बुधवार, ऑगस्ट 6, 2025
Home Blog Page 534

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

शिर्डी, दि.७ – माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै.पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी कै.पिचड यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, श्रीमती हेमलता पिचड, वैभव पिचड, हेमंत पिचड आदी उपस्थित होते.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना असल्याचे नमूद करून श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित, आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वन जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यतत्पर होते. राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी काम केले. निळवंडे धरणाचं २० किलोमीटरचे काम थांबले होते, तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले. या धरणामुळे शंभर किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आज पाणी मिळत आहे. भंडारदरा (निळवंडे) धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे जलाशय नाव देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती.  ते मितभाषी, व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते. विविध विषयाचा ज्ञान, व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने अतिव दुःख झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कै.मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर कै.मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, राजाभाऊ वाजे, आमदार नरहरी झिरवाळ, सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.

‘वंदे मातरम्’‌ व ‘राज्यगीताने’ महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

मुंबई, दि. 7 :- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

००००

नदी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत -विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. ६ (विमाका): गोदावरी नदीतील प्रदुषणाला प्रतिबंध करण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मलजल, सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल तयार करण्यात येत असलेल्या प्रारुप आराखड्यास त्वरीत अंतिम स्वरूप द्यावे, यासोबतच नदी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश नाशिक विभागीय महासूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी  दिले.

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक आज दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली, त्यावेळी डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे कामकाज पाहणाऱ्या सहआयुक्त राणी ताटे,  महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके,  स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,  याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित,  जगबीर सिंग यांच्यासह संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते. निरीचे प्रतिनिधी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीदरम्यान विभागीय आयुक्तांनी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मलजल, सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल तयार करण्यात येत असलेल्या प्रारुप आराखडयाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याबाबत सदर कामे वेगवेगळया संबंधित योजनांमधून घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले. नदीकाठाच्या सुशोभिकरणाचा आणि नुकत्याच मंजूर झालेल्या रामकाल पथ या सर्वांचा एकत्रित बृहत आराखडा तयार करावा. तसेच हा आराखडा टप्प्याटप्प्याने जसा निधी  उपलब्ध होणार त्या प्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.

नाशिक महानगरपालिकातर्फे  ‘आपली गोदावरी’ नावाची स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी रुपये प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय पारितोषिक 3 लाख व तृतीय पारितोषिक 2 लाख आणि उत्तेजनार्थ 1 लाखांची बक्षीसे घोषित केली आहेत. या स्पर्धेबाबतची संपूर्ण  माहिती महानगरपालिकेच्या  www.ourgodavari.com या संकेतस्थळावर दिली आहे. या स्पर्धेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यााठी  याबाबत जनजागृती करावी, तसेच अधिकाधिक नागरिकांकडून सूचना  मागविण्यात याव्यात.

गोदावरी नदीच्या दोन्ही तटावर सुशोभिकरणासह नदीचे सौंदर्य कायमस्वरुपी जतन व्हावे व  नागरिकांची नदीशी नाळ जुळावी यासाठी उपक्रम राबवावेत. याठिकाणी दोन्ही बाजूला वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक सारखे प्रकल्प राबविल्यास भविष्यात नदीकाठाच्या परिसरात अतिक्रमण देखील होणार नाही. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकल्पाची व्यवहार्यता नाशिक ते त्र्यंबकेश्वर पट्ट्यात एनएमआरडीए आणि जिल्हा परिषदेने तपासावी.

नदीमध्ये काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर दवाखान्याचे आणि मंगल कार्यालयाचे कपडे स्वच्छ करीत असल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे परवानगी नसलेले प्लास्टिक शहरात वापरले जात असून त्यामुळेही नदीचे प्रदूषण होत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्या सर्वांवर महानगरपालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त पथकाने गुन्हे दाखल करण्याचे आदेशित केले. त्याचप्रमाणे ज्या मोठया गृहनिर्माण प्रकल्पांना स्वत:चे एस.टी.पी आहेत, त्यांचे एस.टी.पी कार्यक्षमतेने सुरू आहेत किंवा कसे याचीही तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण् नियंत्रण मंडळाला आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले.

०००

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ६: ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

 

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६: राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास 35 वर्ष प्रतिनीधीत्व केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. आदिवासी बांधवांचे प्रश्न त्यांनी विधानसभेत नेहमीच मांडले. आदिवासी बहुल अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील ते नेहमी प्रयत्नशील राहिले.

मी मुख्यमंत्री असताना काही महिन्यांपूर्वी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आदिवासी भागातल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. आपल्या प्रकृतीची चिंता न करता मधुकरराव या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यातून त्यांची आदिवासी बांधवाविषयीची तळमळ दिसून येते, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

 

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ६: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी बांधव, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील  मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी बांधव, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबिय, कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

०००

‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

  • ५४ व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन;
  • राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. ६:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54 व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही मॅरेथॉन 6 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडणार असून यातील सहभागी सैन्यदलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे 405 कि.मी. अंतर पार करणार आहेत.

मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.

अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील जवान, माजी अधिकारी, युवक व एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत. सैन्य दलाच्या वतीने या परिक्रमेदरम्यान नाशिक येथे ‘जाणूया सैन्य दलांना’ व अहिल्यानगर येथे ‘सैन्य दलात महिलांना समान संधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर येथे माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल बिक्रमदीप सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 

 

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) उद्या लोकअदालत

मुंबई, दि.६: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या दि. ७ रोजी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात आले आहेत. या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, ए. पी. कुऱ्हेकर, सदस्य (न्या.) आणि आर. बी. मलिक, सदस्य (न्या.) हे कामकाज पाहणार आहेत.

या लोक अदालतीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील प्रलंबित असलेली सेवाविषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

०००

 

विधानसभेची उद्या मुंबईत बैठक

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे उद्या शनिवार, दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११  वा. आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली आहे.

याचबरोबर महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.

०००

कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ

मुंबई, दि. ६: विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

०००

ताज्या बातम्या

हतनूर धरण प्रकल्प; ११ गावांच्या पुनर्वसन संदर्भात सकारात्मक मार्ग काढू – मदत व पुनर्वसन...

0
मुंबई, दि. ६ : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील हतनूर धरण प्रकल्पातील ११ गावांच्या पुनर्वसन संदर्भात मदत व पुनर्वसन विभाग आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक...

शेतकरी हित लक्षात घेऊन पाणंद रस्त्यांसाठी धोरण तयार करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. 6 : प्रत्येक शेताला रस्ता मिळाला पाहिजे, ही राज्य शासनाची भूमिका आहे. यानुसार पाणंद रस्ते तयार करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्या...

जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. 6 : राज्यातील जमीन मोजणीचे काम अधिक सुलभ, अचुकतेने आणि जलद गतीने होण्यासाठी अत्याधुनिक रोव्हर्स महत्त्वपूर्ण आहेत. महसूल आणि भूमी अभिलेख विभागाला...

समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग – राज्यपाल...

0
‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ सोहळा मुंबई, दि. ६ : “समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा केवळ गौरव नव्हे, तर समाजातील इतरांनाही प्रेरणा देण्याचा मार्ग...

अपूर्ण नव्हे, तर स्वयंभू… मन में है विश्वास, हम होंगे कामयाब!

0
त्यांचे जगच वेगळे... शब्दांच्या पलिकडचे, केवळ सांकेतिक खुणांचे आणि नजरेतील भावांचे. ही भाषा कदाचित आपल्याला सहज कळणार नाही, पण त्यांच्या डोळ्यांतील चमक बघा... त्यात...