गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 586

स्वीप उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात मतदार जनजागृती

सांगली, दि. १४ (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाची तारीख अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमातून सर्व घटकांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गावोगावी जनजागृतीचे विविध उपक्रम घेऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.

मतदार जनजागृती अभियानांतर्गत श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज, मिरज शहर व विटा येथे मॅरेथॉनच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस येथे बालहक्क सप्ताह व मतदार जनजागृती अभियानांतर्गत सह दिवाणी न्यायाधीश ए. वाय. खान यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना मतदान करण्यास सांगण्याबाबत आवाहन केले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालय येथे मतदान शपथ वाचन कार्यक्रम घेण्यात आला. तर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन यांच्या उपस्थितीत सुंदरनगर येथील वारांगनांनी मतदार शपथ घेत 100 टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

राजे रामराव महाविद्यालय, जत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जत शहरांमध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड किर्लोस्करवाडी कारखान्यातील 500 पेक्षा जास्त कामगारांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. आदर्श प्राथमिक विद्यामंदिर विटा व बिंदूताई महामुनी विद्यामंदिर विटा, दिघंची हायस्कूल दिघंची व आर एम कलाल कनिष्ठ महाविद्यालय दिघंची, जिल्हा परिषद शाळा आरवडे या ठिकाणी मानवी साखळीचे आयोजन करून मतदान जनजागृती करण्यात आली. चंपाबेन वाडिलाल ज्ञानमंदिर व पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती पर मानवी साखळी साकारून सर्व पालक व नागरिकांना दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जत विधानसभा मतदारसंघात ऊसतोड कामगारांमध्ये उसाच्या फडात जाऊन स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात आली. एकता मोरे पाटील माध्यमिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज दिघंची येथे मानवी साखळीव्दारे वोट फॉर इंडिया चे आवाहन केले. श्री मुकुंदराज विद्यालय शाळगाव ता. कडेगाव व वांगी हायस्कूल येथे मतदाना संदर्भात संकल्प पत्र वाटप करण्यात आले. कोंडाबाई साळुंखे हायस्कूल हरिपूर येथे मतदार जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली.

 

न्यु इअर महिला बचत गट, आत्मशक्ती महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, प्रेरणा महिला बचत गटाच्या सदस्यांनी मतदानाची शपथ घेतली. शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत, मौजे मांगले येथे महिलांनी मतदार जाणीवजागृती केली. निमसोड सर्व सेवा सहकारी लि., निमसोड येथे सभासदांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले.

खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदानकेंद्रामध्ये व त्या गावांमध्ये जेष्ठ मतदार, महिला मतदार, युवक मतदार यांच्याशी संवाद साधून, आवाहन पत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात आली. लेंगरे, वाळूज, मादळ मुठी वेजेगांव येथे मतदान जनजागृती करण्यात आली. तासगाव तालुक्यातील आरवडे येथील मतदान केंद्र क्र.28 येथे महिला संवाद मेळावा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. पलूस तालुका डॉक्टर असोशियन पलूस,. निमा वूमन्स संघटना पलूस, आय एम आय संघटना यांच्या विद्यमाने श्री मंगल कार्यालय पलूस येथे मतदार जनजागृती करण्यात आली.

०००

यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्रफितीचे प्रकाशन

  • जिल्हा माहिती कार्यालयाची संकल्पना

यवतमाळ, दि. १४ (जिमाका) : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. संपुर्ण राज्यात निवडणूक आयोगाच्यावतीने यासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने जनजागृतीसाठी तयार केलेल्या या चित्रफितीचे विमोचन आज जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या विमोचन कार्यक्रमास जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाल देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, चित्रफितीचे निर्माते आनंद कसंबे आदी उपस्थित होते.

लोकशाही मजबूत करण्यासोबतच प्रत्येकाच्या मनात मतदानाचे महत्व वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ही चित्रफित तयार करण्यात आली आहे. यवतमाळ येथील प्रसिद्ध माहितीपट निर्माते आनंद कसंबे यांनी प्रशासनासाठी विनामुल्य चित्रफितीची निर्मिती केली आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने अनेकजन मतदान करण्याऐवजी बाहेर फिरायला जातात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास अडचण निर्माण होते.

योग्य उमेदवार निवडण्यासोबतच प्रत्येक मतदाराचा लोकशाहीच्या उत्सवात सहभाग वाढविण्यासाठी ही चित्रफित महत्वाची ठरेल. ज्या प्रमाणे पक्षी घरटे बांधण्यासाठी एक एक काडी जमा करून घरटे तयार करते त्याचप्रमाणे एक एक मतदाराच्या मतदानाने लोकशाही समृध्द होत जाते, असा महत्वाचा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे. यावेळी उत्तम चित्रफित तयार केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आनंद कसंबे यांचे कौतूक केले. या लघुपटात महेंद्र गुल्हाने, वैष्णवी दिवटे आणि वेदांती बावणे यांनी भूमिका साकारल्या आहे.

०००

वाई विधानसभा मतदार संघात फिरत्या चित्ररथातून मतदान जनजागृती

सातारा, दि. १४:   वाई विधानसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यत मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत  मेटतळे, हरोशी, जावली, दरे, नवेनगर, कुंभरोशी, कुमठे, पारसोंड, बिरवाडी, चतुरबेट, शिरवली, देवळी, दुधगांव  या ठिकाणी मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये उत्साही वातावरणात मतदान विषयक जागृती करण्यात आली.

या गावांमध्ये मतदान करण्याविषयीचे विविध फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक, महिला वप्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी  जनजगृती केली. तसेच  या गावांमध्ये लहान मुलांनी साखळी तयार करुन येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहनही केले.

पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मतदानाच्या दिवशी म्हणजेच येत्या 20 नोव्हेंबरला विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी असतात. या अनुषंगाने पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला.

 

०००

 

फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती

सातारा दि. १४: फलटण बसस्थानक येथे मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे, नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थिती होते.

यावेळी नोडल अधिकारी फलटण यांनी मतदान बुधवार दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ७ ते सायं. ६ दरम्यान मतदान करण्यासाठी घराबाहेर पडून हक्क बाजवण्याबाबत आवाहन केले. जागरूक मतदार होऊन लोकशाही बळकटीसाठी मतदान करण्यासाठी वेळ काढा तसेच ‘मतदान कर 100 टक्के फलटणकर’ सांगून मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अहवान केले.

०००

नागपूर जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात

  • दिव्यांग आणि वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क
  • निवडणूक यंत्रणा पोहोचली दुर्गम भागात

नागपूर, दि. १४:  कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. दिव्यांग आणि वयोवृद्दांनी मतदानाचा आज हक्क बजावला. अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले.

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात १४ आणि १५ नोव्हेंबर या दोन दिवशी गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याची सुरुवात आज जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली.

रामटेक तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगतच्या अति दुर्गम आदिवासी भागात वयोवृद्धांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात कट्टा, सावरा, तुलारा, बेलदा या दुर्गम भागातील गावातील नऊ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच कामठी येथील दिव्यांग असलेल्या विनायक कुलदीवार, फौजिया तब्बस्सुम सय्यद मोहम्मद अली तसेच राजेश मेश्राम यांनी आपल्या गृह मतदानाचा हक्क बजावला.

दि. १४ व १५ नोव्हेंबर रोजी काटोल विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यात आले. त्यासाठी एकूण २३ पथके तयार करण्यात आली. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण २४ पथके रवाना झाली. नागपूर उत्तर (अ.जा.)विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण ७ पथके, रामटेक विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देवून मतदान घेण्यात येत आहे.त्यासाठी एकूण १५ पथके कार्यरत होती.

भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे.  दिनांक 14 आणि 15 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतदार गृहमतदानाचा हक्क बजावत आहेत. यात ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 416 तर शहरी विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 21 गृह मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३७ मतदार गृह मतदान करणार आहेत.

०००

 

 

अकलूज येथे रन फॉर वोट स्पर्धा उत्साहात

सोलापूर, दि. १४: आगामी विधानसभा निवडणूक-2024 चे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासन विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करीत आहे. या अंतर्गतच 254-माळशिरस विधानसभा(अ.जा.) मतदारसंघांमध्ये अकलूज नगरपरिषद,रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांनी ‘RUN FOR VOTE’ या स्वरूपाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून मतदान जनजागृती चा अभिनव उपक्रम राबविला.

सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ही मॅरेथॉन अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे सकाळी ७ वा. पार पडली. यात  १८ मुलींनी सहभाग नोंदविला. पुरुषांच्या स्पर्धेत ६२ मुले व नागरिक सहभागी झाले.  ७  वर्षाच्या २ मुलांनी ०३  किमी धावून मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये  अकलूज परिक्षेत्राचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी देखील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. मॅरेथॉन मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविले. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून,  लोकशाही परंपराचे जतन करण्याचे तसेच नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांची पावित्र्य राखण्याची तसेच कोणत्याही प्रलोभनास अथवा दबावास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी धनशैल्य विद्यालय, गीरझनी व किडझी स्कूल, अकलूज या शाळेतील तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाचे नियोजन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नोडल अधिकारी स्वीप – दयानंद गोरे व रोटरी क्लब अकलूज अध्यक्ष प्रिया नागणे, सचिव मनीष गाकवाड, रोटरी क्लब सराटी डिलाईटचे  अध्यक्ष जगदीश कदम, सचिव महादेव पाटील यांनी केले.

 

०००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १४: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९, १० व ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदे, अनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पद, अनुसूचित जमाती (माजी सैनिक) ०१ पद, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (माजी सैनिक) ०१ पद, इतर मागास वर्ग, (माजी सैनिक) २ पदे अशी एकूण ०८ पदे राखीव होती. या वर्गवारीकरिता त्या – त्या वर्गवारीचे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी दिव्यांगाकरिता राखीव ०२ पदांपैकी ०१ पदाकरिता (कर्णबधीर) दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार अराखीव (सर्वसाधारण) वर्गवारीचे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अनाथांकरिता ०१ पद राखीव होते. त्याकरिता अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार या अराखीव वर्गवारीचे ०१ पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

मुंबई, दि. १४ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला.

राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी,  दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोग यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेद्वारे (postal ballot Paper) मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२’ किंवा ‘१२ अ’ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संबधित निवडणूक अधिकारी यांनी पडताळणी करून टपाली मतपत्रिका दिली. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात मतदारसंघात आज निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहात टपाली मतदान केले.

सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या मतदारसंघात १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे. धारावी मतदारसंघात केवळ आजच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वडाळा मतदारसंघात १५ ते १७ नोव्हेंबर, वरळी मतदारसंघात १६ ते १७ नोव्हेंबर, माहीम मतदारसंघात १६  नोव्हेंबर रोजी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी टपाली मतदान केल्याचे समाधान पोलिस कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. टपाली मतदानानंतर अनेक पोलीस कर्मचारी अतिशय उत्साहाने, अभिमानाने मतदान केल्याची निशाणी असलेले आपले बोट अभिमानाने उंचावत सेल्फी काढताना दिसून येत होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. १४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेअंतर्गत शिवडी विधानसभा मतदारसंघात ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी ११५  मतदारांनी तर ३४ पैकी १५ दिव्यांग मतदारांनी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या एकूण १३० अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

ठाणे,दि. १४(जिमाका): महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

मतदारांचा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील वाहने, संस्था आणि एजन्सीद्वारे सायरनचा वापर करण्यात आला होता. नियोजित वेळेत सामूहिक संकल्प उपक्रमात सामील होण्यासाठी सायरनने शासकीय कार्यालयात, खाजगी आस्थापनांमध्ये व सार्वजनिक ‍ठिकाणी असलेल्या नागरिकांना या सामूहिक प्रतिज्ञा उपक्रमात सहभागी होण्याची आठवण करुन दिली.  सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सायरन वाजल्यानंतर 11.00 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील उत्साही मतदार, नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह, नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त व इतर सर्व पोलीस अधिकारी/ कर्मचारी, सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व त्यांचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे जिल्हा परिषद कार्यालय व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सर्व महापालिका शाळा, खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीची तसेच मतदान अधिकार बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सामूहिक शपथ घेण्यात आली. 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ, प्रशिक्षण हॉल, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गांधार नगर, खडकपाडा त्याचप्रमाणे विविध शाळा, शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी देखील मतदानाची शपथ घेवून मतदान जनजागृती करण्यात आली.

139 मुरबाड विधानसभा क्षेत्रातील शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. 140-अंबरनाथ (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रात, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातही सामूहिक शपथ घेण्यात आली. 142 कल्याण पूर्वमधील सर्व शाळा, महाविद्यालये, प्रभागक्षेत्र कार्यालय, शासकिय कार्यालये, विविध गृहनिर्माण संकुले यामध्ये देखील मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली व मतदान प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात लाऊडस्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत व संदेश वाजवून नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स.वा.जोशी विद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे मतदार जनजागृतीची सामूहीक शपथ घेण्यात आली. 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विविध शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृहनिर्माण संस्था, निवडणूक कार्यालये तसेच 146 – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विवियाना मॉल, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी, त्याचबरोबर 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील आय टी आय वर्कशॉप-1, वागळे इस्टेट, परबवाडी ठामपा शाळा क्रमांक १८ येथे मतदान शपथ घेण्यात आली.

148 विधानसभा मतददारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थी, ठाणेकर नागरिक यांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ स्वीप समितीमार्फत ठाणे महानगर पालिका माध्यमिक शाळा क्र. 11, 13, 14, 75, 118 या ठिकाणीही मतदानाची शपथ देण्यात आली.

०००

ताज्या बातम्या

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

0
आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण मुंबई, दि. २१ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध...

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ – सांस्कृतिक...

0
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच...

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

0
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली...

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत...

0
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD)...

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...