शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 457

केईएम रुग्णालय मुंबईकरांचे आधारवड; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 22 : रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतो, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात व्यक्त केली.

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, केईएमने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

सेवाभाव हा परमभाव आहे, असे आपली संस्कृती सांगते. डॉक्टर देखील वैद्यकीय क्षेत्रात येताना सेवाधर्माची शपथ घेतात. ही शपथ घेऊनच ९९ वर्षांपूर्वी हे हॉस्पिटल उभे राहिले. आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांना आधार देत उभे आहे, असेही श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो. आपुलकी असते, तशीच भावना केईएम बद्दल आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेनं सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. आज केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. सांस्कृतिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएमने धरलीये. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

केईएम सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत.  अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली.जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे असे उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येते ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचे कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी काढले.

भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात १९६८ मध्ये झाली. त्यानंतर २०२४ रोजी यशस्वी हार्ट ट्रान्सप्लाण्ट येथे करण्यात आले. अवयवदानामध्ये वाखाणण्यासारखे कार्य केल्याबद्दल केईएम रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबीही केईएम रुग्णालयात १९८७ साली डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया करण्यात येतात. वैद्यकीय क्षेत्रात केईएमने केलेली ही क्रांती ऐतिहासिक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केईएमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्याहस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनीकचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत.त्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे शासनाच्यावतीने आभार मानतो. केईएमचे शताब्दी महोत्सव वर्षे पुढील पिढीसाठी खुप काही देण्यासाठी पायाभरणीचे ठरेल, यात तीळमात्र शंका नाही, असेही ते म्हणाले.

रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी त्याचबरोबर रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करतानाच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

००००

 

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार ६,२५,४५७ कोटींवर

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केले निमंत्रित, टाटा समूह ३०,००० कोटी गुंतवणूक करणार

दावोस, दि. २२ : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. याबरोबरच रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांचीही त्यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५,००० मेवॉ पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच श्री. शर्मा यांनी केले.

मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

0000

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी
  • बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल?
  • नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार
  • ९२,२३५ रोजगार निर्मिती

दावोस, 21 जानेवारी : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उद‌्घाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितल्याचे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था

यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…

(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)
आतापर्यंत झालेले सामंजस्य करार
एकूण : 4,99,321 कोटींचे

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे

16) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : 17,500 कोटी
रोजगार : 23,000

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : 3500 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : पुणे

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 8000 कोटी
रोजगार : 2000

19) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : 1700 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

20) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : 8500 कोटी
रोजगार : 17,300

 

राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन शाळा

नवी दिल्ली, दि. 21 :  प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील दोन शाळा महाअंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत 16 शाळा बँड संघ निवडले गेले आहेत. त्यात बॉयज ब्रास बँड, गर्ल्स ब्रास बँड, बॉयज पाईप बँड, गर्ल्स पाईप बँड असे असून,  466 मुले महाअंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.

महाअंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्टस् अकॅडमी, इस्लामपूर (पश्चिम झोन) आणि भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स, नाशिक (पश्चिम झोन) या दोन शाळांची निवड झाली आहे.

सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी परिक्षक असून हे परिक्षक मंडळ स्पर्धतील बँड चमुच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. विजेत्यांना 25 जानेवारी 2025 रोजी सरंक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना रोख पारितोषिक (प्रथम – रु. 21,000/-, द्वितीय – रु. 16,000/- आणि तृतीय – रु. 11,000/-), चषक तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. प्रत्येक गटातील उर्वरित संघाला प्रत्येकी 3,000/- चे प्रोत्साहनपर रोख पारितोषिक दिले जाईल.

0000

अंजु निमसरकर –कांबळे  /वृत्त वि. क्र. 11/ दिनांक 21.01.2025

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २१ :- सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) याबाबत नवीन धोरण तयार करून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत दिली.

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) अधिनियम १९५४ नुसार मौजा, गांधी चौक, ता.वणी, जि.यवतमाळ येथील निर्वासित सिंधी समाजाच्या विस्थापितांना दिलेले वाणिज्य भुखंडाचे पट्टे नियमित करुन मालकी हक्क प्रदान करणे आणि  जरीपटका कॉलनी, नागपूर येथील अतिक्रमीत जागेसंदर्भात  महसूल मंत्री यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर व संबधित अधिकारी उपस्थित होते.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ

सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमिनीबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २१ : – सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सांगितले.

सांगली शहरात एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार  सुधीर गाडगीळ, महसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकम, सत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते. सांगली  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, खासगी व्यक्तीचे क्षेत्राचा धारणाधिकार एल बदलून त्याचे रूपांतर ए मध्ये करणे हा धोरणात्मक निर्णय आहे.  या निर्णयास मंत्रिमंडळाची मान्यता घेणे उचित ठरणार असल्याने त्यामुळे याबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल.

00000

एकनाथ पोवार/विसंअ

न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई, दि. 21 : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे मंगळवारी (दि. 21) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली.

शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्या. आलोक आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. आलोक आराधे यांचा जीवन परिचय

न्या. आलोक अराधे यांचा जन्म १३ एप्रिल १९६४ रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांनी १२ जुलै १९८८ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात त्यांनी नागरी आणि घटनात्मक प्रकरणांवर काम केले. एप्रिल २००७ मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. २९ डिसेंबर २००९ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व  १५ फेब्रुवारी २०११ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. न्या. आराधे २० सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि ११ मे २०१८ रोजी हंगामी मुख्य न्यायमूर्ती झाले. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. ३ जुलै २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पहिले.  दिनांक १९ जुलै २०२३ रोजी त्यांची तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली.

न्या. आलोक अराधे यांनी मध्यस्थी व सामंजस्य केंद्रे, न्यायिक अकादमी, तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरणांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या विविध अंगांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

००००

स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 21 : राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या नियोजनासाठी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. बैठकीस सचिव वीरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, राज्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, सहसंचालक श्रीमती कमलापुरे आदींसह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य मंडळाच्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालये उभारण्याबाबत  पुढील वर्षात आर्थिक तरतुदीची मागणी करण्याबाबत सूचना देताना आरोग्य मंत्री श्री.अबिटकर म्हणाले, नाशिक व अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालय कार्यान्वित झाली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा शोधून निधीची मागणी करण्यात यावी. मागील आर्थिक वर्ष 2024 – 25 मध्ये मिळालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात यावा. याबाबत विहित कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती तसेच तक्रारीच्या अनुषंगाने संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी. या संपर्क यंत्रणेचे केंद्र मुंबईत असावे. महात्मा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ

अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 21 : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात महिला पुढे येऊन माहिती देतात, अशा महिलांचे मानधन वाढविण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला.

राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस यंत्रणेच्या समन्वयाने अशा प्रकरणावर कारवाया वाढविण्यात याव्यात, अशा सूचनाही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य भवन येथे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायदा (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस सचिव विरेंद्र सिंग, आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक डॉ नितीन अंबाडेकर, सहसंचालक श्रीमती कमलापुरे आदी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगर पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यात स्त्री – पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारणेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासोबतच अवैध गर्भपात रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. गुन्हा सिद्ध करून कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशा प्रकरणात गुन्हे सिद्धता वाढविण्यात येईल. आंतरराज्य जिल्ह्यामध्ये शेजारच्या राज्यातील जिल्ह्यातील प्रशासनाशी समन्वय साधून दोषींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, अवैध गर्भपात प्रकरणात दाखल केसेस  जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच गर्भपात करण्यात येणाऱ्या गोळ्या सहज उपलब्ध होवू नये, यासाठी काळजी घेण्यात यावी. ऑनलाईन विक्री होत असल्यास याबाबत पडताळणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी. जिल्हा स्तरावर असलेल्या समित्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतील नागरिकांचा सहभाग करण्यात यावा. या समित्या आणखी सक्षम करण्यात यावी. खबरी बक्षीस योजनेतील बक्षीस वाढविण्याबाबत कार्यवाही करावी.

०००

निलेश तायडे/विसंअ

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई, दि. 21 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा पारंपरिक नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर केला.

मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्यांनी आपल्या स्थापनेपासून शिक्षण, आरोग्य व पर्यटन या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. गेल्या दहा वर्षांमध्ये उत्तर पूर्वेतील राज्ये रेल्वे, रस्ते तसेच हवाई मार्गाने संपूर्ण देशाशी जोडले गेले आहेत.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांची भाषा, लोककला, जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तिन्ही राज्यांच्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.हेमलता बागला, कुलसचिव डॉ. भगवान बालानी, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, एचएसएनसी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले तर परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी आभारप्रदर्शन केले.’

ताज्या बातम्या

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
तीन कोटी रुपयांचे बक्षिस प्रदान नागपूर, दि. ०२ : महाराष्ट्र शासनाने कायम क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक देण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील...

जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफारी महत्त्वाचा टप्पा ठरणार !- पालकमंत्री...

0
पालकमंत्र्यांनी सफारीचे पाच हजार रुपये देऊन दोन तिकीट केले बुक जळगाव दि. २ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) - “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या...

0
पुणे, दि. ०२: भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत रहावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री...

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ

0
मुंबई, दि.०२ :– भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय,...

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील –  उपमुख्यमंत्री अजित पवार

0
 रायगड जिमाका दि. ०२ -  रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...