहिती संबंधित जिल्ह्यांच्या  नोडल अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचनाही सदर बैठकीत देण्यात आल्या .
                                                                                                                                                                                                                                00000

सहयोगी प्राध्यापक, गट-अ मुलाखतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १३ : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ मधील सहयोगी प्राध्यापक (शल्यचिकित्साशास्त्र) या पदाच्या मुलाखती दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा निकाल आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर https://mpsc.gov.in उपलब्ध आहे, असे आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणी दिनांक १७ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी तयारीच्या दृष्टीने आवश्यक सराव करावा, असे आयोगाने सूचित केले आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित केला जाणार आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

देहविक्री व्यवसायातील महिलांचा शंभर टक्के मतदानाचा संकल्प

मुंबई, दि. १३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. या महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात ‘स्वीप’ समन्वय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने, सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत, अपने आप स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक अभिलाषा रावत, नागपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बारवकर आणि प्रसिध्दीमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात उपस्थित होते.

विजयकुमार सूर्यवंशी यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावून सांगितले. “मतदान हा आपला अधिकार आहे. आपण सर्वांनी एकजूट होऊन मतदान करून लोकशाहीला सुदृढ बनवण्यास हातभार लावावा,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी प्रत्येक मतदाराने मतदारयादीत आपले नाव तपासून शंभर टक्के मतदान साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.

सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने यांनी मतदानाचे महत्त्व पटवून देत, “मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे,” असे सांगितले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान मतदान होणार असून, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वितरण करण्यात आले. उपस्थित महिलांसोबत प्रश्नावली आणि बक्षीसांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत यांनी केले  सूत्रसंचालन वसीम शेख यांनी केले आणि आभार अपने आप संस्थेच्या पूनम अवस्थी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

 

आचारसंहिता काळात नव्याने स्थानिक विकास निधीचे वितरण नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, दि. १३ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या काळात विधानसभा अथवा विधानपरिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक तसेच लोकसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून स्थानिक विकास निधीबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्याने विकास निधी दिला जाऊ नये, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसेल अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात यावे, तथापि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झाले असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या सूचनांनुसार काम समाधानकारकरित्या पूर्ण झाले असेल अशा प्रकरणी देयके अदा करण्यास बंधन असणार नाही, असेही आयोगामार्फत कळविण्यात आल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

0
नांदेड दि. २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध...

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...