गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 587

अकलूज येथे रन फॉर वोट स्पर्धा उत्साहात

सोलापूर, दि. १४: आगामी विधानसभा निवडणूक-2024 चे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासन विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करीत आहे. या अंतर्गतच 254-माळशिरस विधानसभा(अ.जा.) मतदारसंघांमध्ये अकलूज नगरपरिषद,रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांनी ‘RUN FOR VOTE’ या स्वरूपाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून मतदान जनजागृती चा अभिनव उपक्रम राबविला.

सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ही मॅरेथॉन अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे सकाळी ७ वा. पार पडली. यात  १८ मुलींनी सहभाग नोंदविला. पुरुषांच्या स्पर्धेत ६२ मुले व नागरिक सहभागी झाले.  ७  वर्षाच्या २ मुलांनी ०३  किमी धावून मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये  अकलूज परिक्षेत्राचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी देखील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. मॅरेथॉन मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविले. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून,  लोकशाही परंपराचे जतन करण्याचे तसेच नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांची पावित्र्य राखण्याची तसेच कोणत्याही प्रलोभनास अथवा दबावास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी धनशैल्य विद्यालय, गीरझनी व किडझी स्कूल, अकलूज या शाळेतील तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाचे नियोजन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नोडल अधिकारी स्वीप – दयानंद गोरे व रोटरी क्लब अकलूज अध्यक्ष प्रिया नागणे, सचिव मनीष गाकवाड, रोटरी क्लब सराटी डिलाईटचे  अध्यक्ष जगदीश कदम, सचिव महादेव पाटील यांनी केले.

 

०००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १४: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९, १० व ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदे, अनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पद, अनुसूचित जमाती (माजी सैनिक) ०१ पद, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (माजी सैनिक) ०१ पद, इतर मागास वर्ग, (माजी सैनिक) २ पदे अशी एकूण ०८ पदे राखीव होती. या वर्गवारीकरिता त्या – त्या वर्गवारीचे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी दिव्यांगाकरिता राखीव ०२ पदांपैकी ०१ पदाकरिता (कर्णबधीर) दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार अराखीव (सर्वसाधारण) वर्गवारीचे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अनाथांकरिता ०१ पद राखीव होते. त्याकरिता अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार या अराखीव वर्गवारीचे ०१ पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

मुंबई, दि. १४ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला.

राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी,  दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोग यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेद्वारे (postal ballot Paper) मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२’ किंवा ‘१२ अ’ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संबधित निवडणूक अधिकारी यांनी पडताळणी करून टपाली मतपत्रिका दिली. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात मतदारसंघात आज निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहात टपाली मतदान केले.

सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या मतदारसंघात १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे. धारावी मतदारसंघात केवळ आजच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वडाळा मतदारसंघात १५ ते १७ नोव्हेंबर, वरळी मतदारसंघात १६ ते १७ नोव्हेंबर, माहीम मतदारसंघात १६  नोव्हेंबर रोजी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी टपाली मतदान केल्याचे समाधान पोलिस कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. टपाली मतदानानंतर अनेक पोलीस कर्मचारी अतिशय उत्साहाने, अभिमानाने मतदान केल्याची निशाणी असलेले आपले बोट अभिमानाने उंचावत सेल्फी काढताना दिसून येत होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. १४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेअंतर्गत शिवडी विधानसभा मतदारसंघात ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी ११५  मतदारांनी तर ३४ पैकी १५ दिव्यांग मतदारांनी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या एकूण १३० अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

ठाणे,दि. १४(जिमाका): महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

मतदारांचा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील वाहने, संस्था आणि एजन्सीद्वारे सायरनचा वापर करण्यात आला होता. नियोजित वेळेत सामूहिक संकल्प उपक्रमात सामील होण्यासाठी सायरनने शासकीय कार्यालयात, खाजगी आस्थापनांमध्ये व सार्वजनिक ‍ठिकाणी असलेल्या नागरिकांना या सामूहिक प्रतिज्ञा उपक्रमात सहभागी होण्याची आठवण करुन दिली.  सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सायरन वाजल्यानंतर 11.00 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील उत्साही मतदार, नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह, नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त व इतर सर्व पोलीस अधिकारी/ कर्मचारी, सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व त्यांचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे जिल्हा परिषद कार्यालय व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सर्व महापालिका शाळा, खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीची तसेच मतदान अधिकार बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सामूहिक शपथ घेण्यात आली. 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ, प्रशिक्षण हॉल, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गांधार नगर, खडकपाडा त्याचप्रमाणे विविध शाळा, शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी देखील मतदानाची शपथ घेवून मतदान जनजागृती करण्यात आली.

139 मुरबाड विधानसभा क्षेत्रातील शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. 140-अंबरनाथ (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रात, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातही सामूहिक शपथ घेण्यात आली. 142 कल्याण पूर्वमधील सर्व शाळा, महाविद्यालये, प्रभागक्षेत्र कार्यालय, शासकिय कार्यालये, विविध गृहनिर्माण संकुले यामध्ये देखील मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली व मतदान प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात लाऊडस्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत व संदेश वाजवून नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स.वा.जोशी विद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे मतदार जनजागृतीची सामूहीक शपथ घेण्यात आली. 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विविध शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृहनिर्माण संस्था, निवडणूक कार्यालये तसेच 146 – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विवियाना मॉल, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी, त्याचबरोबर 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील आय टी आय वर्कशॉप-1, वागळे इस्टेट, परबवाडी ठामपा शाळा क्रमांक १८ येथे मतदान शपथ घेण्यात आली.

148 विधानसभा मतददारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थी, ठाणेकर नागरिक यांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ स्वीप समितीमार्फत ठाणे महानगर पालिका माध्यमिक शाळा क्र. 11, 13, 14, 75, 118 या ठिकाणीही मतदानाची शपथ देण्यात आली.

०००

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६८ तर १० दिव्यांग नागरिकांचे गृह मतदान

मुंबई, दि. १४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र ‘१२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत मलबार हिल विधानसभा मतदारसंघात २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग अशा एकूण २७८ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत कर्तव्य बजावले.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे’, असा महत्वपूर्ण संदेश या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान करून कृतीद्वारे इतर मतदारांना दिला आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी २६८ मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२ ड’ भरून जमा केले होते. अशा एकूण २७८ मतदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी घरून मतदान करण्याच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करीत निवडणूक पथकाचे आभार मानले.

०००

नवी दिल्ली येथे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. १४: देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रातही पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

०००

आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली

मुंबई, दि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

०००

जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणेकरांकडून मतदानाची सामूहिक शपथ

ठाणे, दि. १४ (जिमाका):  भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी निवडणुकीत मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाणेकरांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेतली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, नायब तहसिलदार स्मितल यादव, माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी, निवडणुककामी कार्यरत कर्मचारी तसेच ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ तसेच एन. के. टी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, ठाणे जिल्ह्याने मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले होते.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ‘आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु’ ही प्रतिज्ञा सर्वांना दिली.

०००

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.१४: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के. गोविंदराज यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

ताज्या बातम्या

कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा):    कुंभमेळ्यानिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि...

शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे...

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी मुंबई, दि. २१ :  कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना...

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या...

0
सातारा दि.२१ - पावसाचे प्रमाण व धरणातून विसर्ग कमी झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे बाधीत, शेती, पशुधन, घरे, विद्युत यंत्रणा, रस्ते, पुल व अन्य सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ...

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून लोकाभिमुख कामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात वर्धा प्रथम येईल यासाठी प्रयत्न करा वर्धा, दि.२१ (जिमाका) : वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व...