शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 486

माजी माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांना मंत्रालयात श्रद्धांजली

मुंबई,दि.12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे नुकतेच निधन झाले. ते 31 जानेवारी 2023 ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथून निवृत्त झाले होते. आज मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी  श्रद्धांजली  वाहिली.  

श्रद्धांजली वाहताना संचालक (माहिती) दयानंद कांबळे म्हणाले की, डॉ.खराट यांच्या शासकीय नोकरीची सुरुवात कोल्हापूर येथून झाली होती. रत्नागिरी व ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर 10 ऑक्टोबर 2021 ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे तेरुजू झाले होते. डॉ. खराट वाचनप्रेमी, सतत अभ्यासू वृत्ती असलेले आणि उत्कृष्ट संपादन कौशल्य असलेले लेखक म्हणूनही परिचित होते. महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासक होते. ते उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी त्यांना शासनाचे दोन पुरस्कार, उत्कृष्ट पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पुरस्कार, डॉ. आंबेडकर पुरस्कार, शब्दशिल्प पुरस्कार तसेच चौथा स्तंभ पुरस्कारासह अन्यही पुरस्कार मिळाले  होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन व माहितीपटांची निर्मिती केली होती.त्यांनी विविध 25 विषयांच्या पुस्तकांचे लिखाण केले असून, त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व गमावले असल्याचेही संचालक श्री.कांबळे यावेळी म्हणाले.

माहिती व जनसंपर्क विभागातील माजी वरिष्ठ सहायक संचालक प्रकाश डोईफोडे, पुणे जिल्हा माहिती कार्यालय येथील माजी प्रदर्शन सहाय्यक अजित कोकीळ, लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे वाहनचालक प्रविण बिदरकर यांचेही नुकतेच निधन झाल्याने यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

संचालक किशोर गांगुर्डे, उपसंचालक गोविंद अहंकारी, उपसंचालक सीमा रनाळकर, उपसंचालक (लेखा) सुभाष नागप यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर

मुंबई, दि.१२ : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे.

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात पाच निरनिराळ्या मूर्ती देऊन घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

नवी दिल्ली, 12 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. काल आणि आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एकूण 7 मान्यवरांच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी 5 निरनिराळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांची अश्वारुढ मूर्ती भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वीर सावरकरांची मूर्ती भेट दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती भेट दिली. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सिद्धीविनायकाची मूर्ती भेट दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा केली.

जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण तयार करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 12 : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकार व प्रमुख उद्योग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल. आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची (MoUs) अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

याअंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांशी सहकार्य वाढवणे, दूतावास व व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

या नव्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), मैत्री व उद्योग संचालनालय सक्रिय भूमिका बजावणार आहे.

ठळक मुद्दे

– गुंतवणूकदारांना उद्योग प्रस्तावांमध्ये मदत करण्यासाठी “कंट्री डेस्क” विशेष कक्ष

– जागतिक आणि प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत नवीन गुंतवणूक धोरण

– शासन आणि प्रमुख औद्योगिक संस्थांमध्ये समन्वय वाढवणे

– गुंतवणुकीच्या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना सतत आवश्यक सहाय्य देणे

– सामंजस्य करारांचा पाठपुरावा आणि अंमलबजावणीची गती सुधारणे

– राज्यातील गुंतवणुकीच्या संधींबद्दल जागरूकता निर्माण करणे

– बहुपक्षीय संस्था आणि विकास बँकांसोबत काम करणे

– दूतावास आणि व्यापारी संघटनांसोबत समन्वय वाढवणे

– विशेषतः देशविदेशातील महाराष्ट्रीयन उद्योजक यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणे

– इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल, ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे

0000

शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहाेचण्यासाठी प्रयत्न करा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील

नांदेड दि. 12 डिसेंबर :- शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आहे. तो जगलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. या योजना शेतकऱ्यापर्यंत  पोहाेचण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपलं कुटुंब समजून त्यांच्यापर्यंत जाऊन आवश्यक मदत करून त्यांना आधार द्या, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डी. एस. इंगळे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, रेशीम विकास अधिकारी पि. बी. नरवाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा आरोग्य अधिकारी संगिता देशमुख, यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या आत्महत्येत तरुण शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी सर्वांनी मिळवून प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे नैराश्य कमी करून त्यांच्या आत्महत्या आपल्याला रोखता येतात. यासाठी ग्रामीण भागात पोवाडा, नाटक, किर्तनासारख्या अनेक उपक्रम राबविले पाहिजेत. सामाजिक बांधिलकीतून संतगाडगेबाबांनी केलेल्या कार्याची आठवण ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी यावेळी करून दिली.

शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मराठवाड्यात चारा लागवडीबाबत वाढ होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात प्रयत्न करून मोफत चारा वाटपाचा उपक्रम हाती घ्यावा. जैविक नैसर्गिक खते निर्माण करण्याची प्रयोगशाळा सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा होणारा उत्पादन खर्च कमी होईल. यासाठी शेतीच्या बांधावर जाऊन त्याचे प्रयोजन करावे. सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांचा यात मोठा सहभाग वाढवावा, अशी सूचना त्यांनी केली.पिक विमा उतरवितांना शेतकऱ्यांना मदत लागते. यासाठी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचे नाव, संपर्क क्रमांक प्रत्येक गावात दर्शनी भागात प्रसिद्ध केली पाहिजेत, असे सांगून त्यांनी हदगाव तालुक्यातील एका प्रतिनिधींला संपर्क होतो का याची प्रत्यक्ष तपासणी केली व माहिती घेतली.

शेतमालाचे किमान आधारभूत मूल्य कृषि उत्पन्न बाजार समितीत दर्शनी भागावर दिसणे आवश्यक आहे. यासाठी मोठे फलक करून लावावेत. शेतमाल तारण योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ही योजना चांगली असून यातून शेतकऱ्यांना मोठी मदत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन सोयाबीन केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनाही त्या समजल्या पाहिजेत यासाठी विविध माध्यमाचा उपयोग करून त्यांच्या पर्यंत त्या योजना गेल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय, स्पर्धा परीक्षा वाचनालय व शाळेत पटांगणाची सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेच्या मैदानी खेळातून लहान मुलांचा शारीरिक विकास चांगला होतो. क्रीडा कार्यालयाच्या विविध योजनेतून ग्रामीण शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवावेत.आपल्याला निसर्गावर प्रेम करता आले पाहिजे. निसर्ग समजल्याशिवाय निसर्ग वाचवता येत नाही. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्‍ये विज्ञानाची गोडी निर्माण करून टेलीस्कोप उपकरणाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना पुरक यंत्रसामुग्री वाटपासाठी प्रयत्न करून शेतकरी कुटुंबाला मदत करावी. क्याकटसच्या उत्पादनाचा खर्च कमी येतो, पाणी कमी लागते यासह विविध फळ प्रक्रियेवर भर देवून कृषि विभागाने कौशल्य विकास विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने तरुणाला रोजगार उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या रोजगार मेळाव्याची त्यांनी माहिती घेतली.

बँकांनी खरीप हंगामात कर्ज वाटपातून शेतकऱ्यांना मदत करावी असे सांगून वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान व मोबदला अनुदान वाटपाची माहिती त्यांनी घेतली. जनावरांना धोका होऊ नये म्हणून शेतकरी रात्री थंडीत जनावरांची काळजी घेतो. जंगलात फळांची झाडे लावल्यास वन्यप्राणी गावात येणार नाहीत. त्यासाठी जंगलातील फळझाडांचे अधिक प्रमाण वाढवावे. वनविभागाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात त्या शेतकऱ्यांना माहिती करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांसाठी दामिनी ॲप

विज पडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह जनावरांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप वापरावा. या ॲपमुळे 4 तास आगोदरच विज पडणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे पशुधनाचे व शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. यासाठी शेतकऱ्यांने जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत ग्रामस्तरावर सविस्तर पुस्तक स्वरुपात पोहचल्या पाहिजेत. यासाठी कृषि विषयक विविध योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. नांदेड जिल्हा रेशीम क्षेत्रात आघाडीवर असून शेतकरी पारंपारिक पिकासोबतच हळद, केळी, स्ट्रॉबेरी फळ घेण्याकडे कल वाढवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. विषय सुचीनुसार सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती दिली. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आभार मानले.

0000

‘गुरुशाला’ उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस उपयुक्त ठरणार

जळगाव, दि. १२ (जिमाका):  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विकास प्रशासनाने नवी दिल्ली येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करत ‘गुरूशाला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शासकीय आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.

राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत 497 शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्ययन स्तर मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ‘गुरूशाला’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत 3 वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

हा उपक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ‘गुरूशाला’ उपक्रमांतर्गत सन 2024-25 ते 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडून आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होईल. दुसऱ्या टप्प्यात शिक्षक-शिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण तर तिसऱ्या टप्प्यात अधीक्षक-अधिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यपन प्रक्रियेचे उद्धबोधन होणार आहे.

‘गुरूशाला’ उपक्रमांतर्गत आश्रमशाळा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शाळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 497 प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते.  त्यापैकी 287 प्रकल्प पुढील टप्प्यासाठी पात्र ठरली. त्यात नाशिक अपर आयुक्तालयाच्या 100, ठाणे आयुक्तालयाच्या 91, नागपूर आयुक्तालयाच्या 56 तर अमरावती आयुक्तालयाच्या 40 प्रकल्पांचा समावेश आहे.

‘गुरूशाला’मुळे शिक्षकांच्या अध्यपन तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत गतिमानता येईल. अध्ययन सुलभ होऊन पायाभूत क्षमतांचा विकास होईल. परिणामी, आश्रमशाळांचा शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावेल अशी आशा आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी व्यक्त केले आहे.

०००

 

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींसमवेत संस्मरणीय भेट

जळगाव, दि. १२ (जिमाका):  जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो ) योजनेतुन शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा या करीता टॅलेट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व  दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला,  शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच  विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी सहभागी झाल्या होत्या.

सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग दिल्ली यांची भेट व राजघाट येथिल महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे  प्रकल्प  अधिकारी  अरुण पवार यांनी व्यक्त केली व दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी, यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या.

या टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील प्रशांत  माहुरे, राजेंद्र लवणे, पवन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल तसेच व्ही. डी. गायकवाड, एम.डी. पाईकराव, श्रीमती सुलताने मॅडम, एल. एम. पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यावल व विकास पाटील व कृष्णा पाटील व कार्यालयातील इतर कर्मचारी व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी योगदान दिले.

०००

कांदिवली येथे राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव 

मुंबई, दि. १२ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे बुधवारी सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी केले.

पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भगवद्गीता शिक्षा अभियान समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे, जुहू इस्कॉनचे अध्यक्ष श्री. ब्रज हरी दास, पोईसर जिमखानाचे अध्यक्ष मुकेश भंडारी, अमेरिकेच्या टेक्सासचे अटॉर्नी जनरल कॅन टॅक्सन आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, भगवद्गीता हा भारतातील ज्ञान आणि बुद्धीचा उत्कृष्ट ग्रंथ आहे. प्रत्येकाने स्वच्छ मनाने आणि फळाची चिंता न करता एकाग्रतेने आपले कर्तव्य करत रहावे, यशाच्या रूपाने फळ आपोआप मिळेल, असे गीता शिकविते.

समाजातील प्रत्येकाला शिक्षण, आरोग्य, निवास आदी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेने गरजूंना या किमान सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेऊन इतर देशांसमोर आदर्श निर्माण करावा, आपणही यासाठी सहकार्य करू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जगातील सर्व प्रगत देशांनी यासाठी प्रयत्न केल्यास चांगली समाज निर्मिती होऊन मानवाचा हॅपिनेस इंडेक्स वाढेल, असा विश्वास राज्यपाल श्री. राधाकृष्णन यावेळी व्यक्त केला.

०००

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे  प्रत्येक महिन्यात पाच मासिक  तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

१ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, २ नोव्हेंबर, २०१४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, ६ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष, १२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र दिवाळी भव्यतम, १९ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र गजराज व दि. २०/११/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

या तिकिटांना लॉटरी जाहीर

➡️ महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2411D/43098 या चिराग एन्टरप्रायझेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-०६-३८६२ या महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️ महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत तिकीट क्रमांक DI-05 / 38465 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. एक कोटीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️ महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ 24/7136 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.14 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G13/5771 या भारत लॉटरी, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.35 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

➡️  महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. सात लाखाचे प्रथम क्रमांकाची एकूण 10 बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम. दहा हजारावरील वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

०००

मोहिनी राणे/ससं/

 

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींची संस्मरणीय भेट

जळगाव, दि. 12 (जिमाका)- जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो) योजनेतून शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा याकरीता टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट घडवून देण्यात आली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला, शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी यांचा समावेश हाेता.
सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, मा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांची भेट व राजघाट येथिल महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन महामहीम मा. राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत महामहीम मा. राष्टपतींशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केली व दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...