गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 494

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

मुंबई, दि. २५:  नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते.  लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ‘द इंटीग्रेटेड सोल्युशन फॉर बुकींग ऑफ रजिस्ट्रेशन मार्क ऑफ चॉईस’  ही ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

या सुविधेबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड जि. पुणे येथे चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविना) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून  https://fancy.parivahan.gov.in/  या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती ऑफलाईन पद्धतीने जारी करण्यात येईल, असे परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

ऑनलाईन पद्धतीने पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याचे टप्पे

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/  या संकेतस्थळावर जावून न्यु युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेयमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी.

 

०००

नीलेश तायडे/विसंअ/

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे – पवार यांनी कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा दि. २४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते दि. २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

मुंबई दि.२४: भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते.

 

०००

मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती ९९% दिसणे तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य -निवडणूक निर्णय अधिकारी, अणुशक्ती नगर

मुंबई दि २३: मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी 172- अणुशक्तीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रात मतदानादिवशी ईव्हीएम मशीन पूर्ण दिवस वापरल्यानंतरही काही CUs मध्ये EVM पॉवर पॅक स्थिती 99% दर्शविली गेली याबाबत एक उमेदवार यांनी आक्षेप नोंदविला होता.

भारत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा करताना 172- अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे की, EVM पॉवर पॅक 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला जोडणी देण्यासाठीची रचना आहे. जेंव्हा क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होते परंतु जेंव्हा बॅटरीची क्षमता ‘थ्रेशोल्ड’च्या खाली कमी होते तेव्हा ते वेगाने घसरते. एकच BU आणि 1000 पेक्षा कमी मते नोंदविली असताना हलके विद्युत प्रवाह असल्यास, बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आऊटपुट व्होल्टेज 7.4V च्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे 99% क्षमता दर्शविली जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत ही एक सर्वसामान्य स्थिती असून याबाबतचा आक्षेप अयोग्य असून अशाप्रकारे गैरसमज पसरविणे अयोग्य असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

 

 

‘संविधान दिना’निमित्त ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण

मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘संविधान दिना’ निमित्त विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक व विचारवंत प्रा. अशोक चौसाळकर यांची दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत होईल. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि. २७, २८, २९ व ३० नोव्हेंबर रोजी तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. २६ रोजी मुलाखत प्रसारित होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस देशात ‘संविधान दिवस’ साजरा केला जाऊ लागला. या दिनानिमित्त संविधान निर्मितीची प्रक्रिया, इतिहास, वैशिष्टे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतलेली प्रा. चौसाळकर यांची मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी तर निवेदक सुषमा जाधव यांनी घेतलेली प्रा. डॉ. जाधव यांची मुलाखत दि. २७, २८, २९ व ३० रोजी आकाशवाणीची सर्व केंद्रांवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार असून ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर देखील ही मुलाखत ऐकता येईल.

प्रा. डॉ. जाधव यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.

आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-क  च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज, संबंधित सर्व कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे हे पडताळणी, अनुवाद चाचणीच्या वेळी सोबत मूळ प्रतींसह सादर करणे अनिवार्य राहील.

लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांने या संदर्भात शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. ६ मधील “लेखनिक/ वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी” या तरतुदीकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात येत आहे. या परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता, विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या एक टप्पा कमी म्हणजे १२ वी असणे आवश्यक आहे. या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे आवश्यक आहे.

लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे पडताळणी/अनुवाद चाचणीच्या वेळी प्रपत्र १/प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक ११ अशी कागदपत्रे सादर करावीत.

शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित/नसलेले) / मेंदुचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक ११ सादर करणे आवश्यक नाही.

लेखनिकाची मागणी करणा-या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १/ प्रपत्र २ मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हतादेखील नमूद करणे आवश्यक आहे.

विहित प्रपत्र १/ प्रपत्र २ व नमुना क्रमांक ११ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २२ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.

तालुका क्रीडा अधिकारी

तालुका क्रीडा अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ५ व ६ डिसेंबर, २०२४ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २८ नोव्हेंबर, २०२४ तसेच दिनांक ३ व ४ डिसेंबर, २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

प्राध्यापक क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गट-अ)

विविध संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती,चाळणीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ व २८ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत आयोगाच्या सीबीडी बेलापूर, नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येतील.

सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ,ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४, सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४,

सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकीत्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार)ची मुलाखत दि. २७ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, परभणी गट- अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर, २०२४

राध्यापक, विकृतीशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ सिंधुदुर्ग ची मुलाखत दि.२८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येतील.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग- गट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर

मुंबई, दि. २२ :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, गट-अ मधील सह्योगी प्राध्यापक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, गट-अ;

सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, सातारा;

सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ.आणि

सहयोगी प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, परभणी. या संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) – गट ब – (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर

मुंबई, दि. २२ : उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट- ब (अराजपत्रित) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक २७ सप्टेंबर, १६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

  • मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई
  • ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी १४ टेबल
  • टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही एकूण ३६ टेबल

मुंबई दि. २२: मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दहा वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

मतदान केंद्रांवरील आवश्यक त्या सोयीसुविधा व उपाययोजनांबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहणी करुन सातत्याने आढावा घेत आहेत.

मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून धारावी विधानसभा मतदारसंघासाठी सत्यप्रकाश टी.एल. (भा.प्र.से.), सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी केदार नाईक, वडाळा विधानसभा मतदारसंघासाठी विक्रम सिंह मलिक, माहिम विधानसभा मतदारसंघासाठी हिमांशु गुप्ता, वरळी विधानसभा मतदारसंघासाठी समीर वर्मा, शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी के. सी. सुरेंदर, भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी अंजना एम., मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी रवींद्र नाथ गुप्ता, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघासाठी शिल्पा शिंदे,  कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद रेहान रझा ‌यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर  स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक  सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी वडाळा, माहिम आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०५ टेबल, भायखळा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०४, धारावी, शिवडी आणि मलबार हिल  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०३ टेबल तर सायन कोळीवाडा आणि मुंबादेवी मतदारसंघासाठी प्रत्येकी ०२ असे एकूण ३६ टेबल असतील. सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी जिल्ह्यातील १०  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे एकूण १० टेबल असतील. सकाळी ०८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या

धारावी विधानसभा मतदारसंघ – १९ मतमोजणी फेऱ्या,  सायन-कोळीवाडा – २०, वडाळा -१६, माहीम – १८, वरळी – १७, शिवडी – १९, भायखळा – १९, मलबार हिल – २०, मुंबादेवी – १७, कुलाबा – १९ अशा मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठित करण्यात आली आहेत.

प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने  मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकारपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मीडिया सेंटर येथे जमा करावा लागेल.

मतदार संघ व मतमोजणी केंद्र

धारावी – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, तळमजला, किचन रूम, धारावी बस आगाराच्या जवळ, सायन वांद्रे लिंक रोड, धारावी, मुंबई – ४०००१७.

सायन कोळीवाडा – न्यू सायन मुन्सिपल स्कूल, प्लॉट नंबर 160/ 161, स्कीम सहा, रोड नंबर 28, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल जवळ, सायन पश्चिम, मुंबई-४०००२२.

वडाळा – बीएमसी नवीन इमारत, सीएस नंबर ३५५ बी, स्वामी वाल्मिकी चौक, हनुमान मंदिरासमोर, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल, मुंबई-३७

माहीम – डॉक्टर अँटनिओ डी’साल्व्हिया हायस्कूल, एमरोल्ड हॉल, दादर, मुंबई-28.

वरळी – पश्चिम रेल्वे जिमखाना हॉल, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी क्रीडा मैदान

शिवडी – ना. म. जोशी मार्ग, बीएमसी प्राथमिक शाळा क्रमांक दोन, लोअर परळ, मोनो रेल स्टेशन जवळ, ना.म. जोशी मार्ग, करी रोड, मुंबई-११.

भायखळा – रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेड, तळमजला हॉल, जे जे रोड, ह्युम हायस्कूल जवळ, भायखळा, मुंबई-०८

मलबार हिल – विल्सन कॉलेज, तळमजला, रूम नंबर १०२, १०४, नेताजी सुभाष चंद्र मार्ग, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड, मुंबई-०७.

मुंबादेवी – तळमजला, गिल्डर लेन, बीएमसी शाळा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोर, मुंबई सेंट्रल पूर्व, मुंबई-०८.

कुलाबा – न्यू अप्लाइड आर्ट असेंबली हॉल (एक्झिबिशन हॉल), जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई –

०००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी

0
छत्रपती संभाजीनगरमधील मैदान परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कडक निर्देश  - उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई, दि. 17 : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या मालकीच्या सार्वजनिक...

विधानसभा कामकाज

0
प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि. १७ : शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात...

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १७ : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे....

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

0
मुंबई, दि. 17 : बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील...

स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी : स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये मिरा-भाईंदर मनपा देशात प्रथम

0
नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण...