शुक्रवार, ऑगस्ट 15, 2025
Home Blog Page 554

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी प्रा.डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’  कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ही मुलाखत  मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

26 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत, प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या पहिल्या भागातून डॉ. जाधव यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, इतिहास, वैशिष्टे आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर माहिती दिली. त्या अनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. या भागात डॉ.आंबेडकर यांचे लेखन व साहित्य या विषयावर त्यांनी माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

सेवाविषयक प्रकरणांसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन

मुंबई. दि. ७ : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची सेवाविषयक प्रकरणे तातडीने व सामंजस्याने मार्गी लागावी म्हणून ३३ वर्षात प्रथमच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथील कार्यालयात ‘लोक अदालत’ आयोजित करण्यात आली. या लोक अदालतीत तिन्ही खंडपीठ मिळून एकूण  ५४२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १३८ इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण, मुंबईचे विशेष कार्य अधिकारी (न्यायिक) सुरेश जोशी यांनी दिली.

मेकर टॉवर, ई-विंग, तिसरा मजला, कफ परेड, जागतिक व्यापार केंद्राच्या बाजुला, मुंबई येथे मॅट च्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नागपूर,मुंबई, छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली. यामध्ये  मुंबई खंडपीठाच्या- २३८ प्रकरणापैकी ३९ निकाली तर नागपूर- खंडपीठाच्या १५० पैकी ६३ व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या १५४ प्रकरणांपैकी ३६ निकाली काढण्यात आली असल्याची माहितीही श्री. जोशी यांनी दिली.

मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील सचिव यांनी लोक अदालत यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मोलाचे सहकार्य केले. मंत्रालयातील प्रत्येक विभागातर्फे नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, त्यामुळे लोक अदालतीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणांच्या बाबतीत शासनाशी संपर्क साधणे सोयीचे झाले. तसेच बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मणचेकर यांनी  तपासणी केली  व शासनाने नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्यामार्फत प्रलंबित प्रकरणे लोक अदालत समोर ठेवण्यासाठी योग्य ठरविण्यात आली, असेही विशेष कार्य अधिकारी (न्यायिक) सुरेश जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबईच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर, यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, मुख्य सादरकर्ता अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण बार असोसिएशनमधील सर्व वकील वर्ग, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील वकील आणि शासनाचे सर्व नोडल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेनंतर ३३ वर्षांनी प्रथमच लोक अदालत झाली.

लोक अदालतसाठी तीन पॅनल आयोजित करण्यात आले होते. लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, ए. पी. कुन्हेकर, सेवानिवृत्त सदस्य (न्या) आर. बी. मलिक, सेवानिवृत्त सदस्य (न्या) व पॅनल सदस्य म्हणून नितिन गद्रे, सदस्य (प्र), मप्रन्या, नागपूर, विजयकुमार, निवृत्त सदस्य (प्र), मप्रन्या, औरंगाबाद, विजया चौहान, संदेश तडवी, निवृत्त सहसचिव, आर. एम. कोलगे, वकील आणि एम.बी. कदम, वकील यांनी काम पाहिले.

00000

मोहिनी राणे/स.सं

ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 7 : देशाच्या सीमेवर सैन्यदलाच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळे देशातील नागरिक सुखाने राहू शकतात व देश प्रगती करू शकतो.  ही जाणीव ठेवून प्रत्येकाने सशस्त्र सैन्यदल ध्वजनिधीला आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.  देशातील प्रत्येकाने मतभेद विसरून एकदिलाने काम केल्यास सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शनिवारी (दि. ७) राजभवन मुंबई येथे आरंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.

सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (नि.) दीपक ठोंगे यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैन्य दलाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

महाराष्ट्र  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या शूरवीर योद्ध्यांची भूमी आहे.  आपली ही सैन्यदले हा वारसा सांभाळत देशाचे रक्षण करीत आहेत.  आपल्या सैन्यदलांनी जशी कारगिल, डोकलाम येथे कठीण परिस्थितीत कामगिरी केली आहे, तशीच कामगिरी त्यांनी  नैसर्गिक संकट व पूरस्थितीच्या वेळी देखील पार पाडली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

आज भारत जगातील तिसरी महासत्ता होण्याकडे वाटचाल करित आहे, असे सांगून अमेरिकन दूतावासासमोर ज्याप्रमाणे आज लोकांच्या रांगा दिसतात, तश्या रांगा भारतीय दूतावासापुढे लागलेल्या दिसाव्या असे आपले स्वप्न असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गेल्या वर्षभरात ध्वज निधी संकलनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते विविध शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक संस्थांनी तसेच व्यक्तींनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

कोकणचे विभागीय आयुक्त राजेश देशमुख, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आदींना यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह, प्रधान सचिव अंशू सिन्हा, मेजर जनरल बिक्रमदीप सिंह, एअर व्हाईस मार्शल रजत मोहन, कर्नल दीपक संचालक, सैनिक कल्याण विभाग आदी उपस्थित होते.

हौतात्म्य प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच सेवानिवृत्त जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वजनिधीचा विनियोग केला जातो.

००००

विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या निवडीची विधानसभेत घोषणा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह १७३ विधानसभा सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. ७ : विधानसभेचे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली.

विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्य यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 173 विधानसभा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

शपथ घेतलेल्या सदस्यांची यादी

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/12/विधानसभा-सदस्यांनी-घेतली-सदस्यपदाची-शपथ.pdf” title=”विधानसभा सदस्यांनी घेतली सदस्यपदाची शपथ”]

0000

काशीबाई थोरात/विसंअ

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

शिर्डी, दि.७ – माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै.पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी कै.पिचड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, श्रीमती हेमलता पिचड, वैभव पिचड, हेमंत पिचड आदी उपस्थित होते.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना असल्याचे नमूद करून श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित, आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वन जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यतत्पर होते. राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी काम केले. निळवंडे धरणाचं २० किलोमीटरचे काम थांबले होते, तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले. या धरणामुळे शंभर किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आज पाणी मिळत आहे. भंडारदरा (निळवंडे) धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे जलाशय नाव देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती.  ते मितभाषी, व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते. विविध विषयाचा ज्ञान, व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने अतिव दुःख झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कै.मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर कै.मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, राजाभाऊ वाजे, आमदार नरहरी झिरवाळ, सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.

‘वंदे मातरम्’‌ व ‘राज्यगीताने’ महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

मुंबई, दि. 7 :- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

००००

नदी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत -विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. ६ (विमाका): गोदावरी नदीतील प्रदुषणाला प्रतिबंध करण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मलजल, सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल तयार करण्यात येत असलेल्या प्रारुप आराखड्यास त्वरीत अंतिम स्वरूप द्यावे, यासोबतच नदी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश नाशिक विभागीय महासूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी  दिले.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक आज दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली, त्यावेळी डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे कामकाज पाहणाऱ्या सहआयुक्त राणी ताटे,  महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके,  स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,  याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित,  जगबीर सिंग यांच्यासह संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते. निरीचे प्रतिनिधी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मलजल, सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल तयार करण्यात येत असलेल्या प्रारुप आराखडयाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याबाबत सदर कामे वेगवेगळया संबंधित योजनांमधून घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले. नदीकाठाच्या सुशोभिकरणाचा आणि नुकत्याच मंजूर झालेल्या रामकाल पथ या सर्वांचा एकत्रित बृहत आराखडा तयार करावा. तसेच हा आराखडा टप्प्याटप्प्याने जसा निधी  उपलब्ध होणार त्या प्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.

नाशिक महानगरपालिकातर्फे  ‘आपली गोदावरी’ नावाची स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी रुपये प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय पारितोषिक 3 लाख व तृतीय पारितोषिक 2 लाख आणि उत्तेजनार्थ 1 लाखांची बक्षीसे घोषित केली आहेत. या स्पर्धेबाबतची संपूर्ण  माहिती महानगरपालिकेच्या  www.ourgodavari.com या संकेतस्थळावर दिली आहे. या स्पर्धेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यााठी  याबाबत जनजागृती करावी, तसेच अधिकाधिक नागरिकांकडून सूचना  मागविण्यात याव्यात.

गोदावरी नदीच्या दोन्ही तटावर सुशोभिकरणासह नदीचे सौंदर्य कायमस्वरुपी जतन व्हावे व  नागरिकांची नदीशी नाळ जुळावी यासाठी उपक्रम राबवावेत. याठिकाणी दोन्ही बाजूला वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक सारखे प्रकल्प राबविल्यास भविष्यात नदीकाठाच्या परिसरात अतिक्रमण देखील होणार नाही. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकल्पाची व्यवहार्यता नाशिक ते त्र्यंबकेश्वर पट्ट्यात एनएमआरडीए आणि जिल्हा परिषदेने तपासावी.

नदीमध्ये काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर दवाखान्याचे आणि मंगल कार्यालयाचे कपडे स्वच्छ करीत असल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे परवानगी नसलेले प्लास्टिक शहरात वापरले जात असून त्यामुळेही नदीचे प्रदूषण होत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्या सर्वांवर महानगरपालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त पथकाने गुन्हे दाखल करण्याचे आदेशित केले. त्याचप्रमाणे ज्या मोठया गृहनिर्माण प्रकल्पांना स्वत:चे एस.टी.पी आहेत, त्यांचे एस.टी.पी कार्यक्षमतेने सुरू आहेत किंवा कसे याचीही तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण् नियंत्रण मंडळाला आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले.

०००

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ६: ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

 

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६: राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास 35 वर्ष प्रतिनीधीत्व केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. आदिवासी बांधवांचे प्रश्न त्यांनी विधानसभेत नेहमीच मांडले. आदिवासी बहुल अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील ते नेहमी प्रयत्नशील राहिले.

मी मुख्यमंत्री असताना काही महिन्यांपूर्वी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आदिवासी भागातल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. आपल्या प्रकृतीची चिंता न करता मधुकरराव या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यातून त्यांची आदिवासी बांधवाविषयीची तळमळ दिसून येते, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

 

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ६: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी बांधव, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील  मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी बांधव, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबिय, कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

०००

ताज्या बातम्या

विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक- पालकमंत्री संजय शिरसाट

0
छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका): शेवटच्या माणसाचा विकास या उद्देशाने शासन  वाटचाल करीत आहे. लोकांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देतानाच विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक...

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
  पुणे, दि. १५ :- भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री....

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी कार्यभार स्वीकारला मुंबई, दि. १४ : मुंबई स्लम-फ्री करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल, तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प...

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यात...

0
नवी दिल्ली, दि.१४ : देशभरातील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (DAY-NRLM) 'प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४'...

जिल्हा विकास निधीचा प्रत्येक रुपया जनहितासाठी — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
सामूहिक लाभ, कायमस्वरूपी मालमत्ता आणि उत्पन्नवाढीच्या योजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६९७ कोटी रुपयांच्या आराखड्याचा आढावा गडचिरोली, दि.14 ऑगस्ट (जिमाका):  जिल्हा विकास निधीतील प्रत्येक...