शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 487

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

नवी दिल्ली, दि. ११ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन

मुंबई, दि. ११ :- जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’तर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणाशी संबंधित बाबींसंदर्भातील सखोल संशोधन, त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी आणि सक्रीय लोकसहभाग यांच्या माध्यमातून डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेले कार्य या पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पश्चिम घाटासंदर्भात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अहवालामुळे या क्षेत्राच्या संवर्धनासाठी शासनासह लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना उभारी मिळाली आहे. डॉ. गाडगीळ यांच्या पुरस्कारामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, क्षारपड जमिनींचे वाढतं प्रमाण यासारख्या समस्यांवर संशोधन, अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या जागतिक पुरस्काराबद्दल डॉ. माधव गाडगीळ यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. भविष्यातील त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

***

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे यूएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन

मुंबई, दि. ११: ‘पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार मिळणे देश आणि राज्यासाठी अभिमानास्पद आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेच्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कारांमध्ये जगभरातील सहा मान्यवरांच्या यादीत डॉ गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरणे हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी गौरस्वापद आहे. यातून डॉ गाडगीळ यांच्या कार्याचा उचित सन्मान झाला आहे. पर्यावरण, जैवविविधतेचे रक्षण हा त्यांचा ध्यास राहिला आहे. त्याला त्यांनी जीवनकार्य मानले आहे. यातूनच ते गेली अनेक दशके या क्षेत्रात अथकपणे संशोधन करत आहेत. विशेषतः पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील, जैवविविधतेबाबत त्यांनी केलेले काम मार्गदर्शक, दिशादर्शक राहिले आहे. यातून आपल्या सर्वांना पर्यावरण रक्षण, जतन संवर्धनासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत राहणार आहे. यापुढेही डॉ. गाडगीळ या क्षेत्रात मोलाची योगदान देत राहतील, असा विश्वास आहे. या आंतररराष्ट्रीय पुरस्कारासाठी डॉ. गाडगीळ यांचे अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३५ प्रकरणांवर सुनावणी

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाद्वारा वरळी येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा अन्वये तसेच बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अन्वये, आयोगाकडे प्राप्त तक्रारीबाबत बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने पोक्सो कायद्यांतर्गत प्राप्त तक्रारींचा समावेश होता.यावेळी मुंबई शहर व उपनगर परिसरातील संबंधित पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुनावणीसाठी असणाऱ्या जवळपास सर्वच प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोप पत्र दाखल केले होते. याबाबत आयोगाने पोलिसांचे कौतुक केले. ही प्रकरणे सदयस्थितीत न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच बऱ्याच प्रकरणांमध्ये तक्रारदारांनी गैरहेतूने खोट्या तक्रारी दाखल केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून आयोग लवकरच मार्गदर्शक सूचना व शिफारशी जारी करणार आहेत, यामुळे कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर वचक  बसेल आणि वेळ वाया जाणार नाही.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शाह, आयोगाचे सदस्य अॅड. श्री. संजय सेंगर, अॅड. निलिमा चव्हाण, सायली पालखेडकर, अॅड. प्रज्ञा खोसरे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली.

या सुनावणीमध्ये प्रामुख्याने पोक्स कायद्याअंतर्गत तक्रार प्रकरणांचा समावेश असल्याने विशेष पोलीस निरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई या कार्यालयाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक, सारा अभ्यंकर या उपस्थित होत्या.

 

0000

 

 

 

भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १० : भारतीय सैनिक सीमेवर अतुलनीय शौर्य गाजवीत असतात. त्यांच्या शौर्याचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवणे आवश्यक असून युवा पिढीला तो प्रेरणादायी असल्याचा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीरचक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांच्या या गौरवाच्या 25व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी कारगिल युद्धाच्या प्रसंगी आपण संसद सदस्य असल्याचे सांगत प्रधानमंत्री श्री. वाजपेयी यांना भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यावर संपूर्ण विश्वास होता याची आठवण सांगितली. कॅप्टन यादव यांनी ग्रेनेडियर म्हणून बजावलेल्या पराक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. जीवनात शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही. ‘एनसीसी’ पासूनच तरुण वयात शिस्तीचे धडे शिकायला मिळतात. यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील ‘एनसीसी’च्या बळकटीकरणावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कॅप्टन यादव यांनी यावेळी कारगिल युद्धप्रसंगाचा घटनाक्रम सांगून उपस्थितांच्या डोळ्यासमोर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे चित्र उभे केले. कॅप्टन यादव यांच्या लग्नाचा देखील २५ वा वाढदिवस असल्याने राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या पत्नी श्रीमती रीना यादव यांचा यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे ओटी भरून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आश्रयदाता डॉ. अश्विनी भिडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

०००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १०: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ., सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार), सहयोगी प्राध्यापक, प्रसुती शास्त्र व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynecology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी), सहायक प्राध्यापक, आय.सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र (I.C.C.U. General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब (सातारा) या परिक्षांचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्गचा निकाल जाहीर

प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्ग  या पदाच्या मुलाखती २८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ चार निकाल जाहीर

सहयोगी प्राध्यापक, शारीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ चे निकाल जाहीर

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या प्रतिक्षायादीच्या निकाल जाहीर

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल १० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेच्या अंतिम निकालानुसार प्रतिक्षायादीतून उमेदवार उपलब्ध करुन देण्याची शासनाने मागणी केली आहे. त्यानुसार अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने पदासाठीची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रतिक्षायादीतून गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या शिफारशी शासनाकडे करण्यात येत आहेत.

प्रतिक्षा यादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक

मुंबई, दि. १०: शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रिन्स गोयल, (वय ५३) यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती राज्य कर उपआयुक्त यांनी  दिली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीवर वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात कंपनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले आणि बोगस वाहतूक पावत्या जारी करत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे कंपनीने रूपये ६४.०६ कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून शासनाची फसवणूक केली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या सर्व कामकाजास व व्यवहारास जबाबदार असल्यामुळे  प्रिन्स गोयल यांचा या फसवणुकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळून आले. ही संपूर्ण कार्यवाही षण्मुगाराजन एस. (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क  तसेच नयना गोंदावले, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली,  विलास नाईक आणि अजित विशे, सहायक राज्यकर आयुक्त यांच्याकडून संयुक्तपणे राबविण्यात आली.

०००

वंदना थोरात/विसंअ/

प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १०: लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करत असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे राज्य मानवी हक्क आयोगामार्फत आयोजित कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड, आयोगाचे सदस्य एम. ए. सईद, संजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती, महिला, मुले, तृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क हे आपल्या मानवाधिकार अजेंड्याच्या अग्रस्थानी राहिले पाहिजेत. प्रत्येक गट समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि त्यांना समानतेचे आणि आदराचे वातावरण मिळणे आवश्यक आहे.

हवामान बदल व अन्य नैसर्गिक घटक हेदेखील शेतकऱ्यांसमोरील आव्हानांचे व्यापक स्वरूप असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन सेवा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगाचे कार्य दुर्बल घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्यात उपयुक्त ठरले असल्याचेही ते म्हणाले.

मानवी हक्क दिनाचा यावर्षीचा ‘आपले हक्क, आपले भविष्य, आत्ता’ हा विषय अत्यंत दूरदृष्टीपूर्ण असून मानवाधिकारांच्या आव्हानांवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी आयोगाचे कौतुक केले. राज्य मानवी आयोग स्थापन झाल्यापासून, अशा असंख्य व्यक्ती आणि गटांसाठी तो आशेचा किरण ठरला असल्याचे सांगून राज्यभरातील व्यक्तींच्या सन्मान आणि हक्कांचे रक्षण करण्याचे राज्य मानवाधिकार आयोगाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगता येईल अशा संधी निर्माण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, जागतिक हवामान बदलांना सामोरे जाणे याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयोगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. न्या. तातेड यांनी प्रारंभी आयोगाच्या कार्याची माहिती दिली. तर, न्या. पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या हक्कांचे जतन करतानाच इतरांच्या हक्कांचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी बांधावरील प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर तसेच आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्काबाबत जनजागृती करणारी दालने उभारण्यात आली होती, त्यांची राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी पाहणी केली.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १०: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या निधनाने राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, न्यायिक क्षेत्रातील दिग्गज, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना दांडगा राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक अनुभव होता. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. या पदांवरून काम करताना त्यांनी नेहमीच लोकहीत जपण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुधारणा आदी बाबतीतील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाचे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो. एस.एम. कृष्णा यांचे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते, चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

०००

एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे राजकारणातील सुसंस्कृत, अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.10 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

एस. एम. कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस. एम. कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले.

साहित्य, टेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या एस. एम. कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची गरिमा जपली. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सुसंकृत व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले आहे.

या दुःखद प्रसंगी एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००००

S M Krishna was a man of higher tastes”: Governor C P Radhakrishnan

Mumbai 10 :  Maharashtra Governor C P Radhakrishnan has expressed grief over the demise of former Governor of Maharashtra and former Karnataka Chief Minister S. M. Krishna.

In a condolence message, Governor Radhakrishnan wrote:

“Former Governor of Maharashtra S M Krishna was a popular figure in the politics of Karnataka and the country. Starting his career as a Professor of Law, S M Krishna got elected to Parliament from the Praja Socialist Party of Barrister Nath Pai.

In his long political journey, Krishna held various positions such as the Speaker of Karnataka Legislative Assembly, Chief Minister of Karnataka, Governor of Maharashtra and Union Minister of External Affairs.  S M Krishna was a man of higher tastes who took keen interest in literature, tennis and classical music. He had organized classical music programs in Maharashtra Raj Bhavan. He upheld the dignity of the post of Governor. In his demise, we have lost an erudite and cultured leader. I pay homage to the memory of late S M Krishna and convey my heartfelt condolences to the members of the bereaved family.”

0000

ताज्या बातम्या

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलिप भुजबळ- पाटील यांची  सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली....