शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 480

महसूल कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणार- पालकमंत्री अब्दुल सत्तार

महसूल पंधरवाडा सांगता समारंभ

छत्रपती संभाजीनगर दि.१५ (जिमाका):  महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून शासनाच्या महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. जिल्ह्यात तहसिल, उपविभागीय कार्यालये, तलाठी कार्यालये येथे महसूल कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करणे सुकर व्हावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.

महसूल पंधरवाड्याच्या समारोप आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आला. या सोहळ्यास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपायुक्त जगदीश मिणियार, मंदार वैद्य, गव्हाणे, श्रीमती बोंदरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, महसूल कर्मचारी हे गाव ते जिल्हा विभाग पातळीपर्यंत काम करीत असतात. महसूल पंधरवाड्यात केलेल्या आरोग्य तपासणीत ज्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारांची गरज असेल त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. कर्मचारी शारिरीक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवे,असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. अरविंद लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनीही उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित केले व त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

०००

सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर दि.१५(विमाका):  विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी साऱ्यांची साथ आवश्यक असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून आपण आपल्या प्रगतीचा वेग कायम राखू या, असे आवाहन पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला, पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार संदिपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, म.न.पा. आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदिश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे  तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

पालकमंत्र्यांनी उपस्थितांना शुभेच्छा संदेश दिला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेचे रक्षण करतांना प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

रोजगार निर्मितीला चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, बिडकीन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे. १२० एकर जागेत हा प्रकल्प येत असून या जागेचे वाटपपत्रही त्या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ९०० जणांना थेट रोजगार मिळेल. शिवाय अन्य लहान उद्योगही त्यामुळे कार्यान्वित होतील. त्याचप्रमाणे टोयोटा-किर्लोस्कर प्रकल्पाची २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते आहे. मोटार वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळेही ८ हजार जणांना प्रत्यक्ष व ८ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. एथर एनर्जी हा प्रकल्प दुचाकी निर्मितीचा प्रकल्प असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

उपेक्षित घटकांच्या विकासासाठी योजना

समाजातील सर्वच उपेक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाने अनेक पावले उचलली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु करण्यात आली. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब माता भगिनींना या योजनेमुळे दरमहा १५००/- रुपये म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागेल. जिल्ह्यात ५ लाख ३२ हजार ७६९ इतक्या बहिणींचे नावे या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाली असून राज्यात आपला जिल्हा अग्रेसर आहे. बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गतही जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८५८ महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात २३१८ रिक्तपदे विविध आस्थापनांनी नोंदविली असून २२२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामुळे सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल शिवाय त्यांना सहा महिन्याचे विद्यावेतनही मिळेल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

अल्पसंख्याकांच्या विकासाला मिळेल चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन कार्यान्वित केले आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्यातील दुग्धविकासाला चालना देण्यासाठी शासनाने ३२८ कोटी ४२ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार असून ३ वर्षाच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी निर्णय

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभदेखील लाखो नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री सत्तार म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई व शबरी या तिन्ही योजनेचे मिळून ७ हजार ७५८ घरकुले पूर्ण करण्यात आली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आर्थिक २५५.०८ टक्के साध्य करण्यात आले. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ती प्रगती पथावर आहेत.

पाणीपुरवठा, क्रीडांगण विकास, स्वच्छतेस प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसाठी नळाला २४ तास पाणी आता स्वप्न नव्हे तर वास्तव होणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून महापालिकेच्या हिश्श्याचा ८२२ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. तसेच आमखास मैदान येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, गरवारे क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम साकारणार आहे. शहरातून जाणाऱ्या खाम नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पासाठी बक्षीस घोषित केले आहे. शहराला स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट करण्याचे दिशेने महानगरपालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्यात नागरिक सहभागही देत आहेत, याबाबत पालकमंत्री श्री. सत्तार यांनी समाधान व्यक्त केले.

देशाच्या एकतेचे प्रतिक तिरंगा

आपण सर्व हर घर तिरंगा/घरोघरी तिरंगा या अभियानात सहभागी झालात त्याबद्दल आपले अभिनंदन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेने जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता विसरुन सहभागी होतो. विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचे एकमेव उदाहरण असल्याचेही पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले.

प्रशासनाच्या विविध उपक्रमांचे कौतुक

पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनानेही जलसमृद्ध गाव अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत विहीर पुनर्भरणाची ५७० कामे तर रेनवॉटर हार्वेस्टिंगची १६७ कामे सुरु आहेत. वटवृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६०५ वटवृक्ष लागवड करण्यात आली आहे. या  अभियानांची सुरुवात करुन पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाकांक्षी काम सुरु केले आहे. पाणी टंचाईवर मात करण्याचा विचार यामागे आहे. प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या या उपक्रमांला त्यांनी शुभेच्छा दिल्या.  लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांची साथ असतेच. आपल्या समाजात एकोपा आणि शांतता कायम ठेवून आपल्या प्रगतीचा वेग राखता येईल. देशाची एकात्मता आणि शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना केले सन्मानित

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय खांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भांगे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक परविन यादव, पोलीस उपनिरिक्षक अशोक माने, दिपक पारधे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जाधव, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत निकाळजे यांना गौरविण्यात आले.

शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल स्वराज्य अरुण मानधने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम, यांना तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्चित संतोष दखर, अर्यान सखाहरी नवले, अनुराग राजेंद्रकुमार पवार यांना गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी शासनाकडून सन २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या ॲटोमॅट इंडस्ट्रीज वाळूज व ओमकार इंडस्ट्रीज शेंद्रा या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण १५३ पदांची तलाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली त्यापैकी ५९ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित ९४नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ५ नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले.

श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचलन केले.

०००

सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

नागपूर,दि. 15 :  अनेकांच्या बलिदानातून, संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी अनेकांनी यातना सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आजवरच्या वाटचालीत आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेवली आहे. प्रगतीचे विविध टप्पे गाठताना सामान्य माणसाच्या जीवनात परिर्वतन व्हावे यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरिक्त आयुक्त माधवी चवरे-खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस सहआयुक्त आश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाने केंद्र शासनासमवेत विविध उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. या प्रयत्नातून महाराष्ट्राची वाटचाल आता ट्रिलियन डॉलरकडे झेपावली असून सबंध भारतात महाराष्ट्राने यात पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्याने साध्य केलेल्या प्रगतीची अनुभूती आपण सर्व घेत आहोत. हे विकासाचे पर्व आपण पाहत आहोत. येथील समृद्धी महामार्ग असेल, मेगा टेक्टाईल प्रोजेक्ट, मेट्रो आदींसह विविध सिंचन प्रकल्प महत्त्वाचे आहेत. सुमारे 88 हजार कोटीतून आपण वैनगंगा-नळगंगा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातून विदर्भातील दुष्काळ दूर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गत तीन वर्षात 5 हजार कोटींपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आणू शकलो याचे समाधान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाने लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून चांगले निर्णय व उपक्रम हाती घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहा दीड हजार रुपये आपण देत आहोत. कालपासून याची प्रतिनिधीक सुरुवात केली आहे. येत्या 17 तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळेल. या एक कोटीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 5 लाख महिलांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही आपण सुरु केली आहे. सुमारे 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये असे विद्यावेतन आपण नोंदणीकृत युवकांना देत आहोत.  शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. मुलींसाठी 500 कोर्सेसच्या फिसची रक्कम शासन देत आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसविले त्यांना 300 युनिट मोफत वीज आपण देत आहोत. ज्यांची वीज 300 युनीटपेक्षा अधिक होत आहे. ती वीज आपले वीज महामंडळ विकत घेईल, असे त्यांनी सांगितले.

सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना एक रुपया विमाअंतर्गत 278 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेयो, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथील विविध विकास कामांसाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध वैद्यकीय सुविधा आपण निर्माण करीत आहोत. केंद्र सरकारकडून मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदीसाठी 550 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळाला आहे. जिल्ह्यातील 35 हजार 750 लोकांना आपण प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मान्यता दिली आहे.  ओबीसींसाठी मोदी आवास योजनेत 6  हजार 747 घरांना मंजूरी देऊन यातील 1 हजार 54 घरे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक योजनांसाठी आपण 1 हजार 219 कोटी रुपयांच्या निधीची नागपूर जिल्ह्यासाठी तरतूद केली आहे. देशातील अद्ययावत असे क्रिडा संकुल आपण साकारले आहे. जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासनाला भक्कम करण्यासाठी 272 कोटी रुपये खर्चून नवीन इमारत आपण उभी करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एक वृक्ष मातेच्या नावाने ही चळवळ आता अधिक प्रभावीपणे लोकसहभागातून राबविली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती पदक प्राप्त , विशेष सेवा पदक प्राप्त अधिकारी, अंमलदार, आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या दाखल्याचा त्वरीत निपटारा करणारे अधिकारी, अग्निवीर सैन्य भरती मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणार व महाआवास योजना अभियान 2023-24 मध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  • जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

हिंगोली, दि.१५(जिमाका): भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी देशसेवेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा अभियानाची आणि तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू विरोधी शपथ जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिंनींना दिली.

  जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये स्वराज संदीप तिवडे या विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ग्रामीण भागातून 14 वा आल्याबद्दल तर बालाजी नरहरी काळे या सहशिक्षकाने ‘हिट अँड रन’ अपघात आई व बाळाचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून बालरोग विभाग हिंगोलीला राज्यातील पहिला ‘मुस्कान’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, आणि डॉ. गोपाल कदम यांच्यासह चमूचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे यांच्या समुहाने ई-संजिवनी अंतर्गंत 1 लाख 26 हजार रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा दिल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्याशिवाय मृदा आरोग्य पत्रिका वाटप केल्याबद्दल कृषी विभागाचे गजानन लोडे आणि त्यांचा चमू, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये औंढा तालुक्यातील चौंडी शहापूर, वसमत तालुक्यातील चिखली आणि विरेगाव या गावाचा धनादेश व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतर्फे राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प अंतर्गत भूजल जनजागृतीसाठी चित्ररथाला जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवली.

देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या वीर पिता, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जोडीदार यांनाही गौरविण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींना वंदन करण्याचा दिवस – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे  

परभणी, दि. 15 (जिमाका) : पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या मातृभूमीस स्वतंत्र होण्याच्या घटनेस आज 77 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असंख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणास लावले. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचे अन्याय, अत्याचार सहन केले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. महान स्वातंत्र्य सेनानीसह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावले. त्या सर्वांना वंदन करण्याचा, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री. गावडे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पुढे श्री. गावडे म्हणाले की, हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात नेत्रदिपक प्रगती साधली, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतातील लोकशाही मूल्यांचे जतन झाल्याने आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था निर्माण करुन जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. आपल्या देशाने मिश्र पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारल्याने विकास प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत पोहचत असल्याचे आपण पाहत असल्याचे सांगितले.

आपल्या जिल्ह्यासमोर विविध समस्या आहेत, परंतू या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याकरीता शासन आणि प्रशासनामार्फत देखील सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आपण सर्वांनी मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु असे सांगत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, आणि पत्रकार उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर श्री. गावडे यांनी उपस्थितांना अभिवादन करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार केला.

यावेळी जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षातील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या चित्ररथाचे आणि सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग संघटना द्वारा नशामुक्त भारत अभियानास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई, दि.15 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू  यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे, अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पालांडे,  उपायुक्त (पुनर्वसन) अमोल यादव,  उपायुक्त (रोहयो) श्रीमती रेवती गायकर, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (आस्थापना) मिनल कुटे,उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभवी, उपायुक्त (पुरवठा) अनिल टाकसाळे,  कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत कोकण भवन इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी  कोकण भवन इमारत तिरंगी रंगाच्या रोषणाईने सजवण्यात आली होती. “हर घर तिरंगा” या संकल्पनेवर आधारित  आकर्षक असे शुभेच्छा संदेश देणारी रांगोळी आणि  सेल्फी पॉईंट इमारतीच्या आवारात उभारण्यात आले होते.

यावेळी महसूल पंधरवड्यानिमित्त  महसूल संवर्गातील पुनर्वसन  शाखेचे उपायुक्त अमोल यादव, मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या  नायब तहसिलदार  दिपाली पुरारकर, नायब तहसिलदार  सुहास सावंत यांच्यासह लघुलेखक संवर्ग, वरिष्ठ लेखापाल संवर्ग, अव्वल कारकून संवर्ग, महसूल सहाय्यक संवर्ग, आणि महसूल मित्र अशा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य करणारे नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश धनसिंग ठाकरे, तुर्भे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भगवान वाघ आणि तुकाराम सुरेश नांगरे, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश आनंदा पाटील, सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल रामराव मुंडे, कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शाहूराव नवले, नाव्हाशेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भरत पोफळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नवी मुंबई पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.   यावेळी विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

येणाऱ्या महिला भगिनींना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या- अजित पवार

पुणे, दि. १५: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला येणाऱ्या महिला भगिनींना सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित महिलांच्या खात्यावरील येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा श्री. पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमासाठी लांबून महिला येणार असल्याने त्यांच्या येण्याजाण्याची, भोजन, पाणी आदी व्यवस्था चांगल्या प्रकारे करा. त्यांची आरोग्य तपासणी करावी. कार्यक्रमस्थळी वाहनतळ, पुरेशी बैठकव्यवस्था, मोबाईल टॉयलेट, परिसराची स्वच्छता आदी चोख व्यवस्था करावी. महिला भगिनींनी गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभ प्रदानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे सांगितले.

डॉ. दिवसे यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 15 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोहळा अत्यंत उत्साहात झाला. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.  त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख, उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझले, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुमेध अलोने,  तहसीलदार विजय लोखंडे, तहसीलदार भाग्यश्री देशमुख, तहसीलदार निलेश खटके, जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, अधीक्षक प्रशांत पडघम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार

जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, अचलपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉ. संजय गरकल, तहसीलदार भाग्यश्री देशमुख, अधीक्षक निलेश खटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, दर्यापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रवीण जमधाडे, धामणगाव तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून निलेश दडमल, मोर्शी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी समीर वडनेरकर, अमरावती तहसील कार्यालयाचे तलाठी पवन राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूल सहायक पंकज राऊत, लघुलेखक अमित चेडे, नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाचे वाहन चालक बबन मोहोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे शिपाई गोविंद चव्हाण, चिखलदरा तहसील कार्यालयाचे पोलीस पाटील रमेश महल्ले, कोतवाल देवराव सुरतणे यांना  यावेळी सत्कार करण्यात आला.

*****

जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणारे काम करण्यासाठी कटीबद्ध – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 रायगड (जिमाका) दि.15:- शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार अव्याहतपणे कार्य करीत आहे. हेच कार्य जोमाने पुढे घेऊन जाऊ आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडवू, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77  व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनिल तटकरे  यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उप वनसंरक्षक राहुल  पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सां.बा.अलिबाग जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कु.आदिती तटकरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच  देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर, शहीद यांना वंदन केले.

महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.  राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात परिवर्तन घडविणे, आवश्यक त्या सर्व सेवा, सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

आज राज्यातील शेतकरी-कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणे, आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या बाबींना महत्व दिले जात आहे. विविध योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करुन मदतीचा हात वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर आमचा भर आहे. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातूनही बाब ठळकपणे अधोरेखीत झाली आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्ष्‍िात बेरोजगारांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजनाआहे.

रायगड जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त नवउद्योजकांना राज्य शासनाचे रु. 7.5 कोटी पेक्षा जास्त अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्राद्वारे रायगड जिल्ह्यातील लघु उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाकरिता गणपतीमूर्ती क्लस्टर, हमरापुर पेण, इंजिनिअरींग क्लस्टर, तळोजा, पनवेल व बांबू कारागिरांकरिता बांबू क्लस्टर, मुरुड हे समुह औद्योगिक प्रकल्प (क्लस्टर) प्रस्तावित आहेत. महायुती सरकारनं महिला, मुली यांच्यासाठी ज्या योजना राबविल्या आहेत.

 कु.तटकरे पुढे म्हणाल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनाही राज्य शासनाची क्रांतिकारी योजना आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आली आहे. राज्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशनमोडवर काम सुरु आहे. आज राज्यात 1 कोटी 35 लाख महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.  रायगड जिल्ह्यातील 3 लाख 38 हजार महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत.

ज्या बहिणींची अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यांनी अर्जाची पूर्तता केल्यानंतर पुढच्या महिन्यात त्यांना तीन महिन्यांचे एकत्र पैसे मिळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक विकास करण्यास शासन कटिबद्ध आहे. गेल्या वर्षभरात जनतेच्या हिताचे व जिव्हाळ्याचे निर्णय तात्काळ घेण्यास प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात योजनांची जिल्हा प्रशासनामार्फत अंमलबजावणी सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे बळकटीकरण, दिवेआगार येथील विस्तारीत सुपारी संशोधन केंद्र, रातवड येथील मेगाक्लस्टर प्रकल्प, जिल्हा परिषद नवीन इमारत यांची पूर्तता करण्यावर भर आहे. आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज म्हसळा तालुक्यातील सावर या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी 100 बेड्स व 100 विद्यार्थी क्षमता असणार आहे.

 रायगड जिल्हा हे नवे इंडस्ट्रियल हब म्हणून विकसित होत आहे.  रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी राज्य शासनाकडून मिळविण्यासाठी आम्ही सर्वजण विशेष  प्रयत्नशील आहोत.

 अटल सेतू, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, विरार-अलिबाग क़ॉरिडार, नवी मुंबई मेट्रोचं विस्तारणारं जाळं हे रायगड जिल्ह्याचा  कायापालट करून टाकणारे गेमचेंजर प्रकल्प ठरतील असा विश्वास आहे.

 जिल्ह्याच्या विकासाचं हे पर्व असंच सुरु राहावं यासाठी निरंतर प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. नवीन, समृद्ध व बलशाली असा महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन  मंत्री कु तटकरे यांनी यावेळी केले.

यावेळी मंत्री कु.तटकरे यांच्याहस्ते दामिनी (महिला सुरक्षा बीट) पथकास 20 दुचाकी वाहने तसेच संविधान प्रत वाटप करण्यात आले.

तसेच मंत्री कु.तटकरे यांच्याहस्ते जिल्ह्यातील विविध व्यक्ती अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

 महाराष्ट्रातील युद्धजन्य परिस्थतीत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युद्ध विधवा यांना ताम्रपटाचे वितरण श्रीम.निशा सुयोग कांबळे.

 नारंगी, ता.अलिबाग येथील सुपूत्र लांस हवालदार सुयोग अशोक कांबळे हे दि.29 एप्रिल 2005 पासून भारतीय सैन्यामध्ये अविरत सेवा बजावित असताना देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन स्नो लिओपार्ड मोहिमेत पूर्व सिक्कीम येथे कार्यरत असताना दि. 04 ऑक्टोबर 2023 रोजी अचानक आलेल्या महापुरात ते वाहून गेल्याने शहिद झाले आहेत.

 राष्ट्रपती पोलीस पदक 2024- श्री. शिवाजी ज्ञानदेव फडतरे, उविपोअ, पेण, श्री.विनीतकुमार जयवंत चौधरी, उविपोअ, अलिबाग, श्री.शिवाजी गोविंद जुंदरे, पोउनि, खालापूर पोलीस ठाणे.

 विशेष सेवा पदक-श्री. अभिजित अरविंद भुजबळ, सहा.पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे (सन 2020 ते 2024 मध्ये आंतरराज्यीय न्यु बेस कॅम्प मुरकुटडोह, गोंदीया या जिल्यामध्ये नक्षलग्रस्त विभागात 4 वर्षे समानधानकारक सेवा पूर्ण केली.). राष्ट्रपती सुधार सेवा पदक व स्क्रॉल (प्रशस्तीपत्रक) प्रदान करणे श्री.अशोक दगडू चव्हाण, सुभेदार, तळोजा मध्यवर्ती कारागृह.

 महसूल अधिकारी यांना विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार- श्रीम. स्नेहा उबाळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी, (लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे कामकाज उत्तमरित्या पार पाडले).  श्री.विकास गारुडकर, तहसिलदार माणगाव, (शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगाव येथे राबविला, 861 आदिवासी बांधवाना सातबारा नावावर करुन जमीनी मिळवून दिल्या, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून काम केले, निवासस्थाने येथे 1 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले.

 नगरपरिषद आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेशाचे वितरण-श्री. शैलेश अशोक शेळके, रा.खोपोली, ता.खालापूर (श्रीवर्धन नगरपरिषदेवरील आस्थपनेवरील गट क संवर्गात नियुक्ती देण्यात आली आहे.)

 उत्कृष्ठ लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार 2023- प्रथम पुरस्कार विजेते – मे.सहारा रुफींग टेक्नो सोल्युशन, खोपोली ता. खालापूर (रोख रु. 15000/-, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ),  द्वितीय पुरस्कार विजेते मे. उपासना फॅशन, अलिबाग (रोख रु.10000/-, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ)

 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभाग- कु.हंस उमेश दोशी, एन.एम.जोशी विद्याभवन गोरेगाव, कु. वरुण अरुण फडतरे, सेंट झेविअर्स सेंकडरी इंग्लिश हायस्कूल महाड.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 शहरी विभाग- कु.आवंतिका सुनिल टकले, एम.इ.एस.आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल.

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभाग- कु.आयुष दत्तात्रेय शिंदे. डी. के.इ.टी. सी.के.व्ही.हायस्कूल इंग्लिश मिडीयम, चेंढरे.

 श्री.दत्तात्रेय कमलाकर कांबळे, अध्यक्ष, वक्रतुंड मित्रमंडळ, पेण, (रायगड जिल्हयातील कोरोना काळात व आपात्कालीन परिस्थतीमध्ये खारीचा वाटा उचलून समाजिक बांधिलकीतून सेवा केली आहे. तसेच सामाजिक बांधिलक जपून प्रशासनास वेळोवेळी मदत केली आहे.)

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड- नागरी संरक्षण दल उरण/आपदा मित्र, सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रोहा, आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली, आपदा मित्र महाड, म्हसळा, अलिबाग

00

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण संपन्न

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

सर्वसामान्यांसाठीच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील

कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन करुन सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महाराणी ताराबाई सभागृह येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजक राजश्री मनोहर पाटील (प्रथम), रमेश शंकरलाल पारिक (व्दितीय) यांना जिल्हा पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस पाटील उदय भरमा पुजारी (भडगाव, ता.गडहिंग्लज) यांना विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्कार देण्यात आला.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी सारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ‘कांस्य’ पदक मिळवून ‘जगात भारी कोल्हापुरी’ ही म्हण पॅरीसमध्ये सार्थ ठरवली आहे. नेमबाजीत चमकदार कामगिरी करत जिल्ह्यासह देशाचं नाव उंचावणाऱ्या नेमबाज स्वप्निल कुसाळे याच्या यशामुळे खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात तब्बल ७२ वर्षांनंतर पदक मिळवून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या यशाबद्दल स्वप्निल आणि त्याच्या आई वडीलांचे अभिनंदन… खेळाला आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यानिमित्तानं व्यक्त केला.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध होणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आणि सन्मान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी व नवीन आवश्यक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी एकाच वर्षात जवळपास १२०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये राज्य योजनेअंतर्गत संस्थेचे अद्ययावतीकरण व यंत्रसामग्री करता २६७ कोटी, राज्य योजनेअंतर्गत बांधकामा करिता एकूण ७९९ कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून २२.८६ कोटी रुपये निधी, कागल येथील १०० खाटांचे रुग्णालय, उत्तुर आजरा येथील ५० खाटांचे रुग्णालय, सांगाव कागल येथे १०० खाटांचे आरोग्य पथक यासह यंत्रसामुग्रीसाठी २३७.१४ कोटी देण्यात आले आहेत. कागलमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि त्याला संलग्न १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय आणि उत्तूर मध्ये योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वय वर्ष ६५ पुर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत जुलै अखेर ५ हजार ६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. ही योजना महत्वाकांक्षी असून गरजुंसाठी शासनाने सुरु केलेली अत्यंत चांगली योजना आहे.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करुन कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना १५०० रुपये प्रति महिना म्हणजेच १८ हजार रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत. जिल्ह्यात ६ लाख ९२ हजार महिला नोंदणीनंतर पात्र झाल्या आहेत. अजूनही नोंदणी सुरु असून आत्तापर्यंत पात्र झालेल्या महिलांना दोन महिन्यांचे १५०० रुपयांप्रमाणे २०७.६० कोटींचे वितरण सुरु होईल.

कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे १ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली असून या बांधकाम कामगारांना सुरक्षासंच व अत्यावश्यक संच, गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहेत. नोंदीत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेमधून २०२३- २४ याकालावधीमध्ये सुमारे १०३ कोटी ९२ लाख आर्थिक लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा केली आहे.

जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत १५ विविध प्रकारचे प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले असून त्यांना सुमारे २ कोटी ५० लाख रुपये अनुदान स्वरुपात वितरीत झालेले आहेत. यामध्ये काजू, नाचणी, भात व गूळ या प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेमुळे छोट्या उद्योगांना हातभार लागला आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सन २०२३-२४ अंतर्गत हरीतगृह, शेडनेट, सामुहिक शेततळे, फलोत्पादन, यांत्रिकीकरण, मनुष्यबळ विकास कार्यशाळा प्राथमिक फळप्रक्रिया केंद्र या घटकांकरीता ११५ लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. फक्त १ रुपया भरुन विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी व खरीप ज्वारी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. खरीप हंगामात ८६ हजार ६३८ शेतक-यांनी सहभाग घेतला असून २३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केली आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत १२१ लाभार्थ्यांना जिल्हास्तरावरुन २४० लाख रुपये निधीचे वितरण अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांच्या खात्यावर जमा केले आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ४ लाख ७० हजार लाभार्थ्यांना लाभ दिला जात असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत मार्च २०२४ अखेर ४ लाख ७० हजार लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आला आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५६३ वस्त्यांमधील कामांसाठी ३८ कोटी ९ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन देण्याच्या योजनेअंतर्गत सन २०१९-२० ते २०२३- २४ अखेर एकूण ५०० कलावंतांची निवड करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानातून दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या महत्वाच्या धोरणांतंर्गत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत एकूण ३५ हजार ५१३ घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी २७ हजार ९५१ (७९ %)घरकुले पूर्ण झाली आहेत तसेच 7 ७ हजार ५६२ घरकुले प्रगतीपथावर आहेत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (एमआरडीपी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.  ३ हजार २०० कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक २ हजार ३३८ कोटी रुपयांचे वित्तसहाय्य करणार आहे. राज्य शासन ८६२ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिनांक १२ ऑगस्ट २०२४ अखेर जिल्ह्यामध्ये शासकीय व खासगी अशा एकूण १४० आस्थापनांनी नोंदणी केली असून ४ हजार ६१० पदे ऑनलाईन अधिसूचित केली आहेत, त्यापैकी २२९ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. तर ५४ उमेदवार आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.

एकत्रित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत गोल्डन कार्ड (PM-JAY) आरोग्य विमा योजना आहे. या योजने अंतर्गत ५ लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. या योजनेंतंर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १२ लाख ३८ हजार लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वतीने गौरी गणपती सणादरम्यान आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यात १०० रु. मध्ये पामतेल, रवा, चणाडाळ, साखर इ. जिन्नस असतील. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य लाभार्थी योजना या शिधापत्रिकाधारकांना जानेवारी २०२३ पासून मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत ५ लाख ८६ हजार १२५ इतक्या कार्डावर २४ लाख ७९ हजार ९३४ इतक्या सदस्यांना दरमहा ७ हजार मे. टन तांदूळ व ५ हजार मे. टन गहू वितरीत केला जात आहे.

कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाला अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे. या देशाची एकता, स्वातंत्र्य आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिवीरांच्या बलिदानातून प्राप्त झालेले हे भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, असे सांगून त्यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या व अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमानंतर सर्व नागरिकांनी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

***

ताज्या बातम्या

डिजिटल युगात कामात सुलभता आणि सुरक्षेसाठी संगणक सजग असणे आवश्यक – प्राजक्ता तळवलकर

0
मुंबई, दि. 9 : डिजिटल युगात संगणक हा आपला अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर होतो. या...

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा १३ मे रोजी

0
मुंबई, दि.9 : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मंगळवार, दि. १३ रोजी वितरण करण्यात येणार आहे. राज्यपाल...

स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिजे – मंत्री मंगलप्रभात लोढा

0
मुंबई, दि. ९ : एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला  'सोने की चिडिया' म्हटले जात होते....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

0
मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला....

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0
सातारा दि. 9 : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी...