रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 44

मंत्रिमंडळ निर्णय 

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर

राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९’ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य (scalable) उपाययोजना राबविता येणार आहेत. राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्रिस्तरीय प्रशासकीय संरचना असेल. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ५०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्र वेगाने बदलणारे आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात या धोरणामध्ये आवश्यक ते बदल / सुधारणा करण्यात येतील.  त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती,  राज्यस्तरीय तांत्रिक समिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र, कृषि विद्यापीठांतर्गत कृषि कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधन व नाविन्यता केंद्र काम करतील.

या धोरणाच्या माध्यमातून राज्यात कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता व नाविन्यतेसाठी एक अग्रगण्य केंद्र निर्माण होईल. या धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा “शेतकरी-केंद्रित वापर”, संशोधन, डेटा देवाण-घेवाण वाढेल,  स्टार्ट-अप्सना पाठबळ मिळेल आणि यातून महाराष्ट्र डिजिटल कृषि नाविन्यतेमध्ये आघाडीवर राहील, अशी अपेक्षा आहे.

या धोरणाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा ‘शेतकरी-केंद्रित’ वापर करण्यास स्टार्टअप्स, खासगी कंपन्या / तंत्रज्ञान कंपन्या, कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्रे, खासगी संस्था, शेतकरी / शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) आदींना चालना मिळेल, असे उपक्रम हाती घेतले जातील.  यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅग्रीटेक नाविन्यता केंद्राची संस्थात्मक उभारणी केली जाईल. हे केंद्र या धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी स्वतंत्र, पूर्णवेळ कार्यान्वयन यंत्रणा म्हणून कार्य करेल. ही यंत्रणा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी, नवकल्पनांना प्रोत्साहन, प्रकल्पांची निवड, अंमलबजावणी व अर्थसहाय्य, समन्वय, क्षमता बांधणी इ. धोरणांतर्गत विविध बाबींवर काम करेल.

आयआयटी/आयआयएस्सी सारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार कृषि विद्यापीठांमध्ये कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता आणि इनक्युबेशन केंद्र स्थापण्यात येतील.

डेटा-आधारित शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी उपयोगी ठरतील अशा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. या सुविधा राज्यव्यापी, सुरक्षित, सुसंगत व संमती-आधारित डेटा देवाण-घेवाण सुलभ करतील. क्लाऊड आधारित कृषि डेटा एक्स्चेंज (A-DeX) आणि सँडबॉक्सिंग सुविधा उपलब्ध केली जाईल, या डिजिटल प्लॅटफॉर्मशी केंद्र व राज्य शासनाचे शेती संबंधीत सर्व डेटाबेस जोडण्यात येतील (उदा. अॅग्रीस्टॅक, महावेध, महा-अॅग्रीटेक, क्रॉपसॅप, अॅगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डीबीटी इ.). या एक्स्चेंजद्वारे शेतकरी, त्यांची जमीन, पीक माहिती, स्थानिक हवामान, मृदा आरोग्य, इ. डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम सुदूर संवेदन (Al-enabled Remote Sensing) आणि Geo-spatial Intelligence यांनी युक्त एकात्मिक इंजिन विकसित करण्यात येईल. याद्वारे उपग्रह प्रतिमा, ड्रोन सर्वेक्षण, UAVs आणि IoT आधारित उपकरणांद्वारे संकलित केलेल्या विविध स्रोतांतील स्थानिक माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्यासाठी मदत करेल. ही प्रणाली MahaVedh, FASAL, Bhuvan इ. राष्ट्रीय व राज्य प्लॅटफॉर्मशी API द्वारे जोडण्यात येईल. या प्लॅटफॉर्मचा कृषि, जलसंपदा, महसूल व आपत्ती व्यवस्थापन इ. विभागांना विविध प्रयोजनांसाठी उपयोग करता येईल.

कृषि विस्तार सेवा अधिक प्रभावी व शेतकरी-केंद्रित बनवण्यासाठी VISTAAR उपक्रम राबवण्यात येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून जनरेटिव्ह AI आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना मराठीतून वैयक्तिक सल्ला दिला जाईल. या उपक्रमांतर्गत मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट्स, व्हॉईस असिस्टंट्स यांची मदत घेतली जाईल.  त्याद्वारे पीक उत्पादन, रोग-कीड व्यवस्थापन, हवामान अंदाज, बाजारभाव व शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी सिम्युलेशन टूल्स विकसित केली जातील. यासोबतच Agristack आणि Bhashini यांसारख्या राष्ट्रीय प्लॅटफॉर्मशी याची जोडणी करण्यात येईल. क्षेत्रीय विस्तार कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे प्रशिक्षण देण्यात येईल.

अन्नसुरक्षा, पुरवठा साखळीतील पारदर्शकता, अन्न गुणवत्ता हमी आणि शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी AI, ब्लॉकचेन आणि QR-कोड तंत्रज्ञानावर आधारित राज्यव्यापी शोधक्षमता व गुणवत्ता प्रमाणीकरण (Traceability व Quality Certification) प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल. या प्लॅटफॉर्मद्वारे शेतापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे, शेती पद्धती, कापणीपश्चात प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे डिजिटल आणि जिओ-टॅग केलेली नोंदवही तयार करेल. सुरुवातीला निवडक व निर्यातक्षम पिकांसाठी हे सुरू करून, त्याचा टप्प्याटप्प्याने अन्य पिकांपर्यंत विस्तार केला जाईल. शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, पॅक हाऊसेस, गुणवत्ता प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था, लॉजिस्टिक्स व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यांना या प्रणालीशी जोडले जाईल. यामध्ये IoT व मोबाईल आधारित शोधक्षमता, कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे प्रमाणित दाव्यांची पडताळणी, QR कोड निर्मिती, आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन (APEDA, Codex, EU Farm-to-Fork) यांचा समावेश असेल. या प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना अधिक चांगले दर मिळतील, निर्यातीत विश्वासार्हता वाढेल आणि स्थानिक व जागतिक बाजारात स्वीकारार्हता वाढेल.

राज्य कृषि विद्यापीठे, तांत्रिक संस्था आणि संशोधन भागीदारांमध्ये AI/ML व कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. कृषि विभागातील अधिकाऱ्यांसाठी विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण टूलकिट तयार करण्यात येतील. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्थांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण, डिजिटल साधने आणि मदत कक्ष उपलब्ध करून दिले जातील. तंत्रज्ञान संस्था व उद्योग क्षेत्रासोबत भागीदारी करून प्रशिक्षणाचे दर्जा व उपयुक्तता वाढवली जाईल. वेळोवेळी शेतकऱ्यांचे अभिप्राय घेऊन प्रशिक्षण व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर स्थानिक गरजेनुरूप व उपयुक्त ठरेल याची काळजी घेतली जाईल.

दरवर्षी ‘जागतिक कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखरसंमेलन (Global Al in Agriculture Conference and Investor Summit)’ आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत जागतिक तज्ज्ञ, तंत्रज्ञान कंपन्या, संशोधन संस्था गुंतवणूकदार, शासकीय प्रतिनिधी, आणि शेतकरी उत्पादक संघटनांचा सहभाग असेल. या परिषदेद्वारे धोरण चर्चासत्रे, नवउत्पादनांचे सादरीकरण, प्रात्यक्षिके, आणि गुंतवणूकदारांशी थेट संवाद घडवून आणला जाईल. राज्यातील विविध भागांत ही जागतिक परिषद चक्रीय पद्धतीने घेतली जाईल.

०००

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी, तसेच शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषिविषयक सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पात राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची AWS उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. ही माहिती, मदत व पुनर्वसन विभाग POKRA प्रकल्प, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर, सर्व कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र आणि इतर संशोधन संस्था यांद्वारे वापरण्यात येते. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY), हवामान आधारित फळपीक विमा योजना (RWBCIS) इ. योजनांचा लाभ देण्यासाठी या माहितीचा आधार घेतला जातो.  मे.स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सेवा पुरवठादार संस्था म्हणुन नियुक्ती केली आहे.  महसूल मंडळ स्तरावर महावेध प्रकल्पअंतर्गत यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आली आहे, अशा ग्रामपंचायती वगळून अन्य ग्रामपंचायतींमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.  ग्रामपंचायत स्तरावर केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफूटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे.  महावेधसाठी कृषि विभाग नोडल विभाग म्हणून काम करेल.

०००

णीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ; हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच मानधनधारकाच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

देशात 25 जून, 1975 ते 31 मार्च, 1977 या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती.  या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्यांना कारावास भोगावा लागला. अशा व्यक्तींच्या सन्मानार्थ, त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी 2018 मध्ये दरमहा मानधन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, त्यानुसार आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना दरमहा वीस हजार रूपये व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस दरमहा दहा हजार रूपये मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीधारकांना दरमहा दहा हजार रूपये तर त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस पाच हजार रूपये मानधन देण्यात येईल. हयात असलेल्या जोडीदारास मानधनासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती 2 जानेवारी, 2018 पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात त्याच्या जोडीदारास शपथपत्र जोडून अर्ज करता येणार आहे. यासाठीची मुदत याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यापासून 90 दिवसांचा राहणार आहे.  या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी यापूर्वी अटकेच्या वेळी किमान वय 18 असणे आवश्यक होते, ही अट रद्द करण्यात आली आहे.

०००

ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी नाशिकमधील जांबुटके येथे २९ हेक्टर ५२ आर. जमीन

ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके (ता. दिंडोरी) येथील 29 हेक्टर 52 आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना त्यांचा उद्योग उभारण्याकरिता भूखंड उपलब्ध होणार आहे. आदिवासी भागात रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयानुसार दिंडोरी तालुक्यातील मौजे जांबुटके येथील 29 हेक्टर 52 आर जमीन ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतरित करण्यात येणार आहे.

०००

मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्कात सवलत, गुंतवणुकीला चालना, रोजगाराच्या संधी वाढणार

एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात प्रकल्प जमिनीशी संबंधित करारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.

पेण तालुक्यात स्थापन होणाऱ्या या ग्रोथ सेंटरचा समावेश नवीन शहर विकास प्राधिकरण क्षेत्रात होतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून एमएमआरडीएने एकात्मिक वसाहत धोरणानुसार १२१७.७१ एकर जमीन विशेष उद्देश संस्था (SPV) च्या नावे नोंदविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास फिनटेक कंपन्या, शैक्षणिक व आरोग्य सुविधा, करमणूक उद्याने, परवडणाऱ्या घरे, व्यावसायिक हब, किरकोळ विक्री आणि बांधकाम क्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून जागतिक दर्जाच्या नियोजनावर आधारित तयार होणारा हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळण्याबरोबरच भविष्यातील व्यावसायिक व्यवहारांतून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क व कर महसूल जमा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ५० टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार

०००

मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क माफ

मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठास मौजे पहाडी गोरेगाव येथील जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी गोरेगाव (पश्चिम) येथील एक लाख एकेचाळीस हजार 640.40 चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जमीन हस्तांतरणासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

सध्या विद्यापीठाचे कामकाज पवईतील भाडेततत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. या नवीन जागेत विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे हा भाडेखर्च वाचणार आहे.  तसेच येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

०००

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्कात सवलत

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेष हेतू कंपनी (Special Purpose Vehicle) स्थापन करण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून या परिसराचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येत आहे. पुनर्वसन व पुनर्विकासाच्या योजनेला अत्यावश्यक नागरी प्रकल्प तसेच विशेष प्रकल्प म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. अशा अत्यावश्यक नागरी प्रकल्पांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचे किंवा ते माफ करण्याचे धोरण यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पातील रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, नवी दिल्ली आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) मुंबई यांच्यामध्ये होणाऱ्या पोट भाडेपट्ट्याच्या करारासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव होता. तसेच भाडेपट्ट्यांच्या या दस्त प्रकारांचा सवलत धोरणात समावेश करावा असा प्रस्ताव होता. त्यानुसार या दस्त प्रकारांचा सवलत धोरणात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. जेणेकरून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला चालना मिळेल.

०००

मुंबईतील मेट्रो मार्ग- प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ

मुंबईतील मेट्रो मार्ग-2 अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर), 2 ब (डी.एन.नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून मेट्रो मार्ग-2अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर), 2ब (डी.एन.नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) करिता एकूण 1075.74 मिलीयन डॉलर कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 549.25 मिलीयन डॉलर म्हणजेच 4 हजार 304 कोटी 43 लाख रूपये खर्च झाला आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने कर्ज उचल करण्यास 30 जून, 2025 पर्यंत मुदत दिली होती. या प्रकल्पातील मेट्रो मार्ग-2अ आणि 7 कार्यान्वित झाले आहेत. मेट्रो प्रकल्प 2ब चे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पात एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाद्वारे 96 मेट्रो ट्रेन घेण्यात येणार होत्या. त्यापैकी 60 मेट्रो ट्रेन प्राप्त झाल्या आहेत. या कर्जास 31 डिसेंबर, 2026 पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे उर्वरित 36 मेट्रो ट्रेन उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत.

०००

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

विरार ते अलिबाग बहुद्देशिय मार्गिका प्रकल्पाच्या एकूण 126.06 किलोमीटर लांबीपैकी पालघर जिल्ह्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली दरम्यानच्या 96.410 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात महामंडळामार्फत बांधा वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ही मार्गिका जेएनपीटी ते प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला जोडणारा आहे. याचबरोबर हा मार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848, कल्याण-मुरबाड-निर्मळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61, तळोजा बायपास मुंबई वडोदरा एक्स्प्रेस वे, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, पनवेल उरण राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातून प्रस्तावित आहे. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामास बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली.

या मार्गिकेच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करण्यास तसेच भूसंपादनाकरिता 22,250 कोटी रुपये आणि यावरील व्याजापोटी 14,763 कोटी अशा एकूण 37,013 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

०००

अनिवासी भारतीयांची मुले, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार

राज्यातील खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनिवासी भारतीयांच्या मुलांना व पाल्यांना प्रवेश मिळावा याकरिता प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम, 2015 मधील व्याख्येत सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मध्ये अनिवासी भारतीय या व्याख्येत एनआरआय उमेदवारास राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. या अधिनियमात सुधारणा केल्यामुळे यापुढे भारतीय वंशांच्या नागरिकांना व त्यांच्या मुलांना किंवा पाल्यांना गार्डीयन्स ॲन्ड वॉर्डस ॲक्ट, 1890 मधील व्याख्येनुसार राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे, पण त्यासाठी राखीव जागांच्या संख्येची अट व गुणवत्तेनुसार प्रवेश व त्याबाबतची सूत्र मात्र कायम राहणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पी.ए.इनामदार यांच्या प्रकरणात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देण्यात आला आहे.

०००

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १७ : राज्यातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि प्राध्यापकांच्या क्षमतेत गुणात्मकवाढ करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘क्वांटम संगणन उपक्रम’  राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना क्वांटम तंत्रज्ञानासंदर्भातील विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव संतोष खोरगडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, ‘मित्र’ संस्थेचे मुख्य कार्यकारीअधिकारी प्रवीण परदेशी, क्वांटम तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख डॉ. जे. बी. व्ही. रेड्डी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुंज टंडन, प्रकल्प संचालक आणि पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे प्राध्यापक प्रा.सुनील नायर, मित्राच्या शिक्षण सेलचे वरिष्ठ सल्लागार पूजा मिसाळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसह विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने दर्जात्मक उच्च शिक्षणाची तयारी सुरू आहे. या उपक्रमातून केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे तर नवयुगातील अध्यापन कौशल्येही विकसित केली जातील. प्राध्यापक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अधिक दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण पोहोचवले जाईल. राज्यातील विविध विद्यापीठांतील व तांत्रिक महाविद्यालयांतील ५०० पेक्षा अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण आणि क्वांटम संगणन, संशोधन, नावीन्यपूर्णता व कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे .

आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, तो तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

मुंबई, दि. १७: कोकण विभागात भरती-ओहोटी व चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, विविध योजनांच्या लाभक्षेत्रातील पिकाखालील क्षेत्र नापिक होणे, गोड्या पाण्याचे स्त्रोत भरतीच्या पाण्यामुळे क्षारयुक्त होणे, तसेच लाभक्षेत्रातील गावांना भरती व पुराचा धोका निर्माण होणे आदी समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे बृहत आराखड्यातील नवीन योजनांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

रोजगार हमी योजनेसंदर्भात मंत्री गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीस आमदार किरण सामंत शेखर निकम, वित्त विभागाचे सहसचिव विजय शिंदे, कोकण विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, जलसंपदा विभागाचे उपसचिव रोशन हटवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गोगावले म्हणाले, सद्यःस्थितीत राज्य निधी अंतर्गत उपलब्ध निधीतून खारभूमी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. तथापि, नुकसानीस तोंड देणाऱ्या आणि भविष्यकालीन धोके लक्षात घेता नव्या खारभूमी योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून साहाय्य मिळणे गरजेचे आहे.

या निधीतून कोकण विभागातील ६६ खारभूमी योजनांची कामे हाती घेता येतील. यासाठी सुमारे ४४२.७९ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, या योजनांमुळे अंदाजे ६,९२० हेक्टर क्षेत्र पुनःप्राप्त होणार आहे. या कामांना अधिक गती देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण    

मुंबई, दि. १७: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले.

यंदाच्या आषाढी एकादशी दिवशी रविवार, दि ६ जुलै, २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येईल. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची तसेच अन्य व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.

०००

येत्या नवरात्रौत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन-मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १७ : श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १,८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व बाबी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही बाबी समांतर पातळीवर करण्यात याव्यात.  तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, हे दाखवत असताना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री व तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रे, परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्व्हे करा

मुंबई, दि. १७: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राच्या स्थापनेसाठी या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना जागेचा सर्वे करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा- आष्टा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, गौरव नायकवडी आदी लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसीकरिता जागा अंतिम झाल्यानंतर त्या जागेचा कालमर्यादेत विकास करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. एमआयडीसीच्या स्थापनेमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, वाळवा तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवे आयाम मिळणार असल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई, दि. १७ : मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करून शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. वाळकेश्वर येथील कवळे मठ महापालिका शाळेत मंत्री श्री. लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

मंत्री श्री.लोढा यांनी शैक्षणिक साहित्य आणि गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी एक सोहळा होऊन अविस्मरणीय ठरावा, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी उपस्थित पालकांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. पालक संघाची महिन्यातून एकदा शिक्षकांसोबत बैठक आयोजित करावी त्यातून अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महा विभूतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुढच्या पिढीला कळावे यासाठीही महिन्यातून एकदा शाळांमध्ये विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.

मंत्री श्री. लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिका शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहितीही यावेळी शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी दिली. यापुढे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास मंत्री प्रयत्नशील राहतील, असा दृढ विश्वासही कंकाळ यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला सहायक उपायुक्त मनीष वळंजू, कवळे मठ महापालिका शाळेच्या प्रशासकीय प्रमुख श्रोमती सायली पाटील यांच्यासह पालिकेच्या डी विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७,  पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या  महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी,  स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १७ : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या दिशेने आज आणखी एक पाऊल टाकण्यात आले असून सागरी सुरक्षेसाठी नवीन गस्ती नौका तैनात करण्यात आल्या असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

भाऊचा धक्का येथे मंत्री श्री. राणे यांनी नव्याने तैनात होत असलेल्या गस्ती नौकेची पहाणी केली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच गस्ती नौका पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात ड्रोन टेहळणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन हाय स्पीड गस्ती नौका तैनात करण्यात येत आहेत. या नौकांमुळे अवैध मासेमारी रोखण्यासह किनारपट्टीवरील सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या नौकांमुळे मच्छिामारांचीही सुरक्षा होणार आहे. अशा प्रकारच्या एकूण १५ बोटी तैनात करण्यात येणार असून आता पाच बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत वॉटर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. वॉटर मेट्रो हा एक उपयुक्त आणि चांगला प्रकल्प असून यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

अत्याधुनिक गस्ती नौकेमध्ये १५ लोकांच्या बसण्याची क्षमता असल्याने त्यामध्ये सागरी पोलीसही असणार आहेत. तसेच या नौकेस सुझुकी कंपनीची २५० एचपीची दोन इंजिन असून याचा वेग ३० नॉटीकल मैल आहे. अधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज या नौकेमध्ये रडार, ट्रान्सपॉन्डर, त्वरित प्रतिक्रिया प्रणाली यांचा समावेश आहे. द्रिष्टी, क्रुझ आणि फेरिस कंपनीची ही नौका संपूर्ण फायबरची आहे. १३ मीटर पेक्षा जास्त लांबी असणाऱ्या या बोटीची इंधन क्षमता ९०० लीटर आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थिती
  •  जि.प.शाळा बामणोली, मनपा शाळा क्र. ७ शाळेत उत्साह
  •  विद्यार्थ्यांना पुष्प देऊन केले स्वागत

सांगली, दि. १६, (जिमाका): शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी बाणवाव्यात. शिस्त, वेळेचे महत्त्व, पुस्तकवाचन, मैदानी खेळ, फटाक्यांना फाटा देऊन प्रदूषणास आळा व पर्यावरण संवर्धन, तंबाखू व अमली पदार्थ व्यसनापासून दूर राहणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे. उत्तम शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षारंभ विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद शाळा, बामणोली व सांगली मिरज कुपवाड महापालिका शाळा क्रमांक 7 सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, मोफत गणवेश व पुस्तके वितरीत करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा बामणोली येथील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड तर महापालिका शाळा क्रमांक 7 येथील कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ, मनपा आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, मुख्याध्यापिका स्मिता सौंदते यांच्यासह महानगरपालिका माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पटावर नोंदले गेलेले प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शाळा बालकांचे भावविश्व घडविते. सामाजिक विकासात व राष्ट्र जडणघडणीत शाळेची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षारंभाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांची नियमित हजेरी व वेळेवर उपस्थिती यावर लक्ष देऊन त्यांच्या अंगी शिस्त बाणवावी. शाळेच्या 200 मीटर परिसरात अंमली पदार्थ, तंबाखू विक्री केलेली आढळल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास बडतर्फ केले जाईल. शैक्षणिक वर्षारंभीच शाळेच्या स्वतःचा पॅटर्न तयार करा. यामध्ये दीपप्रज्वलनावेळी मेणबत्तीचा वापर टाळणे, फटाक्यांना फाटा देणे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणे, शाल, श्रीफळाचा खर्च विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वळवणे अशा बाबी आवर्जून कराव्यात, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान पालकांच्या कथाकथन स्पर्धा घ्याव्यात. त्यांना रक्कम रूपये पाच हजारांचे बक्षीस देऊ, असे घोषित केले. तसेच, विद्यार्थ्यांना पुस्तके, खेळणी पुरवण्याबाबतही सूचित केले. शाळेचे पटांगणाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत शाळा परिसर स्वच्छ करून शाळांचे सुशोभिकरण करण्यात आले होते. पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रमुख वरिष्ठ अधिकारी, स्थानिक शासकीय अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आदिंच्या सहभागाने पारंपरिक वेशभूषेत आलेल्या प्रातिनिधिक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना सवाद्य मिरवणुकीने शाळेत आणण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरीत करण्यात आली. माध्यान्ह भोजन जेवणात गोड पदार्थ देण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल व त्यांच्यामध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य व आनंदमयी होईल, अशा पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

उन्हाळ्याची सुट्टी संपून शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षारंभ अंतर्गत दि. 16 ते 30 जून या कालावधीत राज्यात व जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होत आहे. वय वर्षे 4 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना (दिव्यांग मुलांसह) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत असून, याअंतर्गत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शासन निर्णयानुसार नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात “100 शाळांना भेटी देणे” हा उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

०००

ताज्या बातम्या

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...