रविवार, ऑगस्ट 10, 2025
Home Blog Page 536

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ८.१३% टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. १३: राज्य शासनामार्फत ८.१३% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची १३ जानेवारी, २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १४ जानेवारी, २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १४ जानेवारी, २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँक शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे,  त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.१३% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घ्यावी.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे  सचिव  (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

०००

परभणीतील दंगलीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा – उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर, दि. १३: परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीला बाधा पोहचविल्याच्या घटनेबाबत महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश अॅड. मेश्राम यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

परभणी येथे 10 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेबाबत वृत्तपत्रात जे वृत्तांकन आले व घटनेनंतरच्या उसळलेल्या दंगलीसंदर्भात तपशीलवार माहिती सादर करण्याचे लेखी पत्र निर्गमित करण्यात आले आहे. ॲड. मेश्राम हे परभणी जिल्हा दौरा लवकरच करणार आहेत.

परभणीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेबाबत स्वतंत्र अहवाल तत्काळ सादर करावा असे देखील निर्देश ॲड. मेश्राम यांनी दिले.

ooo

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी

मुंबई, दि. १३: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतीसाठी 30 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. 60 आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे 24 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी आवाहन केले आहे. मुलाखतीस Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर एस.एस.बी.-60 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत यावे.

एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी  शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com किंवा दूरध्वनी क्र.  0253-2451032 किंवा व्हॉट्स ॲप क्र. 9156073306 यावर प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

०००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांची १४, १६ व १७ डिसेंबरला विशेष मुलाखत

मुंबई, दि. १३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ या विषयावर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 लागू झाल्यापासून, भारतीय शैक्षणिक परिसंस्थेत परिवर्तनात्मक बदल घडवून आणले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम अनेक बदलांमधून दिसून येत आहे. या धोरणांतर्गत अभ्यासक्रम- संरेखित शिक्षणाकडे वळणे, प्रादेशिक भाषा हे शिक्षणाचे माध्यम, शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन तसेच शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञानातील अंतर कमी करणे आदी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याचबरोबर विद्यापीठात आणखी कोणकोणते नवनवीन अभ्यासक्रम व उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. याविषयी कुलगुरु डॉ. शिर्के यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 14, सोमवार दि. 16, मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

नवी मुंबईत उद्यापासून महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन

मुंबई, दि. १३: राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत महिलांना कौशल्य व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे देण्यात येतात. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी  ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२४’  चे आयोजन सिडको एक्झीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे १४ ते २५ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन’ आयोजित केले जाते.  आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी ‘महालक्ष्मी सरस’ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला दरवर्षी चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो.

‘महालक्ष्मी सरस’ चे नवी मुंबईतील हे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३७५, इतर राज्यातून सुमारे १०० असे स्टॉल असणार आहेत. तसेच खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७५ स्टॉलचे मिळून भव्य असे ‘फूड कोर्ट’ असणार आहे.

या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू याशिवाय महिलांच्या आकर्षणाच्या अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. राज्याच्या सर्व भागाची चव एकाच ठिकाणी भेट देणाऱ्यांना अनुभवता येणार आहे. सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी (प्ले एरिया) उभारण्यात आला आहे. यावेळी या प्रदर्शनात अनुभव केंद्र असणार आहे.

नवी मुंबई परिसरात सुद्धा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची परंपरा निर्माण व्हावी या हेतूने सलग दुसऱ्या वर्षी वाशी येथे हे भव्य प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला हातभार लावण्यास मदत होईल त्यामुळे या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

०००

वि.स.अ./श्रीमती श्रध्दा मेश्राम

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३: महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिओ  वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बिकेसी, वांद्रे येथे 13 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजित वर्ल्ड हिन्दू  इकॉनॉमिक परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै, सहसचिव शैलेश त्रिवेदी यासह जगातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेने भारताची संस्कृती आणि विविध क्षेत्रातील विकास तत्वावर आधारित वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत. पाश्चिमात्य आणि आपल्या संस्कृतीमध्ये मूलभूत अंतर आहे. पाश्चिमात्य संस्कृतीत जो  सक्षम आहे तोच विकास करू शकतो मात्र, आपल्या संस्कृतीमध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आणि अधिकार आहे.

भारताच्या नेत्रदीपक प्रगतीने सर्व जगाला थक्क करून टाकले आहे. सर्वाधिक गतीने पुढे येणारा भारत जगात तिसरी महासत्ता म्हणून पुढे येत आहे. जगातील लोक म्हणत होते की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश कशाप्रकारे प्रगती करू शकतो? परंतु देशातील कुशल मनुष्यबळ हेच विकासाचे महत्त्वाचे साधन असून प्रत्येकाला विकासामध्ये सोबत घेऊन जात आहोत असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र आज मोठ्या गतीने पुढे जात आहे. महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार कमिटीची स्थापना केली असून यामाध्यमातून महाराष्ट्र कोणकोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो याचा अभ्यास करुन यावर आधारित महाराष्ट्राच्या विकासाची धोरणे आखली जात आहेत. जागतिक पातळीवरती महाराष्ट्र विकासाला पूरक एक साखळी बनवत आहे. यामध्ये लॉजिस्टिक धोरण, सर्वाधिक गतिमान रस्त्यांचे जाळे बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग 700 किलोमीटर असून जो 16 जिल्ह्यांना जोडला आहे. हा महामार्ग थेट जेएनपीटी या बंदराला जोडला आहे, यातून अत्यंत चांगल्या पुरवठादारांची साखळी निर्माण होत आहे, रस्ते, विमान वाहतूक, बंदर विकास या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर राज्य शासन भर देत आहे. देशासोबतच महाराष्ट्राला मेरीटाईमची ताकद बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ध्यास आहे. सन 2014 पासून पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला गती दिली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगीतले.

पंतप्रधान श्री. मोदी यांनी देशाच्या विकासाला गती देणारी नवीन धोरण बनवले आहेत. भारताने गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेवरती आणले आहे. सन 2030 पर्यंत भारताला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवणार आहोत. हे उद्दिष्ट आम्ही 2028 पर्यंतच पूर्ण करू. जागतिक पातळीवरील आर्थिक संस्थांच्या माध्यमातून भारत देश सात ट्रिलियन इकॉनॉमीचे किंवा 9 ट्रिलियनचेही उद्दिष्ट गाठू शकतो असे सर्वेक्षण समोर येत आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित विकासावर अधिक भर देण्यात येत आहे. सन 2020 च्या देशपातळीवरील विकास सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र देशात भू-जल पातळीमध्ये देखील प्रथम होते. राज्यातील वनांचे आच्छादन देखील जास्त आहे. ग्रीन ऊर्जा, नदीजोड प्रकल्प यातून शाश्वत विकासावरती राज्य शासन भर देत आहे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी सांगितले.

प्रमुख वक्ते पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै म्हणाले की, देशामध्ये उपलब्ध मनुष्यबळ हे आपल्या विकासाचे बलस्थान आहे. विकसित भारत हेच भारताचे भवितव्य आहे. भारतीय संस्कृती हा विचार आहे तो जगात पुढे नेणे गरजेचे आहे. युवांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणे, आरोग्य, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, महिला सबलीकरण यावरती काम होणे गरजेचे आहे. भारताला जगातील महसत्ता बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे विकासाचे अनेक पैलू यावेळी श्री. पै यांनी मांडले.

०००

वि.स.अ./श्रीमती संध्या गरवारे

विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२ : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा बुद्धिबळाच्या क्षेत्रातील दबदबा आणखी वाढला आहे. विश्वनाथन आनंदच्या कामगिरीमुळे देशातील मुलांना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली. आता याच कामगिरीची परंपरा गुकेश समर्थपणे पुढे नेईल’, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

000

अभिजात मराठी : ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात मराठी भाषेचा दर्जा’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभवाची जगभरात ओळख असून ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असणार आहे. याचबरोबर मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळणार असून, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. त्या अनुषंगाने अभिजात भाषेचा दर्जा आणि अभिजात दर्जा बहाल केल्यास मराठी भाषेत नेमके काय बदल होणार आहे आणि मराठी भाषेचा इतिहास काय आहे या विषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. सदानंद मोरे यांनी माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे.  या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी तर दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘दिलखुलास’कार्यक्रमातून ही मुलाखत दि. १८ १९, २०, २१ व २३ डिसेंबर २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

माजी माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांना मंत्रालयात श्रद्धांजली

मुंबई,दि.12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे नुकतेच निधन झाले. ते 31 जानेवारी 2023 ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथून निवृत्त झाले होते. आज मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी  श्रद्धांजली  वाहिली.  

श्रद्धांजली वाहताना संचालक (माहिती) दयानंद कांबळे म्हणाले की, डॉ.खराट यांच्या शासकीय नोकरीची सुरुवात कोल्हापूर येथून झाली होती. रत्नागिरी व ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर 10 ऑक्टोबर 2021 ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे तेरुजू झाले होते. डॉ. खराट वाचनप्रेमी, सतत अभ्यासू वृत्ती असलेले आणि उत्कृष्ट संपादन कौशल्य असलेले लेखक म्हणूनही परिचित होते. महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासक होते. ते उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी त्यांना शासनाचे दोन पुरस्कार, उत्कृष्ट पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पुरस्कार, डॉ. आंबेडकर पुरस्कार, शब्दशिल्प पुरस्कार तसेच चौथा स्तंभ पुरस्कारासह अन्यही पुरस्कार मिळाले  होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन व माहितीपटांची निर्मिती केली होती.त्यांनी विविध 25 विषयांच्या पुस्तकांचे लिखाण केले असून, त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व गमावले असल्याचेही संचालक श्री.कांबळे यावेळी म्हणाले.

माहिती व जनसंपर्क विभागातील माजी वरिष्ठ सहायक संचालक प्रकाश डोईफोडे, पुणे जिल्हा माहिती कार्यालय येथील माजी प्रदर्शन सहाय्यक अजित कोकीळ, लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे वाहनचालक प्रविण बिदरकर यांचेही नुकतेच निधन झाल्याने यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

संचालक किशोर गांगुर्डे, उपसंचालक गोविंद अहंकारी, उपसंचालक सीमा रनाळकर, उपसंचालक (लेखा) सुभाष नागप यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर

मुंबई, दि.१२ : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे.

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.

ताज्या बातम्या

वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर !

0
मंत्री, खासदार, आमदारांच्या सुचनांनुसार वाळू माफियांना सोडू नका वाळू तस्करीत सामील अधिकाऱ्यांवरही निगराणी ठेवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी वाळू साठे व...

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल

0
नाशिक, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक...

‘देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चे महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

0
बुलढाणा, (जिमाका) दि. ९ : चिखली तालुक्यातील देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेचे उद्घाटन आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते...

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

0
मुंबई, दि.९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द...

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा...

0
मुंबई, दि.९ : कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या राज्यातील...