गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 539

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन तसेच, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधीक्षकांची बदली

परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस अधिकारी निलंबित

बीड, परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

नागपूर, दि. 20 : बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.

बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यातील भूमाफिया, वाळूमाफियांसह इतर प्रकारच्या गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळाचा  वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बीड, परभणी येथील घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता. या मोर्चात बांग्लादेशमधील हिंदूंसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही हिंदू विरूद्ध दलित अशी दंगल नाही. परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकाने, वाहने, सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीची कामे आम्हालाच द्या किंवा खंडणी द्या अशी मानसिकता काहींची तयार झाली आहे. त्यामुळे बीड प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील पोलीसांनी देखील योग्य कारवाई करावी. गुन्हे दाखल करताना वस्तुस्थिती तपासावी, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

0000

पत्रकारितेच्या विकासात दै. भास्करचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. १९ : भारत देश आणि राज्याच्या प्रगतीबरोबरच दैनिक भास्करने प्रगती साधत पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. या वृत्तपत्राने नागपुरात वेगळे स्थान निर्माण केले असून नागपूरकर वाचकांना हे आपले वृत्तपत्र वाटते, असेही मुख्यमंत्री  म्हणाले.

येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आयोजित दै. भास्कर नागपूरच्या २२व्या वर्धापन दिनाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री नितेश राणे, आमदार सर्वश्री कृपाल तुमाने, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, विकास ठाकरे, विश्वजित कदम, दै. भास्करचे प्रधान संपादक मनमोहन अग्रवाल, समुह संपादक प्रकाश दुबे, संचालक राकेश अग्रवाल, संपादक मणिकांत सोनी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भास्कर म्हणजे सूर्य. सूर्य जसा सर्वत्र प्रकाश देतो तसेच देशात कुठेही गेलो तरी सकाळी सर्वत्र दैनिक भास्करचे दर्शन घडते. मुंबईतही कमी वेळात या वृत्तपत्राने स्वतःची छाप सोडली. हे वृत्तपत्र ज्या-ज्या ठिकाणाहून प्रकाशित होते तेथील संस्कृती, नागरिकांची आवड लक्षात घेवून वाचकांपुढे येते. दैनिक भास्करचा दांडिया उत्सव, गणेशोत्सवातील महालड्डू प्रसिद्ध असल्याचे सांगत या वृत्तपत्राने संपादकीय आणि व्यावसायिक विभाग पूर्णपणे वेगळा ठेवून कार्य केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, दै. भास्करने 2002 मध्ये नागपूर येथून महाराष्ट्रातील आवृत्तीचा प्रारंभ केला. राज्यात या वृत्तपत्राच्या विविध आवृत्त्या सुरु झाल्या असून पत्रकारितेत या वृत्तपत्राने केलेले नवनवीन प्रयोग उल्लेखनीय आहेत.

विविध क्षेत्रात सेवाभावाने कार्य करणाऱ्या सात व्यक्तींचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुंभमेळ्याच्या माहितीवर आधारित दै. भास्करद्वारा निर्मित ‘महाकुंभ प्रयागराज’ पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते पार पडले.

०००

 

बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

नागपूर, दि. १९ : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची दुर्घटना घडली. या बोटीतील एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी आपापर्यंत १३ जणांना मृत घोषित केले आहे. आतापर्यतच्या माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे ३ तर १० नागरिकांचा समावेश आहे. ३ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एक ४ वर्षाची मुलगी आहे. एक ८ महिन्यांची गरोदर महिला आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. नौदलाचा एक जवान देखील गंभीर असून उपचार घेत आहे.

प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. अजूनही ८ क्राप्ट, १ कोस्टगार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरुच आहे.

मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा क्र. ०२८३ दि. १८. १२. २०२४ रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम १०६ (१), १२५ (a), १२५ (b), २८२, ३२४ (३), ३२४ (५) प्रमाणे नोंदविण्यात आलेले आहेत. तसेच, अपघाताची Inland Vessels Act मधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन प्रकरणी सर्वंकष चौकशी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

०००

 

पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार 

मुंबई, दि. १९: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाकरीता राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आदी पायाभूत सुविधांचा विकास, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, लघु, मध्यम, उद्योग घटकांना, विशाल प्रकल्पांना प्रोत्साहन योजना, दुध अनुदान योजना, केंद्र सरकारचे अनुदान असलेल्या विकास योजना, प्रकल्पांसाठी राज्याचा हिस्सा आदी खर्चासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक बांधकाम, कृषी व पदुम, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्यांना आज विधानसभेत मंजूरी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की, संबंधित विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत पन्नास सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची शहानिशा करुन त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7 हजार 490 कोटी 24 लाख रुपये, कृषी व पदुम विभागाच्या 2 हजार 147 कोटी 41 लाख रुपये, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 4 हजार 112 कोटी 79 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना आज मंजूरी देण्यात आली.

०००

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात २४ डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई दि. १९: शासकीय कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण युद्ध पातळीवर करण्यासाठी आजपासून (19) मुंबई उपनगर जिल्ह्यात सुशासन सप्ताहास प्रारंभ झाला झाला. दि.24 डिसेंबर 2024 सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी दिली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ‘प्रशासन गाव की ओर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

प्रशासनिक सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय  यांच्या निर्देशानुसार हा सप्ताह राबविण्यात येत आहे.

या अभियानात विविध शासकीय कार्यालयात प्रलंबित विविध तक्रारीचे निवारण युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच विविध सेवा पुरविणेबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपले सरकार पोर्टल, CPGRAMS इ. ठिकाणी तक्रारी नोंदविता येतील. या व्यतिरिक्त महाऑनलाईन पोर्टलवर विविध सेवासाठी अर्ज करता येईल. तसेच आयोजित विशेष शिबिरामध्ये अर्ज दाखल करता येतील.

या अभियानातंर्गत दाखल तक्रारी अथवा अर्ज यावर प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवावा व आपली गाऱ्हाणी व विविध सेवासाठींचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.

‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार; कर संकलनात सुसूत्रता, पारदर्शकता आणणार – उप‍मुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. १९ : आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, अनुदानाच्या योजना राबविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निगडीत खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत ‘जीएसटी’च्या अनुषंगाने सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशातल्या एकूण कर संकलनापैकी 16 टक्के करसंकलन एकट्या महाराष्ट्रातून होते. देशांतर्गत एकूण कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. यामुळे राज्यातल्या ‘जीएसटी’ करप्रणालीत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्याच्या सीमेलगतच्या भागातून होणारी कर चुकवेगिरीचे प्रकार थांबविण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येईल.

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ मंजूर

‘महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून राज्य शासनाचा महसूल वाढवण्यार भर देण्यात आला आहे. या विधेयकानुसार सध्याच्या महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, 2002 मधील कलम 37 नुसार वसुलीबाबत राज्याचा प्रथम भार विशिष्ट शर्तीच्या अधीन राहून होता. या विधेयकांच्या सुधारणेनुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, 2002 अंतर्गत विनाशर्त प्रथम भार स्थापित झाल्यानंतर जलद गतीने वसुली करणे शक्य होणार आहे.

तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल खरेदी करुन व्यापारी खोल समुद्रात उभ्या असलेल्या बोटींना बॅरेलद्वारे पुरवठा करतात. हा पुरवठा अन्य पेट्रोलपंपाद्वारे केल्या जाणाऱ्या पुरवठ्याप्रमाणे गृहीत धरुन कर भरणा करण्यापासून व्यापारी सूट घेतात. या सुधारणेमुळे किरकोळ विक्री केंद्राची व्याख्या आणि किरकोळ विक्रीचे स्पष्टीकरण कायद्यात समाविष्ट होऊन कर चुकवेगिरीला रोखणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या कायद्यातल्या कलम 2 (24) (पाच) या कलमामध्ये सुयोग्य स्पष्टीकरणाचा समावेश केल्यामुळे, एखाद्या संस्थेने किंवा क्लबने स्वतःच्या सदस्यांना केलेल्या विक्रीवर कर आकारणी शक्य होणार आहे.

०००

 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानसभेत ठराव

नागपूर, दि. १९: पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला.

महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

०००

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करावे

मुंबई, दि. १९: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.

श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांना  लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील आमदार सर्वश्री नितीन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याप्रश्नी लक्ष घालून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री श्री. गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांना लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, राज्यात विशेष करुन नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. आजमितीस उन्हाळी कांदा संपला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतले आहे. अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उर्वरीत चांगल्या कांद्यास खर्चावर आधारीत चांगला भाव मिळणे गरजेचे असतांना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2400 रुपये अत्यल्प दर मिळत आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. जेणेकरून लांल कांद्याचे दर टिकून राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत चांगले दर मिळतील,  असे पत्रात स्पष्ट केले आहे.

०००

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानपरिषदेत ठराव

नागपूर, दि. १९: पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला.

या ठरावाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

०००

सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस -विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

नागपूर, दि. १९ : विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधानपरिषदेला वेगळी परंपरा आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस आहे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारीपूर्ण वर्तन आपले राहिल, अशी काळजी घेऊया, अशा शब्दांत विधानपरिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.

विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावर प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री पंकजा मुंडे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, ॲड. अनिल परब यांनी निवडीवर भावना व्यक्त केल्या.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण उपयोगात आणायचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी ही संसदीय लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनताजनार्दनाची अभिव्यक्ती विराजमान आहे. या रथाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ. सदस्यांचा सभागृह कामकाजातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या आयुधामार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकू यादृष्टीने सतत तयारी केली पाहिजे. आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते मात्र अलिकडच्या काळात तरूण सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमानपरत्वे तरूण  होत चालले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधीमंडळाचे कामकाज प्रभावी होण्यासाठी चतु:सूत्रीचा कार्यक्रम अंमलात आणणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असून हा तास विनाव्यत्यय पार पडावा. समित्यांचे गठन, समिती प्रमुखांना उचित मार्गदर्शन, सभागृहाला अहवाल सादर होणे ही कार्यपद्धती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल. कायदा निर्मिती प्रक्रियेत सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा. तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यांवरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे यादृष्टीने आपण उत्तम कार्य करणे या चतु:सूत्रीचा अवलंब कामकाजात करणार आहे, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

माजी सभापती ना.स.फरांदे यांच्या विचाराचा वारसा चालवतील  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे हे शिक्षक आहेत. त्यामुळे ते सभागृहाचे कामकाज अतिशय शिस्तीने व संवेदनशीलपणे चालवतील. शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो. तो शिकतही असतो. त्यामुळे प्रा. शिंदे पदावर आल्यावर अनेक चांगले पायंडे पाडतील व पिठासीन अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील असा विश्वास आहे.

माजी सभापती प्रा. ना.स. फरांदे यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याच अहिल्यानगर जिल्ह्याचे असलेले प्रा. शिंदे पुढे नेतील. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षात त्यांचे वंशज असलेले प्रा. राम शिंदे हे विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या वरिष्ठ पदावर बसत आहेत, हे एक प्रकारे पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना वाहिलेली सुमनांजली आहे. सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रा. शिंदे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा त्यांना सभागृह चालविताना नक्कीच उपयोगी येईल. ऐतिहासिक चौंडी गावच्या सरपंचपदी असताना त्यांनी केलेले काम राज्यात नावजले गेले. त्याचबरोबर अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांचा प्रभाव आहे. दोन्ही सभागृहाच्या पिठासीन अधिकाऱ्यांमध्ये विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मान मोठा आहे. अतिशय संवेदनशील व्यक्ती पदावर बसली आहे. एक उत्तम सभापती म्हणून सभागृहात त्यांचे नाव घेतले जाईल. यामाध्यमातून राज्याच्या 14 कोटी जनतेला न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा प्रा.शिंदे चालवतील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षात प्रा. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नावात राम आहे, त्यामुळेच ते रामासारखेच न्यायप्रिय असतील. सत्ताधारी किंवा विरोधक कुणावरही ते अन्याय होवू देणार नाहीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायाचे राज्य कसे असावे, प्रजेचे कल्याण कसे करावे, याचा वस्तुपाठ घालून दिला. प्रा. शिंदे हे हेच संस्कार घेऊन समाजकारणात उतरले आहेत. त्यांची सभापतीपदी निवड ही सर्वार्थांने अचूक आहे. सभापती म्हणून त्यांच्यातील नेतृत्व, संयम, अभ्यासू वृत्ती आणि सभागृह चालविण्याची हातोटी हे गुण दिसतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. शिंदे यांनी राज्यमंत्री व नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. शांत संयमी नेतृत्व म्हणून प्रा. शिंदे यांनी ओळख आहे. मात्र, ते जनतेच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सभापतीपदाला न्याय देऊन गौरव वाढवतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीचे आसन अत्यंत मानाचे, सन्मानाचे व तितकेच जबाबदारीचे आहे. अनेक नेत्यांनी हे पद भूषविले आहे. प्रा. शिंदेही या पदाला योग्य न्याय देऊन पदाचा गौरव वाढवतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची न्यायप्रियता, त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थान पुढे नेण्याचा, राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्याचे कार्य या सभापतीपदाच्या माध्यमातून प्रा. शिंदे करतील असा विश्वास आहे.

शेती-मातीत, गाव-खेड्यात वाढलेला एका शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा मुलगा आज विधीमंडळाच्या सर्वोच्च साभागृहाच्या प्रमुखपदी बसला आहे. हे खऱ्या अर्थान लोकशाहीचे मोठेपण आहे, सौंदर्य आहे. आपल्या देशाच्या संविधानाची महानता, सुंदरता आहे. प्रा. शिंदे यांच्या रुपानं विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती तरुण आहेत. अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद सांभळले आहे. त्यामुळे प्रा. शिंदे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रा. शिंदे हे त्यांच्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळे या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतील. प्रा. शिंदे यांनी सभापतीपदाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या त्यांच्या कार्यकाळाला नवा आयाम द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपताना योग्य सहकार्य करू  अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षात प्रा. शिंदे यांना मिळालेला मान बहुमूल्य आहे. प्रा. शिंदे यांनी संघर्ष करत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. मंत्री असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. आताही ते चांगले काम करतील. वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपत असताना त्यांना विरोधी पक्षाकडून योग्य सहकार्य मिळेल.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

ताज्या बातम्या

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

0
हिंगोली(जिमाका), दि. 13: शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील...

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक...

0
छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहास आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी...

‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

0
पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा...

शंकरबाबाची मानसकन्या माला होणार जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नियुक्त देण्यात आली...