रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 42

सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • चऱ्होलीची नगर रचना योजना रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे, दि. १८: पिंपरी चिंचवड हे वाढते शहर असून त्याचा विकास सुनियोजितरित्या होण्यासाठी शहराचा उत्तम आराखडा करा आणि पुढच्या पिढीचा विचार करून आगामी ५० वर्षाचे नियोजन व्हावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहराचे नियोजन करत असतांना जनतेला विश्वासात घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या मागणीनुसार चऱ्होलीची नगर रचना योजना रद्द करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या शब्दात भागवत धर्माचे तत्वज्ञान आणि आपला वैश्विक विचार आपल्यापर्यंत पोहोचविला. त्यामुळेच माऊलीच्या पालखीत लाखो वारकरी सहभागी होतात. संत नामदेव महाराजांनी ही परंपरा आपल्यापर्यंत अभंगाच्या माध्यमातून पोहोचविताना भागवत धर्मातील हा विचार पंजाबपर्यंत पोहोचविला. शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेव महाराजांचे विचार समाविष्ट आहेत. ज्यांनी भागवत धर्माला उंची दिली अशा दोन संतश्रेष्ठाच्या भेटीचे शिल्प महानगरपालिकेने उभारले आहे. वारकरी संप्रदायात प्रत्येक जण एकमेकांना माऊली समजतो, ईश्वराचे रूप समजतो, हाच भाव या शिल्पात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपला वैश्विक विचार जगाला साद घालणारा

जगाला साद घालणारा आणि दिशा देणारा असा आपला वैश्विक विचार आहे. एका पिढीने दुसऱ्याला दिल्याने तो टिकून आहे. जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत विचार आहे, आणि सूर्य-चंद्र असेपर्यंत वारी आहे. या विचाराच्या प्रसारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुंदर संतपीठ तयार केले. सीबीएसई अभ्यासक्रमासोबत हा विचार पोहोचविण्याचे कार्य संतपीठाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे संतपीठाच्या विस्तारासाठी आराखडे, नियोजन केल्यास त्याच्यापाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील.

नदीमध्ये जाणाऱ्या १०० टक्के पाण्यावर प्रक्रियेसाठी प्रयत्नशील

इंद्रायणी नदी निर्मळ करण्यासाठी नदीमध्ये जाणारे १०० टक्के पाणी प्रक्रिया केलेले असेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून इंद्रायणीचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अमृत योजनेंतर्गत दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू होत आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महापालिकेचे विकास प्रकल्प नागरिकांसाठी उपयुक्त असून खेळाडू तयार करणारी पिढी घडावी, यासाठी महापालिकेने उभारलेली क्लायबिंग वॉल उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माणुसकी या धर्मानुसार पोलीसांचे काम

पोलीस आयुक्तालयाने दोन चांगल्या प्रणाली सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात आधाराची गरज असते, कोणीतरी पाठीशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे. अनेकदा ज्येष्ठांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असते. माणुसकी हा खरा धर्म म्हणून पोलीस काम करतात. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाने तयार केलेले  ‘ज्येष्ठानुबंध’ हे ॲप ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त ठरेल. पुणे, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी वाहतुकीच्या नियमनासाठी ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून त्यात एआयचा समावेश असलेल्या प्रणाली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस दल सज्ज होत असून नागरिकांसाठी चांगली यंत्रणा उभी रहात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. तसेच या प्रकल्पांविषयी चित्रफीत दाखविण्यात आली.

विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रभाग क्र. १६ मध्ये मुकाई चौक कृष्णा हॉटेल ते लोढा स्किमपर्यंत एक्सप्रेस हायवे लगतचा १२ मीटर डी.पी. सर्विस रस्ता विकसित करणे (भाग १ व भाग २), बापदेव मंदिर येथील किवळे गावातील मुख्य रस्ता ते एक्सप्रेस हायवेपर्यंतचा सिंबायोसिस कॉलेजमागील १८ मीटर डी.पी. रस्ता विकसित करणे, प्रभाग क्र. १६ विकासनगर येथील मुख्य रस्ता डांबरीकरण करून विकसित करणे, गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपिंग पद्धतीने विकसित करण्याच्या कामाचा भुमिपूजन तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संत मदर टेरेसा उड्डाणपूलावरून चिंचवड बाजूकडे उतरण्यास व चढण्यास बांधण्यात आलेल्या लूप, रॅम्प, पवना नदीवर थेरगाव प्र. क्र. ५० मध्ये प्रसुनधाम शेजारी १८ मीटर डी.पी. रस्त्यावरील उभारण्यात आलेल्या थेरगाव-चिंचवड पूल, अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या चिखली (१२ एमएलडी) व पिंपळे निलख (१५ एमएलडी) क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्प, पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी उभारण्यात आलेल्या क्लायबिंग वॉल, प्रभाग क्र. ४ दिघी येथे आरक्षण क्र. २/१२२ येथे बांधलेल्या शाळा इमारत, प्रभाग क्र. ३ चऱ्होली येथील चोविसावाडी येथील अग्निशमन केंद्र इमारत, भोसरी येथील प्रभाग क्र. ७, आरक्षण क्र. ४३० येथील प्राथमिक शाळा इमारत, थेरगाव व भोसरी रुग्णालयाचे मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग, प्रभागाचे लोकार्पण करण्यासह  क्र. ५ मधील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथील बहुमजली वाहनतळ इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

०००

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १८ : आपली संस्कृती, संतांचे विचार व परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र टाळगाव, चिखली येथे वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन व सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे, चिंतन समिती, संतपीठ समितीचे पदाधिकारी तसेच पालक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. संतपरंपरा जपण्याचे काम संतपीठात होणार आहे. या ठिकाणाला वैश्विक स्वरुप देण्याचे काम करण्यात आले असून येथे संपूर्ण संतसाहित्य ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्य वादनाचे प्रशिक्षणही याठिकाणी देण्यात येणार आहे.

संतपीठाने तयार केलेल्या यापुढील संकल्प आराखड्यानुसार पंढरपूर व आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला शासन पूर्णपणे मदत करेल. सगळ्या ठिकाणची संतपीठे एकमेकांना पूरक बनविण्यात येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्याचा मार्ग खुला झाला असून मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा व अर्थकारणाची भाषा बनविण्याचे दालनही खुले झाले आहे. हे धोरण महाराष्ट्र शासनाने स्वीकारले असून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषेचा तिरस्कार करणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संतपरंपरा जपणारी शाळा स्थापन करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. संतांचे विचार या संतपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम होणार आहे. विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी संतपीठाचा मोलाचा सहभाग असेल. संतपीठ समितीच्या यापुढील संकल्पास शासनाने आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ चिखली येथे संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष, संत सोनबा ठाकूर पखवाज कक्ष, पंडीत अरविंद मुळगावकर तबला कक्ष तसेच आलीजाबहाद्दर ह.भ.प. महादजी शिंदे सभागृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत या वर्षात सुमारे १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित करण्याच्या महत्वाकांक्षी उद्देशाने टाळगाव चिखली येथे २३ कोटी ५४ लाख रुपये खर्चातून ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ विकसित केले आहे. यामध्ये तळमजला तसेच ५ मजले असे इमारतीचे नियोजन करण्यात आले असून त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र १३ हजार १६१ चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये  ५५ वर्गखोल्या, ९ कार्यालये, ४० इतर खोल्या ज्यामध्ये प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, संगीत तथा वाद्य कक्ष आहेत. प्रत्येक मजल्यावर स्वछतागृहे, विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता विस्तीर्ण मैदान आदी सुविधा आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या समुहशिल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुणे – आळंदी पालखी मार्गावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समूहशिल्प आणि संतसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. या संतसृष्टीत विविध संतांच्या जीवनावर आधारित विविध भित्तीचित्रे आहेत. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई व इतर वारकरी २० असे एकूण २५ शिल्पे मिश्र धातूमध्ये बनविण्यात आली आहे. विविध संतांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित एकूण ४७ कांस्य धातुच्या शिल्पांचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. यासाठी ३० कोटी ६९ लाख रुपयांतून कामे उभारण्यात आली आहेत.

०००

 

 

 

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

पुणे, दि. १८: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते. दर्शनानंतर संस्थानच्यावतीने उपमुख्यमंत्री पवार यांचा सत्कार करण्यात आला.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

०००

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे

मुंबई, दि. १८ : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्रनिहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवा, असे आवाहन नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.

भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगर विकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्युमेंट मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १७ जून, २०२५ रोजी केले आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून गावपातळीवरील कार्यालय प्रमुखांनी, सर्व नागरिकांनी सर्वेक्षणामध्ये आपले अभिप्राय नोंदवावेत यासाठी दर्शनी भागावर फलक लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले आहेत. यामध्ये नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाटासाठी पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. १८ : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आणि पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१८ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात २९.२ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात २१.७ मिमी, पालघर २१.१ मिमी, रत्नागिरी १९.५ मिमी  आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९.१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :

ठाणे  १३.६, रायगड २१.७, रत्नागिरी १९.५,  सिंधुदुर्ग १९.१,  पालघर २१.१, नाशिक ३.१, धुळे ०.३, नंदुरबार ६.५, अहिल्यानगर ०.४, पुणे ६, सोलापूर ०.२,  सातारा ८.१,  सांगली ३.२,  कोल्हापूर १३.९, जालना ०.१, बीड ०.२,  धाराशिव ०.२, नांदेड ०.४,  परभणी ०.२, हिंगोली ०.६, बुलढाणा ०.१, अकोला ०.२, अमरावती ०.५, यवतमाळ ०.२, वर्धा ०.९, नागपूर ०.२, भंडारा १.६, गोंदिया ३.८, चंद्रपूर ०.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भिंत पडून व्यक्ती जखमी झाली. नागपूर जिल्ह्यात औद्योगिक रिऍक्टरचा स्पोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  मुंबई उपनगर जिल्ह्यात आगीच्या घटनेत दोन व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दोन व्यक्ती जखमी आणि वीज पडून एक प्राण्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी प्रशासनाने दक्ष राहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

Oplus_0

मुंबई, दि. १८: वारकऱ्यांसाठी वारी मार्गात कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याचबरोबर आजपासून सुरू होणाऱ्या आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, स्वच्छता, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

निर्मल भवन येथे आषाढी वारीनिमित्त आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस दूरदृष्टी प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी व पुरेसे टँकर उपलब्ध करुन द्यावेत. तसेच सर्व पाण्याच्या स्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावेत. महिलांसाठी हिरकणी कक्षांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना यासंदर्भात सूचना द्याव्यात. तसेच वारी काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही वारी “स्वच्छ वारी, सुरक्षित वारी, भक्तीमय वारी” बनवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वारी मार्गावर आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात यावे, औषधसाठा मुबलक ठेवावा व रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. काही ठिकाणी कोविड रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाने सतर्क राहावे, योग्य तपासणी व खबरदारी घ्यावी. ऊर्जा विभागाने वीजवाहित तारांचे व्यवस्थापन योग्यरित्या करावे, अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यावर्षी अधिक पावसाची शक्यता असल्याने जलरोधक मंडप, जर्मन हॅंगरची व्यवस्था केली जावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस आणि प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे. मोबाईल नेटवर्क व्यवस्थित राहावे यासाठी संबंधित कंपन्यांना सूचना पाठविण्यात याव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले की, “वारकरी ही आपल्या श्रद्धेची शिदोरी घेऊन पंढरपूरकडे चालत येतात. त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देऊ नये, हीच आपली जबाबदारी आहे.”

या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदींनी सहभागी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करुन यशस्वीपणे करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी प्रशासनास दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम,  पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे सकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात येणार आहे. योग कार्यक्रमास विविध मान्यवरांसह वारकरी सहभागी होऊन योग करणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पूर्व तयारी करावी.

शहरातील विविध शाळांमध्येदेखील वारकरी भक्तीयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनासहित स्वयंसेवकांना बसण्याच्या जागेसह, ओळखपत्र, एकसारखे टीशर्ट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी उपलब्ध करुन द्यावेत. शाळेत योगाकरीता लागणाऱ्या लागणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्याव्यात.

वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याकरीता क्युआर कोड, फेसबुक लाईव्ह, अधिकाधिक वारकऱ्यांचा सहभागी होतील याकरीता अधिकाधिक जनजागृती करावी. यामध्ये शहरातील विविध भागात विशेषत: दिंडीचा मुक्कामाचे ठिकाण, मार्गावार महानगरपालिकेने जाहिरात फलके लावावीत. एकंदरीत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाचे संयोजक व संकल्पक राजेश पांडे यांनी ‘वारकरी भक्तीयोग’ नियोजनाबाबत माहिती दिली.

०००

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून या कामांना गती द्यावी असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व विदर्भ विकास महामंडळाकडील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस आमदार सर्वश्री अनुप अग्रवाल, राम भदाणे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, श्याम खोडे, संजय पुराम, चंद्रकांत रघुवंशी, अमश्या पाडवी, वसंत खंडेलवाल, खासदार शोभा बच्छाव ,माजी मंत्री सुभाष भामरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे तापी  व विदर्भ विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विविध सिंचन योजनेच्या कामांचा आढावा  घेताना मंत्री महाजन म्हणाले, सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी. धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याकरिता महत्त्वाचे असलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत आवश्यक भूसंपादन करण्याबाबत कार्यवाही करावी. याबाबतचा  प्रस्ताव सादर करावा. गोंदिया जिल्ह्यातील कुवाडास नाला प्रकल्पासाठी  आवश्यक प्रशासकीय मान्यता घेण्याबाबतची कामे कालबद्ध पद्धतीने करावीत.

मंत्री महाजन यांनी जामनेर येथील भागपूर उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेऊन वाघूर उपसा सिंचन योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून घेण्यात येणाऱ्या शेततळ्यांची कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शेळगाव बँरेजवरील यावल उपसा सिंचन योजना कामांना गती देण्याबरोबरच अमोदा सहकारी उपसा सिंचन योजना, बामनोद सहकारी उपसा सिंचन योजना आणि दादासाहेब जि. तु. महाजन सहकारी उपसा सिंचन योजना भालोद कामाचा आढावा घेऊन या योजनेच्या कामाबाबतही सूचना दिल्या.

बैठकीत तापी प्रकाशा बुराई उपसा सिंचन प्रकल्पाचा आढावा, अक्कलपाडा (निम्न पांझरा) धरण पूर्ण क्षमतेने भरण्या संदर्भात अतिरिक्त भूसंपादन करणे तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता बाबत भागपूर उपसा सिंचन योजना, टप्पा-१ व टप्पा २ ता. जामनेर,  वाघुर प्रकल्प शेततळयांच्या व उर्वरित कामांसदंर्भात, ता. जामनेर, यावल उपसा सिंचन योजना (उध्भव शेळगांव बॅरेज) ता. यावल, जि. जळगाव व बामनोद, भालोदा, आमोदा प्रकल्पांची आढावा, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत कुवाडहास नाला प्रकल्प आढावा, इसापूर जलाशय उपसा सिंचन योजना प्रस्तावित करणे, अकोला शहर विकास योजनेसाठी पाटबंधारे विभागाद्वारे विट्टपा व मोर्णा नदीचे निळी व लाल ते रेष आखणी सर्व्हेक्षण नकाशे निरस्त करणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात उच्चस्तरीय संयुक्त बैठक झाली.

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, उपसचिव अरविंद पगार, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव श्री. मराळे, दिव्यांग कल्याण विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री कडू म्हणाले की, पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या सर्व मजुरीची कामे मनरेगात समाविष्ट करावीत, फळपिके व दुग्धव्यवसायालाही ‘मनरेगा’शी जोडावे, ‘मनरेगा’मधील मजुरी ३१२ रुपये वरून ५०० रुपये करण्यात यावी, दिव्यांग व विधवांना दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे या मागण्या बैठकीत करण्यात आल्या.

या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री गोगावले म्हणाले, या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून, योग्य तो अभिप्राय घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्य शासन या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन अदा करावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

मंत्रालयात नागपूर व रत्नागिरी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, रत्नागिरी जिल्हा बैठकीस आमदार शेखर निकम, नागपूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाबा आष्टणकर उपस्थित होते. रत्नागिरी बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्ष श्री. कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारशी संबंधित विषयांबाबत विभागाने सर्वंकष माहिती तयार करावी. यासंदर्भात लवकरच दिल्ली येथे केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. रेशनकार्ड शोध मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण बंद झाल्यास धान्याचा कोटा वढविणे शक्य होईल. धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल कमिशन वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांना ओळखपत्र देण्यात यावे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्राधिकृत करावे. तसेच ऑफलाईन धान्य वितरणाची परवानगी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...