रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 456

विश्व मराठी संमेलनात प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. २२ – मराठी भाषा विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात मराठी ही या विश्व मराठी संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून त्याअनुषंगाने या कालावधीत विविध भाषा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्था यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध प्रकाशन संस्था, ग्रंथविक्रेते तसेच मराठी भाषा आणि संस्कृती यासंबंधी वेगवेगळे उपक्रम करणाऱ्या संस्था यांना त्यांची पुस्तके/उत्पादने यांच्या प्रदर्शन/विक्री करिता दालने उपलब्ध करून देण्यात येतील.

या विश्व मराठी संमेलनात ग्रंथ/पुस्तके/उत्पादने यांच्या प्रदर्शन/विक्रीकरिता सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दि.२५ जानेवारी पर्यंत अर्ज project3.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावे. काही ग्रंथ दालने शासकीय विभागांसाठी राखीव असतील. दालनांचे वितरण / वाटप अधिकार दालन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

तरी इच्छुक प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्था यांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपला सहभाग नोंदवावा. प्रदर्शनास उपस्थित राहणाऱ्या दोन प्रतिनिधींच्या आधार कार्डची छायाप्रत, आपल्या प्रकाशनाचे नाव, इ-पत्ता, संपर्क क्रमांकासहीत project3.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या श्रीमती सुरेखा कांबळे-साळवे संपर्क क्र. ८२९१७९५४८५ श्री. निलेश यादव संपर्क क्र ७७१०८९९७०४ यांच्याशी संपर्क साधावा, असे राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

 

विकासकामे पूर्ण वेगाने पुढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक

गडचिरोली, (जिमाका) दि.22 : राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेताना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कोणतीही विकास कामे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व विकासकामांमध्ये अडथळे येत असल्यास आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते.

 श्रीमती सौनिक यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाज जलद गतीने पार पाडण्याचे सूचना देतांनाच गडचिरोलीला डिजिटल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे सांगितले. त्यांनी शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल बसवून ऊर्जा बचत करण्याच्या सूचना दिल्या. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक पीक पद्धतीऐवजी द्विपीक किंवा बहुपीक पद्धती अंगीकारण्याचे व फळझाड लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक आयटीआयमधील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याचे व त्यात किमान 30 टक्के महिलांना रोजगाराची हमी दिली जाईल, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेसा कायद्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कायद्यात सुधारणेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

स्थानिक स्तरावर ज्या अडचणी सुटू शकत नाही त्याची यादी माझ्याकडे पाठवावी मी त्या सोडविण्यासाठी 100 टक्के प्राधाण्य देईल याबाबत त्यांनी आश्वस्त केले, यासोबतच विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली.

मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी गोंडवाना विद्यापीठातील सीआयआयआयटी प्रशिक्षण केंद्र व एकल सेंटरलाही भेट देवून पाहणी केली. डिजिटल कारपेंट्री युनिट व ई-बायसिकल उत्पादन युनिटची उभारणी करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

0000

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात २२५ पदभरती

मुंबई,दि.२२ : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज सादर करावयाचा कालावधी

दिनांक २१ जानेवारी, २०२५ रोजी १४.०० ते दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची दिनांक  १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचे  दिनांक १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी

०००००००

राजू धोत्रे/विसंअ

महामार्गांवर महिला प्रवाशांसाठी प्राधान्याने सुविधायुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, दि. 22 : राज्यभरात विविध महामार्गांवरुन लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यामध्ये प्राधान्याने  महिला  प्रवाशांसाठी  सुविधायुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था उपलब्ध करुन देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह  भोसले यांनी दिल्या.

महामार्गांवरील महिला प्रसाधनगृहांच्या सुविधांबाबत मंत्रालय येथे आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणाले, महिला प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महामार्गांवरील पेट्रोलपंपांच्या शेजारी, टोल नाक्याजवळ किंवा इतर सुयोग्य ठिकाणी सुविधांयुक्त प्रसाधन गृहांची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य द्यावे. तसेच 25 किमीच्या रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावांमध्येच या बाबींचा समावेश करावा. सर्व स्वच्छतागृहांची रचना एकसारखी  ठेवावी.  त्याचप्रमाणे प्रसाधनगृहांच्या येथे कटाक्षाने स्वच्छता राखण्यात यावी. आवश्यक प्रमाणात लाईटची व्यवस्था ठेवली जावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रसाधन गृहांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रसाधन गृहांची व्यवस्थापन यंत्रणा महिला बाल विकास विभागाच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात यावी. स्थानिक महिला बचतगटांना व्यवस्थापनाचे काम सोपवण्यात यावे, जेणेकरुन नियमितपणे प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्याचे काम नियंत्रित केले जाईल, असे श्री. शिवेंद्रसिंह भोसले यांनी सूचित केले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बाल विकास विभागाकडून महिला बचतगटांना या कामात सहभागी करुन घेता येईल, असे सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ/

भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ

नवी दिल्ली, दि. 22: लाल किल्ला परिसरात भारत पर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार असून या महोत्सवास महाराष्ट्र राज्याचा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.

दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त केले जाते.  यावर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह बारा राज्यातील चित्ररथ ही इथे असणार आहेत. दिनांक 26 ते 29 जानेवारी दरम्यान भारतपर्व महोत्सव चालेल.

हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात असून, यावर्षी चित्ररथांसाठी   ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे.  या संकल्पनेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याने ‘मधाचे गाव’ असा चित्ररथ तयार केला.

मधमाशांचे पर्यावरणाच्या आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर पर्यटन व पर्यावरण यासाठीही ही योजना महत्त्वाची आहे.

असा असेल मधाचे गावचित्ररथ

चित्ररथाच्या पुढच्या भागात फुलांनी सजवेलेली मधमाशीचे आकर्षक शिल्प बसवले आहे.  या मधमाशीभोवती लहान मधमाशा आणि काही फुले दाखवली आहेत. भव्य मधमाशीच्या पंखांची हालचाल दाखवण्यात आली असून लहान मधमाशा हवेत उडताना दिसतील.

चित्ररथाच्या मागील भागात एक विशाल मधमाशाचे पोळ चित्रित करण्यात आले आहेत.  नैसर्गिकरित्या असणा-या मधुमाशींच्या पोळची अचूक प्रतिकृती बनविली आहे. मधमाशा त्यांच्याभोवती फिरताना दिसतात. मध उत्पादनाचे टप्पे मोठ्या मधाच्या पोळ जवळ दाखवले आहेत. मध व्यवसायातील महत्त्वपूर्ण उप-उत्पादने देखील दर्शविली आहेत. फुलांच्या परागीकरणातून रस शोषुन घेणाऱ्या मधमाशी प्रतिकृती दर्शविण्यात आली आहे. मध निर्मितीच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया दर्शविण्यात आले आहेत. मधमाशीपालनात वापरल्या जाणाऱ्या खोक्यांवर मधाचे गाव योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावांची नावे लिहिली आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून हा चित्ररथ तयार झाल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

000000000000

पुणे महानगरपालिकेत थकित मालमत्ता करावरील शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करावा – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. २२ : पुणे शहर महानगरपालिकेमध्ये नवीन ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मनपाअंतर्गत थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

मंत्रालयात पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध विषयांबाबत बैठक राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, एस गोविंदराज, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, नगररचनाकार प्रतिभा भदाणे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, मालमत्ता कराच्या थकबाकीची वसूली करताना निवासी आणि व्यावसायिक असे वर्गीकरण करण्यात यावे. थकीत कर प्रलंबित राहिल्यास त्यावर दंडाची रक्कम वाढते. त्यामुळे मालमत्ताधारकांना अधिकचा बोझा बसेल. पुणे शहरात लष्करी छावणीचा भाग आहे. या भागाचा पुणे महानगरपालिका क्षेत्रात सहभाग करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. लष्करी छावणीचा महानगरपालिकेत समावेश झाल्यास तेथील मनुष्यबळाचा उपयोग होईल. तसेच सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत एकत्रित मानधनावर 168 सेवक कार्यरत आहेत. या सेवकांना सामावून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सफाई कामगार वारसा हक्क भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली असून याबाबत सामाजिक न्याय विभागाशी चर्चा करून शासन निर्णय काढण्यात यावा. पुणे शहरातील वृक्षांची संख्या, आवश्यक वृक्ष संख्या याबाबत पुणे शहरात वृक्ष गणना करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

पुणे मनपा व पीएमआरडीएने बांधकाम परवानगी देताना बांधकाम शुल्कातील 50 टक्के  हिस्सा संबंधित यंत्रणेला त्याचवेळी मिळण्यासाठी ऑनलाईन पेयमेंट व्यवस्थेत बदल करावा. हिलटॉप आणि हिलस्लोप जमिनींच्या आरक्षणाबाबत समिती करण्यात यावी. यामध्ये प्रकरणनिहाय आढावा घेण्यात यावा. पुणे शहरातील प्रकल्प बाधीत नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पग्रस्त नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. हिल टॉप, हील स्लोप आणि बी. डी. पी बाबत निर्णय घेण्यात यावा. पर्वती टेकडी लगतची झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सर्वंकश योजना करण्यात यावी. या भागातील हेरीटेजची अट शिथील करून इमारत उंचीवरील मर्यादा हटविण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे येथील स्मारकाचा आराखडा तातडीने पाठवावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 22 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी होत असलेल्या त्यांच्या स्मारकाचे काम लवकर सुरू होण्यासाठी  सामाजिक न्याय  विभागाने स्मारक आराखडा  तातडीने पाठवावा.  हा आराखडा तयार करताना  टप्पा एकमधील कामे व टप्पा दोनमध्ये  घेण्यात येणारी कामे  असा आराखडा  तयार करावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे, ता. मंडणगड,  जि. रत्नागिरी येथील स्मारक कामासंदर्भात बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी खासदार अमर साबळे, प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, उपसचिव अजित देशमुख, सह सचिव श्री. बागुल, अवर सचिव श्रीमती देशमुख यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते. तर कोकण विभागीय आयुक्त  व रत्नागिरीचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले,  स्मारकासाठी खासगी जागा भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी. भूसंपादन आणि स्मारकाच्या संपूर्ण कामासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव द्यावा. स्मारकाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करावीत. स्मारक जागेमध्ये येणाऱ्या खासगी घरांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा प्रस्तावाच्या आराखड्यात समावेश करावा, अशा सूचनाही  श्री. बावनकुळे यांनी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त

मुंबई, दि. २२:- जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली.

दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणासुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीकची रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी; प्रवाशांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दु:ख व्यक्त

मुंबई, दि. 22 :- जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे परधाडे रेल्वे स्टेशननजीक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहचले असून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदतकार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत.  जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील परधाडे जवळ रेल्वेचा भीषण अपघात, जिल्हा प्रशासन सक्रीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

जळगाव दि. 22 ( जिमाका ) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य सुरू आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. गंभीर जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच पाचोरा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पालकमंत्र्याकडून घटनास्थळीचा आढावा

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले, “मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.”

घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चा देखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकार व रेल्वे विभागाच्या संपर्कात

जिल्हा प्रशासन घटनेच्या अनुषंगाने रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मदतकार्य जलदगतीने सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....