शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 490

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडून नव्या सरकार स्थापनेचा दावा

मुंबई, दि. ०४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला.

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

००००

 

पोलीस क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

  • ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष

   गटाला विभागून तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बाजी

  • ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता भव्य समारोपीय समारंभातून संपन्न

कोल्हापूर, दि.4 : पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 50 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय समारंभावेळी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघांना बक्षिस वितरित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपली मानसिक व शारिरिक तयारी ठेवण्यासाठी कोणत्याही क्रीडा प्रकाराची आवड असणे गरजेचे आहे. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात क्रीडा प्रकारांना सर्वोच्च स्थान असल्याने अजूनच या स्पर्धेला रंगत प्राप्त झाली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेतून अनेक चांगले खेळाडू पुढे येतील. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी पोलीस विभागातील खेळाडूंनी अजून आपली कामगिरीमध्ये सुधारणा करावी असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्‍हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडित, पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम.राजकुमार, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक सांगली संदिप घुगे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्रातील 50 व्या पोलीस क्रीडा स्पर्धाला शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर रोजी पोलीस मैदानावर सुरुवात झाली. त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते झाले होते. या स्पर्धेत कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून एकूण 19 संघ एकल व सांघिक गटात सहभागी झाले होते. 1,200 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जवळपास 19 विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. यात जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष गटाला विभागून मिळाला तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारत जनरल चॅम्पियनशीप चषकाला गवसणी घातली. पोलीस विभागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या संघांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. पुढिल वर्षीची स्पर्धा पुणे ग्रामीण यांच्याकडे आयोजित केली जाणार आहे. याची घोषणा व ध्वज हस्तांतरण यावेळी करण्यात आले.

व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, क्रॉस कंट्री, मॅरेथॉन, कुस्ती, ज्युडो, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळांचे सामने या स्पर्धेत झाले. यावेळी पहिल्यांदाच वुशू सारख्या खेळाचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्‍हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी या स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकसभा, विधानसभा तसेच इतर महत्त्वाच्या वय्क्तींचे दौरे विभागातील महत्त्वाचे सन उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले. त्यांचा थकवा या स्पर्धेतून नक्कीच दूर झाला असेल. तसेच त्यांना कामाच्या दैनंदिन परिस्थितीतून एक वेगळे वातावरण देण्याचा प्रयत्न यातून केला. या स्पर्धेतून मिळालेली ऊर्जा चांगल्या कामी खर्ची घालावी तसेच नियंत्रित गुन्हेगारी कायम राहिल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी मनोगतामधून व्यक्त केले. प्रास्तविकात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीसांच्या समोरील विविध आव्हाणे व बदलते कामाचे स्वरूप यातून त्यांना चांगले वातावरण निर्माण व्हावे व त्यांना सांघिक भावना निर्माण व्हावी यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी मानले तर सुत्रसंचलन मोनिका जाजू यांनी केले. कार्यक्रमात वारणा व्हॅली स्कूल, तळसंदे येथील मुलांनी मल्लखांब क्रीडा प्रकारातील रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर केली.

विजेते संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे –

  1. 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये

पुरूष गटात सुवर्ण -कोल्हापूर, रौप्य – सातारा व  कांस्य – सांगली

महिला- 3 सुवर्ण कोल्हापूर, 2 रौप्य सातारा व 1 कांस्य पुणे ग्रामीण

2.त्वायक्वांदो- पुरुष – कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

3.वुशू- पुरुष- कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

4.वेटलिफ्टिंग- पुरुष- सातारा, महिला- सातारा

5.ज्युदो- पुरुष- सातारा, महिला- सातारा

6.कुस्ती- पुरुष-सातारा, महिला- सातारा

7.बॉक्सिंग- पुरुष- सातारा, महिला- सांगली

8.खो-खो- पुरुष- सांगली, महिला-  सोलापूर ग्रामीण

9.कबड्डी- पुरुष- पुणे ग्रामीण, महिला- कोल्हापूर

10.बास्केटबॉल- पुरुष- सोलापूर शहर, महिला- सोलापूर शहर

11.व्हालीबॉल- पुरुष- सांगली, महिला- कोल्हापूर

12.जलतरण- सातारा

13.हॅन्डबॉल – सांगली

14.हॉकी – कोल्हापूर

15.फुटबॉल- कोल्हापूर

16.क्रॉसकंट्री – पुरुष- सोलापूर शहर, महिला- कोल्हापूर

17.ॲथलॅटिक्स- पुरुष- कोल्हापूर, महिला- कोल्हापूर

18.बेस्ट ॲथलिट- पुरुष- अमृत तिवले, कोल्हापूर, महिला- सोनाली देसाई, कोल्हापूर

अशा प्रकारे जनरल चॅम्पियनशीप  पुरुष गट – कोल्हापूर व सातारा जिल्हा विभागून मिळाली तर महिला गटात कोल्हापूरने बाजी मारली.

00000000

भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या ‘मीडिया ॲवार्ड-२०२४’ साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुबंई, दि.४ : राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये  चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रित माध्यम (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/ सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार  पुरस्कारांचा समावेश आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांनी आपले प्रस्ताव दि. १० डिसेंबर २०२४ पर्यंत  राजेश कुमार सिंग, अवर सचिव (संवाद),  भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन. अशोका रोड, नवी दिल्ली 110001. ईमेल: media-division@eci.gov.in ,  फोन नंबर: ०११-२३०५२१३१ केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या कार्यालयाकडे परस्पर पाठवायचे आहेत.  प्रस्ताव इंग्रजी अथवा हिंदी भाषांमध्ये सादर करावेत. इतर भाषेतील प्रस्ताव  इंग्रजी भाषांतरासोबत सादर करावे.  पुरस्कारासंदर्भात अंतिम निर्णय हा निवड समितीचा राहील. प्रस्तावावर आपले पूर्ण नाव, प्रसारमाध्यमांचा सविस्तर पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल यांची अवश्य नोंद करावी.

निवडणुकांबद्दल जागरुकता निर्माण करून, निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांना साक्षर करून, निवडणुकीशी संबंधित माहिती व तंत्रज्ञान वापर, युनिक/रिमोट मतदान केंद्रांवरील कथा आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून मतदान, नोंदणीची प्रासंगिकता आणि महत्त्व या कार्यात निवडणूक सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या  उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

निकष – या पुरस्कारासाठी सादर करण्यात येणारे वृत्त, प्रसिद्धी साहित्य  2024 दरम्यान प्रसारित/प्रक्षेपित प्रकाशित केले गेले असावे. संबंधित कालावधीत केलेल्या कामाचा सारांश ज्यामध्ये बातम्या/लेखांची संख्या, चौरस सेमी मध्ये एकूण मुद्रण, पीडीएफ सॉफ्ट कॉपी QR संबंधित वेब पत्त्याची लिंक, वर्तमानपत्र/लेखांची पूर्ण आकाराची छायाप्रत/मुद्रित प्रत, थेट सार्वजनिक सहभाग इ. इतर माहिती याचा समावेश करावा.

मुद्रित माध्यमांसाठी प्रसिद्ध झालेले लेख अथवा बातम्या यांचा आकार, आणि पीडीएफ कॉपी सोबत जोडणे आवश्यक आहे. यासोबतच दैनिकाचा वर्ग अथवा एबीसीद्वारे प्रमाणित वर्गवारी यांची माहिती द्यावी.

ईलेक्टॉनिक माध्यमे यामध्ये विविध वाहिन्या, रेडीओ यासाठी प्रसारित केलेले साहित्य पेन ड्राईव्ह मध्ये सादर करावे तसेच प्रसारित झालेल्या बातम्या, यशोगाथा विशेष वृत्तांकन यांच्या प्रसारणाची वेळ नमूद करावी. मतदान जनजागृतीबाबत इतर विशेष उपक्रम वाहिनीमार्फत राबवण्यात आले असल्यास त्याची माहिती द्यावी.

प्रसारण/टेलिकास्टचा कालावधी आणि वारंवारता आणि कालावधी दरम्यान प्रत्येक स्पॉटच्या अशा प्रसारणाची एकूण वेळ,  सर्व स्पॉट्स/बातम्यांच्या एकूण प्रसारण वेळेची बेरीज याची माहिती नमूद करावी.  सीडी किंवा डीव्हीडी किंवा पेन ड्राईव्हमध्ये इतर डिजिटल मीडियावरील बातम्या फीचर्स किंवा मतदार जागृतीवर कार्यक्रम, कालावधी, टेलिकास्ट/प्रसारण तारीख आणि वेळ आणि वारंवारता याची माहिती द्यावी.

समाजमाध्यमांवरील प्रसारित साहित्य यामध्ये ब्लॉग, कॅम्पेन, ट्विट आणि लेख याची माहिती पीडीएफ तसेच सॉप्ट कॉपीमध्ये सादर करावी. तसेच प्रसारित केलेल्या लिंकचा तपशीलही त्यात द्यावा. याशिवाय लोकजागृतीसाठी इतर काही उपक्रम राबवले असल्यास त्याची माहिती द्यावी.

निवड झालेल्या पुरस्कारार्थींना राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान केले जातील, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, दि. 4 : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीत देण्यात येणार आहे. या 133 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांनी कळविले आहे. इच्छुकांनी 24 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थीकडून प्रतिमहिना रूपये 450/-, दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून रूपये 100/- शुल्क आकारले जाते. या प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थी निकष खालीलप्रमाणे आहेत.

1) प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. 2) प्रशिक्षणार्थी 18 ते 35 वयोगटातील असावा. 3) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. 4) प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 5) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 6) प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्डधारक असावा. 7) प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधीत मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून 8) प्रशिक्षणार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे 24 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावेत. या प्रशिक्षण सत्राच्या अधिक माहितीसाठी सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो. 9920291237 आणि जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा. असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांनी कळविले आहे.

0000

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस कार्यक्रमाचे १० डिसेंबर रोजी आयोजन

मुंबई, दि. ४ : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या वर्षाची संकल्पना (अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाऊ) अशी आहे.  यानिमित्त आयोजित राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती निवृत्त न्यायाधीश एन.एच पाटील यांची असणार आहे.

या कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर (रा. अचलपूर, जि. अमरावती) हे अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाच्या पुनर्वसन या विषयावर, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. वैशाली कोल्हे दिव्यांग व्यक्तींचे हक्क, एनजीओचे श्रीरंग बिजूर ऑटीझम / एएसडी दिव्यांगाचे हक्क या विषयावर, हेल्पेज इंडिया संस्थेचे सहसंचालक व्हॅलेरिअन पैस ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अंकुर ट्रस्टच्या सचिव डॉ. वैशाली पाटील आदिवासी कातकरी जमातीतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न या विषयावर, वाशिम येथील फार्मलॅब येरंडा ॲग्रोसोल्युशन प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष चव्हाण शेतीतील खर्च कमी कसा करावा या विषयावर, बीआयएफ कंपनीचे अधिकारी संजय पाटील हे शेतीतील जैव विविधता व समाजातील हक्क या विषयावर संबोधित करतील.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या 2024 सोव्हिनिरचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात संपूर्ण राज्यातील 350 विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच कार्यक्रम ठिकाणी बांधावरील प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला व मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती, दिव्यांग व ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर व आदिवासी भागातील समस्या व त्यांचे हक्काबाबत जनजागृती करणारे स्टॉलही असणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाने महात्मा गांधी यांच्या 11 शपथांवर आधारीत समाजरचनेच्या संकल्पनेची मांडणी व्याख्यानांद्वारे व स्टॉलवरील प्रदर्शनीद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे, असे आयोगाचे अध्यक्ष के.के. तातेड, सदस्य एम.ए सईद, संजय कुमार, सचिव नितीन पाटील यांनी कळविले आहे.

मानवी हक्क आयोगाविषयी थोडक्यात..

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी करण्यात आली. आयोगामध्ये 3 सदस्य आहेत. 7500 प्रकरणे 2024 मध्ये प्राप्त झाली आहे. त्यापैकी 5700 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. तसेच आयोगाने 134 प्रकरणांमध्ये सुमोटो दखल घेतलेली आहे. परदेशातील अनेक संस्था, भारताच्या इतर राज्यातील मानवी हक्क आयोगाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रतिनिधी यांनी 2024 मध्ये आयोगास भेट दिली आहे. आयोगाने यावर्षी लोकांमध्ये जागरूकता व्हावी, म्हणून जिल्हास्तरावरसुद्धा कार्यशाळा घेतल्या आहेत.

मुंबई येथील आयोगाच्या न्यायालयीन कामकाजात नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. बऱ्याच दिव्यांग मुलांना स्वयंसेवी संघटनांकडून दानाच्या स्वरूपात ‘असिस्टीव्ह डिव्हाईसेस’ मिळवून दिले आहे.  मानवी हक्काचे विषय विधी शाखेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वेच्छा कार्यक्रम व परिविक्षाधीन कार्यक्रम राबविले आहे. आयोगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे प्रश्न, देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न, महिला व मुलींच्या विक्रीबाबत आळा घालण्याबाबत पोलीसांसोबत शिबिरे घेण्यात आली आहेत.

0000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना

मुंबई, दि. ४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. माहितीपट व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकरमाहितीपटाचे सकाळी ११ वा. प्रसारण

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता. महासंचालनालयाच्या एक्स,  फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या १७ मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

बाबासाहेब आंबेडकरमाहितीपटाचे दुपारी १ वा. प्रसारण

भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी १९८१ मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथया चित्रपटाचे दुपारी ४ वा. प्रसारण

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता महासंचालनालयाच्या एक्स, या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  हा चित्रपट नक्की पहायला हवा.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि. ३ : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT)  शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती  जगदीप धनखड उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखडराज्यपाल सी.पी.राधाकृष्णनकेंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहानकेंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूरभारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव तथा महानिदेशक डॉ.हिमांशु पाठक तसेच संस्थेचे पदाधिकारीकृषी तज्ज्ञसंशोधक व इतर मान्यवर उपस्थित होते.

 केंद्रीय कापूस संशोधन तंत्रज्ञान संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) १९२४ मध्ये स्थापन झाली. ही संस्था कापूस क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणी

मुंबईदि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी आणि परिसरात केल्या जातात. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला.

विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले कीचैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून अनुयायांसाठी वैद्यकीय कक्षही उभारण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) आणि परिसरात पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधांबाबत सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करीत समन्‍वय साधून कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा अनुयायांना मिळतात की नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विवेक गायकवाडबृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त  अजितकुमार आंबीसहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच चैत्यभूमी येथे दाखल झालेल्या अनुयायांना खाद्य पदार्थांच्या किटचे वाटप करण्यात आले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ‘ड्राय डे’ जाहीर  

मुंबईदि. ३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशीविदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेतअसे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या आदेशानुसारराज्य उत्पादन शुल्कचे  डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्याई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईलअसेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.

0000

 नीलेश तायडे/विसंअ/

‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन  

मुंबईदि. 03 : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे. टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (Re.Wi.Re) – ‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र’ (आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंघलटाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्राकार्यकारी संचालक गिरीश वाघ  उपस्थित होते.

या नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राची वर्षाला 25 हजार वाहनांची स्क्रॅपिंग क्षमता असणार आहे. यावेळी परिवहन आयुक्त श्री. भिमनवार म्हणाले कीटाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशन्स सुरू करणे हा राज्यातील वाहन स्क्रॅपिंगचा व्यवसाय यशस्वी करण्याच्या प्रवासातील योगदानाचा आणखी एक मैलाचा दगड आहे. या सुविधा केंद्रात वाहनांच्या स्क्रॅपिंगची प्रक्रिया पर्यावरणपूरक व शासकीय नियमांचे पालन करणारी असेल. टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिंघल यांनी सुविधा केंद्रात सर्व प्रकारच्या प्रवासी व व्यावसायिक वाहनांचे स्क्रॅपिंग करण्यासाठी सुसज्ज असल्याचे सांगितले. 

 तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बत्रा यांनी वाहन स्क्रॅपिंगच्या उद्योगातून टीआयव्हीए आणि टाटा मोटर्सने देशातील वाहनांचे जीवनचक्र बदलविण्याच्या दृष्टीकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे सांगत वाहनांच्या पुनर्वापराची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर असल्याचे सांगितले. 

नीलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...