रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 455

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २२:  सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांना अधिकचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मान्यता  मिळण्यासाठी विभागाने पाठपुरावा करावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर अंतर्गत कामांचा आढावा घेताना दिल्या.

महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर अंतर्गत कामांचा आढावा घेतला. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सचिव संजय दशपुते, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, नागपूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे  यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले,  प्रशासकीय मान्यता व निधीअभावी विकासकामे  थांबू नयेत. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी विभाग व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करावा. तसेच नागपूर येथील आमदार निवास, आयएएस आयपीएस, अधिकाऱ्यांसाठी निवास इमारत, नागभवन इमारत आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी नवीन प्रशासकीय इमारत याबाबतचा  प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

नागपूर शहरातील पायाभूत सुविधांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २२ :  नागपूर  शहरात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. विकासकामे जलद गतीने पूर्ण करुन नागरिकांना  दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी  संबधित यंत्रणांनी या कामांचे सुयोग्य नियोजन करावे, अशा  सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगरपालिका यांचेकडील प्रलंबित प्रकरणांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीस नगरविकास विभाग १ चे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता,नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मीना, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त  अभिजित चौधरी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांची कामे ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या कामांचा  थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि विकासाच्या गतीवर होतो.  त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत. पायाभूत सुविधांची  कामे मार्गी लावण्यासाठी  निधीची कमतरता असल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव तात्काळ पाठवून द्यावेत. नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व अनुषंगिक कामांबाबत पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश श्री.बावनकुळे यांनी दिले.

या बैठकीत नागपूर महापालिकेकडील प्रलंबित कामे, त्यांना आवश्यक असणारा निधी व प्रशासकीय मान्यता, स्मार्ट सिटीमधील कामाबाबत आढावा घेण्यात आला. नागपूर महापालिकेकडील कामांसाठी  आवश्यक मंजूरी देण्याबाबतची  नगरविकास विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी  दिल्या.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

हाफकीन जैव औषध निर्माण महामंडळाने औषधांमध्ये नवीन संशोधन करावे – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 22 : हाफकीन जैव औषध महामंडळाने अनेक लसींचे संशोधन करून उत्पादन घेतले आहे. हाफकीन ही एक नावाजलेली संस्था आहे. हाफकीनने संशोधीत केलेली सर्पदंशावरील लस सर्वत्र परिचित आहे. महामंडळाने भविष्यातही अशाप्रकारच्या लसी, औषधांमध्ये नवनवीन संशोधन करावे, त्यासाठी शासन नेहमी संस्थेच्या पाठीशी उभी राहील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी हाफकीन जैव औषध निर्माण महामंडळाला भेट दिली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड,  महाव्यवस्थापक (उत्पादन) डॉ. प्रदीप घिवर, व्यवस्थापक (प्रशासन) नवनाथ गर्जे, व्यवस्थापक संपदा पटवर्धन आदी उपस्थित होते.

श्री. आबिटकर म्हणाले, महामंडळाकडील खरेदी कक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्याकडे ठेवावा. औषधांच्या त्यांच्या घटकांनुसार दर्जा तपासण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. त्यानुसार महामंडळाने औषधांचा दर्जा तपासावा. हाफकीनच्या विकासाची योजना तयार करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकही आयोजित करण्यात येईल.

श्री. आबिटकर यांनी यावेळी सद्यस्थितीत औषध पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या औषध खरेदीची आणि राज्य शासनाने नेमलेल्या डॉ. माशेलकर समितीनुसार कामकाज सुरू असल्याबाबतची माहिती घेतली.

०००

निलेश तायडे/विसंअ

राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील अडचणी त्वरीत सोडवाव्यात – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुबंई, दि. २२ :  शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व  करावी. राष्ट्रीय  महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी या रस्त्यांच्या दुपदरीकरणाची कामे दर्जैदार  ही कामे गतीने पूर्ण करावी, भूसंपादनातील अडचणी त्वरीत सोडविण्यात याव्या, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी येथे दिल्या.

बांधकाम भवन येथे शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी या महामार्गाच्या संदर्भात बैठक झाली. यावेळी, आमदार मोनिका राजळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते (बांधकामे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण शिरुर रस्त्याचे दुपदरीकरण करण्याच्या कामात ज्या गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही, त्याठिकाणी   संबंधितांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. ज्या भागात काम सुरु झाले आहे त्याठिकाणी  संबधित कंत्राटदारांनी गांर्भियाने कामाचा दर्जा राखावा. विहीत कालमर्यादेत काम पूर्ण करण्यावर  कटाक्षाने  लक्ष द्यावे. तसेच ज्या गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्याच्या मावेजा मिळण्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांनी सादर करावा. मार्च एप्रिल २०२५ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.

राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी रस्त्याचे दुपदरीकरणाचे कामास गती देण्यात यावी, या भागातील १४.३० किमीमधील अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या गावांचे अंतिम निवाडा त्रुटीच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहे त्यासंदर्भात स्थानिक जिल्हाधिकारी यांना विभागाने पत्र देऊन या  कामासंदर्भातील बाबी तत्परतेने पूर्ण करण्याचे सूचित करावे.  लोकांना सोयीचे होईल अशा पद्धतीने सर्व कामांची पूर्तता करावी. या सर्व कामांची गुणवत्ता व गती याची विभागाने पडताळणी करावी,अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधितांना दिल्या.

0000

वंदना थोरात/विसंअ/

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई,दि.२२ केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे.  सन 2021-22 पासून राज्यातील  सर्व  जिल्हयांमध्ये  हे अभियान राबविण्यात येत आहे.  या राज्यस्तरीय अभियाचा शुभारंभ आणि दशकपूर्ती सोहळा महिला व बालविकास मंत्री   अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ हे अभियान सुरू झाले. या उपक्रमामुळे मागील दहा वर्षात मुलींचा जन्मदर वाढला आहे. मुलींच्या प्राथमिक शिक्षणाचा टक्का हा ८७ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून मुलगा – मुलगी भेदभाव करू नये. मुलींना शिकवल्यास त्या कुटुंबाचा आधार होतात. या शिकवणीसह घरातील मुलांना मुलींप्रती चांगली शिकवण, संस्कार देणे गरजेचे आहे. मुलींमध्ये कर्तृत्ववान स्त्री असल्याचा आत्मविश्वास निर्माण करा. असे सांगून हे अभियान  दि. 22 जानेवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत विशेष उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे  बोर्डीकर म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या अनेक योजना आणल्या. या योजनांमुळे महिला स्वावलंबी झाल्या.

राज्य शासनाने मुलींना शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महिलांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.  महिला लखपती दीदी झाल्या  पाहिजे. आपला महाराष्ट्र हा जिजाऊ, सावित्री बाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचा आहे असे सांगून मुलींचा जन्मदर आणि शिक्षण यासाठी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवावेत त्यामुळे लोकांचे मनपरिवर्तन होण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, विभागीय उपायुक्त, कोकण विभाग, सुवर्णा पवार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खेळाडू महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच , महिला बचत गटांना धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

000

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२ – मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील वांद्रे कुर्ला संकुल येथील कन्व्हेशन सेंटर येथे ‘एम एम आर डी ए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजन नाईक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, आश्विन मुद्गल, सह महानगर आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्यासह ‘एम एम आर डी ए’ चे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

राज्यातील जनतेला मिळालेल्या सोयी सुविधांचा उत्सव म्हणजे आजचा उत्सव विकासाचा ही संकल्पना असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, वेगवान आणि गतिमान विकासाचे शिल्पकार असलेल्या ‘एम एम आर डी ए’ च्या टीमचे अभिनंदन करतो. विकास, वारसा आणि संस्कृती यांचा उत्तम मिलाफ ‘एम एम आर डी ए’ मध्ये पहायला मिळतो. पुढील पिढीला या विकासाची फळे चाखायला मिळणार आहेत. मुंबई सह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या विकासात प्राधिकरणाचा मोठा वाटा आहे. साडेसहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात आणि साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या परिसराचा विकास प्राधिकरण करत आहे. सल्लागार म्हणून स्थापन झालेली ही संस्था आज वेगाने विकासकामे करत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ३ लाख कोटी पेक्षा जास्त किमतीची कामे सुरू असणारे हे देशातील एकमेव प्राधिकरण आहे. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करण्याचा उद्देश आहे. पण एकट्या ‘एम एम आर डी ए’ क्षेत्रात दीड ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य आहे. जगाचे आर्थिक केंद्र होण्याचे क्षमता महानगर प्राधिकरण क्षेत्रात आहे. ही क्षमता निर्माण करणारे प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो.

राज्य आज थेट परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात क्रमांक एकवर असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, दावोस येथे आतापर्यंतच्या गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड तोडले जातील असा विश्वास आहे. लोकांच्यासाठी शासन काम करत आहे. लोकांना सर्व सोयीसुविधा देणे यासाठी शासन काम करत आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आता ‘एम एम आर डी ए’, महापालिका, सिडको, म्हाडा यांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकर पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.श्री शेलार म्हणाले की, प्राधिकरण ने ५० वर्षात मोठी झेप घेतली आहे. अशीच शतकी झेप घ्यावी अशा शुभेच्छा देतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे करणारी दुसरी संस्था नाही.

यावेळी ‘एम एम आर डी ए’ च्या विविध शाखांचे व अधिकारी यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्राधिकरणाचे बोधचिन्ह, कॉफी टेबल बुक प्रकाशन ही करण्यात आले. अशोक हांडे आणि त्यांचा पथकाने मराठी बाणा हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम कुमार यांनी तर आभार प्रदर्शन राधा विनोद शर्मा यांनी केले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

 

१५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार; दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार

दावोस, दि. 22 – दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:

21) सिएट

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : नागपूर

 

22) व्हीआयटी सेमिकॉन्स

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 24,437 कोटी

रोजगार : 33,600

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

23) टाटा समूह

क्षेत्र : बहुविध क्षेत्रात

गुंतवणूक : 30,000 कोटी

 

24) रुरल एन्हान्सर्स

क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक

गुंतवणूक : 10,000 कोटी

 

25) पॉवरिन ऊर्जा

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 15,299 कोटी

रोजगार : 4000

 

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 15,000 कोटी

रोजगार : 1000

 

27) युनायटेड फॉस्परस लि.

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 6500 कोटी

रोजगार : 1300

 

28) ईरुलर्निंग सोल्युशन्स

क्षेत्र : शिक्षण

गुंतवणूक: 20,000 कोटी

रोजगार : 20,000

 

29) ऑलेक्ट्रा ईव्ही

क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही

गुंतवणूक: 3000 कोटी

रोजगार : 1000

 

30) फ्युएल

क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय

राज्यातील 5000 युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण

……….

दि. 21 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी

एकूण रोजगार : 1,53,635

………….

दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

 

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट

गुंतवणूक: 3,05,000 कोटी

रोजगार : 3,00,000

 

32) ग्रिटा एनर्जी

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 10,319 कोटी

रोजगार : 3200

कोणत्या भागात : चंद्रपूर

 

33) वर्धान लिथियम

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)

गुंतवणूक : 42,535 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : नागपूर

 

34) इंडोरामा

क्षेत्र : वस्त्रोद्योग

गुंतवणूक : 21,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : रायगड

 

35) इंडोरामा

क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स

गुंतवणूक: 10,200 कोटी

रोजगार : 3000

कोणत्या भागात : रायगड

 

36) सॉटेफिन भारत

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक: 8641 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

37) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

38) सिलॉन बिव्हरेज

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 1039 कोटी

रोजगार : 450

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

39) लासर्न अँड टुब्रो लि.

क्षेत्र : संरक्षण उत्पादन

गुंतवणूक : 10,000 कोटी

रोजगार : 2500

कोणत्या भागात : तळेगाव

 

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.

क्षेत्र : आयटी

गुंतवणूक: 450 कोटी

रोजगार : 1100

कोणत्या भागात : एमएमआर

 

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.

क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण

गुंतवणूक : 12,780 कोटी

रोजगार : 2325

कोणत्या भागात : नागपूर

 

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

क्षेत्र : सौर

गुंतवणूक : 14,652 कोटी

रोजगार : 8760

कोणत्या भागात : नागपूर

 

43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.

क्षेत्र : ड्रोननिर्मिती

गुंतवणूक : 300 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : जालना

 

44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 5000 कोटी

रोजगार : 1300

कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

 

45) हॅझेरो इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : बुटीबोरी

 

46) टॉरल इंडिया

क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 1200

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

48) हिरानंदानी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 51,600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

49) एव्हरस्टोन समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 8600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

50) अ‍ॅमेझॉन

क्षेत्र : डेटा सेंटर

गुंतवणूक : 71,795 कोटी

रोजगार : 83,100

कोणत्या भागात : एमएमआर

 

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

 

52) एमटीसी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

कोणत्या भागात : एमएमआर

 

53) क्रॉसरेल इंटरनॅशनल

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

…………..

दि. 22 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी

एकूण रोजगार : 15.75 लाख

शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

बारामती, दि. २२ : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’  च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

ॲड.कोकाटे म्हणाले,  राज्यातील शेतकरी प्रगतशील आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञान, उत्कृष्ट बी-बियाण्याचा वापर केला पाहिजे. कृषी क्षेत्रात चांगले काम करणारे शेतकरी, कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरीता राज्य शासनावतीने सहकार्य  करण्यात येईल. केंद्र व राज्यशासन मिळून शेतकरी सुरक्षित आणि संरक्षित होण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध लोकल्याणकारी निर्णय घेण्यात येतील. आगामी काळात नवीन योजना राबविण्यासोबतच आवश्यकतेनुसार जुने कायदे व योजनेतही बदल करण्यात येतील.

तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान आदी घटकांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे.  कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ च्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान, पीकपद्धती तसेच कृषी क्षेत्रातील ज्ञान गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरीता प्रयत्न करण्यात आला आहे; आगामी काळात अशा प्रकारचे प्रदर्शन राज्यभर आयोजित करण्याकरीता प्रयत्न करण्यात येतील. केवळ महिलांकरीता अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करुन कृषी विषयक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पीकपद्धती आदींबाबत माहिती देण्यात येईल.

उमेद अभियान तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादन विक्रीकरीता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ॲड.कोकाटे म्हणाले.

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करावा – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

श्री. भरणे म्हणाले, शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आधुनिकतेची कास धरुन शेती करावी. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करुन कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. बाजारपेठेत पिकांचे नवनवीन वाणदेखील उपलब्ध असून त्याचाही वापर करावा. कृषी विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करुन अधिकाधिक उत्पन्न घेतात. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासोबत विविध स्पर्धेत सहभागी होतात. आगामी काळात शेतीला चांगले दिवस आणण्याकरीता धोरण आणावे, अशी श्री. भरणे सूचना केली.

इंदापूर येथे २२ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित प्रदर्शानात कृषी व जनावरे,  घोडेबाजार व डॉग शो असणार आहे. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला अधिकाधिक शेतकऱ्यांनी भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

कार्यक्रमात ॲड. कोकाटे यांच्या हस्ते तालुक्यातील शैक्षणिक, कृषी, उद्योग आदी या क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

श्री. जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. जगदाळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
0000

रेल्वे दुर्घटनास्थळी पोहाेचून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हाताळली परिस्थिती

जळगाव दि. 22 ( जिमाका )जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ ह्या काही वेळातच परधाडे येथे पोहाेचून परिस्थिती हाताळली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटना स्थळी थांबून होते.

मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटलमध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते.

कागदी, प्लास्ट‍िकचे राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी

मुंबई दि. 22 : कागदी तसेच प्लास्ट‍िक ध्वज वापरण्यास बंदी असून कापडी राष्ट्रध्वज वापरण्याचे निर्देश आहेत.

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तहसिल कार्यालयात व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या सर्व यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनाना देण्यात आले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर व अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर गठित करण्यात आल्या असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....