रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 45

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा

सातारा दि. १६: चालू शैक्षणिक वर्ष  शाळा प्रवेशोत्सवच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी ता. माण येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, योजना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, अमर नलवडे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग सातारा,  प्रदीप शेंडगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती माण,  चंद्रकांत खाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी, विजयकुमार कोकरे, अधिव्याख्याते -डाएट, लक्ष्मण पिसे, गटशिक्षणाधिकारी,  साधना झणझणे, केंद्रप्रमुख आंधळी उपस्थित होते.

यावेळी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट, मोजे यांचे वाटप करण्यात आले. एक पेड़ माँ के नाम अंतर्गत मान्यवर व विद्यार्थी,पालक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

०००

शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवतील – मंत्री मकरंद जाधव -पाटील

सातारा, दि. १६:  शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडतील व विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवतील, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव- पाटील यांनी व्यक्त केला.

शेंदुरजणे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, मॅप्रो फुड्सचे व्यवस्थापकीय संचालक मयूर वोरा, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे शाळेचे मुख्याध्यापक रामदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

डोंगरी विकास निधीतून, विविध संस्थां व ग्रामस्थांच्या मदतीने उभारण्यात आलेली शाळेची इमारत गावाच्या वैभवात भर घालेल, असा विश्वास व्यक्त करून मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, शाळेतील विद्यार्थी हा ज्ञानाने व संस्काराने परिपूर्ण होण्यासाठी शिक्षक, पालक यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले पाहिजे. माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये चांगले शिक्षण देण्यात येत आहे. राज्य शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवित आहे. यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, दुपारचे जेवण, विद्यार्थ्याला दुर्धर आजार असल्यास शासनामार्फत मोफत उपचार केले जातात. वाई जवळ असतानाही शेंदूरजणे प्राथमिक शाळेने पटसंख्या टिकविण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवला आहे. या  डिजिटल युगात आपापसात संवाद खूप कमी होत आहे. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या खेळांकडेही लक्ष दिले पाहिजे. यासाठी शेंदूरजणे येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार  असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

या कार्यक्रमात विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश
  • प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार

सांगली, दि. १६ (जिमाका): जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा चौफेर विकास होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी विकासकामे प्रस्तावित करावीत व नियोजनबद्ध कार्यवाही करावी. यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कामांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री अरुण लाड, सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सन्माननीय सदस्य व जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती मुदतीत पूर्ण व्हावीत. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री पाटील  म्हणाले, जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा, यादृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वयाने विकासकामांचा चांगला आराखडा प्रस्तावित करावा. प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. पावसाळा संपताच कामांचे कार्यादेश दिले जातील, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचित केले.

पालकमंत्री पाटील  म्हणाले, शिक्षण क्षेत्र हा आपला सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी, शालेय वर्गखोल्या नवीन बांधकाम व दुरूस्तीची सर्व कामे या आर्थिक वर्षाखेर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. विद्यार्थी नोंदणी, विद्यार्थ्यांच्या आधार लिंकिंगसाठी तातडीने कार्यवाही करावी. त्यासाठी तालुकास्तरीय शिबिरांचे आयोजन करावे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील  म्हणाले, वन विभागाने त्यांच्या ताब्यातील जमिनींवर प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्र होण्याच्या दृष्टीने कामनिहाय निधी मागणीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, यासंदर्भातील कार्यवाही व येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. तसेच, पाटबंधारे विभागाच्या जागेत पर्यटन विकासाच्या दृष्टीने वास्तुविशारद नेमून बृहद आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊ. तसेच, रेल्वेशी निगडीत प्रश्नांसाठी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. रेल्वेबाबतच्या प्रश्नांसंबंधी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2024-25 मध्ये माहे मार्चअखेर 570 कोटी 41 लाख रुपये खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी  99.55 टक्के इतकी आहे. तर सन 2025-26 साठी गत वर्षीच्या तुलनेत 59 कोटी 28 लाखांची वाढ करून 632 कोटी, 29 लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्हा नियोजनच्या समितीच्या या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रातील योजनांचा सन 2024-25 चा माहे मार्च अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात येऊन मार्चअखेरच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच सन 2025-26 साठीच्या नियोजनासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये कृषि व कृषि संलग्न सेवा क्षेत्र यासाठी 28 कोटी, 38 लाख, ग्रामविकास साठी 48 कोटी, नागरी क्षेत्राचा विकास साठी 66 कोटी 53 लाख, पाटबंधारे व पूरनियंत्रणासाठी 25 कोटी, ऊर्जा विकासासाठी 58 कोटी 52 लाख, रस्ते विकासासाठी 47 कोटी 50 लाख, सामान्य शिक्षणासाठी 48 कोटी 4 लाख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह आरोग्य क्षेत्रासाठी 80 कोटी 36 लाख, तीर्थक्षत्र, पर्यटन व गडकिल्ल्यांसाठी 32 कोटी 40 लाख, महिला व बालविकाससाठी 15 कोटी 8 लाख, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास 8 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी मांडलेल्या मौजे मरळनाथपूर, रेठरे धरण (ता-वाळवा) व गोरक्षनाथ येथील निसर्ग पर्यटन विकास मंडळाचा आराखडा, वीर शिवा काशिद स्मारक, गुहागर – विजापूर महामार्गालगतचे जोडरस्ते महामार्गाला व्यवस्थित जोडले जाणे, कुंडल येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचा प्रस्ताव, बिरोब देवस्थान आरेवाडीच्या पर्यटन विकासाचा आराखडा, मिरज येथे ऐम्स रुग्णालय, शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग, नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम व सदस्थितील वर्ग खोल्यांची दुरुस्ती, पूरपरिस्थिती नियंत्रण, अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेची कारवाई, नंदादीप प्रकल्पाअंतर्गत जत तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील दुध भेसळ, विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आदि विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीचे 9 विशेष निमंत्रित व 2 नामनिर्देशित सदस्यांची पालकमंत्री यांची शिफारस करून शासनास पाठवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, गत आर्थिक वर्षात जवळपास 100 टक्के निधी खर्च केल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पालकमंत्री व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. वडाच्या रोपास पाणी घालून बैठकीस प्रारंभ करण्यात आला.

०००

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. १६ (जिमाका): जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन व विक्री संदर्भात कारवाई करून तस्करांवर चांगला धाक निर्माण करण्यात पोलीस विभाग आतापर्यंत यशस्वी झाला आहे. कायद्याचा हा धाक यापुढेही असाच कायम ठेवावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या नवव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कायद्याचा धाक, प्रबोधन व पुनर्वसन ही त्रिसूत्री यापुढेही प्रभावीपणे राबवावी, असे सूचित करून पालकमंत्री पाटील म्हणाले, चालू शैक्षणिक सत्रात प्रार्थनेवेळी अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा व अमली पदार्थ विरोधी परिपाठ यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर अमली पदार्थांच्या दुष्परिणाम रूजवले जातील. महापालिकेने निश्चित केलेल्या डार्क स्पॉटस्‌च्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे सूचित करून त्यांनी यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चिकित्सा केंद्राची उभारणी, महापालिका क्षेत्रात टॉवर पोलीस चौक्या याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अमली पदार्थ विक्रीबाबतची साखळी शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, जिल्ह्यात एकूण 92 ब्लॅक स्पॉट असून यामध्ये सांगली महानगरपालिका क्षेत्रात 52 ब्लॅक स्पॉट असल्याचे सांगून सविस्तर आढावा सादर केला. महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महानगरपालिका क्षेत्रातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी दिवाबत्ती व सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत सादरीकरण करताना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची माहिती देऊन सर्व महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले असल्याचे सांगितले.

०००

 शासन, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Ø  प्रधानमंत्री आवास योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत नोंदणीला गती द्या

Ø  सरपंच व ग्रामसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

नागपूर, दि. १६ : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला अधिक गती देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आज रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.०  ही  सर्वसामान्यांसाठी योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे या योजनेची नोंदणी करताना येणा-या अडचणी दूर करण्यात याव्यात. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन, सरपंच व ग्रामसेवकांच्या सहकार्याने नाव नोंदणीस गती देण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.

वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल म्हणाले की, सर्वांसाठी घरे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवायची आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जिल्ह्यात शंभर टक्के घरकुलाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सर्वसामान्य, दुर्गम माणसाच्या अडचणी दूर करायच्या आहेत. विविध योजना नागरिकांपर्यंत सहजतेने पोहोचण्याची गरज असल्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश सांगितला.

उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा गौरव

जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींचा गौरव पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यात मौदा तालुक्यातील वाकेश्वर, कोदामेंढी, सिरसोली,, कामठी तालुक्यातील महालगाव, उमरी, उमरेड तालुक्यातील सुरगाव कुही तालुक्यातील तितुर, सावनेर तालुक्यातील पिपळा डा.ब. तसेच पारशिवनी तालुक्यातील उमरी पाली या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

०००

विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख शिक्षण देणार – शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. १६ (उमाका): विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी व त्यांच्या कल्पना शक्तीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्यपुर्ण  शिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

तुंगण दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशात्सव कार्यक्रम शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी  ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी चित्रा देवरे, तहसीलदार कैलास चावडे, सरपंच, शर्मिला  पवार, प्रशासक पंढरीनाथ बोरसे, मुख्याध्यापक भाऊराव बहिरम,शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी,पालक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रथमत: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  व्हिडिओ कॉलिंगद्वारे शाळा प्रवेशात्सव निमित्ताने  तुंगण दिगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, तुंगण दिगर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले 100 टक्के आदिवासी गाव आहे. येथील सर्व विद्यार्थी स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असून या शाळेला गावकऱ्यांचे  पूर्ण सहकार्य असल्यामुळे  इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेल्या या शाळेत एकही विद्यार्थी खासगी शाळेत जात नाही, ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार शिक्षणमंत्री भुसे यांनी काढले.

शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासह विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यात येईल. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आवश्यक ते निधी शाळेला देण्यात येईल. त्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाबरोबरच कौशल्यपुर्ण शिक्षण देण्यात येणार असून तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असल्याचे यावेळी शिक्षणमंत्री भुसे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राज्यात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांच्यात शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करून शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल. या सोहळ्यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास शिक्षण मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वाद्य व पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा सहभाग होता. पहिलीच्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक, प्रवेश पात्र मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व पाहिले पाऊल उपक्रमांतर्गत ठसा आणि विद्यार्थ्यांना पुरणपोळी व आंबा रसाचे भोजन देण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्ते त्यांच्या आईच्या साक्षीने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते उपक्रमांची भिंतीचे उद्घाटन करण्यात आले व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, टॅब व गणवेश वाटप करण्यात आले.

तुंगण दिगर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षक विविध नाविण्यपुर्ण उपक्रम उत्कृष्टपणे राबवित असल्यामुळे शिक्षकांचे  कौतुक शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शिक्षण मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेची माहिती व अडीअडचणी जाणून घेतल्या. शाळेच्या व गावाच्या सर्वांगिण् विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील व आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षण मंत्री भुसे यांनी दिली.

०००

 

 

पोलीस दलातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजाराचे बक्षीस

सांगली, दि. १६ (जिमाका): जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेशात जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढा, बक्षीस देऊ, त्याचबरोबर अमली पदार्थांना आळा घालण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस विभागातील कर्तबगार अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बक्षीस देण्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषित केले होते. त्या आश्वासनाची पूर्ती आज पोलीस दलातील तब्बल 16 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रक्कम रूपये 25 हजाराचे चार लाख रूपयांचे धनादेश आज स्वतःच्या संवेदना संस्थेच्या निधीतून वितरित करुन केली.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

विटा येथे  जानेवारी महिन्यात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर विषयाचे गांभीर्य ओळखून, तातडीने पावले उचलत अमली पदार्थ तस्करी विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. एवढ्यावरच न थांबता दर आठवड्याला त्यांनी या विषयाचा सर्वोच्च प्राधान्याने आढावा घेतला. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वेळोवेळीच्या कारवाया, प्रबोधन व अन्य माध्यमातून केलेल्या कार्यवाहीमुळे जिल्ह्यात अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांत घट झाली.

कायद्याचा धाक, प्रबोधन व पुनर्वसन या त्रिसूत्रीने गेले पाच महिने काम केल्याने जिल्ह्यात अमली पदार्थ संबंधित घटना कमी झाल्या आहेत. याची दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी अमली पदार्थ कारवाया रोखण्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांच्या पत्नी/पतीच्या नावे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 25 हजार रूपयांचे धनादेश पालकमंत्री यांनी आज सन्मानपूर्वक प्रदान केले. यासाठी त्यांनी स्वतःच्या संवेदना या स्वयंसेवी संस्थेच्या फंडातून रक्कम दिली.

यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरूण पाटील आणि सचिन धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस शिपाई जावेद शेख आणि मोहसिन टीनमेकर तसेच विटा पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम माळी आणि हेमंत तांबेवाघ, पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांच्या पती/पत्नीच्या नावचे धनादेश संबंधितास व अनुपस्थित कर्मचाऱ्यांचे धनादेश पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

सज्जनांची साथ, दुर्जनांचा नाश यासाठी पालकमंत्री यांनी दिलेली ही थाप नक्कीच प्रेरणा व प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. याचबरोबर भावी पिढीला अमली पदार्थांपासून रोखण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच सामाजिक महत्त्वाचे आहे.

०००

नागरिकांच्या तक्रारीतील तथ्य लक्षात घेऊन मोहपा गावाचे लवकरच पुनर्सर्वेक्षण – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,दि. १६: मोहपा येथील घरांचा झालेला सर्व्हे याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. मूळ मालकी एकाची तर मालमत्ता पत्रावर नावे दुसऱ्यांची आली आहेत. यामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून तेथील गरजू रहिवाशांना वंचित रहावे लागत आहे. सुमारे 1763  मालमत्तांच्या सर्वेक्षणामध्ये बहुसंख्य लोकांनी वेळोवेळी याबाबत सामूहिक तक्रारी केल्या आहेत. यातील तथ्य लक्षात घेऊन मोहपा गावाचे लवकरच पुनर्सर्वेक्षण करण्याची घोषणा महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

नागपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोहपा गावातील 2017 मध्ये भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने झालेल्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी दिसून आल्या. याबाबत सावनेरचे लोकप्रतिनिधी डॉ. आशिष देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी बैठकीतच हा निर्णय जाहीर केला.

ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मितीच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन कसोसीने प्रयत्न करत आहे. आपल्या जिल्ह्यात श्री क्षेत्र आंभोरा देवस्थान हे तीर्थक्षेत्रासह आता पर्यटन स्थळाच्या दृष्टीने महत्वाचे म्हणून गणले गेले आहे. या प्रकल्पासाठी 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून यातील कायदेशीर तिढा लवकर मार्गी लावू, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

या ठिकाणी हरिनाथ मंदिर, चैतन्येश्वर मंदिर, राम मंदिर, बुद्ध विहार, भक्त निवास, दुकानांचे गाळे, पार्किंग व्यवस्था, गार्डन, ॲडव्हेंचर स्पोर्टस्‌, पॅराग्लायडिंग आदी सुविधा या आंभोरा भागात स्वयंरोजगाराचे नवे मार्ग देतील, असे ते म्हणाले.

नागपूर सुधार प्रन्यासने गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमितीकरण केलेले अभिन्यास नागपूर महानगर पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत तीन महिन्यात कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील शासकीय जमीन हस्तांतरणाबाबत एक महिन्याच्या आत शासकीय जमीनीबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नगरपंचायत गोधनी (रे) येथील विविध विकास कामासाठी शासनस्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या ठिकाणी म्हाडामार्फत विकसीत केल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठी नगरपरिषदेने तत्काळ जागेची उपलब्धता करुन देण्याचे निर्देश त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले. यातील सुविधा या म्हडामार्फत विकसीत केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

०००

विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळा, गावाचे नाव उज्ज्वल करावे – पालकमंत्री अतुल सावे

  • जिल्हा परिषद व सर्व शासकीय शाळांचे बळकटीकरण करणार
  • आता पहिलीपासून सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून शिक्षण

 नांदेड, दि. १६: आज शाळेचा पहिला दिवस. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्साह भरलेला असतो. या दिवशी मुलांचा उत्साह वाढावा, म्हणून राज्य शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या तसेच इतर शालेय साहित्यांचे वाटप आज करण्यात आले आहे. यावेळी मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे पालक, विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा संदेश दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच उत्कृष्ट कार्यातून देशाचे, गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय शाळा बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यांनी स्पष्ट केले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी पालक, शिक्षकांचे आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत केले. पहिल्या दिवशी सर्वजण उत्साहात शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करु या. या वर्षभरात आपण सर्वजण शाळेत उपस्थित राहू या. प्रत्येक नागरिक व विद्यार्थी शिकला पाहिजे असा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपण सर्वानी मिळून त्यांचा हा संकल्प पूर्ण करु या, असेही आवाहन त्यांनी केले.

आजपासून सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. या निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांमधून सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शिक्षण मिळणार आहे. शासनाच्यावतीने सर्व शाळामध्ये डिजीटलायझेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेही पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावले जात आहेत. शिक्षकांनी जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याचे पालकांशी चर्चा करुन शिक्षकांनी संवाद साधला पाहिजे, यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पुढील काळात चांगले काम होईल. आज विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

०००

 

कोल्हापूर शहरासाठीच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक

कोल्हापूर, दि. १६ (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शहरासाठी असलेल्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.

कोल्हापूर महापालिकेअंतर्गत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या तक्रारीबाबत महापालिका आयुक्त, मुख्या अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्यासमवेत चर्चा झाली. कोल्हापूरवासियांना दोन वेळचे स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने तातडीने अडचणी दूर करून योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. हे काम करणाऱ्या कन्सल्टंट तसेच पुरवठादारानेही याबाबत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून वारंवार येणाऱ्या त्रुटींचा विचार करून एक चांगला पर्याय शोधून योजना अखंडित सुरू राहण्यासाठी काय काय करता येईल याबाबतही नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत पुरवठा करणे, बी बियाणे यांचा पुरवठा करणे तसेच या अनुषंगिक प्रश्नांबाबतचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समवेत झाला. लिंकिंगचा प्रश्न, खतांचा पुरेसा पुरवठा आणि बी बियाणांचा पुरवठा याबाबत यावेळी चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील विविध पुरवठादारांसह कृषी अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी स्तरावर लावून त्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढावा असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी कागल नगरपरिषदेतील 2003 पासून सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या देय रकमेबाबत कागल नगरपालिका कर्मचारी संघटना यांच्या विनंती अर्ज बाबत बैठक घेण्यात आली. संबंधित नगरपालिका प्रशासनासह यावेळी जिल्हा नगर प्रशासन अधिकारी तसेच संबंधित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या देय रकमांबाबत शासनाकडून संबंधित निधी मिळाल्याशिवाय देता येणार नाही तसेच नगरपालिका फंडात तेवढा निधी नसल्याने एक रकमी सर्व रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना देता येणार नसल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी नगरपालिका फंडातील मर्यादांचा विचार करता याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर पुढील आठवड्यात बैठक लावावी लागेल अशी माहिती दिली.

कागल शहरातील म्हाडा गृहप्रकल्पाबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. याबाबत म्हाडा प्रशासन व संबंधित सदनिका धारक उपस्थित होते. याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी मुंबई येथील वरिष्ठांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबत राज्यस्तरावर बैठक लावून येत्या आठ दिवसात प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही त्यांनी सदनिका धारकांना दिली. कागल एमआयडीसी येथील ओसवाल एफएम टेक्स्टाईल एक वर्षापासून बंद असल्याकारणाने तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आयुक्त कामगार पुणे, सहाय्यक आयुक्त कामगार इचलकरंजी यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी तेथील काम करीत असलेल्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या देय रकमा तातडीने मिळाव्यात यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. यानंतर येत्या दोन दिवसात संबंधित बँका, कंपनीचे मालक व कामगार विभागाने एकत्रित बैठक लावून यावर निश्चित असा तोडगा काढावा. त्यानंतर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नियमाप्रमाणे देय रकमांचा तपशील एकमेकांना देऊन याबाबत अंतिम निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करावी अशा सूचनाही या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

तसेच गडहिंग्लज मधील नव्याने विकसित होत असलेल्या क्रीडा संकुलच्या अडचणीबाबत जिल्हा परिषद व संबंधित पुरवठादार यांच्यासोबत बैठक झाली. क्रीडा संकुलाच्या कामासाठी आवश्यक जागेतील असणाऱ्या वृक्षांची तोडणी करण्यासाठी परवानगी देणेबाबत चर्चा झाली. नगरपालिकेच्या अधिकारात असणाऱ्या नियमांप्रमाणे वृक्ष तोडण्यासाठी तातडीने परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

०००

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...