रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 53

गुणवत्ता आणि पटसंख्यावाढीकडे लक्ष देण्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षण विभागाला निर्देश

नाशिक, दि. १३: नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून (दिनांक १६) सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी मध्ये विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. राज्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातही सर्व लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी सर्व शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. याशिवाय, शिक्षण विभागाने गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीकडे अधिक लक्ष देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मंत्री श्री. भुसे म्हणाले की, सध्या राज्यातील अनेक शाळांमध्ये नवीन उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम त्या शाळेपुरते मर्यादित न राहता ते सर्व शाळेपर्यंत पोहोचावे, यासाठी नियोजन केले जाईल. विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत वाढावा यासाठी अधिक चांगले आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. येत्या सोमवारपासून सर्व शाळा सुरू होत आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी या विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचे नियोजन जिल्हा परिषदेने तयार केले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा या शाळांकडे आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम साह्यभूत ठरतील, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी पीएम श्री शाळा, विविध शासकीय योजनेव्दारे शाळांच्या पायाभूत भौतिक सुविधांचा विकास. (पिण्याचे स्वच्छ पाणी, कम्पाऊंड वॉल, स्वच्छतागृह, वर्ग खोली बांधकाम व दुरुस्ती इ.), प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रम, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना,  इ. ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, आधार पडताळणी / अपार आयडी,  शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, हेल्थ कार्ड, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आढावा, पवित्र पोर्टल – शिक्षक भरती टप्पा-२, शिक्षक समायोजन, जिल्हा परिषद – स्मार्ट स्कूल मोहीम,  जिल्हा परिषद क्षेत्रात पटसंख्या वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, शिक्षक / संस्था / अधिकारी यांनी विद्यार्थी हितासाठी राबविलेले नवउपक्रम, आयडॉल शिक्षक बँक, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शाळा आणि  सुपर – ५० कार्यक्रम आदी योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी, सुपर ५० तसेच विविध शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमांची आणि त्याच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितीन बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी या बैठकीला उपस्थित होते.

00000

उत्तूर शासकीय योग, निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी व रुग्णालयात उपचारासाठी जगभरातील विद्यार्थी व नागरिक येतील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

 * उत्तुर येथील रुग्णालय देशातील अग्रेसर योग व निसर्गोपचार रुग्णालय बनेल

* या महाविद्यालयातून देशातील नामवंत योग व निसर्गोपचार तज्ज्ञ घडतील

* मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट; जिल्ह्यातील एकाही गरजू रुग्णाला उपचारासाठी मुंबई, पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही

 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी आणि या रुग्णालयात उपचारासाठी जगभरातील विद्यार्थी व नागरिक येतील. तसेच या महाविद्यालयातून योग व निसर्गोपचाराचे नामवंत तज्ज्ञ घडतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

राज्यातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रथम वर्ष बी.एन.वाय.एस. 2024 – 25 च्या प्रवेशास प्रारंभ व उद्घाटन समारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे आयुक्त डाॅ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी न. रा. पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाचे मूळ कॉलेज उत्तुरमध्ये आहे. तथापि या महाविद्यालयाची इमारत पूर्ण होईपर्यंत सुरुवातीची दोन वर्षे ते बहिरेवाडी येथील जे.पी. नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये भरणार आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी 205 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंधरा एकर विस्तीर्ण जागेवर मुख्य रुग्णालय महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. देशात यापूर्वी पाच योग महाविद्यालये असून उत्तुर येथील हे सहावे योग रुग्णालय देशातील अग्रेसर योग रुग्णालय बनेल, असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, या रुग्णालयामध्ये 4 हजारहून अधिक रुग्णांना सेवा मिळणार आहे. महाविद्यालयाची क्षमता 60 विद्यार्थ्यांची असून या ठिकाणी स्टाफ कॉर्टर्स, सुसज्ज ग्रंथालय, नॅचरोपॅथी थेरपीज केंद्र, ऑडिटोरियम, ट्रीटमेंट केंद्र, डायट सेंटर, स्विमिंग पूल, 200 मुलांचे व 200 मुलींचे वसतीगृह, चिकित्सा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, योगासन हॉल, योगावर आधारित चालण्याचा ट्रॅक अशा विविध सुविधा असणार आहेत. 252 कोटींच्या निधीचा राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय गडहिंग्लज तालुक्यात तर फिजिओथेरपी महाविद्यालय उत्तुर येथे सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु असून यासाठी जागेची चाचपणी करण्यात येत आहे.

योग व निसर्गोपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय आदी विविध प्रकारची कामे वैद्यकीय शिक्षण विभागा अंतर्गत करण्यात येत आहेत. तसेच सीपीआर रुग्णालयाच्या इमारतींची दुरुस्ती व या परिसराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट घडवण्यात येत आहे. येत्या दिवाळीदरम्यान सीपीआरच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होत असून हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील एकाही गरजू रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुण्याला जावे लागणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शिक्षण व शासकीय रुग्णालयांमध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी शासकीय रुग्णालयांची आहे. रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्यास एकाही रुग्णाला खाजगी दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर व डॉ. मिलिंद निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.भाग्यश्री खोत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालय स्थापनेबाबतची सविस्तर माहिती दिली. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, किरण कदम, उत्तुरचे सरपंच किरण अमनगी, बहिरेवाडीच्या सरपंच सौ.  रत्नजा सावंत, डॉ. वीणा पाटील, नरसू पाटील, शिवाजीराव देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.

     ***

राजूर बहुला एमआयडीसीत आयटी पार्कसाठी २५ एकर जागा- उद्योग मंत्री उदय सामंत

नाशिक, दि. १३ जून:   जिल्ह्यातील राजूर बहुला येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संपादित केलेल्या जागेपैकी २५ एकर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून द्यावी. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे, असे निर्देश उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीचा नाशिक विभागाचा आढावा आणि जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडी-अडचणीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार, ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब, महाराष्ट्र चेंबर्सचे सचिन शहा, मिलिंद राजपूत, धनंजय बेळे, मनीष रावल, हर्षद बेळे, राजेंद्र वडनेरे, राजेंद्र आहिरे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नाशिकमधील आय.टी पार्कच्या माध्यमातून विकासाला गती मिळणार आहे. त्यासाठी राजूर बहुला येथील २५ एकर क्षेत्रासह महानगरपालिका १५ एकर जागा उपलब्ध करून देणार आहे. उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महानगरपालिकेच्या माध्यमातून आय. टी. कंपन्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

आगामी कुंभमेळाकरीता साधूग्रामसाठी जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. तेथे उद्योजक, महानगरपालिकेच्या सहकार्याने कायमस्वरूपी प्रदर्शनी केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आराखडा सादर करावा. या प्रदर्शनी केंद्रात 11 वर्षे औद्योगिक प्रदर्शने भरविण्यात येतील, तर 12 व्या वर्षी  कुंभमेळासाठी सदरची जागा प्रशासनाकडे सोपविण्यात येईल. तसेच कुंभमेळ्यानिमित्त देशभरातून येणाऱ्या उद्योजकांसाठी टेंट उभारणीचे निर्देश मंत्री श्री. सामंत यांनी दिले.

अग्निश्यामक कराचा प्रश्न महानगरपालिका आणि एमआयडीसीच्या समन्वयातून मार्गी लावण्यात येईल. उद्योजकांना विना व्यत्यय अखंड वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने उपाययोजना कराव्यात. उपकेंद्रांचे सक्षमीकरण करावे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा उद्योग समितीच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न सोडविले जातात. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी  जिल्हा उद्योग समितीच्या अंतर्गत उप समित्यांची स्थापना केली असून या उपसमितीच्या माध्यमातून उद्योजकांच्या प्रश्न सोडविण्यास गती मिळत आहे. याच धर्तीवर राज्यभरात कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल, असेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
00000

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकासकामांसाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील उपस्थित होते.

खामगाव दौऱ्यात उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा व प्रलंबित कामांची माहिती घेतली. त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण रस्ते, सिंचन सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण व इतर पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून विशेष निधीची तरतूद केली जाईल. जिल्ह्यातील मागास भागांचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हे आमचे प्राधान्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्याचा आर्थिक विकास समतोल होण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सर्व विभागासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. लाडकी बहिण व लाडका भाऊ योजनासाठी विशेष तरतुद करण्यात आली असून लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात आहे. सोबतच इतर विभागावर निधीची कमतरता भासू देणार नाही,याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अनुसूचित जाती, जमाती व आदिवासी योजनासाठी गेल्या वर्षापेक्षा जास्त तरतूद केली असून सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचा शासनाचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी व्यक्त केला.

000000

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री नितेश राणे

पंधरा दिवसानंतर पुन्हा आढावा घेणार

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : अरुणा प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना पायाभूत सुविधा मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा हक्क असून त्यांना त्या सुविधा पुरविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रकल्पग्रस्तांना पाणी, रस्ते, वीज अशा अत्यंत महत्वाच्या सुविधा प्रशासनाने तात्काळ पुरविण्याचे निर्देश देत प्रकल्पग्रस्तांचे  प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली अरुणा मध्यम प्रकल्पाच्या विविध विषयांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, आखवणे-भोम अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी आणि गांवकरी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, गावकऱ्यांनी कोणत्याही विरोधाशिवाय आपली जमीन या प्रकल्पासाठी दिलेली आहे. प्रकल्पग्रंस्तांना पायाभुत सुविधा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्याबाबत तसेच पर्यायी शेतजमीन उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पालकमंत्री म्हणून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार आहे. सानुग्रह अनुदानाच्या रकमेच्या प्रदानाची अनेक प्रकरणे दिर्घकाळ प्रलंबित असून याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी.  प्रकल्पाच्या कामामुळे रस्ते खराब झालेले आहेत ते रस्ते दुरुस्त करावेत. तिन्ही गावठणातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करावे. जे काम पुर्ण होईल ते प्रशासनाने गावकऱ्यांना हस्तांतरीत करावे. कालव्याच्या वरच्या भागात शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. पुनर्वसन गावठणासाठी दर्जेदार क्रीडांगण बनवावे. पुर्ण झालेली विविध समाज मंदिरांची ताबा पावती संबंधितांना देण्यात यावी.  संकलन यादीनुसार प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित असणाऱ्या भुखंडाची पाहणी करावी. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे निर्देश देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले.

०००००००

नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन

नाशिक, दि. १३ : नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, साहित्यिक उपस्थित होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अभिजात मराठी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसारासाठी जगभरातील मराठी भाषकांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहकार्य मिळणार आहे. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम होतील. त्यांना उत्तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्पर्श लाभलेला असेल. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यासाठी विविध समित्या गठित करण्यात येतील. या संमेलनाचे कार्यालय नाशिक येथे १६ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होईल. या कार्यालयाच्या माध्यमातून संमेलनाच्या तयारीचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल. या संमेलनात अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असे नियोजन करण्यात येईल.

या संमेलनात पुस्तक आदान- प्रदानाचा उपक्रम असेल. या वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथे झालेल्या संमेलनात हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. पुणे येथील संमेलनात ३५ हजार वाचकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता, असे सांगत मंत्री श्री. सांमत यांनी मराठी साहित्याची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मराठी साहित्य संग्रहालय स्थापन करण्यात येईल. त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सहकार्य लाभणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी समीक्षक डॉ. वरखेडे, कुलगुरू डॉ. सोनवणे, ॲड. ठाकरे यांच्यासह उपस्थित साहित्यिकांनी विविध सूचना केल्या.

०००००

कृष्णदेव गोसावी यांनी सुरू केली आरसेटी प्रशिक्षण, मुद्रा योजनेतून मोबाईल शॉपी

शासकीय योजनांचा लाभ घेऊन अनेक जण आयुष्यात प्रगती साधत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावीचे कृष्णदेव गोसावी त्यापैकी एक. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर सेटी मधून व्यवसायाचे प्रशिक्षण व त्यानंतर मुद्रा योजनेतून स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे.

कृष्णदेव गोसावी यांचे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी हे गाव. आई, वडील, पत्नी व दोन मुले असे त्यांचे कुटुंब. कुटुंबाचा व्यवसाय शेती आहे. मात्र, त्यातून सहा जणांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात अडचण येत असल्याने त्यांनी बांधकाम क्षेत्रात बिलिंगची खाजगी नोकरी स्वीकारली. मात्र, आर्थिक अडचण दूर करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून कृष्णदेव गोसावी यांनी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था सांगली या संस्थेतून सेल फोन दुरूस्ती आणि सेवा उद्यमी याचे मोफत प्रशिक्षण घेतले.

याबाबत कृष्णदेव गोसावी म्हणाले, आर सेटीच्या सेल फोन दुरूस्ती व सेवा उद्यमी या 30 दिवसांच्या प्रशिक्षणात आम्हाला सेल फोन दुरूस्ती व सेवा उद्यमीसाठी लागणारे आवश्यक सर्व प्रशिक्षण मिळाले. तसेच, व्यवसाय उभारणीसाठी कोणत्या मशिनरी वापराव्यात आदि बाबींची माहितीही मिळाली. आरसेटीचे प्रशिक्षक प्रदीप साळुंखे आणि प्रवीण पाटील यांनी बँकिंग, आर्थिक नियोजन कसे करावे, आलेल्या अडचणींवर मात कशी करायची, संभाषण कौशल्य आदिंची माहिती प्रशिक्षणात दिली. प्रशिक्षणादरम्यानच मला मुद्रा कर्जाविषयीही माहिती मिळाली.

यशस्वी प्रशिक्षणानंतर कृष्णदेव गोसावी व्यवसायासाठी कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी मुद्रा योजनेतून त्यांनी कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. यासाठी त्यांना आर सेटी संस्थेचे संचालक महेश पाटील यांनी मदत केली. या योजनेतून कृष्णदेव गोसावी यांना एक लाख रूपये कर्ज मिळाले. त्यातून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बहिरेश्वर येथे स्वत:ची मोबाईल शॉपी सुरू केली. बहिरेश्वर येथे बांधकाम क्षेत्रात काम करत असताना पूर्वी काम केल्याने हा व्यवसाय स्थिरावू शकतो, हे त्यांनी ओळखले. त्याचा फायदाही त्यांना होत आहे. मासिक प्राप्ती चांगली होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

याबाबत कृष्णदेव गोसावी म्हणाले, व्यवसाय सुरू करण्यासाठी मला मुद्रा योजनेतून एक लाख रूपये कर्ज घेतले. त्यासाठी माझी स्वत:ची 80 हजार रूपये गुंतवणूक केली. अशी एकूण 1 लाख 80 हजार रूपये गुंतवणूक करून त्यांनी मोबाईल शॉपी सुरू केली. यातून सद्यस्थितीत 15 हजार रूपये मासिक उत्पन्न होत असून आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. आरसेटी मध्ये जावून प्रशिक्षण घेऊन ग्रामीण भागातील तरूण पिढीने स्वतःच्या पायावर उभे रहावे, असा संदेश त्यांनी दिला.

–         संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली

00000

पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, दि.13, :- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज जायकवाडी धरणातील उद्भव विहीर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुदधीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल, ॲप्रोच ब्रिज, फिल्टर प्लॅंट आदीसह सुरू असलेल्या कामाची पाहणी करून प्रत्येक कामाला काम पूर्ण करण्याबाबत विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे.  विहित कालावधीत कामे पूर्ण करा,असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले.

पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, मजीप्रचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार श्री.देशमुख यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री पापळकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलचे काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणे, 26 एमएलडीचा टप्पा जूनअखेर पूर्ण करणे, यासह कंत्राटदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार कंपनी आणि महापालिकेच्या सबंधित यंत्रणेने आपसात समन्वय ठेवत विहित कालमर्यादेत काम पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे.  महापालिका व कंपनीतर्फे करण्यात येणारी उपाययोजना याबाबत त्यांनी माहिती घेतली.

विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, २४ ठिकाणच्या जोडण्या पूर्ण करणे, ३० टाक्याचे बांधकाम आणि वितरण व्यवस्था जोडणीचे काम मागे पडले आहे ते काम कंत्राटदाराने पूर्ण करण्याबाबत विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी सूचना दिल्या.

जायकवाडी धरणक्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचे काम, फारोळा येथील २६ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून अडचणीही जाणून घेतल्या.

मा.उच्च न्यायालयात पाणी पुरवठा योजनेबाबत जनहित याचिका सुरू असून प्रशासनाकडून मा.उच्च न्यायालयाला वेळेवेळी पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा दिला जातो. 11 जून रोजी याबाबतचा आढावा देण्यात आला. मुख्यमंत्री महोदय यांनीही मुंबई येथे नुकतीच पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक घेतली असून या बैठकीत  छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस  कार्यान्वित करा असे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*****

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची मोझरी येथे उपोषणाला भेट

अमरावती, दि. १३ (जिमाका) : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोझरी येथे बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली. तसेच मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

मंत्री श्री. राठोड यांनी आज उपोषण मंडपाच्या ठिकाणी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांनी श्री. कडू यांच्या मागण्या शासनाकडे मांडल्या आहेत. याबाबत बैठकाही घेतल्या आहे. मागण्यांबाबत सभागृह आणि शासन दरबारी लक्ष वेधले आहे. तसेच येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येही मागण्या मांडण्यात येतील. प्रत्येक मुद्यांवर चर्चा करून पाठपुरावा करण्यात येईल. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रत्येक प्रश्नाबाबत शासन सकारात्मक पाऊल उचलणार आहे. सध्या मशागत आणि पेरणीची कामे असल्याने आणि श्री. कडू यांची प्रकृती लक्षात घेता उपोषण मागे घेण्यात यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान सकाळी श्री. राठोड यांनी तिवसा येथील विश्रामगृहात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गुरूकुंज मोझरी येथील तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

000000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची मुलाखत

मुंबई दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप व प्रवेश प्रक्रिया’ या विषयासंदर्भात राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी राज्य तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील तरुणांना व्यावसायिक आणि करिअर उभारणाऱ्या गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत ई-कौन्सिलिंगची संकल्पना प्रथमच राबवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशा पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रवेशाची संधी मिळणार आहे.

संचालनालयामार्फत यावर्षी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ही संकल्पनाही प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योगानुसार सुसंगत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे आहे आणि त्यामधून रोजगाराच्या संधी कशा खुल्या होतात या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती संचालक डॉ. मोहितकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 17 जून 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच  महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000

जयश्री कोल्हे/ससं/

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...