बुधवार, जुलै 30, 2025
Home Blog Page 471

कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि. ८ : पाणी पुरवठा व  स्वच्छता विभागाच्या योजनांतर्गत  मंजूर विविध कामांची विहीत कालमर्यादेत  पूर्तता न करणाऱ्या  कंत्राटद्वारांवर  नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले.

मंत्रालयात आयोजित ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कामांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस विभागाचे  सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशन अभियानाचे संचालक ई. रविंद्रन यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, असे सूचित करून त्यांनी विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे कामात दिरंगाई करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचित केले.  त्याचप्रमाणे कामांची वेळोवेळी पाहणी करुन त्याबाबतचा अद्यावत क्षेत्रीय पाहणी आणि आर्थिक प्रगती अहवाल ठेवावा. कामांची पाहणी करून त्यानतंरच प्रमाणिकरण द्यावे. तसेच पूर्ण झालेल्या योजना हस्तांतरित करुन योजना अंमलबजावणीच्या कामांची टप्पे निहाय जबाबदारी निश्चित करण्यात यावी.  योजनांची अमंलबजावणी दर्जेदाररित्या वेळेत पूर्ण  होण्याच्या दृष्टीने यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्यास्तरावर कटाक्षाने लक्ष देऊन तालुका निहाय आढावा घ्यावा,असे सूचित केले.

बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत  कार्यान्वीत घरगुती नळ जोडणी सद्यस्थिती, हर घर जल प्रमाणीकरण, आर्थिक खर्चाची सद्यस्थिती, योजना पूर्ण व हस्तांतरण सद्यस्थिती, प्रलंबित योजनांची माहिती, स्वच्छ भारत मिशन, (ग्रा.) 2.0 या योजनेच्या अंतर्गत विविध कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

वंदना थोरात/विसंअ/

पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करावी – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. ८ : राज्यात पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करून देशी व परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी बैठक झाली. यावेळी बैठकीला पर्यटन विभागाचे सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्यातील गड – किल्ले पर्यटन वाढीसाठी  पुरातत्व विभागाच्या सहकार्याने आवश्यक त्या सुविधांसह बळकटीकरण करून गड – किल्ले यांची माहिती जागतिक पातळीवर पोहचवा.पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करावी.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील प्रत्येक विभाग व हंगामानुसार विविध महोत्सवांचे नियोजनूपर्वक आयोजन करणे, जिथे पर्यटन वाढू शकते अशा ठिकाण शोधून अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे यावर पर्यटन विभागाने भर द्यावा.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सुरू असलेल्या उपक्रमांना गती द्यावी. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आधारित पर्यटन उपक्रम राबवावे, असेही ते म्हणाले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्धार – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जळगाव दि. ८ जानेवारी (जिमाका ) : उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा दीक्षान्त समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.एम.जगदीश कुमार, कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत आपण परिवर्तनाच्या युगाला प्रारंभ केला आहे. उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे सद्याचे प्रमाण २८.४ % असून सन २०३५ पर्यंत हे प्रमाण ५०% पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी, समाज आणि उद्योगांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे लागतील. आजच्या डिजीटल युगात ऑनलाईन शिक्षण हे एक महत्वाचे साधन बनले आहे. शिक्षक हा प्रतिभावान आणि चारित्र्यवान पिढी निर्माण करीत असतो. एक चांगला शिक्षक केवळ माहितीच देत नाही तर नवनिर्मिती, सृजनशिलता आणि संशोधनाचा मानसिकतेला प्रेरणा देत असतो. शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रूजवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे ग्रामीण व आदिवासी भागात असूनही उत्तम प्रतीचे उच्च शिक्षण देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठातील चार वर्षीय ऑनर्स डिग्री प्रोग्रॉम, ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॉम तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काही पुस्तकांचे मराठीत केलेले भाषांतर, विद्यापीठातील इनोव्हेशन – इन्क्युबेशन केंद्रामार्फत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कौतुक केले.

पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करा, पालक, शिक्षक यांचे योगदान विसरू नका. या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले असून बहिणाबाईंचा वारसा पुढे नेण्यात विद्यार्थिनींचा सहभाग सुवर्णपदकातील संख्या बघता अधिक दिसून येतो, ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी आपल्या दीक्षांत भाषणात भारताला सन २०४७ पर्यंत विकसित देश बनविण्यासाठी पदवीधरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असून आर्थिक कारणांमुळे शिक्षणात बाधा येवू नये यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समानता तसेच सांस्कृतिक वारसा याबद्दल मांडलेल्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून हे शैक्षणिक धोरण राबविले जात आहे. भारतीय भाषा व भारतीय ज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून कौशल्याधारीत शिक्षण देण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे असे प्रा. जगदीश कुमार म्हणाले. सन २०४७ पर्यंत भारताला महासत्ता करण्यासाठी एकत्रित काम करावे, भारतीय असल्याचा अभिमान बाळगा, आपल्यातील क्षमतांचा शोध घ्या आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य ओळखा असे आवाहन पदवीधरांना उद्देशून त्यांनी केले.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करताना गेल्या वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वाटचाल याबद्दल माहिती दिली. यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील होते. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत यावेळी सादर झाले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. अधिष्ठाता प्राचार्य एस.आर. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्रा. अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ.जगदीश पाटील यांनी मानव विज्ञान विद्याशाखा, आणि डॉ. साहेबराव भुकन यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.

मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्रा.म.सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, ॲड.अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. कपील सिंघेल, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

या समारंभात दहा विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती यांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात आलेत. त्यानंतर कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्रा. जगदीश कुमार यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख व डॉ. विना महाजन यांनी केले.

या समारंभासाठी एकुण २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १०५५६ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४१२८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ५२७३ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २५५७ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३६६, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १३२८, प्रताप महाविद्यालयाचे ७५९, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७९३ व आर.सी.पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन रिसर्च १४८ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली. गुणवत्ता यादीतील ११९ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले. यामध्ये ८७ विद्यार्थिनी व ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. या समारंभात १६४ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.

मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

दीक्षांत समारंभ सुरु होण्यापूर्वी सकाळी विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत नव्याने बांधकाम केलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.

यावेळी कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एम. जगदीश कुमार यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच विद्यापीठ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठास रुसा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून २११ विद्यार्थिनी क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्र.४ चे बांधकाम करण्यात आले आहे. या वसतिगृहाच्या बांधकामाकरीता ८ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाला असून रुसा अंतर्गत ५ कोटी ७० लाख रुपये निधी प्राप्त झाला तर उर्वरित रक्कम विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून खर्च करण्यात आलेली आहे.

0000000

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्वाचा विभाग आहे. महसूल वाढविण्यासाठी विभागाने नवनवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थित होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या विभागातील सेवा हमी कायद्यांतर्गत सुचित केलेल्या १३४ सेवा पैकी ६२ सेवा कार्यान्वित असून उर्वरित ७२ सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्यात यावा. मद्यार्क वाहतूक करणाऱ्या वाहनावर डिजिटल लॉक बसविण्याची कार्यवाही करावी. तसेच गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार,  मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई-मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामीत्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोनद्वारे जीआयएस सर्वेक्षण व गावठाण भूमापन करण्यात येणार आहे. पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहेत.

जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी सुलभ वाळू धोरण आणण्यात येईल. लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. रेडी रेकनरचे दर पीडीएफ स्वरुपात राहते मात्र हे दर आता गाव निहाय, प्लॉट निहाय मिळविता येणार आहे. वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठी अधिमूल्य व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम बनविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. महसूल विभागातील चार कॅडरची संपूर्ण माहिती पोर्टलवर आणण्यात येणार असून महसूल अधिकाऱ्यांसाठी मॅन्युअल तयार करण्यात येणार आहे. केंद्राच्या ‘अभिनव पहल’ या पोर्टलमध्ये राज्यातील अधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रॅक्टिस टाकण्यात येत आहे. नवीन जिल्हा करताना प्रशासकीय यंत्रणा यापूर्वीच तयार करावी. संपूर्ण यंत्रणेला अतिरिक्त स्वरूपात तयार करून ठेवावे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

‘आपले सरकार’ सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलद्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना आज दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित राज्य सेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  सांगितले की, गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या आपले सरकार सेवा पोर्टल द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. या पार्श्वभूमीवर या पोर्टलवरील ऑनलाईन सेवांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. तसेच अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्याचे ही निर्देश यावेळी संबंधितांना  दिले.

राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य  सेवा हक्क आयोगाच्या कार्यपद्धती बाबत तसेच भविष्यकालीन योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

बैठकीस, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार , वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी , राज्यातील सर्व राज्य सेवा हक्क आयुक्त आणि संबंधित उपस्थित होते.

0000

वंदना थोरात/विसंअ/

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसात मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखडा बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये महाराष्ट्राने नेतृत्व करावे. या अभियानात क्षय रुग्ण शोधून त्यांच्यावरती उपचार करण्यात यावे. स्तन व गर्भाशय कर्करोग निदान करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. रुग्णवाहिका व्यवस्थेमध्ये 108 रुग्णवाहिका महत्वाची आहे. रुग्णवाहिका खरेदीच्या न्यायालयीन प्रकरणी महाधिवक्ता यांचा सल्ला घेवून प्रकरण तातडीने निकाली काढावे.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, बॉम्बे नर्सिंग कायद्यात सुधारणा करून उपचाराचे दर निश्चित करण्याचा मानस आहे. राज्यातील खाजगी प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी कायदा करून विभागाचा आकृतीबंध निश्चित करण्याचे नियोजन आहे. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे अहवाल वेळेत उपलब्ध होत नसल्याबाबत चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई  करण्यात येणार आहे.

बैठकीस अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव विरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक उपस्थित होते.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्याव्यात; औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्ययावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे  वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली, या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी  झिरवाळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय  शिक्षण विभागाअंतर्गत रक्तदान मोहीम, अवयव दान, स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जनजागृती आणि उपचार, मिशन थायरॉईड, अंधत्व  प्रतिबंधात्मक उपाय योजना, मिशन मौखिक आरोग्य मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करणे, वैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागात  ऍलोपॅथी  औषध निर्माते, रक्तपेढ्या, शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी,फूड टेस्टिंगसाठी लॅबोरेटरी सुरू केली आहे तेथील कामकाज सुरू करणे या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा,अन्न व औषध अंतर्गत नोंदणी व परवाने तपासणी,मंदिर व देवस्थाने येथील प्रसाद गुणवत्ता तपासणी ही कामे प्राधान्याने करा.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,राज्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी निगडित सेवा अधिक सुलभ होण्यासाठी भर  देण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी वेगवेगळे प्रशिक्षण व उपक्रम राबवा. विभागांतर्गत परीक्षा, नियुक्ता वेळेत देणे, बदल्या, गोपनीय अहवाल, स्थायित्व लाभ, सेवानिवृत्ती प्रकरणाबाबतची कार्यपद्धती सुलभता आणणे, वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि पदोन्नतीचा मानीव दिनांक देणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावी. भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन सायबर सुरक्षितता, सांख्यिकीय माहिती गोळा करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना द्या असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.

***

संध्या गरवारे/विसंअ/

भुसावळ रेल्वेनी निर्माण केलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जळगाव दि. 8 ( जिमाका ) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक निर्माण केल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडतील तसेच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ हे रेल्वेच्या डब्यात उभं केलेलं रुग्णालय ही अभिनव संकल्पना असून यामुळे सर्व सामान्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

आज भुसावळ रेल्वे विभागाच्या ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ आणि भुसावळ रेल्वे ग्राउंडवरील ‘नवीन सिंथेटिक ट्रॅक’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक श्यामसुंदर गुप्ता, भुसावळ मंडळ विभागीय व्यवस्थापक ईटी पांडे उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भुसावळसाठी अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक ही सुविधा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सुविधा आपल्या खेळाडूंना आणि क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणात सराव करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करून जागतिक स्तरावर स्पर्धा करणे खर्चीक आहे, कारण क्रीडा साहित्य, प्रशिक्षण आणि प्रवास यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. नवीन निर्माण झालेली ही सुविधा या समस्यांवर काही प्रमाणात तोडगा काढेल आणि भुसावळला क्रीडा उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यास मदत करेल, असे प्रतिपादन राज्यपालांनी यांनी केले.

भारतीय रेल्वेच्या खेळाडू घडविण्याच्या परंपरेचा केला गौरव

भारतीय रेल्वेला देशासाठी उत्कृष्ट क्रीडापटू घडविण्याचा अभिमानास्पद वारसा आहे. अनेक महान खेळाडू रेल्वेमधून पुढे आले आहेत आणि रेल्वेने आश्वासक क्रीडापटूंना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, ती परंपरा इथेही निर्माण होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

‘हॉस्पिटल ऑन व्हील’ संकल्पनेचे केले कौतुक

भुसावळ रेल्वे विभागाकडून हॉस्पिटल ऑन व्हील ही क्रांतिकारक योजना सुरु झाली ती अत्यंत अभिनव संकल्पना असून जुन्या रेल्वे डब्यांचा वापर करून हॉस्पिटल तयार करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून यामुळे जुन्या डब्यांचा पुनर्वापर होऊन दुर्गम भागांतील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवता येणार असल्याचे सांगून या संकल्पनेचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कौतुक केले.

रेल्वे ट्रॅकची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला गौरव

सुनील शंकरम, एसएसई पथवे, बुरहानपूर दक्षिण, अनिल कुमार, एसएसई पथवे, बोदवड, छबिनाथ फौजदार, एसएसई पथवे, चाळीसगाव उत्तर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव झाला. त्या विषयी बोलताना राज्यपाल म्हणाले, भुसावळ विभागाने रेल्वेतील अनाम नायक – ट्रॅक देखभाल करणारे, म्हणजेच ‘की-मेन’ यांच्यावर काढलेले कॉफी टेबल बुक आणि त्यांचा माझ्या हस्ते केलेला सन्मान ही बाब मला खुप आनंद देणारी वाटली.त्यांचे मूक पण महत्त्वाचे कार्य कठीण परिस्थितीतही रेल्वे गाड्यांची सुरक्षितता आणि सुचारू संचालन सुनिश्चित करते. त्यांच्या मेहनतीमुळे अपघात टळतात आणि असंख्य जीव वाचतात. त्यांचा आजचा सन्मान त्यांच्या मौल्यवान योगदानाची योग्य पावती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

आमचं लहानपण ज्या ग्राउंडवर गेले आहे, त्याचे हे पालटलेले रूप पाहुन आनंद झाल्याची भावना वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बोलून दाखविली. तसेच या ग्राउंडवर एकेकाळी देशभरातील फुटबॉल, हॉकीचे खेळाडू येथे येत होते. इथे रणजी क्रिकेट सामनाही खेळला गेल्याचे स्मरण करून पुन्हा ते वैभव या मैदानाला प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि रेल्वे कडून होत असलेल्या या कार्याबद्दल कौतुक केले.

यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक श्यामसुंदर गुप्ता,आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक ईटी पांडे यांनी रेल्वे कडून होत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन राज्यपालांनी ‘मशाल’ पेटवून ‘ज्योती’ प्रज्वलित करून केले. ही मशाल रेल्वे शाळेतील बालक्रीडापटूंनी ट्रॅकवर फिरवत नेली, ज्यामुळे क्रीडांगणाचा उज्ज्वल भविष्यकाळ प्रतीत झाला. यावेळी धावणे आणि रिले रेस स्पर्धाही घेण्यात आली.

प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 8 :- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाकडे वाटचाल करणे ही आपल्या राज्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी युवा पिढीने योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावी, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पी. पी. टी. चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघातील युवकांशी सह्याद्री अतिथीगृहात क्रीडामंत्री श्री. भरणे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या उत्स्फूर्त शैलीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले की, दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना राष्ट्रीय स्तरावरील संस्मरणीय असा अनुभव मिळणार आहे. खरंतर आपल्या युवकांचे उज्ज्वल भविष्य हेच आपल्या देशाचे आणि राज्याचे भविष्य आहे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपणच राष्ट्राची खरी शक्ती आहात. युवा पिढी सक्षम होण्यासाठी, युवकांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले की, पी. पी. टी. चॅलेंज स्पर्धेमध्ये दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. मिळालेल्या या संधीचे आपण सोनं करावे. युवा पिढीचा देशाच्या प्रगतीत सहभाग वाढावा या उदात्त हेतूने असे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी आपली निवड झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे स्पष्ट करत सर्वांना या पुढच्या काळात लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसचिव मंगेश शिंदे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे उपस्थित होते.

000000

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई दि. ३०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसास मोफत मालकी तत्वावर सदनिका प्रदान...

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू – मंत्री मंगलप्रभात लोढा

0
मुंबई, दि. ३०: केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता...

राजधानीत अखिल भारतीय शिक्षा समागम – २०२५

0
नवी दिल्ली, 29 : भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात मोलाचा बदल ठरलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला पाच वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने 'अखिल भारतीय शिक्षा...

भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

0
मुंबई, दि. २९ : भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थान येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य...

अटी, शर्तीचा भंग झाल्यास कार्यवाहीचा अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. 29 : मूळ भाडेपट्टा करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित संस्थेकडून दंडाची रक्कम निश्चित करून त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल तातडीने सादर...