गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 590

सहयोगी प्राध्यापक, गट-अ मुलाखतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १३ : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ मधील सहयोगी प्राध्यापक (शल्यचिकित्साशास्त्र) या पदाच्या मुलाखती दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा निकाल आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर https://mpsc.gov.in उपलब्ध आहे, असे आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणी दिनांक १७ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी तयारीच्या दृष्टीने आवश्यक सराव करावा, असे आयोगाने सूचित केले आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित केला जाणार आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

देहविक्री व्यवसायातील महिलांचा शंभर टक्के मतदानाचा संकल्प

मुंबई, दि. १३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. या महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात ‘स्वीप’ समन्वय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने, सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत, अपने आप स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक अभिलाषा रावत, नागपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बारवकर आणि प्रसिध्दीमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात उपस्थित होते.

विजयकुमार सूर्यवंशी यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावून सांगितले. “मतदान हा आपला अधिकार आहे. आपण सर्वांनी एकजूट होऊन मतदान करून लोकशाहीला सुदृढ बनवण्यास हातभार लावावा,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी प्रत्येक मतदाराने मतदारयादीत आपले नाव तपासून शंभर टक्के मतदान साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.

सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने यांनी मतदानाचे महत्त्व पटवून देत, “मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे,” असे सांगितले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान मतदान होणार असून, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वितरण करण्यात आले. उपस्थित महिलांसोबत प्रश्नावली आणि बक्षीसांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत यांनी केले  सूत्रसंचालन वसीम शेख यांनी केले आणि आभार अपने आप संस्थेच्या पूनम अवस्थी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

 

आचारसंहिता काळात नव्याने स्थानिक विकास निधीचे वितरण नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, दि. १३ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या काळात विधानसभा अथवा विधानपरिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक तसेच लोकसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून स्थानिक विकास निधीबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्याने विकास निधी दिला जाऊ नये, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसेल अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात यावे, तथापि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झाले असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या सूचनांनुसार काम समाधानकारकरित्या पूर्ण झाले असेल अशा प्रकरणी देयके अदा करण्यास बंधन असणार नाही, असेही आयोगामार्फत कळविण्यात आल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण

मुंबई, दि. १३ : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून जिल्हास्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणेच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ या कार्यक्रमाचे आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल ॲपपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारण होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची मुलाखत गुरूवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी घेतली आहे

कोल्हापूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी संजय शिंदे यांची मुलाखत शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राचे वृत्त संपादक समरजीत ठाकूर यांनी घेतली आहे.


०००

वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. १३ : माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव  जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी अवर सचिव सुरेश मोगल, ज्येष्ठ पत्रकार  मधुकर भावे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत हाप्पे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले.

००००

आचारसंहिता भंगाच्या ५,८६३ तक्रारी निकाली; ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. १३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ५ हजार ९०२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५ हजार ८६३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

0000

अक्कलकुवा मतदारसंघात ५ अतिदुर्गम मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान -डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार, दि. १३ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम असलेल्या 5 मतदान केंद्रांची मतदानाची वेळ 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 अशी निश्चित केली असल्याचे असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अक्कलकुवा (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील नर्मदा काठावरील अतिदुर्गम (बार्जने जाणारे) मणीबेली, चिमलखेडी, बामणी, डनेल व मुखडी ही 5 मतदान केंद्रे अत्यंत दुर्गम भागात असून सातपुडा पर्वत रांगेत नर्मदा काठावर वसलेले आहेत. या मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी प्रथम रस्ते मार्ग, नंतर बोटीतून प्रवास करावा लागतो व त्यासाठी वेळही जास्त लागतो. तसेच मतदानानंतर मतदान केंद्रांवरुन परत येतांना देखील तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदान सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत होणार आहे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे, असेही डॉ. सेठी यांनी नमूद केले आहे.

सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० या वेळेत होणाऱ्या या अतिदुर्गम मतदान केंद्रात मतदान केंद्र क्रमांक १ चे मणीबेली (मतदार संख्या ३५५), मतदान केंद्र क्रमांक ७ चिमलखेडी (मतदार संख्या ४८०), मतदान केंद्र क्रमांक १० बामणी (मतदार संख्या ८२४), मतदान केंद्र क्रमांक १२ डनेल (मतदार संख्या ८६५), मतदान केंद्र क्रमांक १३ मुखडी (मतदार संख्या २९१) अशा एकूण पाच अतिदुर्गम मतदान केंद्रांवरील २ हजार ८१५ मतदारांना सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान करावे लागणार आहे. या बदलाबाबत सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

०००

अकलूज येथे विद्यार्थ्यांकडून भारतीय नकाशाच्या प्रतिकृतीची मानवी साखळी; केले मतदानाचे आवाहन

सोलापूर, दि. १३ (जिमाका ): 254 – माळशिरस विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम/उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अकलूज नगरपरिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत १२ रोजी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा तयार करून शंभर टक्के मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. जास्तीत जास्त मतदारांनी दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले.

अकलूज नगरपरिषद कार्यालयासमोरील प्रंगणामध्ये भारताचा नकाशा तयार करण्यात आला. या उपक्रमामध्ये अकलूज येथील अकलाई विद्यालय तसेच जैन महावीर मंदिर विद्यालय येथील सुमारे २०० विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झाले होते.

भारतातील सर्व नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही धर्म, वंश, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद दयानंद गोरे,  जि. प. शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख प्रभाकर विठ्ठल ननवरे, मुख्याध्यापक उमा जाधव, मुख्याध्यापक पठाण पी. ए., राजश्री खरात, दत्तात्रय गायकवाड , अनुपमा वसेकर, प्रदीप सातपुते, हमीद मुलाणी, उमेश फलटणकर, संतोष यादव, स्वीप सहाय्यक नोडल पवन भानवसे, स्वीप सहाय्यक नोडल सुनील काशीद, साहाय्यक निरिक्षक धोंडीराम भगनुरे व इतर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे हे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध जनजागृतीपर उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमांना जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

०००

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट

मुंबई, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक समीर वर्मा, सत्यप्रकाश टी. एल., तसेच केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

केंद्रीय निरीक्षकांनी माध्यम कक्षाच्या नियोजनबद्ध कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. कक्षात दररोज येणाऱ्या विविध वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांची नोंद घेण्याची, जाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीही त्यांनी जाणून घेतले. सोशल मीडियावर मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व इतर सोशल मीडियावरील जाहिराती व पोस्ट्सवर लक्ष ठेवण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

प्रसार माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी कक्षाच्या कामकाजाची माहिती दिली.

0000

 

ताज्या बातम्या

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

0
मुंबई, दि.२१ : भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक...

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...