शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 479

जिल्ह्यातील लाडक्या बहिणीशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद; लाडक्या बहिणींनी व्यक्त केला आनंद

गोंदिया दि. 15-राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी बहिणींशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. योजना अतिशय चांगली असून आम्हाला लाभ मिळाल्याने आम्ही आनंदी असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी महिलांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठकीद्वारे हा संवाद साधला. फुलचुर आणि खमारी येथील ज्या महिला लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा प्रत्यक्ष लाभ ज्यांच्या बँक खात्यात जमा झाला त्या महिलांशी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुरुंगानंथम एम , जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद संजय गणवीर , नगर परिषद मुख्याधिकारी गोंदिया व तिरोडा , बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंदिया व तिरोडा, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी महिला प्रत्यक्ष उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सदर योजनेचा लाभ सदैव सुरू राहणार असून तो कधींही बंद होणार नाही. तसेच ही योजना यशस्वी करण्यामागे शासनाच्या सर्व विभागाचे सहकार्य मोलाचे आहे.

युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना, बळीराजा मोफत वीज योजना, अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण, नुकसानग्रस्तांना मदत वाटप, आनंदाचा शिधा वाटप या योजनांचाही आमच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ होणार असल्याचे सहभागी महिला लाभार्थ्यांनी सांगितले.

खमारी येथील दुर्गा सेलोकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संवाद साधला. या योजनेच्या अंमलबजावणीवर समाधान व्यक्त करत यामुळे आर्थिकरित्या आत्मनिर्भर झाल्याची भावना या माता भगिनींनी व्यक्त केली.
000

नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशीही संवाद

दरम्यान या संवाद सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थींशीही संवाद साधला. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्यासह दोन्ही योजनांच्या लाभार्थी उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती खैरनार, ज्योती महाजन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या लाभार्थी तेजस्विनी कुलथे यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती सुनील खैरनार (रा. नांदगाव, ता. नांदगाव) यांनी १७ जुलै रोजी योजनेचा अर्ज स्वत: भरला होता. महिनाभराच्या आतच त्यांच्या बँक खात्यावर काल दुपारी रुपये तीन हजार रक्कम झाल्याचे जमा सांगून आपल्याला ही रक्षाबंधनची ओवाळणी मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या घरी पती, सासू, सासरे व २ छोटी अपत्ये आहेत. त्यांचे पती कापड दुकानात काम करतात. सहा जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या पगारात भागविताना तारेवरची कसरत व्हायची. कुटुंबाला हातभार म्हणून त्या स्वत: अस्मिता ग्राम संघाच्या सदस्या झाल्या असून, बाजरी प्री मिक्स करण्याचे काम त्या करतात. या पैशांतून संसारासाठी आर्थिक मदत होणार असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती अरुण महाजन (रा. गिरणानगर, ता. नांदगाव) यांनी बँक खात्यावर ३ दिवसांपूर्वी रक्कम जमा झाल्याचे सांगून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. कुटुंबात त्यांच्यासह पती, सासू व दहावी पास मुलगा हे सदस्य आहेत. त्यांचे पती खासगी वाहनचालक आहेत. त्या स्वतः उम्मेद अभियानच्या सी आर पी आहेत. त्यांनी १५ जुलै रोजी स्वत: या योजनेचा अर्ज भरला होता. स्वतः अर्ज भरण्याबरोबरच त्यांनी इतर महिलांनाही प्रेरित केले. त्यांचा मुलगा आय. टी. आय. ला प्रवेश घेत असून त्याच्या प्रवेशासाठी या रकमेचा विनियोग करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
या दोन्ही लाभार्थींनी मुख्यमंत्रीरूपी भाऊ आपल्या पाठिशी असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
तेजस्विनी नंदकुमार कुलथे (रा. नाशिक) ही पदवीधर युवती नोकरीच्या शोधात असताना अनुभवाअभावी तिचे प्रयत्न अपुरे पडत होते. मात्र, तिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. तिने नोंदणी केल्यानंतर तिला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी तिला मासिक दहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे. यामुळे तिला आर्थिक मदतीसह शासकीय कार्यालयातील कामकाजाचा अनुभव मिळणार असून, भविष्यातील नोकरीसाठी या अनुभवाची मदत होणार असल्याचे सांगून तिने राज्य शासनाचे आभार मानले.
00000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रूपये खात्यावर जमा, मला लय भारी वाटतंय! – लाभार्थी सरिता कांबळे बहिणीची प्रतिक्रिया

जिल्ह्यातील सरिता कांबळे ठरल्या पहिला लाभार्थी

कोल्हापूर दि. 15 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया आज स्वातंत्र्य दिनी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांना 2 महिन्यांची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली असून उर्वरित पात्र महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरित होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोल्हापूर येथून या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी एकनाथ कांळबांडे, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे आदी अधिकारी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्था व अंगणवाडी सेवीका, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सरिता कांबळे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले. श्रीमती कांबळे यांनी आनंद व्यक्त करताना रक्षाबंधनाची भेट मला 3 दिवस आधीच मिळाली असे मत व्यक्त केले. महिलांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानून कोल्हापूरी भाषेत ‘मला लयं भारी वाटतंय!…’ अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. अंगणवाडी सेवीकेनी मला नारी शक्ती दूत ॲप द्वारे माहिती भरण्यास मदत केली असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अनुराधा कुमठेकर यांनी मला व कुटुंबियांसाठी आर्थिक लाभ होणार असल्याने शासनाचे आभार मानले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मिळणाऱ्या अनुभवाचा भविष्यात निश्चित फायदा होणार

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात प्रशिक्षणासाठी रुजू झालेल्या मृणाली कांबळे यांनी प्रशिक्षण घेवून मला नोकरीसाठी मदत होईल.  यातून मला प्रमाणपत्र मिळणार तर आहेच शिवाय सरकारी योजनेची माहितीही मिळणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तसेच महिला व बाल विकास विभागाअतंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मिळाली या अनुभवाचा भविष्यात फायदाही होणार असल्याने शासनाचे तिने आभार मानले. यावेळी उपस्थित इतर लाभार्थी यांनी मिळालेल्या लाभाबद्दल शासनाचे आभार मानले.

0000000

मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा मनमोकळा संवाद; बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी जमा झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान

मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे

मुख्यमंत्री ‘सर’ नाही तर ‘भाऊ’ असा आवाज देणार…

मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख…

मुंबई, दि. 15: ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहिले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.  या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्यापुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरु केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. सर्वसामान्य, दुर्बल, गरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक – युवती, कामगार यांच्यासाठी सरकार शक्य ते सर्व करत आहे. या सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला की केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’च्या माध्यमातून बचतगट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पूर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपयांपर्यंत केली आहे. आता त्यामध्ये 50 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, युवक – युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. याचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी फायद्यातच आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पूल बांधणे, दळणवळणाची साधने उभारणे महत्त्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबवणेही महत्त्वाचे आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकासाठी शासन योजना राबवित आहे.

शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आले आहे. 45 लाख कृषिपंप धारकांना याचा लाभ झाला आहे. तसेच नमो सन्मान योजनेमध्ये केंद्राच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासनाचे 6 हजार रुपये आणखी भर घालून आता 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

एखादी योजना सुरु करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम 1 वर्षापासून सुरु होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव  यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहोचवल्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचे मी अभिनंदन करतो.

महिलांना सक्षम  व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींना वंदन करण्याचा दिवस – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे  

परभणी, दि. 15 (जिमाका) : पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या मातृभूमीस स्वतंत्र होण्याच्या घटनेस आज 77 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असंख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणास लावले. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचे अन्याय, अत्याचार सहन केले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. महान स्वातंत्र्य सेनानीसह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावले. त्या सर्वांना वंदन करण्याचा, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री. गावडे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पुढे श्री. गावडे म्हणाले की, हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात नेत्रदिपक प्रगती साधली, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतातील लोकशाही मूल्यांचे जतन झाल्याने आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था निर्माण करुन जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. आपल्या देशाने मिश्र पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारल्याने विकास प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत पोहचत असल्याचे आपण पाहत असल्याचे सांगितले.

आपल्या जिल्ह्यासमोर विविध समस्या आहेत, परंतू या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याकरीता शासन आणि प्रशासनामार्फत देखील सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आपण सर्वांनी मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु असे सांगत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, आणि पत्रकार उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर श्री. गावडे यांनी उपस्थितांना अभिवादन करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार केला.

यावेळी जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षातील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या चित्ररथाचे आणि सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग संघटना द्वारा नशामुक्त भारत अभियानास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

कुळगाव बदलापूर नगरपरिषद इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे आश्वासन

ठाणे,दि.15 (जिमाका) : आज बदलापूर बदलत आहे. लोक बदलापूरला पसंत करु लागले आहेत. लोक बदलापूरला राहायला यायला लागले आहेत. तुम्ही सांगा आम्हाला महानगरपालिका पाहिजे, तेव्हा महानगरपालिका केली जाईल. सरकार शेवटी लोकभावनेचा विचार करणारे आहे. तुमचा आवाज ऐकणारे सरकार आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापूर येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या उर्दू शाळा क्र. ०२ व कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश(बाळ्या) म्हात्रे, आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कुळगाव बदलापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, विविध विभागाचे प्रशासकीय  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची ही इमारत भव्यदिव्य आहे. या इमारतीसाठी मी मुख्यमंत्री असल्याने 25 कोटी रुपये देऊ शकलो. शेती व पायाभूत सुविधामध्ये आपण चांगले काम केले आहे. जे प्रकल्प बंद होते ते आपण सुरू केले. लोक उपोषण करतात, आंदोलन करतात, कारण मुख्यमंत्री देणारा आहे. लोकांचा विश्वास आहे. देशामध्ये सर्वात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रात आहेत. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला पहिला नंबर आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. त्याला मदत करताना आपण आपला हात आखडता घेतला नाही. हे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.

आम्ही सांगितले होते की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस आपल्या बँक खात्यात जमा होतील. राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले आहेत. हे सरकार जे बोलत आहे, ते करीत आहे. आपल्या अर्जात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करुन घेऊ. आपले 31 ऑगस्टनंतर जरी अर्ज आले तरीही आपणाला  जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे देणार आहोत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आमचे सरकार बहिणीच्या खात्यात पैसे भरणारे आहे. आपण वेगाने निर्णय घेतले आहेत.महिलांसाठी 107 निर्णय  आपण घेतले आहेत,असेही यावेळी सांगितले.

देशातील हे पहिले राज्य आहे. तरुणांना प्रशिक्षण पण देत आहे आणि पैसे पण देत आहे.आपल्या राज्यात उद्योग येत आहेत.त्यांना मनुष्यबळ आपण त्यांना देत आहोत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजेनमधून 547 तरुणांना ठाणे महानगरपालिकेने नियुक्तीपत्र दिले आहेत.तसेच आपणही कुळगाव बदलापूर  नगरपरिषदेमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार द्या. आपण उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण दिले आहे.मुलींना यापुढे कोणतेही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु केली आहे.ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.

या सर्व योजना चालू राहणार आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. जे आपणास आवश्यक आहे, ते आपणास देण्यात येईल.असेही यावेळी श्री.शिंदे यांनी सांगितले.

रानभाज्या महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हास्तरीय एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

 नाशिकदिनांक : 15 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा): शहरातील नागरिक व पुढील पिढीपर्यंत रानभाज्यांचे महत्व पोहचविण्यासाठी या महोत्सवाची व्याप्ती वाढविणे ही काळाची गरज बनली आहेयासाठी अशा रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात यावेअसे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कृषि विभागकृषि तत्रंज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळविभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाममराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणेआत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकमकृषि विज्ञान केंद्राचे डॉ. नितीन ठोकशेतकरी बाजार रोटरी क्लबचे चेअरमन चेतन पवार यांच्यासह रानभाजी महोत्सवासाठी आलेले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी उपस्थित होते.

 पालकमंत्री दादाजी भुसे म्हणालेरानभाजी महोत्सव घेण्याचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ज्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी जतन करून पिकवलेल्या या रानभाज्यांची माहिती व महत्व शहरातील नागरिकांना समजून रानभाज्यांना चांगला बाजार उपलब्ध होण्यसाठी मदत होईल. त्याचप्रमाणे या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपले जाण्यास मदत होईल. हे रानभाजी महोत्सव साजरे करतांना त्यांच्यातील नैसर्गिक संतुलनास धोका पोहचणार नाहीयाबाबत दक्षता घेण्यात यावी. या महोत्सवात आदिवासी महिलांकडून रानभाज्यांच्या विविध पाककृती प्रत्यक्ष दाखविण्यात येतात. अशा आरोग्यवर्धक रानभाजी महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन ही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी रानभाज्यांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याची ताकद असते. असे सांगत या रानभाज्यांचे जीवनातील महत्व अधोरेखीत केले. तसेच रानभाजी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुरवातीला रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्री यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलन केले. तसेच पालकमंत्री श्री. भुसे यांनी रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी शेतकऱ्यांनी लावलेल्या विविध रानभाजीच्या स्टॉलला भेटी दिल्या.

000

नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारमध्ये उपस्थित राहावे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महसूल पंधरवडाचे आयोजन

पालघर दि 15 : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.  यावर्षीपासून दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये महसूल पंधरवडा- 2024 चे आयोजन करण्यात आले होते.  महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महसूल पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून )तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

पालघर जिल्हा महसूल पंधरवडा सांगता समारंभाचे आयोजन नियोजन समिती सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ.हेमंत सवरा,माजी खासदार राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक अभिसरणामध्ये समाजोन्नती करिता केंद्र व राज्य शासनाच्या योजनांद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

शासनाने घोषित केलेल्या अत्यंत महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ व ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या तीन महत्त्वपूर्ण योजनांद्वारे महिला, युवा आणि जेष्ठ नागरिकांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुखकर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण 24 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आज या आदेशांचे वाटप करण्यात आले असून  अधिकाधिक उमेदवाराने या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या योजनेंतर्गत मेजर राजेश नायर हे जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेल्या 4 राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. सन 2001 मध्ये, मेजर राजेश नायर यांची नियुक्ती युनिट जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादग्रस्त डोडा जिल्ह्यात तैनात होती. त्यांनी केलेल्या 22 पेक्षा जास्त यशस्वी लष्करी ऑपरेशन्समुळे ते एक लढाऊ आणि समर्पित असे सैनिक होते.

मेजर राजेश नायर यांनी धैर्याने सैनिकांना प्रेरित करून ताकदीने प्रतिहल्ला करण्यासाठी आणि दिलेले कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मेजर राजेश नायर यांना त्यांच्या धाडसी कृतीसाठी, आणि सर्वोच्च बलिदानासाठी “सेना मेडल” हा शौर्य पुरस्कार देण्यात आला आहे. आज त्याअनुषंगाने याठिकाणी वीरपत्नी  सुप्रिया नायर  यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे पाच एकर जमीन वाटप आदेश याठिकाणी वितरीत करण्यात आला असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

16 ऑगस्ट रोजी जनता दरबाराचे आयोजन

दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांना केले.

जनता दरबारामध्ये विविध विभागाचे 17 टेबल लावण्यात आले आहेत तसेच नाव नोंदणी करिता 10 टेबल कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी नाव नोंदणी करून संबंधित विभागाच्या टेबलवर जाऊन लेखी स्वरूपात आपल्या अडचणी व प्रश्न मांडावे नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांनी जनता दरबारामध्ये उपस्थित रहावे असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकारी वर्गांना दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

रायगड, जिमाका दि. 15 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी  राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याची ही ऐतिहासिक योजना राबविण्याची संधी मिळाली असून अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.

ररोहा येथील जेष्ठ नागरिक सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रमाणपत्राचे पात्र महिला भगिनीना महिला  व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.या प्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख,महिला व बालविकास अधिकारी (जि. प.) निर्माला कुचीक, पोलिस निरीक्षक देवीदास मुपडे, गटविकास अधिकारी शुभदा पाटीलआदी उपस्थित होते.
मंत्री कु तटकरे यांनी सांगितले की ही योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार,  यांनी मान्यता दिली. तसेच म हाराष्ट्रात सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी ही योजना राबविण्यासाठी अतिशय मेहनत घेतली.पात्र ३२ लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पैसे वितरण केले आहे..आतापर्यंत ४८ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले असून पुढील लाभ देण्याचे काम सुरू आहे. ही योजना यापुढेही कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक उप विभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड यांनी अनेक योजनांची जननी रायगड जिल्हा असल्याचे सांगितले. रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या पैकीच आहेत योजना सर्वत्र राबविले जात आहे. शासनाच्या सर्व विभागांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलबजावणी साठी चांगले काम  केले आहे. असे सांगितले.
महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील तळा, किल्ला आणि रोहा क्षेत्रातील पात्र महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केले .यावेळी मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात महीला उपस्थित होते.

नागरिकांना सेवांची हमी देणारा पथदर्शी प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर दि. 15 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाद्वारे निश्चितच होईल. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण करुन राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होत असलेल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह राज्यातील इतर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी आपण एका लोकाभिमुख, राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात करत आहोत.  हा अधिनियम 2015 मध्ये सुरू झाला असून,  या अंतर्गत शासनाच्या हजारो योजनांचा समावेश करून नागरिकांना तात्काळ व सुलभ सेवा देण्याचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तथापि, या कायद्याची अजूनही लोकांना तितकीशी माहिती नाही. सेवांचा प्रभावी वापर होऊन कायदा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे त्यांनी पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात सुरु केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क मंत्री, शंभूराज देसाई यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यत सेवा हमी कायदा पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीकारलेली जबाबदारी कौतुकास्पद असून आता शासनाच्या विविध सेवा नागरिकांच्या घरोघरी वेळेत जातील. या अभिनव उपक्रमांद्वारे नागरिक व प्रशासन यांच्यादरम्यान ठोस नातंही निर्माण होईल. जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या घरपोच सेवा, सेवा वाहिनी, आपले सरकार वेब पोर्टल आरटीएस मोबाईल ॲप्लिकेशन, व्हाट्सॲप चॅटबॉट, प्रत्येक तालुक्यात एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्र तसेच लोकांच्या तक्रारीसाठी सुरु केलेली क्यूआर कोड संकल्पना, कार्यालयांचं मानांकन करुन प्रशासन गतिमान करण्याचे नियोजन या सुविधा कौतुकास्पद असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात झाल्यानंतर या प्रकल्पाविषयी माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रचार प्रसार पुस्तिकांचेही अनावरण संपन्न झाले. यात क्यूआरकोड, मदतीसाठीचा टोल फ्री क्रमांक, सेवांच्या माहितीकरिता व्हॉट्सॲप चॅटबोट यांचेही अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोल्हापूरची निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. अस्तित्वात असणाऱ्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चांगले नियोजन केल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, विधानसभेच्या अधिवेशनात स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लक्षवेधी उपस्थित केली. तसेच त्यांनी त्यासाठी पाठपुरावाही केला. शासनाकडून उत्तर देत असताना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, लोकांना सेवा घेत असताना होणारा त्रास कमी करण्यासाठी कायद्याची कडक स्वरूपात अंमलबजावणी करण्याचे ठरविले. हा पायलट प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू करण्याचे ठरविले. आणि कोल्हापूर येथे याबाबत चांगले नियोजन केल्याचे त्यांनी पुढे सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, सर्वसामान्य माणसांना योग्य पद्धतीने सेवा अंमलबजावणीत या कायद्याचा उपयोग करुन अधिकाधिक पारदर्शक, लोकाभिमुख कारभार करणे ही  प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सेवा हमी कायदा व पथदर्शी प्रकल्प काय आहे हे सांगितले तर आभार करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, निवडलेल्या शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, सरपंच व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...