गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 588

ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

ठाणे,दि. १४(जिमाका): महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

मतदारांचा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील वाहने, संस्था आणि एजन्सीद्वारे सायरनचा वापर करण्यात आला होता. नियोजित वेळेत सामूहिक संकल्प उपक्रमात सामील होण्यासाठी सायरनने शासकीय कार्यालयात, खाजगी आस्थापनांमध्ये व सार्वजनिक ‍ठिकाणी असलेल्या नागरिकांना या सामूहिक प्रतिज्ञा उपक्रमात सहभागी होण्याची आठवण करुन दिली.  सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सायरन वाजल्यानंतर 11.00 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील उत्साही मतदार, नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह, नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त व इतर सर्व पोलीस अधिकारी/ कर्मचारी, सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व त्यांचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे जिल्हा परिषद कार्यालय व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सर्व महापालिका शाळा, खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीची तसेच मतदान अधिकार बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सामूहिक शपथ घेण्यात आली. 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ, प्रशिक्षण हॉल, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गांधार नगर, खडकपाडा त्याचप्रमाणे विविध शाळा, शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी देखील मतदानाची शपथ घेवून मतदान जनजागृती करण्यात आली.

139 मुरबाड विधानसभा क्षेत्रातील शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. 140-अंबरनाथ (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रात, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातही सामूहिक शपथ घेण्यात आली. 142 कल्याण पूर्वमधील सर्व शाळा, महाविद्यालये, प्रभागक्षेत्र कार्यालय, शासकिय कार्यालये, विविध गृहनिर्माण संकुले यामध्ये देखील मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली व मतदान प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात लाऊडस्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत व संदेश वाजवून नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स.वा.जोशी विद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे मतदार जनजागृतीची सामूहीक शपथ घेण्यात आली. 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विविध शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृहनिर्माण संस्था, निवडणूक कार्यालये तसेच 146 – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विवियाना मॉल, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी, त्याचबरोबर 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील आय टी आय वर्कशॉप-1, वागळे इस्टेट, परबवाडी ठामपा शाळा क्रमांक १८ येथे मतदान शपथ घेण्यात आली.

148 विधानसभा मतददारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थी, ठाणेकर नागरिक यांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ स्वीप समितीमार्फत ठाणे महानगर पालिका माध्यमिक शाळा क्र. 11, 13, 14, 75, 118 या ठिकाणीही मतदानाची शपथ देण्यात आली.

०००

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६८ तर १० दिव्यांग नागरिकांचे गृह मतदान

मुंबई, दि. १४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र ‘१२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत मलबार हिल विधानसभा मतदारसंघात २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग अशा एकूण २७८ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत कर्तव्य बजावले.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे’, असा महत्वपूर्ण संदेश या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान करून कृतीद्वारे इतर मतदारांना दिला आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी २६८ मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२ ड’ भरून जमा केले होते. अशा एकूण २७८ मतदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी घरून मतदान करण्याच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करीत निवडणूक पथकाचे आभार मानले.

०००

नवी दिल्ली येथे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. १४: देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रातही पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

०००

आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली

मुंबई, दि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

०००

जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणेकरांकडून मतदानाची सामूहिक शपथ

ठाणे, दि. १४ (जिमाका):  भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी निवडणुकीत मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाणेकरांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेतली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, नायब तहसिलदार स्मितल यादव, माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी, निवडणुककामी कार्यरत कर्मचारी तसेच ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ तसेच एन. के. टी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, ठाणे जिल्ह्याने मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले होते.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ‘आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु’ ही प्रतिज्ञा सर्वांना दिली.

०००

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.१४: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के. गोविंदराज यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

पंडित जवाहरलाल नेहरु यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १४ : देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

मतदान कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष उपक्रम राबविणार – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 13 : अमरावती विभागातील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समर्थ वातावरणाची अनुभूती व्हावी तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी सर्व मतदान केंद्रावर अनुषंगिक सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले. हे काम काटेकोरपणे होण्यासाठी विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरावर एका नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पाण्‍डेय यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मतदान कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, कार्यक्षमता व सुविधा पुरविण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सक्षम व सर्व सोयीयुक्त वातावरण लाभण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधांची तजवीज करुन ठेवावी. यासाठी विभागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसाठी निवास, स्वच्छ-शुध्द पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास त्यावर तत्काळ औषधोपचारासाठी महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय पथके व रुग्णवाहीका तैनात असतील. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात मतदान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसांची विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाईल, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. तसेच उपरोक्त बाबी संदर्भात जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.

निवडणुकीच्या कामासाठी मतदान कर्मचाऱ्यांना  वेळेवर मानधन व चांगले काम करणा करणाऱ्या कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देण्याची व्यवस्था निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी  करावी अशा सूचना देण्यात आल्या. सदर उपक्रमाच्या माध्यमातून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, महिला व दिव्यांग मतदान केंद्रे तसेच युवा मतदान केंद्र व दुर्गम भागात निवडणुकीचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुविधा (PPWF) कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. मतदान कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात यावा. व त्याकरिता वेगळ्या संपर्क अधिकारी यांची नेमणूक करावी, मतदान कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली सुसज्ज ठेवण्यात यावी, जेणेकरून वास्तविक-वेळ ट्रॅकिंगद्वारे सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन सुलभ होईल. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, बसण्याची सोय यासारख्या आवश्यक सुविधा प्राथम्याने पुरवाव्यात तसेच मतदानाच्या दिवसापूर्वी मुलभूत सुविधा उपलब्धतेची तपासणी करुन खात्री करावी. मतदान कर्मचाऱ्यांसाठी नियोजित सुविधा व कल्याणकारी उपक्रमांची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपाच्या वेळी द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

सदर बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजन व कार्यवाहीची माहिती संबंधित जिल्ह्यांच्या नोडल अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचनाही सदर बैठकीत देण्यात आल्या .

00000

मतदारांच्या जागरासाठी ‘त्यांचीही’ प्रभात फेरी

नागपूर,दि. 13 : “भारतीय राज्य घटनेने इतर नागरिकांप्रमाणेच आम्हालाही अमुल्य असा मतदानाचा अधिकार बहाल केला. आमच्या असंख्य तृतीय पंथीयांनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करुन आमचे कर्तव्य पार पाडले. या विधानसभेच्या निवडणुकीतही आम्ही कर्तव्य नव्हे तर आत्मसन्मानाने मतदान करणार असून नागपुरकरांनीही मोठ्या प्रमाणात येत्या 20 तारखेला मतदानासाठी बाहेर पडावे,” असे आवाहन सोनू नयना या तृतीयपंथी मतदाराने केले. ‘जे मतदार मतदान करतील त्यांच्या परिवाराला आमचे आर्शिवाद पोहचतील’ अशी भावनिक सादही सोनूने घातली.

स्वीप अंतर्गत आज मतदारांच्या जनजागृतीसाठी व समाजातील प्रत्येक घटकाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत व सर्व मतदारांनी येत्या 20 तारखेला मतदान करावे या उद्देशाने तृतीय पंथीयांनी गितांजली चौक परिसरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीनंतर सोनू नयना यांनी ते भावनिक आवाहन केले. या जनजागृती अभियानाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

गितांजली टॉकीज परिसरामध्ये आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीस झोनल अधिकारी सुरेश खरे, विद्या कांबळे, राखीबाई, मुस्कानबाई, विद्याबाई यांच्यासह अनेक तृतीयपंथीय उपस्थित होते. मतदानासाठी सर्व मिळून पुढाकार घेण्याची यावेळी उपस्थितांनी शपथ घेतली.

00000

कराड व रहिमतपूर येथे शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या रॅली  व मानवी साखळीद्वारे मतदान जागृती

सातारा दिनांक 13 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती अभियानातंर्गत रहिमतपूर नगरपरिषदेमार्फत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि कन्या प्रशाला रहिमतपूर यांच्या सहयोगाने मतदान जनजागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीचे रहिमतपूर शहरात आयोजन करण्यात आले. ‘आपल्या मतामुळे होणार आहे लोकशाहीचा सन्मान, अवश्य करा मतदान’ असे  संदेश फलक घेऊन रॅली काढण्यात आली होती.

कराड 259 उत्तर विधानसभा मतदार संघात उंब्रज, तळबीड येळगाव, वाघेश्वर येथे विविध शाळांमध्ये मानवी साखळी तयार करून मतदान शप्पथ, घोषणा देऊन मतदान जनजागृती करण्यात आली आहे. चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या., नवे वारे नवी दिशा, मतदानच आहे उद्याची दिशा., आपले मत आपले भविष्य., ना जातीवर ना धर्मावर, बटन दाबा कार्यावर., मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा आशयाची विविध फलक घेऊन विद्यार्थ्यांमार्फत येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

००

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...

‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी...

शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन

0
मुंबई, दि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस...