रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 474

‘सज्जनांची सक्रियता राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक’… हे आर्य चाणक्य यांचे विचार आजही उपयुक्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.४: सज्जनांची निष्क्रियता ही राष्ट्र घसरणीला कारणीभूत ठरते. तर, सज्जनांनी सक्रिय होणे हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असते, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शेठ गोकुळदास तेजपाल, नाट्यगृह  येथे चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चाणक्य नाटकाच्या १७१० व्या प्रयोगाला उपस्थिती ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग ही खरोखरच हिमालया एवढी बाब आहे. पस्तीस वर्ष सलगपणे मनोज जोशी हे चाणक्यांची भूमिका करत आहेत. लोकांपर्यंत आर्य चाणक्य यांचे काम ते पोहोचवत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जोशी यांनी नाटक आणि चित्रपटातून दर्जेदार अभिनय केला. चाणक्य नाटकाच्या प्रयोगातून एक प्रकारे त्यांची आराधना त्यांनी केली. एक प्रकारे राष्ट्रीय कार्यच श्री. जोशी यांनी केले. आर्य चाणक्य यांचे विचार आजही मार्गदर्शक. त्यामुळे जोपर्यंत आपल्या पिढ्या  हे विचार अंगिकारत राहील, तोपर्यंत या देशाला, येथील संस्कृती, परंपरेला धोका नाही, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

000

सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

मुंबई, दि. 4: सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ आज दुपारी 4 च्या दरम्यान दोन युवक निष्काळजी व भरधाव वेगाने हुल्लडबाजी (कार रेसिंग) करत वाहने चालविताना आढळून आले आहे. यामधील वाहन क्रमांक एम. एच 12 एफ वाय 7263 या वाहनाचा सागरी किनारा रस्त्याचे भिंतीला धडकून अपघात झाला. या वाहन चालकावर मलबार हिल पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाकडून एम एच 12 एफ वाय 7263 व एम एच 03 एडब्ल्यू 2255 ही वाहने दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दोन्ही वाहन चालकांचे परवाना तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे.

राज्यामध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन-2025 या वर्षात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त विविध विभागांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक शहरांमध्ये, विशेषतः महामार्गावर तरूण मुले बाईक रेसिंग अथवा कार रेसिंग करत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकारे वाहन चालविणे हे मोटार वाहन कायद्याच्या भंग करणारे असून यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात परिवहन विभागाने मोहिम सुरू केली आहे. जर अशा पध्दतीने वाहने चालविणारे आढळून आल्यास अशा व्यक्तींची वाहने जप्त करण्यात येवून अशा वाहनांची भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन नियमानुसारच वाहने सुरक्षितपणे चालवावीत, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त रवि गायकवाड यांनी केले आहे.

000

 

सायबर सुरक्षा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे गृह विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित गव्हर्नन्स, रिस्क व कंम्प्लायन्स करण्यात यावे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता नवीन पदे निर्माण करावी. नक्षलविरोधी उपक्रमांमध्ये नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये नवीन सशस्त्र चौक्या उभारण्याच्या कामाला गती द्यावी तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र कारागृह नियमावलीचे प्रारुप तयार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त सर्व प्रयोग शाळांचे संगणकीकरण करणे सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या पाच प्रयोग शाळांचे संगणकीकरण तसेच प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे प्रकल्पाचे डाटा सेंटर उभारण्यात आले आहे, अशी माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी दिली. यावर अमरावती, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर या प्रयोगशाळांचे संगणकीकरण करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ.पंकज भोयर, गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उपक्रम राबवा; झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर द्या! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 4 : राज्याच्या  ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे महिला व बालविकास विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे महिला व बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महिला व बालविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधून शहरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीच्या योजना राबवाव्यात. महिला व बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रातील शौचालये स्वच्छ ठेवणे, त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, नागरी बाल विकास केंद्र तातडीने सुरू करण्यावर भर द्यावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरील पुस्तकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या “द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

 

000

राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.4 : राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी  ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अद्यावत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी  नियोजन करा. औद्योगिक आस्थापनांचा सहयोग वृध्दिंगत करण्यात येणार आहे. स्टार्टअप सहाय्य योजनेतून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात येणार असल्याचे, श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता  आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

 

0000

 

नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.4 – राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, राज्य मंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.

नगरविकास विभाग(एक)चे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणे, शहरां जवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणे, राज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविणे, इमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणे, पर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र यासाठी निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, अशा सूचना दिल्या.

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल का, तसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सोलापूर स्मार्ट सिटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. यामुळे सोलापूरवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

000

 

सर्व मेट्रोची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ४ : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा;  या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होते.

यावेळी श्री फडणवीस म्हणाले, अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेत, याचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून ५० किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, याबाबत नियोजन करा. यावर्षी किमान २३ किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-३ मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभाग (१) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी,  मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे  अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार , अश्विन मुदगल, महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

000000

धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलेल अशी पथदर्शी कामे करण्याचा संकल्प : पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 4 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा, मध्य व पश्चिम रेल्वेला जोडणारे रेल्वे मार्ग, शैक्षणिक हब, औद्योगिक वसाहतीत उद्योगांसाठी जागा व त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, सिंचनाचे प्रकल्प यांना येत्या काळात अधिक गती देऊन सर्वांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याचा चेहरा बदलेल. अशी पथदर्शी कामे उभी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नविन नियोजन सभागृहात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, ॲड. गोवाल पाडवी, आमदार काशिराम पावरा, मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, परिविक्षाधिन अधिकारी सर्वांनंद डी, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या सहाकार्याने धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने नेण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या फ्लॅगशिप योजनांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विकास कामांना गती देण्याची गरज आहे. सुलवाडे जामफळ उपसा जलसिंचन योजना, मनमाड-धुळे-इंदौर रेल्वे मार्ग, प्रस्तावित बोरविहीर (धुळे) ते नरडाणा रेल्वे मार्गाचे कामे सुरु आहे. त्यासाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या जमिनधारकांना भूसंपादन अधिनियमानुसार मोबदला अदा करण्यात करण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय महामार्गाच्या प्रस्तावित कामांना गती द्यावी. रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी आपआपसात समन्वय साधावा. स्थानिक लोकप्रतिनिधीसोबत विकासकामांविषयी वेळोवेळी चर्चा करावी. राष्ट्रीय महामार्गाची कामे करतांना ती दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रोसेंसिंग युनिट उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. सोयाबीन खरेदीसाठी येणाऱ्या नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची गुणवत्ता तपासून मालाच्या दर्जानुसार दर द्यावा. शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, प्रधानमंत्री सौर कुसूम योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुर सौरपंप वितरीत करावे. शहरातील वीजचोरी होणाऱ्या ठिकाणी धडक कारवाई करावी. कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना गती द्यावी. महिला व बाल विकास भवनाच्या इमारतीसाठी नविन जागेची निश्चिती करावी. येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करुन धुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील प्रश्न व अडचणी मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या.

यावेळी मनमाड-इंन्दौर, बोरविहीर-नरडाणा रेल्वे भूसंपादन, सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पणन विभाग, राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत  सुरु असलेल्या विकास कामांची तसेच विभागाच्या प्रमुख योजनांची सद्यस्थितीची माहिती मंत्री महोदयांना जाणून घेतली.

११ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद, धुळे येथील आवारात 11 नविन रुग्णवाहिकांचे लोकार्पण संपन्न झाले. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना राज्यस्तरावरुन या 11 नविन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्या विखरण, आर्वी, धमाणे, निमगुळ, वालखेडा, बोरीस, कळंबीर, मालपुर, शिरसोला, कुसूंबा या प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक तर जिल्हा रुग्णालयास एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री रावल म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत गेल्या 5 वर्षांच्या काळात खुप चांगले विकासाची कामे झाली आहे. राज्य शासनामार्फत उपलब्ध झालेल्या 11 रुग्णवाहिका या सामान्य माणुस तसेच गरीबातील गरीब माणसांना एका फोनवर रुग्णसेवेसाठी उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 36 कोटी रुपयांचे नविन 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, 17 उप केंद्र उभारले आहेत. यामाध्यमातून जनतेसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. येत्याकाळात आरोग्य केंन्द्रात पुरेशा डॉक्टारांची व्यवस्था, औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्र्यार्थ्यांना जिल्ह्यातच सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, ॲड.गोवाल पाडवी, आमदार काशिराम पावरा, मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बाल कल्याण सभापती ज्योती बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनिताई कदम, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

धुळे जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी नाही –  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

धुळे, दि. ४ (जिमाका वृत्त) : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे अद्याप शासनाचे निर्देश नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली नाही अथवा त्यांचेवर कारवाई करण्यात आलेली नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

धुळे जिल्हृ्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील महिला भिकुबाई प्रकाश खैरणार यांनी ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स्वत:हून अर्ज करुन जिल्हा प्रशासनास कळविले आहे की, माझ्या अर्जास माझ्या मुलाचे आधारकार्ड जोडले गेल्याने लाभाची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे सदरची रक्कम मी स्वत:हून परत करीत आहे. त्यानुसार या महिलेने स्वत:हून परत केलेली रक्कम प्रशासनाने जमा करुन घेतली असल्याचे श्री. पापळकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या योजनेबाबत कुणाचा अर्ज अथवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्याबाबत शासन नियमानुसार चौकशी करुन निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी म्हटले आहे.

000000

सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार करण्यावर भर – मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, दि.०३:  आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. भेटी दरम्यान त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आरोग्य भवन येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुण्यातील विभागवार आरोग्य सेवांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना रुग्णालयातील स्वच्छता आवश्यक त्या चांगल्या आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.

आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला अधिकारी समवेत भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधेबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा, रुग्णालयातील विविध विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता बाल आरोग्य सेवा, नवजात विशेष काळजी कक्ष, डायलिसीस सेंटर, अस्थिरोग विभाग तसेच विविध सेवा विभाग यांना भेट देऊन आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली.

आरोग्यमंत्री श्री.अबिटकर यांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. महिला व पुरुष कक्ष, आहार कक्ष, पुनर्वसनात्मक सेवा विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयाच्यावतीने विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. प्रादेशिक रुग्णालय बंगलोरच्या निम्हांस रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय साकारण्यात येणार असून याविषयी बांधकाम विभागाने सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

प्रादेशिक मनोरुग्णालय आदर्श कसे करता येईल याविषयी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुणे येथील मलेरिया, कुष्ठरोग, माता व बाल संगोपन, परिवहन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, आरोग्य प्रयोगशाळा, जन्म मृत्यू नोंदणी विभाग, कुटुंब कल्याण, जलजन्य आजार, हत्तीरोग या विभागांच्या कार्याविषयी राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथेही झालेल्या बैठकीत विविध आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

बैठकीला संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्कर,  सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदि उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

0
नाशिक, दि. २७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
शिर्डी, दि. २७ जुलै -  राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे....

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. २७: - रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट  परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या...

‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर फुलणार हसू

0
मुंबई, दि. 27 : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर...

‘ई-लायब्ररी’ चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण: वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

0
अमरावती, दि. २६ (जिमाका): अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज  'स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चे अमरावती ल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना...