मंगळवार, जुलै 29, 2025
Home Blog Page 473

संविधान व कायद्यांबाबत जागरुकतेसाठी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ०६:  लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी दरम्यान केले.

पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी, प्राचार्या सिद्धकला भावसार, सहयोगी प्राध्यापक भानुदास गर्जे आदींसह आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विधी आदी अनेक मुद्यांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थी राहिला पाहिजे. वयाच्या पन्नाशीनंतरही शिकत राहण्याची वृत्ती कायम राहिली पाहिजे. शिकत असताना त्यात्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींसोबत काम केले पाहिजे. त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. आज विधी शाखेचे विद्यार्थी असलेले तुम्ही सर्वजण उद्या यशस्वी वकील बनाल, परंतु वकिल बनण्याआधी आजचे आदर्श विद्यार्थी, उद्याचे आदर्श नागरिक बना, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य अगदी वकिलीच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वत:ला सातत्याने सिद्ध करत रहावे लागते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड अभ्यास, अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते. त्याची तयारी ठेवा. भारतीय संविधान तसेच कायद्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निर्भयपणे, निष्पक्षपणे, निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध विषयांवरच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. या संवादातून राज्याचा लोकनेता, कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक, एका दिलखुलास मित्राचे दर्शन घडले, अशी भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सागर खुरवड, महादेव पाटील, अनुज बसाळे, अमित काकडे, शंतनु दाते, हरिष मिनेकर आदी विद्यार्थी, प्रतिनिधींसोबत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या संवादात सहभाग घेतला.

०००

 

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, दि.०६: स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, नांदणीला लवकरच ‘अ’ तीर्थक्षेत्र दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले याचा आनंद आहे. काल नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे दुसरे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजात व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक आहेत, जे काल नागपुरात भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी भेटले.

यावेळी जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, १० आचार्य महाराज, ७ मुनी महाराज, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर, आमदार सर्वश्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, अमल महडिक, अशोक माने, शिवाजी पाटील, जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित आचार्य विशुद्ध महाराज यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते वस्तुत्व महाकाव्य ग्रंथाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ यांच्यावतीने प्रजागर्क पदवी देण्यात आली. उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच यानिमित्ताने कोल्हापूर येथील दोन हजार वर्षाचा इतिहास असणाऱ्या नांदणी मठात येता आले. या मठात एक वेगळे जीन शासन पाहायला मिळते. आपली जैन तत्त्व ‘जगा आणि जगू द्या’ अशी आहेत. जगामध्ये बरेच विचार आले आणि नष्ट झाले परंतु हे जैन विचार अजूनही त्याच प्रकारे शाश्वत टिकून आहेत. ‘ज्याच्यात शक्ती असेल तो टिकेल’ ही पश्चिमी विचारसारणी आपण न स्वीकारता आपली विचारशैली शाश्वत ठेवली. ‘जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल’ असा आपला विचार आहे. सर्वाधिक समाजसेवा करणारा असा जैन समाज असून समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे.

संपूर्ण जीवसृष्टी वाचवण्याचे विचार जैन विचारात आढळून येतात. समाजाला सशक्त आणि सन्मार्गावर ठेवणे हे मोठे काम आचार्य करतात. तपस्या करून चांगले सुविचार आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. जैन समाजातील आचार्य तीर्थंकार यांनी परंपरा आणि विचार आजही जीवित ठेवले आहेत. हेच संस्कार काल आणि स्थान यांचा विचार करीत नव्या स्वरूपात नव्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवले जातात.

येथील मठाच्या विकासासाठी आवश्यक सुविधाही देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशातील पहिले जैन महामंडळ राज्यात स्थापन केले गेले ते अधिक बळकट करून प्रत्येक युवकाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महामंडळ अधिक बळकट करू. त्यामधील सुधारणांबाबत आलेले विचार समोर ठेवून भविष्यात महामंडळे अधिक मजबूत आणि गतीने काम करण्यासाठी तयार केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नांदणी मठात मिळालेल्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये निश्चितच आम्ही करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नांदणी येथे ७४३ गावांचे अधिपत्य असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन मठ येथे १२ वर्षांनंतर महामस्तिकाभिषेक सोहळ्याचे आयोजन १ ते ९ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.

गरज पडल्यास अलमट्टीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ

स्थानिक आमदार यांनी शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, अलमट्टीबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

०००

पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. ०६: राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटन उपक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी त्याच बरोबर आगामी शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर भर देण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीस पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी गाव ते राज्यस्तरापर्यंत जिथे पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे त्याची प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून माहिती मागवून पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबवावे, नवीन पर्यटन धोरण, पर्यटन संचालनालयाकडे वर्ग करण्यात आलेली कामे, पर्यटन स्थळांची वर्गवारी, प्रसिद्धी उपक्रम, कृषी पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण, कॅरॅव्हॅन धोरण, बीच शॅक धोरण इत्यादी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी ‘पर्यटन धोरण 2024’ ची प्रभावी अंमलबजावणी करणे, विविध पर्यटन धोरण, पर्यटन संचालनालयामार्फत सुरू असलेले उपक्रम, प्रादेशिक पर्यटन विकास आराखडे, केंद्र सरकारच्या मदतीने सुरू असलेले प्रकल्प यांना गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक विभाग व हंगामानुसार विविध महोत्सवांचे नियोजनूपर्वक आयोजन करणे. जिथे पर्यटन वाढू शकते अशा ठिकाण शोधून अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे यावर पर्यटन विभागाने भर द्यावा. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आधारित उपक्रम राबवावा, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वाचन संस्कृती विषयक उपक्रमांना प्रतिसाद

मुंबई,दि. ०६: वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

ग्रंथालय संचालनालयांतर्गत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबईच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत समूह वाचन, ग्रंथप्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा, ग्रंथपरिक्षण व कथन, व्यवसाय मार्गदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा पार पडली.

यावेळी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथालय उपसंचालक श्री.काकड, यंग लेडीज हायस्कूलच्या शिक्षिका उषा वर्मा, सुजाता महाजन, वर्षा शिंदे यांच्यासह विद्यार्थीनी, वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. श्री. गाडेकर यांनी वाचन कार्यशाळेचे उद्घाटन करून वाचनाचे महत्त्व सांगून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. शामकुमार पां. देशमुख, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. वाचन म्हणजे काय, त्याचे फायदे, काय वाचावे? वाचण्याच्या विविध पद्धतीचे सविस्तर विवेचन केले. वाचनाने मनाची ताकद, आकलन क्षमता, वैचारीक पातळी वाढते. वाचनाचे मुलभूत अंग या प्रसंगी विशद करण्यात आले. वाचनाचे चार स्तर असून प्रत्येक स्तरावर आपल्या वैचारीक पातळीत बदल होतो. वाचनाची सवय लावण्यासाठी दररोज आवडीच्या विषयावर किमान 20 मिनिटे वाचन करण्याचे स्वत:ला बंधन घातले पाहिजे, असेही त्यांनी उपस्थित वाचक आणि  विद्यार्थ्यांना  सांगितले.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबईचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी योगेश बिर्जे यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

‘आपलं सरकार’ वेब पोर्टल नव्या स्वरूपात उपलब्ध करा- मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ०६: महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे ‘आपलं सरकार’ (1.0) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करावे. त्याचबरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे ‘ॲप’ तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

 

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूर, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वे, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, आपलं सरकार ही वेबसाईट अपग्रेड करुन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्यात यावी. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतील, तसेच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईट वापरण्याची पद्धत सुलभ असायला हवी, अधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉट सारख्या सुविधांसह  एआय (कृत्रिम बुद्धीमत्तेचा) चा वापर करुन  त्या वेबसाईट वापरण्यास सुलभ बनवाव्यात. तसेच आपलं सरकारचे एक ॲप तयार करुन  सुविधा ॲपवरुन उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा नागरिकांना आपलं सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अन्य राज्यांचा यासंदर्भातील अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाच्या 485 व्यतिरिक्त 285 अधिकच्या नवीन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. यावर महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि महाआयटी कंपनी काम करीत आहे. या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर 770 सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये येईल. या दृष्टीने विभागाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार राज्याचा ‘स्टेट ओन क्लाउड’ तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

आनंददायी शिक्षणाद्वारे राज्याचा लौकिक वाढवा- मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. ०६:  शिक्षणसंस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे. यासाठी संस्था चालकांनी या शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यास पुढे यावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर नामांकित शिक्षण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींच्या चर्चासत्रात मंत्री श्री. भुसे बोलत होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे. देशाची आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षणसंस्था शिक्षण प्रसाराचे काम अविरतपणे करत आहेत. यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. संस्थेत शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्यात संस्थाचालकांची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा कृतिवर अधिक भर असल्याने  शिक्षण संस्थेच्या चांगल्या कामास, उपक्रमास सहकार्य केले जाईल. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ, संस्थाचालक यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन शिक्षण विभागाचे काम समन्वयाने पुढे नेऊया. शिक्षण संस्थांच्या  मागण्याबाबत शालेय शिक्षण विभाग नेहमीच सकारात्मक आहे.

चर्चासत्रात संस्थाचालक व संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, ११ वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे यासंदर्भातील मुद्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

चर्चासत्रास आमदार  ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, महेश पालकर, बालभारतीचे के.बी. पाटील आणि शिक्षण संस्था चालक व शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

एन.डी. स्टुडिओसाठी व्यावसायिक कृती आराखडा तयार करा – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुबंई, दि. ०६ : एन.डी. स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

एन.डी. स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह फिल्मसिटी  तसेच एन.डी. स्टुडिओचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. शेलार म्हणाले की, मराठी निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ  यांना सहाय्यक  ठरतील अशा पूरक सुविधा उपलब्ध करुन देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाची आहे. त्यादृष्टीने एन.डी. स्टुडिओचे अद्ययावतीकरण हे भविष्यातील मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन करण्यात यावे. याच्या परिपूर्ण आराखडा निर्मितीसाठी तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करण्यावर भर देताना त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे. तसेच या स्टुडीओत उपलब्ध रिकाम्या जागेचा अधिक योग्य वापर करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करावे. या ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रामुख्याने मराठी सिरियल्स, सिनेमा, वेब सिरीज ओटीटी माध्यमात काम करणाऱ्या निर्माते, कलाकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना मंत्री श्री. शेलार यांनी दिल्या.

०००

वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

नवी दिल्ली, ६  : महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या  मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

००००

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३१ जानेवारी पर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३१ जानेवारी,  २०२५ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे,

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते, आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती , मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास mumbaicity.employment@gmail.com  या ईमेलवर संपर्क करावा. ३१ डिसेंबर, २०२४ च्या तिमाही अखेर हजेरी पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाही, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांची मुलाखत

मुंबई, दि. : रस्त्यांवरील अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा’ मोहीम राबविण्यात येते. यासाठी परिवहन व महामार्ग सुरक्षा विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. नागरिकांनी रस्तासुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांची मुलाखत मंगळवार दि. ७, बुधवार दि. ८, गुरूवार दि. ९ आणि शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण मोठे आहे. ही बाब विचारात घेवून केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेच्या माध्यमातून रस्ते वाहतूक व महामार्ग रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी स्पीडगनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे, हेल्मेटचा वापर करणे तसेच वाहतूक नियमावलीचे पालन करणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेची राज्यात करण्यात येणारी अंमलबजावणी याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांनी माहिती दिली आहे.

०००

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

0
पुणे, दि.२८: लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित

0
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा...

नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८ :  नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून 'ग्रँड मास्टर' हा  किताब मिळविला आहे,...

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू – क्रीडा...

0
पुणे, दि.२८: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल...

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे...

0
पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आदींच्या अनुषंगाने...