शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 489

‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

  • ५४ व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन;
  • राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. ६:  महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54 व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही मॅरेथॉन 6 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडणार असून यातील सहभागी सैन्यदलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे 405 कि.मी. अंतर पार करणार आहेत.

मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.

अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील जवान, माजी अधिकारी, युवक व एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत. सैन्य दलाच्या वतीने या परिक्रमेदरम्यान नाशिक येथे ‘जाणूया सैन्य दलांना’ व अहिल्यानगर येथे ‘सैन्य दलात महिलांना समान संधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर येथे माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल बिक्रमदीप सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 

 

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) उद्या लोकअदालत

मुंबई, दि.६: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या दि. ७ रोजी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात आले आहेत. या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, ए. पी. कुऱ्हेकर, सदस्य (न्या.) आणि आर. बी. मलिक, सदस्य (न्या.) हे कामकाज पाहणार आहेत.

या लोक अदालतीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील प्रलंबित असलेली सेवाविषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

०००

 

विधानसभेची उद्या मुंबईत बैठक

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे उद्या शनिवार, दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११  वा. आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली आहे.

याचबरोबर महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.

०००

कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ

मुंबई, दि. ६: विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

०००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली

मुंबई, दि. ६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ. विलास आठवले, अवर सचिव विजय कोमटवार, उपसभापती यांचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र खेबूडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुलाब पुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

०००

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा निर्धार करुया – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांचे स्मरण करताना राज्यपाल श्री. राधाकृष्णन पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, पत्रकार, साहित्यिक, समाजसुधारक सर्वकाही होते. सामाजिक सुधारणांची दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील. डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचार, आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी जातीयवादापासून मुक्त समाजाचे स्वप्न पाहिले होते. अज्ञान, असमानता, दारिद्र्य यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, विकासाची समान संधी मिळेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा विचार देणाऱ्या बाबासाहेबांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिल परिसरात आकाराला येत आहे. हे स्मारक देशातीलंच नव्हे, तर जगातील नागरिकांसाठी, विशेषत: युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यावेळी कायदा, पाटबंधारे, मजूर व वीज मंत्री म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयी-सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. श्री. फडणवीस म्हणाले,  सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ.बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानले जाते. त्यांनी तेव्हा लिहिलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, असे सांगून राज्यात शासन नेहमी वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार करुन संविधानाच्या अनुरूप कार्य करेल, असेही ते म्हणाले.

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

श्री. शिंदे म्हणाले, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. त्याचा उपयोग शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून शासनाचा कारभार –  उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार सुरू आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, यासाठी काम केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला एकता, बंधुता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यावेळी मान्यवरांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

०००

 

 देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन

मुंबई, दि. ५ :  अलोट जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांना अभिवादन केले.

दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रालयात आगमन झाल्यावर लाडक्या बहीणींनी औक्षण करून अभिनंदन केले. श्रीमती वैष्णवी जितेंद्र खामकर, श्रीमती मनाली महेश नारकर, श्रीमती शारदा शरद कदम, श्रीमती प्राची प्रफुल्ल पवार, श्रीमती रेखा शेमशोन आढाव या लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले तर श्रीमती लिलाबाई चव्हाण व श्रीमती रेणुका राठोड यांनी पुष्पगुच्छ देवून प्रातिनिधीक स्वरूपात राज्यातील लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन केले.

0000

महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य राहील यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील, असे सांगून मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, राज्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करून विकासाचा वेग वाढविण्यात येईल. मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरूच राहतील. त्यांची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. त्यात नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू करण्यावर भर राहील. सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. राज्यातील जनतेच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले जातील. समृद्धी महामार्गामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होत आहे. याच धर्तीवर शक्तीपीठ मार्गासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल.

राज्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक उद्योगांशी चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. हे उद्योग राज्यात आल्यानंतर रोजगार निश्चित वाढेल. मागील वर्षभरात राज्यात थेट परकीय गुंतवणुकीपैकी 90 टक्के गुंतवणूक केवळ मागील सहा महिन्यात आली आहे.  हा वेग असाच कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या शक्ती कायद्याबाबत केंद्र सरकारशी संवाद साधण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

०००००

३१ जिल्ह्यांतील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणीसंदर्भात १०४ अर्ज प्राप्त

मुंबई,दि.05:- राज्यातील 31 जिल्हयांतील एकूण 95 विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण 104 अर्ज प्राप्त झालेले आहेत.  या 104 अर्जांमधून महाराष्ट्र राज्यातील 1,00,486 मतदानकेंद्रापैकी 755 मतदानकेंद्रावरील ईव्हीएम संचाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.  राज्यातील उर्वरित सिंधुदुर्ग, नंदुरबार, अमरावती, वर्धा व गडचिरोली या 5 जिल्हयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भातील अर्ज प्राप्त झाले नाहीत.

भारत निवडणूक आयोगाने  01 जून 2024, 16 जुलै, 2024 व 30 जुलै, 2024 रोजीच्या पत्रांन्वये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात करावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना दिलेल्या आहेत. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीदरम्यान निवडणूक याचिका दाखल नसलेल्या प्रकरणी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पार पडलेली प्रक्रिया पुन:श्च पार पाडली जाते. त्यानुसार, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या संचातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लियर करण्यात येऊन अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येते.  अंतिमत: सीयु मधील डेटा व व्हीव्हीपॅट मशिन्स मधील स्लीप्स यांच्या आकडेवारीमध्ये तफावतीबाबत निरीक्षण करण्यात येऊन संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात येते.

30 जुलै, 2024 रोजीच्या पत्रान्वये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात उत्पादक कंपनीकडून तपासणीच्या तारखेआधी 3 दिवस पर्यंत अर्जदार त्यांचा तपासणीचा अर्ज कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतो. त्यानुसार संबंधित अर्जदारास त्याने जमा केलेले शुल्क त्यांना परत करण्याची तरतूद आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

000

 

नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह संपन्न

मुंबई, दि. 5 : नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड, कुठल्याही मौखिक आदेशाशिवाय सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे ‘हॉर्नपाईप सेलर्स डान्स’ सादर करण्यात आले. नौदल दिनानिमित्त  समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

व्हाईस ऍडमिरल निवासस्थानी स्वागत समारंभाला उपस्थिती

या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी ‘नेव्ही हाऊस’ येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ व चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून निमंत्रित नौदल अधिकारी व माजी अधिकारी तसेच गणमान्य व्यक्तींना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह यांनी राज्यपालांना निमंत्रित मान्यवरांचा परिचय करून दिला.

००००

Governor Radhakrishnan attends Beating Retreat Ceremony on Navy Day

Mumbai Dated 5 : Maharashtra Governor C P Radhakrishnan attended the ‘Beating Retreat’ and Tattoo Ceremony organised by the Western Naval Command of Indian Navy on the occasion of Navy Day at Gateway of India in Mumbai on Wed (4 Dec).

The impressive event included breath-taking performances by the naval central band, the Beating Retreat Ceremony, helicopter fly-past, Continuity drill by naval personnel and the Hornpipe Sailor’s Dance by girls of the Sea Cadet Corps.

Vice Admiral Sanjay J Singh, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command, serving and retired officers of Indian Navy and invitees from various walks of life were present.

At Home Reception

The Governor also attended the At Home reception organised by the Vice Admiral Sanjay J Singh at the Navy House on the occasion of Navy Day. The Governor extended his Navy Day greetings to the serving officers and veterans present on the occasion.

0000

 

 

ताज्या बातम्या

विधानपरिषद कामकाज

0
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार - उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम  मुंबई, दि. १८ : देशातील टेस्लाचे पहिले शोरुम मुंबईमध्ये...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. १८ : कराडजवळील कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी...

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

0
मुंबई, दि. 18 : केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही...

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. 18 : शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त तांत्रिक शिक्षणापुरते न राहता, व्यक्तिमत्व घडविणारे...

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...